जलसंधारण वर्तमान आणि भवितव्य

विवेक मराठी    04-Jun-2018
Total Views |

जलसंधारण करताना ते स्थलानुरूप असायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची गरज आहे. उपाय योजताना त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, चढउतार, मातीच्या थराची जाडी, दगडाचे प्रकार, पावसाचं प्रमाण, जागेची निवड आणि जागेच्या निवडीप्रमाणे तिथे योजलेल्या उपायांची निवड, उपलब्ध जागा, पाणी वापराचं प्रमाण आणि कालावधी, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्यानुसार योग्य कामं केली तर जलसंधारण यशस्वीपणे राबवता येतं.

भारतीय माणूस तसा उत्सवाच्या बाबतीत अत्यंत उत्साही! म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचा उत्सव करून टाकायला आवडतं. समूह एकत्र आला की काम करणंa खरंतर सोपं होतं, पण त्याची सांगड उत्सव किंवा स्पर्धा याच्याशी घातली, की बरेचदा मूळ मुद्दा हरवून जाण्याची भीती आणि शक्यता असते. समूहाने काम करणं म्हणजे तज्ज्ञ मंडळींनी ठरवून दिलेलं काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करणं हे आहे, एके ठिकाणी झालेलं काम बघून, आपलं आपण, अभ्यास न करता ठरवून, मन मानेल तसं करणं नव्हे, हे अजूनही बऱ्याच लोकांच्या ध्यानात येत नाही असं दिसतंय. सध्या जलसंधारण, लोकसहभाग, त्यासाठी स्पर्धा, लोकांनी एखादा दिवस श्रमदान करून या कामाला पाठिंबा दाखवणं, शक्य तिथे आर्थिक मदत करणं, या सर्व गोष्टींवर माध्यमांत आणि सोशल मिडीयामध्ये गरमागरम चर्चा करणं (बरेचदा ती मुद्दे सोडून किंवा अर्धवट माहितीवर करणं), इत्यादी गोष्टी जोरात चालू आहेत. 

आज कुठेही पाहिलं, मग ते शहर असो की खेडं, हेच दिसतं की पाणीटंचाई आहेच. पाण्याचा प्रश्न सगळीकडेच आहे. शहरात तो पटकन दिसतो कारण लोकसंख्या एका जागी केंद्रित झाली आहे. जेव्हा मी पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारण या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, की पाणीटंचाई कमी पाऊस पडणाऱ्या आणि मुबलक पाऊस पडणाऱ्या प्रांतांत साधारण सारखीच आहे. म्हणजे, पडणाऱ्या पावसावर पाणीटंचाई अवलंबून आहेच असं नाही, तर टंचाई ही सर्वव्यापी आहे हे लक्षात आलं. ही जाणीव आहे 2000 सालामधील. तेव्हापासून आजपर्यंत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय, पण काही विभाग आणि योजना सोडल्या तर परिस्थितीत म्हणावा तसा बदल घडताना दिसत नाही. कमी आणि जास्त पाऊस असलेल्या, दोन्ही ठिकाणी पाणीटंचाई का निर्माण होते आहे, या परस्परविरोधी गोष्टींमागे काय काय कारणं आहेत याचा शोध घेताना अनेक गोष्टी कळल्या. या लेखाद्वारे त्या मुद्दयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आजचं जलसंधारण 

आज काय चालू आहे? तर पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा, विदर्भ असो की खानदेश, कोकणातील सह्याद्रीजवळ असलेला प्रदेश असो की किनारपट्टीजवळ असलेली सपाटी, या सर्व ठिकाणी जलसंधारणासाठी बहुतेक वेळा सारखेच उपाय वापरले जातात. जलसंधारणाचे उपाय योजताना पावसाचं प्रमाण, जमिनीची जडणघडण, मातीचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती, जिथे काम करणार आहोत त्या भागातील लोकांची गरज, स्त्रोतांचे प्रकार आणि त्यांची ताकद, इत्यादी गोष्टींचा फार काही विचार होतो असं दिसत नाही. कुठेही गेलं तरी तेच बंधारे (check dams), कोल्हापूर पध्दतीचे बंधारे (KT Weir) आणि पाझर तलाव हे सरकारी उपाय केलेले दिसतात. हल्ली, त्यात शेततळी आणि समतल चर (CCT) या दोन गोष्टींचं प्रमाण आणखी वाढलं आहे. शेततळी बांधतानाही, सरकारी पातळीवर काम सोपं व्हावं म्हणून किंवा अन्य अनाकलनीय कारणांनी शेततळयाचं आकारमान निश्चित केलं जातं. त्यामुळे, कोकणात तर अशी परिस्थिती होते की सरकारी निकष पूर्ण करून मदत मिळवण्यासाठी किंवा 'टार्गेट' पूर्ण होण्यासाठी चांगली माती खरवडून काढून तथाकथित तलावाच्या बांधावर घातली जाते आणि तळ खरवडून मुरूम शिल्लक राहतो. त्यामुळे होतं काय, पावसात चांगली माती प्रवाहाबरोबर वाहून जाते आणि मुरूम असल्याने पाणी टिकत नाही. म्हणजे हे सगळं ज्या कारणासाठी केलं जातं, ते होतंच नाही. शेवटी यात पाणी, माती, शेतीची जमीन, पैसा, श्रम, वेळ, इत्यादी अक्षरश: वाया जातं.

