राष्ट्रवादी पक्ष आपल्याइतकाच भुजबळांचा आहे आणि आपणही भुजबळांइतकेच फुल्यांचे वारस असल्याचे सिध्द करण्याचा हा केविलवाणा प्रयोग होता. पण आजच्या जमान्यात सामान्य मतदार वा कुठल्याही जातीचा नागरिक तितका दूधखुळा राहिलेला नाही. तो पगडी-पागोटयाला बळी पडणारा राहिलेला नाही. सततच्या धरसोड वृत्तीने पवारांची राज्यात उरलेली पगडीही मतदाराने उतरवलेली आहे. तुम्ही पगडी सोडून कायम सत्तापदांना जपत संभाळत राहिलात. त्यामुळे सगळे गमावल्यानंतर तुम्हाला पगडी आठवली काय?
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसाव्या स्थापनादिनाचा सोहळा पार पडला. योगायोग असा होता, की या पक्षाच्या स्थापनेचा सोहळा एकोणीस वर्षांपूर्वी मुंबईत पार पडला, त्याचे संयोजक वा यजमान छगन भुजबळ होते. त्या पक्षाची स्थापना कशासाठी झाली, ते आज भुजबळांना आठवत नाही की त्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शरद पवारांनाही आपल्या पक्षाचे प्रयोजन लक्षात राहिलेले नाही. ज्यांना आपण एक संस्था संघटना कशासाठी आरंभली व तिने किती वाटचाल केली, याचे तरी आकलन कशाला असू शकेल? अर्थात मलाही त्या पक्षाच्या स्थापनेचा सोहळा होत असल्याचे ठाऊकनव्हते. पण एबीपी माझा वाहिनीने त्याविषयी कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण दिलेले होते. मी तेव्हा एका दुर्गम खेडयात सातारा येथे होतो, म्हणूनच त्यात सहभागी होऊ शकलो नाही. मात्र प्रत्यक्षात तो सोहळा इतका गाजेल, अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण आपला प्रत्येक सोहळा व समारंभ माध्यमातून गाजला पाहिजे, याचे कौशल्य शरद पवारांनी आत्मसात केलेले असल्याने, त्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात कोणती वैचारिक देवाणघेवाण झाली, ते अंधारातच राहिले. त्यापेक्षा नसत्या गोष्टीच चर्चेत राहिल्या. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणेरी पगडी! समारंभाच्या निमित्ताने कुणा राष्ट्रवादी नगरसेविकेने मान्यवरांना पुणेरी पगडी देऊन सन्मान केला. असे अनेकदा होत असते आणि पवार अनेकदा ती पगडी घालून मिरवलेलेही आहेत. पण एकोणिसाव्या स्थापनादिनी त्यांना पक्षाचा गाडा ओढण्यासाठी त्याच पगडीचे निमित्त मिळाले. त्यांनी घाईगर्दीत एका सहकाऱ्याला सांगून प्रसिध्द 'टोपीकर' दुकानात धाडून वेगळी पगडी आणवली. मग आतापासून राष्ट्रवादी पक्षाच्या समारंभातून पुणेरी पगडी हद्दपार केली असल्याचे जाहीर करून टाकले. यापुढे आपण महात्मा फुल्यांची पगडी एकमेकांना देऊ, असेही सांगून टाकले. हा पक्ष एकोणीस वर्षांपूर्वी अशा पगडयांच्या वादातून निर्माण झाला होता काय?
