जेरिकोचा इतिहास

विवेक मराठी    28-May-2018
Total Views |

आज पॅलेस्टाइनचा भाग असलेल्या जेरिको शहरात 3400 वर्षांपूर्वी ज्यू (हिब्रू) लोकांनी प्रचंड संघर्ष करून आपली वसाहत केली. या ऐतिहासिक शहराविषयी आणि त्यानिमित्ताने ज्यू-अरब संघर्षाविषयी माहिती देणारा लेख.

जवळपास 3400 वर्षांपूर्वी सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाइन या भूप्रदेशात वेगवेगळया प्रकारचे पेगन लोक राहत असत. त्या वेळी तेथील प्रदेशाच्या नावावरून त्या भागात राहणाऱ्या लोकांना नावे पडलेली होती. उदाहरणार्थ, केनन प्रदेशात राहणाऱ्या लोकांना केननाईट असे म्हणत. अशा प्रकारे मोबाईट, अमोराईट, केननाईट हे लोक त्या भूप्रदेशात राहत होते. जेरिको हे त्या वेळी केननाईट लोकांचे एक महत्त्वाचे शहर होते. जेरिको हे शहर जवळजवळ 10,000 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होते. कास्ययुगामध्ये त्या शहराभोवती उंच तटबंदी असलेली एक भिंत होती. या भिंतीच्या आत जेरिकोमध्ये केननाईट लोकांची सुसज्ज आणि प्रगत अशी वसाहत होती. हे लोक पेगन असल्यामुळे मूर्तिपूजक आणि बहुईश्वरवादी होते. जेरिको हे नावदेखील केननाईट लोकांच्या 'यारीख' म्हणजेच चंद्रदेवतेच्या पूजेसाठी महत्त्वाचे असल्याने पडले असावे, असा अंदाज बांधला जातो.

त्याच काळात मोझेसने आपल्या हिब्रू बांधवांना इजिप्तमधून गुलाम म्हणून सोडवून आणून लाल समुद्रामार्गे केनन या प्रदेशात प्रवेश केला. मोझेस आपल्या हिब्रू बांधवांसह जवळजवळ 40 वर्षे केनन या प्रदेशात भटकत होता. छोटया छोटया लढाया करून आपल्या लोकांना युध्दासाठी तयार करत होता आणि हळूहळू जेरिकोच्या दिशेने पुढे सरकत होता. इस्रायलमध्ये खूप तीव्रतेने दोन प्रकारचे हवामान जाणवते. जेरुसलेमपासून उत्तरेकडे भूमध्य समुद्रीय हवामान म्हणजेच मुबलक पाऊस आणि त्यामुळे आलेली सुसह्य जीवनशैलीदेखील पाहावयास मिळते. जेरुसलेमपासून दक्षिणेकडे अत्यंत कमी पावसाचा प्रदेश आणि त्यामुळे तयार झालेले वाळवंट. जेरिको हे दक्षिणेच्या दिशेला वाळवंटात आहे आणि सध्याच्या पॅलेस्टाइनध्ये (वेस्ट बँकमध्ये) आहे.

मोझेसने आपल्या हिब्रू बांधवांना सांगितलेले होते की देवाने हिब्रू लोकांना एक छान सुबत्ता असलेला, भरपूर दूध आणि मध उपलब्ध असलेला भूभाग देऊ  केला आहे. तो भूभाग (म्हणजेच इस्रायल) ताब्यात मिळविण्यासाठी त्यांना तिथे आधीपासून वसत असलेल्यांशी लढून त्यांना मारून टाकून स्वत:ला तिथे प्रस्थापित करायचे, असा आदेश दिलेला होता. सुमारे 40 वर्षांनंतर शेवटी त्यांनी मृत समुद्र पार करून जेरिकोकडे कूच केले. त्या वेळी मोझेस जिवंत नव्हता, पण त्याचे उत्तराधिकारी हिब्रू बांधवांना देवाचे आदेश सांगत असत. जेरिकोमध्ये राहणारे पेगन लोक अतिशय भिन्न संस्कृतीचे असल्याने त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव पडू नये म्हणून जेरिकोमधील सर्व मूर्तींचे भंजन, माणसे व प्राणी यांना मारायची आज्ञा देवाने दिली.

त्यांना कसे मारायचे हेदेखील सांगितले. जेरिको शहराच्या भिंतीभोवती हिब्रू लोकांनी (सैन्याने) सलग चार दिवस शिंग फुंकत संचलन करायचे. चौथ्या दिवशी शिंग फुंकण्याचा आवाज अधिक वाढवत नेणे आणि संचलन करत राहणे. असे हिब्रू सैन्याने केल्यावर या सगळयामुळे चौथ्या दिवशी जेरिको शहराभोवतीची भिंत कोसळली. ही भिंत पडण्यात मला देवाची आज्ञा कमी पण भौतिकशास्त्रातील एक तत्त्व (डॉपलर्स इफेक्ट) लागू पडलेय असे दिसते. सैन्याच्या संचलनामुळे तयार झालेला नाद तसेच त्याची वारंवारिता आणि शिंग फुंकून निघणाऱ्या ध्वनीमुळे निर्माण झालेली ध्वनिवारंवारिता या स्पंदनांचा एकत्रित परिणाम म्हणून भिंतीला मिळालेल्या स्पंदनांची वारंवारिता जुळल्याने रेझोनन्स तयार होऊन ती भिंत पडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भिंत पाडल्यावर सर्व हिब्रू सैन्याने जेरिकोमध्ये प्रवेश करून सर्व केननाईट लोकांना, त्यांच्या बायका-मुलांना, त्यांच्या प्राण्यांना सगळयांना मारून टाकले आणि तिथे राहण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी उत्तरेकडे हिब्रू लोकांच्या वसाहतीचा अशाच प्रकारे आधीच्या पेगन लोकांना मारून भूमध्य समुद्राच्या टोकापासून जेझ्राईल दरी आणि उत्तरेकडचे माउंट गिल्बोआ, गॅलेली आणि माउंट तव्होर वगैरे भागात विस्तार केला. देवाने जो सुबत्तेने भरलेला भूभाग त्यांना देऊ  केला होता, त्याचा हिब्रू लोकांनी ताबा मिळविला. आज 3400 वर्षांनंतर अशी स्थिती आहे की जेरिको पॅलेस्टाइनध्ये आहे आणि इस्रायल-पॅलेस्टाइन भांडणामुळे हिब्रू लोकांना तिथे जाता येत नाही. चुकून जर ज्यू लोक तिथे दिसले, तर त्यांचे गळेच कापले जातात किंवा त्यांना गोळया घातल्या जातात. आमच्या काही अमेरिकन मित्रांनी (त्यातील एक ज्यू) हा थरार अनुभवला होता.

शेवटी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हिब्रू लोक (ज्यू) या प्रदेशात 3400 वर्षांपूर्वी उपरेच आले. मग रोमन साम्राज्यांमुळे त्यांना पॅलेस्टाइनची भूमी सोडून जगभरात पलायन करावे लागले. नंतरचा सारा काळ त्यांना उपरे म्हणूनच सर्वत्र घालवावा लागला आणि पुढचा इतिहास सगळयांनाच ज्ञात आहे. आत्ताच्या पॅलेस्टाइनमध्ये सगळे अरबच आहेत. पण इथे काही हजार वर्षांपूर्वी पेगन, केननाईट असे लोक होते. मग हिब्रू, टर्किश, रोमन, फिलीस्तीन (ज्यामुळे पॅलेस्टाइन हे नाव पडले) आणि मग अरब अशा प्रकारे या भूभागाचे जबरदस्तीचे भाडेकरू बदलले. राज्यकर्तेदेखील बदलले. आता फक्त अरब आणि हिब्रूच लोक आहेत आणि हा भूभाग मूळचा आपलाच आहे असा दावा करून दोघेही जण भांडत आहेत. मृत समुद्राकडे जाताना वेस्ट बँकमध्ये असलेले जेरिको हे शहर आम्हाला दुरून दिसले आणि वरील सगळा इतिहास समजला.

इस्रायल हे अरब आणि ज्यू यांचे एकच राष्ट्र असावे असा एक मतप्रवाह (सिंगल स्टेट सोल्युशन)आहे. त्याचप्रमाणे अरब आणि ज्यू यांची दोन वेगवेगळी राष्ट्रे असावीत असाही एक मतप्रवाह (डबल स्टेट सोल्युशन) आहे. यातील कोणताही एक मतप्रवाह अमलात आणणे अजिबात सोपे नाही. दोघांचे एक राष्ट्र होणे अशक्य आहे, कारण इस्रायल हे केवळ ज्यूंचे राष्ट्र आहे अशीच संकल्पना असल्याने यात अरब लोकांना कायमच दुसरेपणाची वागणूक मिळणार आणि हे अरबांना मान्य नाही. इस्रायल हे एकच सेक्युलर राष्ट्र म्हणून निर्माण होऊ शकत नाही, कारण धर्मनिरपेक्षता आली की अरब मुस्लिमांची संख्या इथे झपाटयाने वाढून वेगळया मुस्लीम राष्ट्राची मागणी होऊ  शकण्याचा धोका आहे. ज्यू आणि अरब अशी दोन राष्ट्रे स्थापन केली, तर आधीच लहान असलेल्या इस्रायलचे आणखीनच छोटया देशात रूपांतर होईल. दुसरे छोटे अरब राष्ट्र निर्माण होईल. इतर अरब देशांतील दहशतवादी लवकरच त्याचा ताबा घेतील, कारण त्या अरब देशाकडे स्वत:चे अस्तित्व टिकविण्याइतके स्वत:चे बळच नसेल. याचा परिणाम पुन्हा दहशतवाद आणि नवीन छोटया इस्रायलच्या अस्तित्वाला धोका असे चक्रचालूच राहणार. इस्रायलमधील हा प्रश्न नक्की कधी आणि कसा सुटेल हे आजमितीला कोणालाही माहीत नाही. पण तरीही इस्रायली लोकांच्या मनोबलाला दाद द्यावयास हवी. कोणत्याही क्षणी इस्रायलध्ये काहीही तातडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची या लोकांना पूर्ण कल्पना आहे. तशी त्यांची मानसिक, शारीरिक तयारी असते. काहीही झाले तरी लवकरात लवकर परिस्थिती सामान्य करून आपले जीवन पूर्वपदावर आणण्याची त्यांच्यात क्षमता आणि इच्छाशक्ती आहे. इस्रायली लोकांचा हा गुण नक्कीच घेण्यासारखा आहे. इस्रायलध्ये केवळ हा धार्मिक वाद आहे असे नाही, तर जगाच्या विविध भागांतून आलेल्या भिन्न संस्कृतीत राहिलेल्या ज्यूंनी येताना आपल्याबरोबर ती संस्कृतीदेखील आणली. त्यातूनच जो सांस्कृतिक गुंता निर्माण झाला, त्याची माहिती 'इस्रायलमधील सांस्कृतिक गुंता' यापुढील लेखात देत आहे.

aaparnalalingkar@gmail.com

9742045785