Enter your Email Address to subscribe to our newsletters
***धनंजय दातार***
व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसा हाताशी असावा लागतो, या गैरसमजापोटी अनेक जण आधीच नाउमेद होऊन संधीपासून बाजूला राहतात. पण खरी गंमत अशी आहे की धंदा सुरू करण्यासाठी भांडवल थोडे, पण व्यवहार चातुर्य अधिक असावे लागते. व्यवसायाचे धडे शिकताना आपोआप उमगले की येथे 'दिमाग मेरा, पैसा तेरा' या तंत्राने काम चालते. कर्ज घेणे ही सर्वसामान्यांना जोखीम वाटते, पण हुशार व्यापारी कर्जाला धंद्यासाठीची संजीवनी समजतात. मीसुध्दा सुरुवातीला याच तंत्राचा वापर करून माझ्या दुकानांची संख्या वाढवली होती.
बाबांनी दुकानाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यानंतर मी आणखी कष्टाने ते नावारूपाला आणले. मालाच्या उत्तम दर्जामुळे दुबईच्या विविध भागांतून खरेदीसाठी ग्राहक आमच्याकडे येऊ लागले. त्यातही दूरवरून येणारे ग्राहक 'सोईस्कर ठिकाणी दुकानाची शाखा उघडा' अशी सूचना वारंवार करू लागले. खरे तर तेवढी झेप घेण्याची ताकद त्या वेळी माझ्या पंखात नव्हती. विक्री समाधानकारक होत असल्याने नफ्याची मोठी रक्कम माझ्याकडे साठली होती. त्याचे काय करावे हे मला समजेना, म्हणून अखेर ते पैसे मी एका बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले. एक दिवस त्या बँकेच्या व्यवस्थापकाचा मला फोन आला. भेटीमध्ये त्याने विचारले, ''दातार साहेब! तुम्ही एवढी मोठी रक्कम नुसतीच ठेव म्हणून ठेवली आहे. तुम्हाला व्यवसायाचे खर्च भागवण्यासाठी पैशाची गरज भासत नाही का? इतर व्यापाऱ्यांप्रमाणे तुम्ही ठेवीवर तारणकर्ज (लोन अगेन्स्ट डिपॉझिट) का घेत नाही?'' त्याच्या तोंडचा कर्ज हा शब्द ऐकून मी दचकलो आणि गडबडीने म्हणालो, ''छे...छे! मला ती कर्जाची भानगड नको. कर्ज म्हणजे डोक्याला ताप असतो.'' माझे उत्तर ऐकल्यावर मी धंद्यात अद्याप मुरलो नसल्याचे बहुधा त्या व्यवस्थापकाने ओळखले असावे.
तो शांतपणे म्हणाला, ''साहेब! कर्ज नेहमीच वाईट नसते, उलट धंद्यासाठी कर्जासारखी संजीवनी नसते. कर्ज व्यवसायाच्या वाढीसाठीच वापरले आणि शिस्तीने फेडले, तर त्याचा फायदाच होतो. माझे ऐकाल तर तुम्ही कर्ज घ्या आणि खर्च भागवण्यासाठी वापरले नाहीत, तर निदान त्यातून नवे दुकान तरी सुरू करा. बघा, त्यातून तुमची उलाढालही वाढेल.'' विचारान्ती मला त्याच्या सल्ल्यात तथ्य जाणवले, कारण आमचे अनेक ग्राहक दुबईतूनच नव्हे, तर जवळच्या अबू धाबी शहरातूनही आमच्या दुकानात खरेदीसाठी येत असत आणि मी त्यांच्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी दुकान उघडावे, अशी सूचना करत असत. ग्राहकांना घराजवळच वस्तू उपलब्ध होण्याची सोय झाली, तर मलाही ते हवेच होते. तरीही मी बिचकतच ते कर्ज घेतले आणि नव्या दुकानासाठी अजमानमध्ये एक जागा बघितली. आनंदाची गोष्ट म्हणजे तेथे सुरू केलेले दुसरेही दुकान फायद्यात चालू लागले. तो नफा शिलकीत साठवून सहा महिन्यांनी मी कर्ज एकरकमी फेडण्याच्या निर्धाराने बँकेत गेलो आणि त्या व्यवस्थापकाला तसे सांगितले. त्यावर तो हसून मला म्हणाला, ''आता एक काम करा. या पैशांची भर घालून तुमची ठेवीची रक्कम वाढवा आणि त्यावर जास्त कर्ज घेऊन तिसरे दुकान टाका.'' मी एकीकडे कर्जाचे ओझे मानगुटीवरून काढून टाकू इच्छित असताना हा माणूस मला जास्तीचे कर्ज घ्यायला का सांगतो आहे, हे मला समजेना. या खेपेस हे धाडस करायचे की नाही, याचा विचार मी करू लागलो.