पुणेरी पगडी सन्मान्य असावी किंवा नसावी, हा वेगळा विषय आहे. पण ती आणली गेली असेल तर तिला सन्मान समजण्यापेक्षा अपमान ठरवणे गैरलागू नाही काय? पवारांना विसर पडला असेल, तर पाच वर्षांपूर्वी गुजरात निवडणुकीपूर्वी असाच एक प्रसंग घडलेला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सद्भावना यात्रेमध्ये मंचापर्यंत पोहोचलेल्या एका मौलवीने मोदींना विणलेली मुस्लीम टोपी देऊ केली होती. ती तिथेच नाकारून मोदींनी त्या मौलवीला त्याची शाल देण्याची विनंती केली आणि नंतर ते चित्रण राजकीय वादाचा विषय झाले होते. एका मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारून मोदींनी अवघ्या मुस्लीम जगताचा अपमान केल्याचा कांगावा मग लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत चालू होता. त्यातून मोदींच्या व भाजपाच्या विरोधात मुस्लिमांच्या मनात किल्मिष पसरवण्याचे काम माध्यमांनी व पुरोगाम्यांनी अगत्याने केलेले होते. अर्थात त्याचा विपरीत परिणाम होऊन हिंदूंची एक मतपेढी निर्माण झाली आणि अशा टोपीबाजीला मतदारानेच शह दिला होता. पण यातून एक महत्त्वाची बाब लक्षात येऊ शकते. अशा रितीने टोपीसारख्या गोष्टी प्रतिकात्मक राजकारणात मोठा परिणाम देत असतात. त्यामुळेच इतक्या घाईगर्दीने पवारांनी ऐन वेळी फुल्यांची पगडी मागवून घेण्याचे कारण, हे राजकारण होते. त्यांना आपल्या कृतीतून एक राजकीय संदेश पाठवायचा होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी नंतर एका वाहिनीच्या चर्चेतही त्याची कबुली दिलेली आहे. पुणेरी पगडी सन्मानार्थ मिळाल्यावर पवारांनी काकडे यांना बोलावून आपल्या भाषणापूर्वी फुल्यांची पगडी आणायचे आदेश जारी केले आणि ती घाईगर्दीने आणवली गेली. मग आपल्या भाषणाचा आरंभ करताना पवारांनी हे टोपी-पगडी नाटय रंगवले. त्यांनी केलेल्या कृतीचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. तरच त्यातला राजकीय हेतू लक्षात येऊ शकेल.
आपल्याला पुणेरी पगडी दिली गेली आणि यापुढे अशी पुणेरी पगडी देण्यापेक्षा फुल्यांची पगडी दिली जावी, असे आदेशच पवारांनी दिलेले आहेत. म्हणजे यापुढे राष्ट्रवादी पक्षात पुणेरी पगडीला बंदीच जारी केल्याचा फतवा काढला गेला आहे. फुल्यांची पगडी हा शब्दच मुळात चुकीचा आहे. कारण फुले जे शिरस्त्राण वापरायचे, त्याला कोणी पगडी असे पूर्वी तरी संबोधलेले नाही. त्याला पागोटे वा फेटा म्हणून ओळखले जाते. फुले विचारांनी प्रवृत्त झालो असल्याचे नाटय रंगवतानाही पवारांना पागोटे वा पगडी यातला फरक ठाऊक नव्हता. पुणेरी पगडी म्हणजे विद्वानांची व प्रामख्याने पुणेरी ब्राह्मणांची असे एक गृहीत आहे. तसा कुणाही बुध्दिमंताचा, नामवंताचा सत्कार करताना ही पगडी आजवर दिली गेलेली आहे. पण पवारांना मात्र त्यातला ब्राह्मणी संदर्भ लक्षात राहिलेला दिसतो आहे. आजवर त्यांची देशातील ओळखही कधी महाराष्ट्राचे नेते अशी नव्हतीच. बलवान मराठा ही त्यांची जातिवाचक ओळख दिल्लीतले पत्रकार अगत्याने करून देत राहिले. पण महाराष्ट्राने मात्र पवारांना कधी एका जातीचे पुढारी मानलेले नव्हते. मात्र स्थापनादिन सोहळयात त्यांनी दिल्लीकर पत्रकारांना खरे ठरवले आणि पुणेरी पगडीला ब्राह्मण ठरवून तिच्यावर पक्षात प्रतिबंध जाहीर केला. तसे करायला अजिबात हरकत नाही. पण त्यात लपवाछपवीही असायचे काही कारण नाही. जितक्या उघडपणे संभाजी ब्रिगेडवाले मराठा अभिमान सांगण्यापेक्षा आपला ब्राह्मणद्वेष आवेशात मांडतात, त्याचे समर्थन तितक्याच आवेशात पवारांनी करायला काय हरकत आहे? ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे काय कारण? महाराष्ट्रात मराठा हा सर्वात मोठा समाजघटक आहे, तर त्याचे नेतृत्व पवारांनी हाती घेण्यात काय गैर असू शकते? मात्र ते असे तोंड लपवून वा मुखवटे घेऊन द्वेष करण्याची गरज नाही. आपला जातीय चेहरा पवारांनाच भयभीत करतो. म्हणून मग अशा टोपी-पगडीच्या आडोशाला जाऊन लपंडाव खेळावा लागत असतो.
नाहीतरी पवारांनी अलीकडल्या काळात आपले 'मराठे'पण ठळकपणे दिसावे, यासाठी सतत संधी शोधलेल्या आहेत. पण त्यांचे दुर्दैव असे आहे, की मराठा समाज कधीच जातीय नव्हता आणि त्याने कधीही जातीय राजकारण वा संघटना यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्याची काल-परवाची साक्ष म्हणजे मराठा मूक मोर्चा होय. कोपर्डीची घटना घडल्यावर जितक्या तटस्थतेने महाराष्ट्र एका मराठा मुलीवर झालेला बलात्कार व हत्या याकडे काणाडोळा करीत राहिला, त्यावर उमटलेली ती संतप्त प्रतिक्रिया होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असे लाक्षणिक भव्य मूक मोर्चे निघाले आणि त्यात कुठलीही हिंसा झाली नाही की कोणाच्याही विरोधात गर्जना, घोषणा झालेल्या नव्हत्या. पवार एका शब्दानेही त्याचे कौतुक करू शकले नाहीत. कारण मराठा मूक मोर्चा कटाक्षाने जातीय अभिमानापासून व अभिनिवेशापासून मैलोगणती दूर राहिलेला होता. त्यात कुठल्याही जातिवाचक आवेशांना व भूमिकांना काटेकोरपणे दूर राखले गेले होते. किंबहुना, जातिवाचक नेते अशी ज्यांची ओळख होती, त्यांना त्या व्यासपीठावर वा नेतृत्वाच्या स्थानीही येऊ दिले गेले नाही. मराठा समाज जातिवादी नसल्याची यापेक्षा मोठी ग्वाही देण्याची काही गरज आहे काय? 'स्ट्राँग मराठा' अशीच पवारांची देशभर ओळख असूनसुध्दा त्या मूक मोर्चाचे नेतृत्व करायला पवारांना कोणी बोलावले नाही की त्यात येऊही दिले नाही. अशा बहुसंख्य समाजघटक असलेल्या मराठा लोकसंख्येचे जातीय नेतृत्व करायला म्हणूनच पवार घाबरतात. कारण तो समाजच जातिनिरपेक्ष राहिला आहे. आपला अभिमान, अस्मिता बाळगताना मराठा अन्य कुणाचा द्वेष करत नाही, ही पवारांची वा तत्सम नेत्यांची खरी अडचण आहे. त्यामुळे मग असे 'बहुजन' वगैरे आडोसे त्यांना शोधावे लागतात. त्यातून मग फुल्यांची पगडी ही कल्पना पुढे आली आहे. पण वास्तवात फुल्यांची पगडी नसते, तर पागोटे असते, हे पवारांना ठाऊक नसेल काय?
किती चमत्कारिक गोष्ट आहे बघा! पवार म्हणतात, किंवा त्यांच्या समर्थकांनी नंतर या घोषणेचा खुलासा केला, की फुल्यांची पगडी पुरोगामी विचारांचा संदेश देणारी आहे. तसे असेल तर पुणेरी पगडी पुरोगामी विचारांचा अव्हेर करणारी आहे काय? पुणेरी पगडीचा इतका विरोध कशाला? खाजगीत तसे आदेश देता आले असते, किंवा ठरावीक लोकांना मूळ संदेश देऊन तसा बदल घडवता आला असता. ते कसे करावे हे मुरब्बी पवारांना नेमके कळते. बोलायचे एक आणि घडवायचे वेगळेच, ही पवारांची ख्यातीच आहे. साहजिकच त्यांना असे जाहीरपणे पगडीच्या विरोधात फतवे काढण्याचे काही कारण नव्हते. पण त्यांना यावरून गदारोळ माजवायचा होता व पर्यायाने ही पगडी म्हणजे ब्राह्मणांचे प्रतीक असल्याची जाहीर चर्चा घडवून आणायची होती. तशी ती चर्चा झाली व होत राहणार आहे. तोच तर त्यामागचा हेतू आहे. मात्र तसा थेट आरोप आपल्यावर होऊ नये, किंवा जातीय नेता ठरवला जाऊ नये, हीदेखील चिंता आहे. बाकी फुले-आंबेडकर ही नावे केवळ देखावा म्हणून पवार घेत असतात. त्यांचे विचार वा भूमिका यांच्याशी पवारांना कधीच कर्तव्य नव्हते आणि त्यांनी आपल्या दीर्घकालीन सत्ताकारणात त्यांचा अवलंब कधी केला नाही. शरद पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते आणि त्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. पण त्या आत्महत्या रोखल्या जाव्यात आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुदृढ व्हावी, म्हणून पवार काय करू शकले? तेव्हा त्यांना कधी फुल्यांचे शेतीविषयक विचार कशाला आठवले नाहीत? तेव्हा कधी पगडी-फेटयाच्या माध्यमातून संदेश धाडायची बुध्दी कशाला झाली नाही? किंबहुना फुले केवळ पगडी वा पागोटयापुरते असल्याचा शोध पवारांनी कधी लावला? पागोटेसुध्दा एका संदेशाचे उत्तम माध्यम असते हे कधी कळले? खुद्द महात्मा फुल्यांनी त्याचा संदेश देण्यासाठी कसा वापर केला, ते तरी पवारांनी समजून घेण्याचा प्रयास केला आहे काय?
त्या काळात - म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची गर्जनाही झालेली नव्हती, त्या काळात महात्मा फुले एक सर्वमान्य व्यक्तिमत्त्व होते आणि मुंबईच्या गव्हर्नराने त्यांनाही एका समारंभाला आमंत्रित केलेले होते. अशा राजेशाही समारंभाला आमंत्रित पाहुणे नटूनथटून जात असतात. आपल्याला आमंत्रण देणाऱ्या सत्ताधीश यजमानाला प्रभावित करण्याचा त्यातला हेतू असतो. अशा समारंभाला फुले कोणता वेष परिधान करून गेलेले होते? पवारांना त्याचे स्मरण तरी आहे काय? जे छगन भुजबळ फुल्यांचाच वारसा आपण चालवीत असल्याचा दावा अखंड करीत असतात, त्यांना तरी फुल्यांच्या घोंगडी-पागोटयाचा संदर्भ कधी कळला आहे काय? गव्हर्नराच्या त्याच समारंभात तो संदर्भ सापडू शकतो. पण त्यासाठी फुल्यांच्या विचारांविषयी व भूमिकेविषयी खरीखुरी आस्था असायला हवी. नुसता त्यांच्या प्रतीकांचा राजकीय लाभ उठवण्याचा हव्यास विचारांना पुढे घेऊन जात नसतो. त्याविषयी दिशाभूल मात्र नक्कीच करीत असतो. पवारांना तरी तेच करायचे असते ना? तसेच पागोटे घालून, कमरेला लंगोटी व खांद्यावर घोंगडी घेऊन फुले गव्हर्नराच्या समारंभाला गेलेले होते. त्यातून मिरवण्यापेक्षा आपल्या रयतेची अवस्था राजसत्तेच्या नजरेस आणून देण्यासाठी महात्म्याने आयती संधी शोधली होती. उंची श्रीमंती वस्त्रेप्रावरणे परिधान करून मिरवणाऱ्या गोतावळयात पागोटे काय सांगत होते? त्याला संदेश म्हणतात. स्थापनादिन सोहळयात पवारांनी तसा कुठला संदेश दिला आहे? संदेश व विचार यांची सांगड तेव्हाच घालता येते, जेव्हा त्या विचारांना आत्मसात केलेले असते. पवारांना खरोखरच फुल्यांच्या विचारांची आस्था असती, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विविध बैठकांमध्ये वा क्रिकेटपटूंच्या सोहळयात लंगोटी व घोंगडीसह पागोटे घालून प्रवेश केला असता. तर देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी जगभर चर्चा झाली असती. पण तिथे सुटाबुटातले पवार मिरवत राहिले ना?
फुल्यांचे पागोटे हा विचार असतो, दाखवायची बाब नसते. पुणेरी पगडी सन्मानाचे प्रतीक असेल, तर फुल्यांचे पागोटे गांजलेल्या कुणबी शेतकऱ्याच्या विवंचनेचे प्रतीक असते. ती विवंचना हल्लाबोल किंवा अन्य आंदोलनातून वा पक्षीय भूमिकेतून प्रकट झाली असती, तर कुणा नगरसेविकेला पुष्पगुच्छ वा पुणेरी पगडी सन्मानार्थ पेश करायची हिंमत झाली नसती. राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल खरेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानुसार झाली असती व पवारांची जडणघडण त्या विचारांनी झाली असती, तर असे आदेश देण्याची वेळ कशाला आली असती? नेत्याच्या विचारांनी प्रभावित झालेली अनुयायी मंडळी मग त्यातून प्रतीके निर्माण करतात. अमुक एका टोपीचा वा प्रतीकांचा वापर करा, असला आदेश नेत्याला द्यावा लागत नसतो. मराठा मूक मोर्चात भगवे ध्वज घेऊन यावे, असे आदेश कोणी दिलेले नव्हते की फतवे काढायची वेळ आलेली नव्हती. आपोआप तिथे भगवे झेंडे फडकले, कारण तो विचार मराठी माणसाच्या हाडीमाशी खिळलेला आहे. शिवराय ही मनात रुजलेली व उपजत मिळालेली भेट असते. त्याचे प्रतिबिंब मग कृतीत आपोआप पडत असते. पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करून दोन दशकांचा कालावधी उलटला आणि अजून त्यांना आपल्या पक्ष सहकाऱ्यांना महात्मा फुल्यांचा विचार शिकवता आला नाही, की त्यांच्या मनात रुजवता आलेला नाही. कारण तो पवारांच्या आस्थेचा विषय नाही की पक्षाची ती भूमिका नाही. आज पक्षाची सगळीकडून होरपळ चालू असताना, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून मग 'बुडत्याला पगडीचा आधार' तसे पवार फुले पगडीला हाताशी धरून आपले हेतू साध्य करायला पुढे सरसावले आहेत. कुठल्याही दगडाला शेंदूर फासला की मग त्याचा देव बनवला जातो, तसाच हा प्रकार आहे. अकस्मात पवारांना व त्यांच्या पक्षाला असली प्रतीके शोधावी व वापरावी लागत आहेत. बाकी त्यातला विचार वगैरे भाग दुय्यम वा दिखाऊ आहे.
पवार दहा वर्षे खुद्द कृषिमंत्री होते. म्हणजे फुल्यांच्या विचारधारेनुसार ते पवारच कुणबी रयतेचे सत्तेतील प्रतिनिधी होते. त्याही काळात शेतकरी अन्यायाशी झुंजायला चवताळून रस्त्यावर उतरला होता. त्याच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेण्याच्या आदेशाला त्या रयतेने आव्हान दिले होते. तेव्हा पवारांना कधी फुले व शेतकरी आठवला होता काय? मुंबई-पुणे महामार्गावर त्या रयतेने शेतकऱ्याने रास्ता रोको केला. त्याच्यावर गोळया झाडणारा कोणी पुणेरी पगडी परिधान करून पुढे सरसावलेला नव्हता. त्या गोळया झाडणाऱ्यांच्या अंगावर पोलिसी गणवेश होता आणि त्याचे बोलविता धनी पवारांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे गृहमंत्री होते. तेव्हा त्यांचा कान पकडून महात्मा फुले व त्यांचे शेतकरीविषयक विचार कधी पवारांनी सुनावले होते काय? अशा गृहमंत्र्याच्या डोक्यावरची पांढरी गांधी टोपी काढून त्याच्या माथ्यावर फुल्यांची पगडी पागोटे चढवण्याची बुध्दी पवारांना झाली होती काय? उलट अशा वेळी शेती परवडत नसेल तर शेती सोडून देण्याचा आगंतुक सल्ला देणारे खुद्द पवारच होते ना? त्यात कुठला फुले विचार सामावलेला होता? आज बाजारभाव मिळत नाही वा कर्जमुक्ती होत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला, तर त्याला टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन पवार करतात. पण हिंजवडी भागातील शेतकरी टोकाची भूमिका घेऊनच रस्ता रोकोला उतरला होता ना? मग तेव्हा फुले विचार कुठे झोपा काढत होते? ज्वलंत विचार असे कधी झोपा काढत नाहीत. म्हणूनच तेव्हाही ते विचार झोपलेले नव्हते, तर पवार त्यापासून मैलोगणती दूर होते. पवारांचा त्या विचारांशी काडीमात्र संबंध तेव्हाही नव्हता व आजही नाही. त्यांना सोयीसाठी फुले हवेत आणि त्यांची पगडी-पागोटे हवे आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे पुरोगामी राजकारणातले फोडणीचे शब्द होऊन बसले आहेत. त्यांचा सोयीनुसार वापर होतो आणि गरज संपली की मग ते विचार अडगळीत जाऊन पडत असतात.
पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळे व भयानक आहे. पवारांना आता खोटेपणाची सवय इतकी अंगवळणी पडलेली आहे, की रोज कुठले तरी खोटे बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. याच स्थापनादिन सोहळयात त्यांनी भीमा कोरेगावचाही उल्लेख केला आणि त्यात खरे आरोपी सोडून निरपराधांना गुंतवण्याचा उद्योग चालू असल्याचाही गंभीर आरोप केलेला आहे. दीर्घकाळ प्रशासकीय अनुभव गाठीशी असलेल्या पवारांना हल्ली धड खोटेही बोलणे अशक्य झाले की काय, अशी शंका येते. कारण तिथेच त्यांनी पंतप्रधानांच्या व मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रकरणावरही भाष्य केले. कोणी निवृत्त पोलीस अधिकारी त्यांना भेटला होता आणि त्याच्याकडे अशा विषयात काय कारवाई होते, अशी विचारणा केल्याचेही पवारांनी श्रोत्यांना रंगवून सांगितले. तर तो अधिकारी पवारांना म्हणाला, असे काही झाल्यास त्याची जाहीर वाच्यता करत नाहीत आणि संबंधित तपास यंत्रणांना शोध घ्यायला सांगितले जात असते. हे सांगायला तो अधिकारी आपल्या कारकिर्दीत मुख्यमंत्री वा गृहमंत्री होता आणि पवार पोलीस निरीक्षक वगैरे होते काय? कारण त्याच्या कालखंडात असे प्रशासकीय काम होत असेल, तर खुद्द पवारांनीच तसे काही केलेले असणार. त्याविषयी अधिकाऱ्याला प्रश्न विचारत बसायची गरज नव्हती. पण पवार तसे विचारतात, म्हणजेच त्यांच्याही काळात असे काही झालेले नव्हते आणि पवारांनीही असे काही केलेले नव्हते. उलट तपासाऐवजी गवगवा करण्यातच खुद्द पवारांनी धन्यता मानलेली होती. अलिबागला झालेले पक्षाचे चिंतन शिबिर साहेब विसरून गेले की काय? मालेगाव स्फोट प्रकरणात एकाच धर्माचे लोक कशाला पकडले जातात, अशी भाषा करून पवारांनी कसला गवगवा केलेला होता? आपल्यापाशी असलेली वा आलेली माहिती संबंधित अधिकारी वा सरकार यांच्याकडे सोपवण्यापेक्षा, पवार चिंतन शिबिरात त्याचा ऊहापोह कशाला करत बसले होते?
याचा अर्थ इतकाच की अधिकारी भेटला वा त्याने काय सांगितले, ही पवारांनी स्थापनादिनी ठोकलेली लोणकढी थाप होती. ज्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांची आठ-नऊ वर्षांनी जामिनावर सुटका झालेली आहे, त्यांना कुठल्याही पुराव्याशिवाय इतकी वर्षे तुरुंगात डांबून छळण्याला कोण जबाबदार होता? पवारांची लोणकढी थाप नाही, तर दुसरे काय कारण होते? आज नऊ वर्षांनीही त्यांच्या विरोधात कसलाच पुरावा नसल्याची ग्वाही तपास यंत्रणांना द्यावी लागत असेल, तर पवार किती धडधडीत खोटेपणा करू शकतात, त्याचा दुसरा पुरावा शोधण्याची गरज नाही. किंबहुना छातीठोकपणे खोटे दामटून बोलणे, हीच पवारांची प्रशासकीय ख्याती राहिलेली आहे. 1993 साली मुंबईत बाँबस्फोट मालिका झाली, त्यात अकरा स्फोट झालेले होते. पण कुठलाही स्फोट मुस्लीमबहुल विभागात झालेला नव्हता. तर हिंदू-मुस्लीम बेबनावाची शक्यता गृहीत धरून पवारांनी थेट दूरदर्शनवर बारा स्फोट झाल्याची थाप ठोकली होती. मुस्लीमबहुल मशीदबंदर भागात बारावा स्फोट झाल्याची ही थाप खपून गेली होती. नंतर पवारांनीच एका जाहीर मुलाखतीतून आपल्या खोटेपणाची कबुली दिलेली आहे. लोकहितास्तव आपण खोटे बोललो असा दावा त्यांनी केला होता. मग आज नक्षली आरोपींना पकडल्यावर पवार खरे बोलत असतील, याची कोण हमी देऊ शकतो? उद्या त्याचे पुरावे, साक्षीदार समोर आल्यावर पवार पुन्हा हात झटकून म्हणू शकतील, तेव्हा लोकहितासाठी खोटे बोललो होतो. एकूण पवारांची कारकिर्द बघितल्यास त्यात ते कधी खोटे बोलतात व कधी खरे बोलतात, त्याची त्यांनाही जाणीव नसल्याचे वारंवार सिध्द झालेले आहे. म्हणूनच त्यांचे सहकारी असोत किंवा विरोधक असोत, पवारांचे कुठलेही विधान वा भाष्य गंभीरपणे घ्यायचे बंद झालेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या फुले पगडीचे आदेश वा भूमिका अनुयायीही गंभीरपणे घेत नाहीत.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पवारांनी अशीच धरसोड वृत्ती आरंभली आणि कुठल्याही बाबतीत गंभीरपणे धोरणात्मक वा वैचारिक बांधिलकी राखली नाही, म्हणून त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे. वेगळा पक्ष काढताना त्यांनी सोनियांवर परदेशी नागरिक असल्याचा आरोप ठेवून वेगळी चूल मांडली होती. पण अवघ्या चार महिन्यांत सत्तेची हाव त्यांना त्याच काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसायला भाग पाडून गेली. तेव्हा एका क्षणात परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा त्यांनी सोडून दिलेला होता. दहा-पंधरा वर्षे राज्याची व केंद्राची सत्ता उपभोगताना त्यांना त्यात कुठे अडचण आली नाही. मग अकस्मात त्यांनी चार वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसशी असलेली आघाडी मोडून टाकलेली होती. त्यामागे कुठली वैचारिक भूमिका होती? कुठली पगडी तेव्हा त्यांनी परिधान केलेली होती? लोकसभेपासून विधानसभेपर्यंत अर्ध्या चड्डीची निंदानालस्ती केली आणि अखेरच्या क्षणी त्याच भाजपाला बाहेरून पाठिंबा देताना कुठली टोपी डोक्यावर घातलेली होती? वैचारिक भूमिकांचे आव आणताना असल्या कुठल्याही प्रश्नाचा समाधानकारक खुलासा पवारांना आयुष्यभर करता आलेला नाही. मग आता पगडीमागे दडी मारावी लागत असते. संधिसाधू राजकारण करताना पवार मराठयांचे नव्हते की पुरोगामीही नव्हते. दीर्घकाळ संधी शोधत बसताना पवारांना आपल्या राज्यातला प्रभावी प्रादेशिक पक्ष होण्याइतकीही कधी मजल मारता आली नाही. त्यांच्या तुलनेत कालचे म्हणावे असे अखिलेश वा ममता-मायावती यांनी आपला पाया विस्तारून राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण केला. त्याच्या खूप आधीपासून पवार राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. पण त्यांना कधी संपूर्ण महाराष्ट्रातही आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यापासून काही शिकण्याची तयारी नाही की विचार करण्याची गरज त्यांना वाटलेली नाही.
शाळेतला कोणी हुशार विद्यार्थी नुसता टिवल्याबावल्या करीत मागे पडावा, त्यापेक्षा पवारांची स्थिती किंचितही वेगळी नाही. ते आपणच निर्माण केलेल्या जंजाळामध्ये सतत फसत राहिलेले आहेत. त्यामुळे मग बाजूला पडल्याची भावना त्यांना असुरक्षित करीत असते आणि त्यातून नवनव्या गमतीजमती करून ते प्रसिध्दी झोतात राहण्याची केविलवाणी धडपड करत असतात. आताही फुले पागोटयाचे कथानकही म्हणूनच समजून घेतले पाहिजे. मध्यंतरी भुजबळांना अटक झाल्यानंतर ''आपल्याला कधी अटक होते, त्याची प्रतीक्षा करतोय'' असे छचोर विधान पवारांनी केलेले होते. पुढे भुजबळ दीड वर्षे तुरुंगात खितपत पडले आणि राष्ट्रवादीने त्यांच्याकडे साफ पाठ फिरवली होती. त्यातून भुजबळ नाराज नक्कीच होते. त्यांना अनुयायी वर्ग मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुखांनाही जाऊन भेटला होता. त्यावर मलमपट्टी करण्याची गरज होती. त्यातच भुजबळ सुटकेनंतर प्रथमच व्यासपीठावर झळकणार होते, तर त्यांच्यासह प्रामुख्याने माळी समाजाला खूश करण्यासाठी हे फुले पगडीचे नाटक रंगवण्यात आले. बहुधा त्या नगरसेविकेला मुद्दामच पुणेरी पगडी आणायला सांगितलेले असावे. मग ती पगडी समोर आल्यावर घाईगर्दीने फुले पागोटे मागवण्यात आले. त्यासाठी प्रवक्त्याला खुलासे देता येतील अशीही योजना आधीच आखलेली असावी. राष्ट्रवादी पक्ष आपल्याइतकाच भुजबळांचा आहे आणि आपणही भुजबळांइतकेच फुल्यांचे वारस असल्याचे सिध्द करण्याचा हा केविलवाणा प्रयोग होता. पण आजच्या जमान्यात सामान्य मतदार वा कुठल्याही जातीचा नागरिक तितका दूधखुळा राहिलेला नाही. तो पगडी-पागोटयाला बळी पडणारा राहिलेला नाही. सततच्या धरसोड वृत्तीने पवारांची राज्यात उरलेली पगडीही मतदाराने उतरवलेली आहे. सत्तेपेक्षाही भारतात पगडी प्रतिष्ठेची असते. भगतसिंगसारखा जिवावर उदार झालेला शहीदही म्हणून गेलाय - 'पगडी सम्हाल जट्टा!' पवारसाहेब, तुम्ही पगडी सोडून कायम सत्तापदांना जपत संभाळत राहिलात. आता सगळे गमावल्यानंतर तुम्हाला पगडी आठवली काय?
bhaupunya@gmail.com