अनेक स्वयंसेवी संस्था जलसंधारणाच्या कामात सहभागी झाल्यापासून आणि या कामांत यंत्रांचा वापर वाढल्यापासून तर अनेक नवीन प्रश्न तयार व्हायला लागले आहेत, ज्यातले अनेक प्रश्न आज बहुसंख्य लोकांच्या जाणीवेतही नाहीत. यात सर्वात क्लिष्ट वाटणारा प्रश्न आहे तो नदी खोलीकरण. नदी पात्रातील गाळ काढून पाण्याच्या साठवणीसाठी जास्त जागा तयार करणं हे एक आणि गावाची पाण्याची गरज गणित करून काढून त्याप्रमाणे नदीच्या पात्रात आणि उतारात फेरफार करणं, त्यासाठी यंत्र वापरून नदी पात्र खरवडून काढून तिथे डोह तयार करणं या दोन वेगळया गोष्टी आहेत हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की सर्व समस्यांच्या उपायांचे सुलभीकरण करण्याची मोहीम सुरू आहे आणि हेच सुलभीकरण जेव्हा सारासार विचार न करता होतं, तेव्हा समस्या आणखी क्लिष्ट होत जातात.

पावसाची सरासरी आणि जलसंधारण शक्यता

महाराष्ट्राच्या पावसाचा विचार केला तर हे लक्षात येतं की वेगवेगळया प्रांतांत पाऊस खूप वेगवेगळा पडतो. म्हणजे, राज्याची पावसाची सरासरी 1100 मिलीमीटरच्या आतबाहेर आहे, पण सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात पडतो तो 418 मिलीमीटरच्या आसपास आणि सर्वात जास्त पाऊस पडतो तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत, साधारण 3300 मिलीमीटरच्या आतबाहेर. एवढंच नव्हे, तर जिल्ह्यातसुध्दा पाऊस कमालीचा फरक दाखवतो. उदा. पुणे जिल्ह्यात एकूण पाऊस अंदाजे 750 मिलीमीटर, पण जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस दौंड तालुक्यात पडतो तो साधारण 450 मिलीमीटर आणि सर्वात जास्त पडतो वेल्हा तालुक्यात, तो अंदाजे 2600 मिलीमीटर! हा फरक पाहिला तर हे लक्षात येईल, की महाराष्ट्रात भौगोलिक परिस्थितीबाबत एवढं वैविध्य आहे की समस्या वेगवेगळया आहेत आणि त्यांचं समाधान कोणत्याही एकाच उपायाने करणं जवळजवळ अशक्य आहे. आणि आपण जलसंधारण करताना नेमकं हे विसरतोय आणि सगळीकडे सारखेच उपाय करायला जातोय.

 

सध्या काय होतंय ?

सरकारी, खाजगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर जे प्रयत्न केले जात आहेत त्यातील बरेच प्रयत्न हे ठराविक प्रकारचे उपाय सगळीकडेच योजून त्यातून जलसंधारण करायचा प्रयत्न होतोय. आणि त्यात भौगोलिक आणि इतर फरक आणि कारणं विचारात न घेतल्याने ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्यापैकी काही ठळक समस्या आणि कारणं खालीलप्रमाणे

Check Dams - भरपूर पाऊस पडणाऱ्या भागांत गाळ साठून पाणी अडवण्यात अयशस्वी. गाळ काढला जात नसल्याने पाण्याच्या साठयासाठी अजिबात उपयोग नाही. 

KT Weirs - दरवाजे बंद होत नसल्याने/चोरीला गेल्याने पाणी साठत नाही, त्यामुळे बहुतांश ठिकाणी अयशस्वी.