माझ्या भांबावलेपणाचा किस्सा त्या बँक मॅनेजरने बहुधा आपल्या मित्रांच्या वर्तुळात सांगितला की काय कोण जाणे, पण मला दोन दिवसांनी दुसऱ्या एका बँकेच्या व्यवस्थापकाचा फोन आला. तो म्हणाला, ''दातार साहेब! आमची बँक तुम्हाला दोन टक्के कमी व्याजदराने कर्ज द्यायला तयार आहे. त्यातून तुम्ही जुने कर्ज फेडा आणि उरलेल्या रकमेत नवे दुकान टाका.'' आता मात्र मला या खेळाची गंमत वाटू लागली. स्पर्धात्मक वातावरणात व्याजदर असा कमी होऊ शकतो, हे मला ठाऊकच नव्हते. मी त्या पहिल्या बँकेच्या व्यवस्थापकाला फोन करून सांगितले, की दुसरी बँक मला दोन टक्के कमी व्याजदराने कर्ज देत आहे, त्यामुळे मी तुमचे कर्ज फेडून टाकणार आहे. त्यावर तो घाईघाईने म्हणाला, ''दातार साहेब! एवढयाशा गोष्टीसाठी तुम्ही दुसरीकडे कुठे जाता? तुम्ही आमच्या बँकेचे प्रतिष्ठित कर्जदार आहात. मी तुम्हाला त्यांच्यापेक्षाही आणखी दोन टक्के व्याज कमी करून देतो, पण तुम्ही अन्यत्र जाऊ नका.''
आता मला या खेळाचे व्यूहतंत्र लक्षात आले. धंद्यात जसे आम्ही पुरवठादारांशी सौदा करतो, तसेच येथेही करता येते. अखेर बँकिंग हाही एक व्यवसायच आहे आणि त्यातही आमच्यासारखीच ग्राहक टिकवून ठेवण्याची स्पर्धा असते. मी ती संधी साधली आणि फक्त चार टक्के व्याजाने नवे कर्ज घेतले आणि पहिले कर्ज फेडून शारजामध्ये तिसरे दुकान सुरू केले. त्यातही मला आणखी एक मोलाचा धडा शिकायला मिळाला. घेतलेली जागा दाखवण्यासाठी मी त्या बँक व्यवस्थापकाला बोलावले, तेव्हा ती बघताच तो म्हणाला, ''दातार साहेब! शेजारचा गाळा रिकामा आहे, तोही घेऊन टाका. आणखी दहा वर्षांनी हा भाग वर्दळीचा होईल, तेव्हा तुम्हाला अशी मोक्याची जागा मिळणार नाही.'' मी त्याचा सल्ला मानला आणि दोन्ही जागा घेऊन टाकल्या. पुढे खरोखरच त्याच्या शब्दांमागील दूरदृष्टीचा प्रत्यय मला आला.
