डोंगरमाथ्यावरून

विवेक मराठी    16-Jun-2018
Total Views |

माणसाखालोखाल मला निसर्ग जवळचा वाटतो, असं शान्ताबाई म्हणत. ते त्यांच्या निसर्गकवितांतून दिसतं. निसर्ग नित्यनूतन असतो. तशीच नवनवोन्मेषशालिनी असते कवीची प्रतिभा! मग निसर्गातला एकच अनुभव दोन वेगळया परिप्रेक्ष्याने एकच कवी आपल्यासमोर तितक्याच कुशलतेने मांडतो. त्याचंच घडवलेलं हे दर्शन..

शान्ताबाई! मराठी चित्रपट-भावगीतांमध्ये आपला रसरशीत अमिट ठसा उमटवलेल्या कवयित्री, गीतकार, लेखिका शान्ता शेळके. 6 जून हा त्यांचा स्मृतिदिन.

अपार विद्वत्ता असूनही अगदी साधी, सोपी, सुगम शब्दरचना. अलंकारिक वा जड शब्दांचा सोस नसलेली, पण विलक्षण जिवंत, रसाळ. त्यांच्या स्वभावातून नि दिसण्या-वागण्या-बोलण्यातून अनुभवायला येत ती सारी वैशिष्टयं त्यांच्या लिखाणात जशीच्या तशी दिसत. साधेपणा, नम्रता, स्वच्छ-प्रेमळ-निरागस मन नि अपार गोडवा!

शान्ताबाईंनी गीतांव्यतिरिक्त निखळ कविताही भरपूर लिहिल्या. त्याही गीतांइतक्याच मोहक आहेत. अनेक कविता नात्यांबद्दल, प्रेमाबद्दल, एकटेपणाबद्दल बोलतात.

माणसाखालोखाल मला निसर्ग जवळचा वाटतो, असं त्या म्हणत. ते त्यांच्या निसर्गकवितांतून दिसतं. निसर्ग नित्यनूतन असतो. तशीच नवनवोन्मेषशालिनी असते कवीची प्रतिभा! मग निसर्गातला एकच अनुभव दोन वेगळया परिप्रेक्ष्याने एकच कवी आपल्यासमोर तितक्याच कुशलतेने मांडतो.

जगण्याची गजबज मागे ठेवून एकटयाने डोंगर चढून माथ्यावर जाणं हा एक लहानसा अनुभव. त्यावर शान्ताबाईंनी लिहिलेल्या या दोन भिन्न कविता. एका अनुभवात मन एकुटवाणं, उदास होतं, तर दुसऱ्या अनुभवात मन झगमगून प्रकाशतं!

ही कशाची किमया? ही निसर्गाची जादू? निव्वळ कल्पनाशक्तीची कमाल? की कवीच्या बदलत्या भावावस्थेचं प्रतीक? दृष्टी तशी सृष्टी असते, की निसर्गाने निर्माण केलेल्या वातावरणानुसार आपली मनोवस्था बदलते?

एकाच अनुभवावरच्या एकाच कवीच्या दोन भिन्न 'मूड' असलेल्या या कविता वाचताना अशी गमतीदार कोडी पडतात!

मी डोंगरमाथी आले

क्षितिजामागे क्षितिज नवे

लाभले सारे मला जे हवे

शिखरावर आभाळ स्थिर

गगन ठेंगणे केले

मी डोंगरमाथी आले!

 

सलते काय हे सुखाच्या तळी?

काटयात चिरते मऊ  पाकळी

हास्याच्या मागे काहीसे जागे

उदास उदास ओले

मी डोंगरमाथी आले!

 

वावटळ ही पुढती सुटे

घेरीत मला नेणार कुठे?

अंधारी दाट, मिटली वाट

एकटी एकटी झाले

मी डोंगरमाथी आले!

.....हा कठीण चढ चढून मी डोंगराच्या माथ्यावर पोहोचलेय. एकामागून एक अवघड वाटा-वळणं पार करत आलेल्या मला किती नवनवी क्षितिजं खुणावत होती! ती सारी सुखं आता हाताशी आहेत. जे हवं ते सुख मी चढून मिळवलं. त्या सुखाच्या माथ्यावर पाय ठेवून मी उभी आहे. आता हात वर केला तर गगनाला स्पर्शू शकेन मी!

पण या सार्थकाच्या क्षणी मला काय टोचतं आहे? माझ्या आनंदाने उमललेल्या मनाच्या पाकळीला, कुठल्या टोचणीचा काटा चिरत जातोय? मनभर पसरलेल्या हास्याच्या तळाशी ही उदासीची ओल का बरं पसरलीय? आणि हे भणाणतं वारं! या वावटळीत माझं मीपण उडून तर जाणार नाही? ही रात्रीत मिसळत चाललेली सायंकाळ.. माझ्या पायाखालची वाट हिच्या पोटात कुठेतरी हरवून गेलीय. आता या डोंगरमाथ्यावर मी उभी आहे, एकटी.. एकाकी...

यशाच्या शिखरावर एकाच माणसापुरती जागा असते म्हणतात. लौकिकाचा गुलाबही निंदेचे काटे लेवूनच हाती येतो. शान्ताबाईंना असं काही जाणवलं असेल का?

आणि ही दुसरी कविता.

 

डोंगरावरून

डोंगरावर सपाट जागी मी उभी, वर ओथंबलेले आभाळ

स्वच्छ निळाईत डवरून आलेली ढगांची शुभ्र माळ

सुसाट वारे अंगाला झोंबणारे, पदर खेचणारे, आग्रही

प्रत्येक गवतपात्यावर तिरप्या सूर्यकिरणाची सोनेरी सही

 

छाती भरभरून घेतला श्वास मी, प्यायले निर्भर वारा

डोळे विस्फारून आत भिनवला, भिनवला आसमंत सारा

वाटले मला मी साऱ्या जगाहून उंच, अस्पर्श, अलग

उजळून आली आतून, आतून एक अलौकिक झगमग

 

खाली दरीत अनामिक गाव, भातुकलीच्या खेळात मांडलेले

तिरप्या उन्हाचे झोतच्या झोत वरून खाली सांडलेले

विश्वाकार व्यथा सामावली संपुटात, गेली पार वाहून -

दैवी समाधानात निघाली अवघी अन्त:सृष्टी नाहून!

 

आला, तसा तो क्षण कालप्रवाहात वाहून गेला

सुख इतके साधे असते, तेव्हा कळलेच नव्हते मला..

 

डोंगरमाथ्यावर उभी आहे मी. आयुष्यातली सारी गजबज घाई, सारी रखरख, सारे उन्हाळे मागे टाकून, हा एवढा डोंगर चढून आलेय मी. इतक्या उंचीवर आल्यानंतर केवळ आपल्या माथ्यावरचा आकाशतुकडा दिसत नाही. चारी बाजूंनी वेढून घेतं ते अनंत आकाश.

एकीकडे  माथ्यावर आहे ओथंबलेलं, भरलेलं  आभाळ, तर दुसरीकडे अजूनही कुठे स्वच्छ निळया आकाशात तरंगते आहे शुभ्र ढगांची माळ. डोंगरमाथ्यावरचा हा सोसाटयाचा वारा... हा अंगाला झोंबतो, झटया घेतो. त्याच्या आवेगापुढे पाय रोवून उभं राहणंही कठीण जातंय. हट्टी मुलासारखे पदर खेचताहेत हे वारे... की कुठले हट्टी घोंघावणारे विचार? पण हा वाऱ्याचा आवर्त सुखावतोही तितकाच. इतकं मोकळेपण कधी अनुभवलं नव्हतं मी! या पठारावरची ही प्रसन्नता, पायाला मऊपणाने गोंजारणारी ही हिरवी गवतपाती... याचं पातं नि पातं कसं चमकतंय...हा हिरवा वास, ही निर्भर हवा मी छातीत भरून घेते.

हा डोंगरावरून दिसणारा विशाल पट, हे अनुपम दृश्य मी नजर विस्फारून साठवायचा प्रयत्न करते. हा सारा आसमंतातला जिवंतपणा, ही प्रसन्नता मला माझ्यात सामावून घ्यायची आहे.

माझं रोजचं इवलं आभाळ, माझ्या रोजच्या लहान लहान लढाया लढणारं माझं तोटकं मन, माझ्या रोजच्या धाव घ्यायच्या चाकोऱ्या... या साऱ्यात कधीही क्षितिजापर्यंत न गेलेली माझी नजर आज किती विस्तारलीय! किती दूरवरच्या अज्ञात प्रदेशांचे वेध घेतेय ती. कुठले दूरदेशीचे वारे मला काय काय सांगावे घेऊन आलेत... या चौफेर पसरलेल्या दरीखोऱ्यात भरूनही उरलेल्या किरणांचा केवढा हा पसारा! किती ऊर्जा आहे भरलेली या साऱ्यात! अचानक मला वाटू लागतं की मी खूप खूप उंच उंच झाले आहे. माझा माथा आकाशाला टेकतोय नि पाय जमिनीवरून सुटलेत. पायाखालच्या, जमिनीवरच्या जगाशी जणू माझा आता काही बंध उरला नाहीये. इथल्या विचार, विकारांपासून अस्पर्श असं हे माझं असणं. या भवतालात मी सामावून गेलेय. हा प्रकाश माझ्या आत झिरपतोय. आतून आतून उजळून निघते आहे मी. मीच प्रकाशतेय, झळाळतेय अंतर्बाह्य!

खाली नजर टाकली तर दिसतंय कुठलंसं चिमुकलं गाव. लहानपणी भातुकली मांडत असू, तसं. कदाचित त्यात माझंही जगणं असेल! माझे इवले हर्ष-खेद, माझ्या आशाआकांक्षा, माझी स्वप्नं, किती मोठी, महत्त्वाची वाटत मला. त्यांचे छोटे बिंदू झालेले मला दिसताहेत वरून. इथल्या गवतपात्यावर इवलं हस्ताक्षर उमटवणारे हे किरण कसे झोत बनून खालच्या जगाकडे झेपावत आहेत... त्या प्रकाशाच्या प्रवाहात काहीतरी सोडून द्यायला हवं खरं तर.

आतापर्यंत माझ्या व्यथा मला इतक्या मोठया वाटत की जणू साऱ्या जगाचं दु:ख माझ्याच वाटयाला आलंय. पण आत्ता या क्षणी माझ्या या साऱ्या व्यथा एका ओंजळीत मावतील इतकुशा वाटताहेत मला. मी माझ्या व्यथेचा दिवा माझ्या हवेपणाच्या द्रोणात लावून सोडून देतेय, या तेजस्वी प्रवाहात. आणि तो दिवा दूर दूर जाईल तसतसं एका अलौकिक समाधानाने माझं मन भरून येतंय. आतला आनंदाचा मळा फुलतोय, बहरतोय.

हे सारं घडलं त्या एका क्षणात. तेव्हा कुठे होते मी खरंच? आता कुठे आहे? कुठे हरवला तो क्षण? ती अलौकिक अनुभूती! तो क्षण तर काळाच्या प्रवाहात वाहून गेला. त्या क्षणाची ती सुखद जाणीव, ते भारलेपण, माझ्यातूनच विस्तारत असलेली मी... खुज्या विचारांच्या पार आलेली मी.. तेव्हा मी फक्त उभी होते काळाच्या त्या बिंदूवर.  हे सारं त्या क्षणी कुठे जाणवलं होतं! ते जाणवतंय आत्ता. त्या वेळी सारं भान विसरून त्या आसमंताचा भाग होऊन जाणं हेच सुख होतं. सुख निराळं नसतं काही. त्या वेळचा तो क्षण साधाच असतो. पण त्या क्षणाशी स्वत:ला विसरून समरस होता आलं, तर तोच पुढची सुखाची पाऊलवाट उलगडून दाखवतो.