जागा आणि उपाय निवड - बंधारे, पाझर तलाव, आणि एकूणच उपाय आणि ते करण्याच्या निवडलेल्या चुकीच्या जागांमुळे बहुसंख्य ठिकाणी आलेलं अपयश.

कामाचा दर्जा - कामाचा दर्जा निकृष्ट असणं, काम अपुरं करणं आणि त्यामुळे येणारं अपयश

स्वार्थ - जिथे वर्षभर पाणी देणारा स्त्रोत नसेल आणि ऊर्जा उपलब्ध नसेल तिथेही लोकांच्या मागणीला बळी पडून किंवा राजकीय फायद्यासाठी नळपाणी योजना राबवणं.

वनराई बंधारे - दरवर्षी त्या भागातील माती कायमस्वरूपी गमावणं आणि हे करणाऱ्या लोकांच्या जाणीवेतही नसल्याने त्यावर काहीच विचार वा कृती न होणं.  

नदी खोलीकरण - माणूस आणि एकूणच पर्यावरणावर घटक यावर परिणाम होऊन समतोल ढासळणे. नदीचा प्रवाह थांबून डोह तयार होणे. अजूनही गावाचं सांडपाणी त्याच नदीत जात असल्याने आणि आता प्रवाह थांबल्याने ते डोहात साचल्याने पूर्ण साठा प्रदूषित होणे आणि भूगर्भातील पाण्याच्या दर्जावरही प्रतिकूल परिणाम होणे. सध्या पोकलेन आणि JCB यांसारख्या यंत्रांचा वापर बेसुमार केला जातोय. यंत्र हातात आल्यावर, सारासार विचार बाजूला ठेवून, स्पर्धात्मक पध्दतीने काम करून कुठेही आणि कितीही जमीन खणली जाते आहे, माती हलवली जाते आहे. हे करताना, निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल आपण घालवत आहोत याची जाणीव बहुसंख्य लोकांना नाहीये किंवा त्याची पर्वा नाही. एखाद्या स्त्रोतात साठलेला गाळ काढणं आणि स्त्रोत खरवडून, खणून खोल करणं यातला फरक आणि त्याचे परिणाम या दोन्ही गोष्टींबद्दल लोकांमध्ये अनभिज्ञता आहे आणि बरेचसे तज्ज्ञही यावर चकित करणारी शांतता बाळगून बसले आहेत.

वृक्षलागवड / वृक्षारोपण चळवळ - हा पाण्याशी थेट संबंधित मुद्दा नसला तरी जंगल वाचवणं, वाढवणं या दोन्ही गोष्टींमुळे त्या भागातील जमिनीत पाणी जिरण्याची आणि साठून राहण्याची खात्री असते. तसंच, यामुळे जमिनीची धूपही होत नाही. पण सध्या जंगल वाचवणं किंवा तयार करायचा प्रयत्न करणं, याऐवजी वृक्षलागवड करण्यावर लोकांचा जास्त भर आहे. त्यातही, माणूस केंद्रस्थानी ठेवून, त्याच्या फायद्याची झाडं निवडली जात आहेत. यात निसर्गाचा समतोल हा विचारच नसल्याने त्याबद्दल काहीच होत नाही. फक्त वृक्ष लावून फार फायदा नाही पण जर त्या भागातील हिरवाई वाढवली, जंगलाचा तुकडा तयार केला, तर त्याचा निश्चित जास्त फायदा मिळेल.   

हे झालं एकूण राज्याविषयी. कोकणात तर परिस्थिती अजून गंभीर आणि क्लिष्ट आहे. मुळात इथे भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे बहुसंख्य लोकांचा समज किंवा प्रश्न हा की एवढा पाऊस पडत असताना पाणी अडवण्यासाठी वेगळे उपाय करायची काय गरज? आणि जे उपाय केले गेलेत आजपर्यंत, त्यात कितीसं यश आलंय?

आपण कोकणात या जलसंधारणामुळे आणि कामांच्या सध्याच्या अंमलबजावणीमुळे निर्माण होणारे प्रश्न बघूया -

 * कोकणात जवळपास सर्वत्र असलेले भरपूर उतार, समुद्राजवळचा सपाटीचा खोलगट भाग, उतार आणि भरपूर पावसामुळे तयार झालेले वेगवान प्रवाही स्रोत, स्रोतांच्या उगमापासून ते समुद्र किंवा खाडीपर्यंत असलेल्या कमी अंतरामुळे काम करण्यासाठी हातात कमी असलेला वेळ.

* तीव्र उतारांमुळे साठवणूक करण्यासाठी जागा खूप कमी मिळते आणि मातीचा थर कमी असल्याने आणि जिथे जांभा दगड आहे तिथे तो पाणी धरून ठेवत नसल्याने साठवणुकीत येणारी अडचण 

* मातीची पाणी धरून ठेवण्याची कमी आणि वेगवेगळी असलेली क्षमता, त्यामुळे वेगवान प्रवाहात वाहून जाणारी माती आणि त्यामुळे होणारं कायमस्वरूपी नुकसान 

* आतापर्यंत झालेली आणि अजूनही होत असलेली बेसुमार वृक्षतोड, कमी झालेली शेती आणि त्यामुळे मातीचं झालेलं नुकसान यामुळे प्रवाहाबरोबर येणाऱ्या गाळामुळे वर्ष दोन वर्षांत पूर्ण भरून जाणारे check dams. 

* बंधारे बांधताना केलेल्या सुरुंग स्फोटांमुळे तळाच्या खडकाला पडणाऱ्या सूक्ष्म भेगा आणि त्यामुळे खाली झिरपून जाणारं पाणी.

* कामाची निकृष्ट अंमलबजावणी, चुकीच्या निवडलेल्या जागा आणि इतर मानवनिर्मित घटक.

या सर्व अडचणींचा पाढा वाचल्यावर आता प्रश्न पडला असेल की हे सगळं होतंय आणि हे बदलायला हवंय हे ठीक, पण मग जलसंधारण करताना काय लक्षात ठेवायला हवं, काय करायला हवं, ज्यामुळे कामात यश मिळेल?

जलसंधारण करताना ते स्थलानुरूप असायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची गरज आहे. उपाय योजताना त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, चढउतार, मातीच्या थराची जाडी, दगडाचे प्रकार, पावसाचं प्रमाण, जागेची निवड आणि जागेच्या निवडीप्रमाणे तिथे योजलेल्या उपायांची निवड, उपलब्ध जागा, पाणी वापराचं प्रमाण आणि कालावधी, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्यानुसार योग्य कामं केली तर जलसंधारण यशस्वीपणे राबवता येतं.

वरील मुद्द्यांचा अभ्यास करून जी कामं आपल्याला स्थलानुरूप करता येऊ  शकतात, त्यांच्याबद्दल थोडी माहिती खाली देतोय -   

* पाझर तलाव - हा साधारणपणे गावाच्या आणि गावातील जलस्त्रोतांच्या वरच्या बाजूला केला जातो. तळाशी दगड असेल तर हा पाझर तलाव न होता साठवणीचा तलाव होऊ शकतो. त्यात पाणी साठू शकतं पण त्याचा फायदा खालच्या स्त्रोतांना होत नाही. त्यामुळे, पाणी अडवण्यात यश मिळालं तरी त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे खाली माती असेल तरंच हा उपाय करावा.  

* झऱ्यांच्या समोर कुंड बांधणे - हे झऱ्यांच्या मुखाशी बांधलं जातं. यामुळे वाहणाऱ्या प्रवाहाचा वेग कमी होऊन झऱ्याचे आयुष्य तीन ते चार महिन्यांनी वाढतं. पाणी स्वच्छ राहतं आणि वापर करणं सोपं होतं. डोंगरात वसलेल्या गावांमध्ये हे विशेष उपयोगी पडतं.

* भूमिगत बंधारा - हा पाण्याच्या स्त्रोताच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला योग्य जागा निवडून जमिनीच्या खाली बांधला जातो. यामुळे त्या परिसरात भूगर्भात पाणीसाठा तयार होतो आणि त्याचा फायदा तिथल्या स्त्रोताला मिळतो. कोणाचीही जमीन वाया जात नाही, भूमिगत जलसाठा असल्याने बाष्पीभवन कमी होतं.

* वेंट असलेला बंधारा - सध्याचे बंधारे पाण्यापेक्षा गाळ जास्त साठवतात. त्याऐवजी, जर हे उघडबंद करता येणाऱ्या वेंट असलेले बंधारे बांधावेत. पावसाळयात वेंट उघडया ठेवल्या जातात. त्यामुळे माती पाण्याबरोबर वाहून जाते. पावसाळा संपताना वेंट बंद केल्या जातात. त्यानंतर हा बंधारा स्वच्छ पाण्याने भरतो. पुढच्या पावसाळयाच्या आधी या वेंट परत काढल्या जातात. हे केल्याने बंधारे गाळमुक्त राहतात.

* साठवण तलाव - जिथे तळाला चांगला दगड लागतो तिथे जागा निवडून हा तलाव केला जातो. यात नैसर्गिकरित्या पाणी येईल आणि जमा होईल याची काळजी घेतली जाते. उन्हाळयासाठी पाण्याची सोय म्हणून हे वापरले जातात.

* जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि बळकटीकरण - अनेक ठिकाणी जुने बंधारे दिसतात. यावर बांधकाम खर्च झालेला असतो. कामांतील चुकांमुळे, निकृष्ट दर्जामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे यांचा उपयोग होत नाही. हे बंधारे दुरुस्त करून पुन्हा वापरात आणले तर त्याचा फायदा नक्कीच गावाला होतो हा आमचा अनुभव आहे.

* नवीन विहीर, रिंगवेल, बोरवेल तयार करणे - जलसंधारण यशस्वीपणे केल्यावर उपलब्ध पाणी परत मिळवण्यासाठीही काही वेळा स्रोतांची गरज असते. भौगोलिक परिस्थिती आणि वापर यांचा विचार करून विहीर, बोरवेल किंवा रिंगवेल बांधून पाणी परत मिळवता येतं.

जलसंधारणात महत्त्वाचा भाग आहे स्थलानुरूप योजना आखणे आणि त्या अचूकपणे राबवणे. यामध्ये, योग्य काम करणं हा एक भाग आहेच, पण दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो चुका टाळणं आणि जुन्या चुका दुरुस्त करणं.

तात्पर्य काय, स्थलानुरूप जलसंधारण शाश्वत यशासाठी आवश्यक आहे. उगाच एखाद्या ठिकाणी कोणी काही उपाय केला म्हणून आपण तो अभ्यास न करता आपल्या गावात करू नये. जलसंधारण म्हणजे खेळ नव्हे, की आपण त्याची स्पर्धा खेळावी. जास्त काम म्हणजे चांगलं काम नव्हे, योग्य काम म्हणजे चांगलं काम हे कायम लक्षात ठेवावं. म्हणजे कधी पश्चात्ताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही.

 पुढच्या काळात जलसंधारण यशस्वी करायचं असेल तर काही गोष्टी नक्की पाळायला हव्यात.

* कामांमध्ये स्थानिक लोकांचा प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य आहे. तसं झालं तर झालेल्या कामांची काळजी नंतर त्यांच्याकडून घेतली जाते आणि काम जास्त टिकतं आणि परिणामकारक होतं.

* केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून गावाचा प्रश्न सुटत नाही किंवा स्थलांतर थांबत नाही. जर दीर्घकालीन यश हवं असेल तर, फक्त पिण्याचं पाणी नाही, तर घरगुती वापरासाठी, गुरांसाठी, दुसऱ्या आणि/किंवा तिसऱ्या पिकासाठी, शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी, इत्यादी कारणांसाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे.

* तुमचं काम आणि योजना स्थलानुरूप असणं आवश्यक आहे. एका गावात यश देणारी योजना तशीच्या तशी दुसऱ्या गावात यश देईलच असं नाही, बरेचदा अपयशच येतं.

* जलसंधारणाचं काम सुरू करण्याआधी गावाचं पाण्याचं बजेट तयार करणं गरजेचं आहे. त्यावरून नक्की किती कामाची गरज आहे हे कळेल आणि कामाच्या यशाची व्याप्ती वाढेल.

* गावाची पाणी साठवण्याची क्षमता काय आहे आणि गावातील पीकपध्दत काय आहे याचा अभ्यास करून मग निर्णय झाला तर फायदा निश्चित होतो.

* नवीन काम करण्यापूर्वी, अस्तित्वात असलेल्या स्रोतांवर काम करून त्यांचं बळकटीकरण करणं उत्तम.

* पृष्ठभागावर पडणाऱ्या पाण्याचं नियोजन करून शक्यतो गरज भागवावी. भूगर्भातील पाणी उपसण्यावर बंधन घालून घ्यावं.

* विहिरीव्यतिरिक्त भूजल उपसण्यावर शक्यतो बंदी घालावी. अगदीच ईलाज नसेल तर पिण्यासाठी बोरवेलचा वापर करावा, पण शेतीसाठी बोरवेलमधून पाणी उपसू नये.

* दुसरा पर्याय असेल तर बोरवेल टाळाव्यात.

 

9967054460