कानडी भ्रतार मराठीने केला।दो भाषा सेतू बळकट उभारिला॥

विवेक मराठी    18-Jun-2018
Total Views |

 

औरंगाबादला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी या जोडप्याच्या मुक्त संवादाचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. उमाताई-विरुपाक्ष या साठी-सत्तरी पार केलेल्या जोडप्याच्या भाषेविषयक या नितळ गप्पा ऐकताना आपला भाषेविषयीचा विचित्र अभिमान किंवा गंड दोन्हीही गळून पडायला होते. जिथे भाषेचे राजकारण पेटले, त्या बेळगावातील एक जोडपे कन्नड-मराठी असा अनुवादाचा बळकट सेतू उभा करते.

 "मराठीने केला कानडी भ्रतार' असे आपल्याकडे म्हणतात. या अभंगात दोघांना एकमेकांची भाषा कळेना म्हणून कशी पंचाईत होते असे विनोदाने सांगितले आहे. पण इथे मात्र वेगळेच घडले. कानडी नवरा केल्यावर कानडीतून तिने जवळपास 55 पुस्तके मराठीत अनुवादली आणि नवऱ्याने मराठीतून कानडीत 25 पुस्तके नेली. मराठी-कानडी हा सेतू बळकट करणारी ही काही काल्पनिक कथा नाही. सगळा भाषावाद बाजूला ठेवून, मूळच्या बेळगावसारख्या संवेदनशील गावच्या असलेल्या उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी या जोडप्याची ही खरीखुरी कथा आहे.

उमा कुलकर्णी या मूळच्या बेळगावच्या, 100 टक्के मराठी कुटुंबात जन्मलेल्या, वाढलेल्या, शिकलेल्या. त्यांच्यासाठी वडिलांनी विरुपाक्ष कुलकर्णी या इलेक्ट्रिकल इंजीनिअरचे स्थळ आणले, तेव्हा त्यांची कानडी पार्श्वभूमी असल्याने उमाताईंनी  लग्नालाच नकार दिला. पुढे वडिलांनी त्यांची समजूत काढली. कानडी असला तरी हा मुलगा पुण्यात राहतो आहे, त्यामुळे तुला काही अडचण येणार नाही.

विरुपाक्ष कुलकर्णी यांना लहानपणापासून वाचनाची मोठी आवड. त्यातही आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची, तसेच ललित पुस्तके - अगदी चांदोबापासून वाचून फडशा पाडायची सवय. हळूहळू त्यांची वैचारिक उंची वाढत गेल्यावर त्यांना भाषेभाषेतील भेद फार क्षुल्लक वाटायला लागले. त्यात आपण पुण्यासारख्या विद्येचे, संस्कृतीचे माहेरघर असलेल्या नगरात राहतो, याचा काहीसा अभिमानच आजही वाटतो. त्यांनी मराठी कुटुंबातील या मुलीला जीवनसाथी म्हणून मनोमन स्वीकारले. 

औरंगाबादला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी या जोडप्याच्या मुक्त संवादाचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. स.भु. संस्थेच्या हिरवळीवर मोजक्याच श्रोत्यांसमोर हवेच्या सुरेख झुळकांसोबत या दोघांनी उलगडलेले भाषेतील संवादाचे सूत्र श्रोत्यांना सुखावून गेले.

उमाताईंना कानडी भाषा वाचता येत नाही. मग विरुपाक्ष रोज सकाळी पुस्तकाची पाने वाचून टेप करून ठेवायचे. मग ते गेल्यावर दिवसभर वेळ मिळेल तसा उमाताई तो टेप केलेला मजकूर ऐकून मराठीत त्याचा अनुवाद करायच्या. त्यांचे शिक्षण मराठीत झालेले. त्यांच्या लक्षात आले की मराठीत मोठया आकाराच्या कादंबऱ्या नाहीत. तशा ताकदीचे कादंबरीकारही नाहीत. उलट कानडीत भरपूर आहेत. मग हा सगळा मजकूर आपण मराठीत का आणू नये? त्याप्रमाणे मग त्यांनी प्रथम शिवराम कारंथ यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला. पण तो आधीच कुणीतरी केल्यामुळे त्याचे पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही. मग त्यांनी कारंथांच्या दुसऱ्या कादंबरीचा अनुवाद केला. तो मात्र मराठीत प्रकाशित झाला.