अशा रितीने 'दिमाग मेरा, पैसा तेरा' या कौशल्यात मी पारंगत झालो. मात्र मी दोन पथ्ये पाळली. कर्जाची रक्कम मी केवळ नव्या दुकानासाठी भांडवल म्हणून वापरली आणि कर्जाचे हप्ते एकदाही चुकू दिले नाहीत. धनंजय दातार हे प्रामाणिक उद्योजक आहेत आणि ते कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरतात, ही माहिती आपोआप बँकांच्या वर्तुळात पसरली. मला अनपेक्षितपणे या सदिच्छेचा उपयोग झाला. मला एकदा सुकामेवा पुरवण्याची खूप मोठी ऑॅर्डर मिळाली होती, पण माझ्याकडे खरेदीसाठी तेवढी मोठी रक्कम नव्हती. मी वेळेत ऑॅर्डर पूर्ण केली नसती तर विश्वास गमावायला वेळ लागला नसता. पैसे कुठून उभे करावेत या विचारात असताना मला आमच्या दुकानाच्या समोरच्या रस्त्यावरील एका बँकेची आठवण झाली. त्या बँकेने मला त्यांच्या शाखेत खाते उघडण्याची विनंती पूर्वी केली होती, पण मी त्याला नकार दिला होता. तरीही प्रयत्न करून बघायचा म्हणून मी शाखा व्यवस्थापकाला फोन केला. आश्चर्य म्हणजे त्याने माझ्याकडील केवळ ऑॅर्डर बघून त्याआधारे मला झटपट कर्ज देऊ केले. मी ऑॅर्डर पूर्ण केली आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याही बँकेत मोठी ठेव ठेवली. यातून मी एक गोष्ट शिकलो, की आपली तीन-चार वेगवेगळया बँकेत खाती असणे गरजेचे असते. कुणीतरी आपल्या गरजेच्या वेळी कर्जपुरवठा करतोच.
'दिमाग मेरा, पैसा तेरा' व्यूहतंत्राचा वापर करून एका रस्त्यावरील फेरीवाल्याने मोठे दुकान खरेदी केल्याचे उदाहरण मी बघितले आहे. मी मुंबईत ज्या उपनगरात राहत होतो, तेथे हा माणूस रस्त्याकडेला बसून फळांच्या व भाज्यांच्या साली काढणारे पीलर, सुऱ्या अशा वस्तू विकत असे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिकही दाखवत असे. प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या भाज्या तो बाजारातून अगदी स्वस्तात खरेदी करत असे. जून झालेले भोपळे-काकडया-दोडके तो विकत घेई. ग्राहकांचे लक्ष भाज्यांपेक्षा साल कशी निघते यावर केंद्रित झालेले असे. बघता बघता या फेरीवाल्याने तथेच एक गाळा भाडयाने घेऊन व्यवसाय तेथे नेला. बँकांकडून कर्ज घेऊन व ते नियमित वाढवून कटलरी उत्पादनांची संख्या वाढवली. नंतर अनेक कंपन्यांची एजन्सी मिळवली आणि अखेर मालकीचे मोठे दुकान उभारले.
मित्रांनोऽ, मी येथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. 'दिमाग मेरा, पैसा तेरा' याचा अर्थ धंदा निव्वळ दुसऱ्याच्याच पैशावर करायचा असा अर्थ नाही, तर पैशाच्या जोरावर पैसा मिळवायचा किंवा त्याला कामाला लावायचा, असा आहे. 'मनी ऍट्रॅक्ट्स मनी' (पैसा पैशाला आकर्षित करतो) ही इंग्लिश म्हण उपयोगात आणणे म्हणजेच 'दिमाग मेरा, पैसा तेरा'. कर्ज घेतानाही आपल्याकडे ते फेडण्याची ऐपत असली पाहिजे. गंगाजळीची ताकद समजावून देणारे एक छान सुभाषित आहे.
अर्थेरथा निबध्यन्ति गजैरिव महागजा:।
न ह्यनर्थवता शक्यं वाणिज्यं कर्तुमीहया॥
(अर्थ - पदरी असलेला एक लहानसा निधी वापरूनही आपण व्यापारात अधिक श्रीमंत होऊ शकतो. पाळीव हत्तींचा वापर करून जंगली हत्तींना आकर्षित केले जाते व पकडले जाते, तसेच धनाद्वारे धन आकर्षित करून अधिक धन मिळवता येते.)
(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)