इन्फोसिस फाउंडेशनच्या संचालक व प्रसिध्द लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना भैरप्पा यांच्या 'वंशवृक्ष' कादंबरीचा मराठीत अनुवाद करण्याची सूचना केली. त्यांनी त्या अनुषंगाने त्या कादंबरीला हात घातला आणि मग पुढे त्या भैरप्पांच्या लिखाणाच्या प्रेमातच पडल्या. भैरप्पांच्या बहुतांश कादंबऱ्या त्यांनी मराठीत आणल्या. भैरप्पांचे आत्मचरित्रही त्यांनी मराठीत आणले. पुढे शिवराम कारंथ, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड (''कर्नाड नाही.. कार्नाडच उच्चार आहे'' असे उमाताई आवर्जून सांगतात.) यांचेही लिखाण त्यांनी मराठीत आणले. सुधा मूर्ती यांची पुस्तकेही त्यांनी अनुवादित केली आहेत. आज त्यांची 55 पुस्तके प्रसिध्द आहेत. एका कुठल्या व्यक्तीने भारतीय भाषांत असे ध्यास घेऊन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सतत इतका मजकूर आणणे हा एक विक्रमच मानावा लागेल. अनुवाद करताना येणाऱ्या अडचणींची उमाताईंनी मोकळेपणाने चर्चा केली. कन्नड दलित साहित्याला मराठीत आणणे मला शक्य झाले नाही, ती भाषा मला अनुवाद करता आली नाही अशी स्वच्छ कबुलीही त्यांनी दिली.

कोकणी भाषा हा मराठी-कानडी यांना जोडणारा दुवा आहे. कितीतरी शब्दांचे अर्थ कोकणी भाषेत सापडून मला अनुवाद करताना मदत झाली, असा एक वेगळा मुद्दाही त्यांनी श्रोत्यांसमोर ठेवला.

विरुपाक्ष कुलकर्णी यांचा मराठी माणसांना फारसा परिचय नाही. त्याला कारणही तसेच आहे. विरुपाक्ष यांनी मराठीतून कन्नड अशी भाषांतरे केली आहेत. तेव्हा स्वाभाविकच मराठी माणसांना ते माहीत असण्याची किंवा ते वाचले असण्याची शक्यता नाही. सावरकरांच्या 'माझी जन्मठेप'चा त्यांनी केलेला कानडी अनुवाद खूप गाजला. पण हा अनुवाद प्रसिध्द होण्यासाठी 22 वर्षे लागली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कानडीत प्रकाशक आधी शोधल्याशिवाय अनुवाद करणे व्यवहार्य कसे नाही, हेही सोदाहरण सांगितले.

सुनीताबाई देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी'चा त्यांनी कन्नड अनुवाद केला. तो कुणी छापायला तयार होईना. कन्नड माणसांना पु.लं.बद्दल फारशी माहिती नाही. मग त्यांच्या बायकोचे पुस्तक कोण कशाला वाचेल, अशी भूमिका कन्नड प्रकाशकांनी घेतली. स्त्रीवादी साहित्य छापणाऱ्या प्रकाशिकेकडे हा मजकूर गेला. हे पुस्तक एका स्त्रीच्या आत्मसन्मानाचा कसा प्रवास आहे, त्याही काळात नवऱ्याला बरोबरचा मित्र समजून संसार करणाऱ्या बाईचा हा प्रवास आहे, असे पटवल्यावर त्या प्रकाशिका हे पुस्तक छापायला तयार झाल्या. पण मुद्दा अडला तो अनुवादकावर. त्यांचे म्हणणे हा एका पुरुषाने केलेला अनुवाद आहे. तो आम्ही नाही छापणार. पुढे आणखी काही काळ गेल्यावर तडजोड म्हणून या पुस्तकावर अनुवादक म्हणून उमाताईंचे नाव कसे टाकले आणि ते पुस्तक शेवटी प्रकाशित झाले, हा किस्साही उमाताईंनी श्रोत्यांना रंगवून सांगितला. ''मला आजही कन्नड वाचता येत नाही, पण ते कन्नड पुस्तक मात्र माझ्या नावावर आहे'' असे त्यांनी सांगताच श्रोत्यांनाही हसू आवरले नाही.

उमाताई-विरुपाक्ष या साठी-सत्तरी पार केलेल्या जोडप्याच्या भाषेविषयक या नितळ गप्पा ऐकताना आपला भाषेविषयीचा विचित्र अभिमान किंवा गंड दोन्हीही गळून पडायला होते. जिथे भाषेचे राजकारण पेटले, त्या बेळगावातील एक जोडपे कन्नड-मराठी असा अनुवादाचा बळकट सेतू उभा करते. ज्या आपल्या पुण्याबद्दल आपणच क्वचित हेटाळणीपूर्वक 'पुणेरी' असा उल्लेख करतो, त्या पुण्याच्या सांस्कृतिक, सांगीतिक, बौध्दिक, वैचारिक श्रीमंतीचा मला कसा अतोनात फायदा झाला, असा उल्लेख विरुपाक्षांसारखा एक कानडी गृहस्थ करतो, तेव्हा एक मराठी म्हणून आपण किती कोते आहोत असेच वाटत राहते. मोकळेपणाने भाषांना एकमेकांच्या सहवासात राहू-वाढू-विकसित होऊ दिले पाहिजे, याची खात्री पुन्हा पुन्हा पटते.  

एखादे व्रत घ्यावे तसे हे जोडपे कन्नड-मराठी भाषाव्यवहारात बुडून गेले आहे. विरुपाक्ष अस्खलित मराठी शुध्द उच्चारांसह बोलतात, तेव्हा तर हे कानडी आहेत हे सांगूनही पटत नाही.

उमाताईंचे 'संवादु अनुवादु' या नावाने 400 पानांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे (मेहता प्रकाशन, पुणे). त्या पार्श्वभूमीवर या जोडप्याने एकमेकांशी आणि श्रोत्यांशी साधलेला संवाद खूपच जिवंत वाटला. भैरप्पांना मराठी वाचकवर्ग फार मोठया प्रमाणात मिळाला. मला कानडीपेक्षा जास्त मराठी वाचक मिळाला असे भैरप्पा जेव्हा सांगतात, तेव्हा त्यात उमाताईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे हे जाणवते. भैरप्पांना मराठी चांगले कळते. त्यांच्याशी संवाद साधताना ते आवर्जून सांगतात, ''तुम्ही मराठीतच बोला. मला या भाषेचा नाद फार आवडतो.''

कार्यक्रमाचा शेवट करताना संयोजकांनी आभाराला सुरुवात करताच उमाताई यांनी त्यांना थांबविले आणि त्यांनी एक अफलातून सूचना केली. विरुपाक्ष यांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा कन्नड अनुवाद केला आहे, त्याने आपण शेवट करू अशी सूचना केली. विरुपाक्ष यांची वाणी अतिशय शुध्द, आवाज स्वच्छ, किनरा, टोकदार. त्यांच्या तोंडून पसायदान ऐकताना काहीतरी विलक्षण ऐकत आहोत असाच भास होत होता. पसायदान तर सगळया मराठी माणसांच्या ओठांवर आहे. त्यांचे कन्नड शब्द ऐकताना मराठीच होऊन गेले आहेत असे वाटत होते. पसायदानाच्या शेवटी 'ज्ञानदेवानी वरदिंदा सुखिया..' असे विरुपाक्ष यांनी आळविले, तेव्हा खरेच ज्ञानदेवांनी हे गोड कन्नड शब्द ऐकले असते तर तेही सुखावले असते, असेच वाटले.

भाषेच्या केलेल्या कामासाठी आपण या जोडप्याबद्दल कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद