Enter your Email Address to subscribe to our newsletters
'दादासाहेब फाळके - काळ आणि कर्तृत्व' या नावाचा मोठया आकाराचा 500 पानी ग्रंथ जया दडकरांनी लिहिला. (प्रकाशक मौज, आवृत्ती पहिली 22 डिसेंबर 2010). फाळकेंच्या जयंतीनिमित्त या महत्त्वाच्या ग्रंथाचे स्मरण होते आहे. सिनेप्रेमी, अभ्यासक, चित्ररसिक या सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे किमान नजरेखालून घातला पाहिजे.
दादासाहेब फाळके यांचे नाव एकदा उच्चारले की परत त्यांच्यासंबंधी काहीही माहिती करून घ्यायची फारशी उत्सुकता मराठी माणसांना नसते. दर वर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने केंद्र सरकार भारतीय चित्रपट सृष्टीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाला पुरस्कार देते. त्या दिवशीच्या बातमीपुरता आपला दादासाहेब फाळकेंशी संबंध येतो. परत आपण फाळकेंना विसरून जातो. परेश मोकाशी या नवीन पिढीच्या कल्पक दिग्दर्शकाने फाळकेंवर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा अफलातून चित्रपट काढला आणि फाळकेंबाबतच्या अनास्थेचा कलंक काही अंशी पुसला गेला. गंगाधर महांबरे, बापू वाटवे, इसाक मुजावर यांनी फाळकेंचे चरित्र ग्रंथबध्द केले. तेही बऱ्यापैकी वाचले गेले आहे.
दि. 30 एप्रिल ही फाळके यांची जयंती आहे. आणि पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला ती तारीख 3 मे ही आहे. लवकरच फाळकेंची शतकोत्तर सुवर्णजयंती येते आहे. (फाळके - जन्म 30 एप्रिल 1870 - मृत्यू 16 फेब्रुवारी 1944.)
'दादासाहेब फाळके - काळ आणि कर्तृत्व' या नावाचा मोठया आकाराचा 500 पानी ग्रंथ जया दडकरांनी लिहिला. (प्रकाशक मौज, आवृत्ती पहिली 22 डिसेंबर 2010). फाळकेंच्या जयंतीनिमित्त या महत्त्वाच्या ग्रंथाचे स्मरण होते आहे. सिनेप्रेमी, अभ्यासक, चित्ररसिक या सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे, किमान नजरेखालून घातला पाहिजे.
जया दडकरांनी चरित्रांच्या मांडणीची एक वेगळी पध्दत मराठीत रुजवली. कवी कादंबरीकार चि.त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू), प्रकाशक रा.ज. देशमुख, कादंबरीकार वि.स. खांडेकर, कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या घटनांचा शोध घेत मेहनतीने त्या त्या प्रसंगांच्या तारखा धुंडाळत संबंधित नातेवाईक, मित्र यांच्याशी चर्चा करून त्यांनी ही चरित्रे लिहिली आहेत. दडकरांनी हे फार मोलाचे काम केले आहे. पण त्याची स्वतंत्र अशी दखल घेतली गेली नाही. सर्व चरित्रांत खांडेकरांचे चरित्र भरपूर मोठे आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके यांच्या त्यांनी सिध्द केलेल्या चरित्राचा आकार आणि आवाका मोठा आहे.
दडकरांनी या चरित्राची रचना मोठया विलक्षण पध्दतीने केली आहे. चरित्र लिखाणाबाबत सुरुवातीला त्यांनीच लिहून ठेवले आहे, '.. दादासाहेब फाळकेंच्या आत्मपर लिखाणाचा वापर करावयाचा, त्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या, स्नेह्यांच्या आठवणींची जोड द्यायची; आणि दादासाहेबांचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्या काळाचं भान वाचकांना असायला हवं म्हणून देश-विदेशांतील तत्कालीन ठळक घडामोडींची नोंद करायची, समकालीन चित्रपटांचा परिचय करून द्यायचा.'
दडकरांच्या या वाक्यांमधूनच त्यांच्या लिखाणाचा आवाका आपल्या लक्षात येईल. त्यांनी या चरित्रग्रंथाचे सहा विभाग पाडले आहेत - उपोद्धात (1870-1910), पर्व पहिले (1911-1919), पर्व दुसरे (1920-1930), पर्व तिसरे (1931-1940), उपसंहार (1941-1944). शिवाय या ग्रंथाला 7 परिशिष्टे जोडली आहेत. त्या त्या काळातील देश-विदेशांतील घडामोडी, नंतर याच काळांतील चित्रपट क्षेत्रांतील घडामोडी आणि दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यातील घडामोडी असे या प्रत्येक कालखंडाचे तीन तीन उपविभाग पाडले आहेत.
पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' 3 मे 1913ला प्रदर्शित झाला. याच वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. हिंदुस्थानातील पहिली दूरध्वनी सेवा सुरू झाली. ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी सशस्त्र 'गदर चळवळ'ची सुरुवात झाली, असे त्याच काळातील कितीतरी संदर्भ दडकर नोंदवून ठेवतात. तसेच चित्रपट क्षेत्रांतील 1913च्या नोंदी करताना 'अमेरिकेत युनिव्हर्सल कंपनीचा 'रॉबिन्सन क्रुसो' हा चित्रपट प्रदर्शित झाला, अमेरिकन प्रेक्षकांना सर्वात आवडला तो 'ला रेनी एलिझाबेथ' हा चित्रपट, फ्रान्समध्ये एमिल झोलाच्या 'जेरमिनाल' कादंबरीवरील चित्रपट आला, हे सांगत राहतात.
फाळकेंच्या पहिल्या चित्रपटाबाबत 'केसरी'च्या 6 मेच्या अंकात 'मुंबईचे बातमीपत्र' या सदरात जो मजकूर आला आहे, तोही दडकरांनी आपल्या पुस्तकात दिला आहे. '..मुंबईत दाखविले जाणारे बहुतेक चित्रपट (फिल्म्स) विलायती असून त्यावरील चित्रेही विलायतीच असतात. परंतु मुंबईत रा. फाळके यांनी हा सर्व प्रकार बदलून येथे चित्रपट तयार केले, इतकेच नव्हे, तर चित्रपटांवरील चित्रेही देशी म्हणजे पौराणिक असून सर्वमान्य अशी आहेत. असा एकंदर तीन हजार फूट लांबीचा चित्रपट रा. फाळके यांनी तयार केला असून त्यावर हरिश्चंद्र नाटकांचा सर्व प्रयोग ते करून दाखवितात...'
फाळकेंच्या शेवटच्या दिवसांबाबत दडकरांनी मोठया वस्तुनिष्ठपणे लिहिले आहे. पण त्या साध्या शब्दांतूनही त्यांचा गहिवर जाणवतो. दुसऱ्या महायुध्दानंतर चित्रपट निर्मितीवर कमालीची बंधने आली होती. निर्मात्याला सरकारकडून परवानगी काढावी लागत होती. युध्दातील ब्रिटिशांच्या सहभागाचे समर्थन करणारा एक तरी चित्रपट काढण्याचा फतवाच निघाला होता. फाळकेंनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्ज केला. पण त्यांचा अर्ज फेटाळला गेला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. परवानगी नाकारणारे पत्र हाती पडल्यावर दोनच दिवसांत, 16 फेब्रुवारी 1944 रोजी फाळकेंचे निधन झाले.
नवाकाळ, मौज साप्ताहिक, द बाँबे क्रॉनिकल, द मिरर, फिल्म इंडिया यांनी फाळकेंच्या निधनाची वार्ता प्रसिध्द केली, त्याच्या नोंदी दडकरांनी केल्या आहेत.
चित्रपट सृष्टीला 25 वर्षे पूर्ण झाली, म्हणून 1938मध्ये फाळकेंचा गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांनी केलेले भाषण अतिशय चटका लावणारे आहे. शकुंतलेचे उदाहरण देऊन फाळके म्हणतात, ''.. माझी चित्रपटरूपी कन्या तशीच वन्य स्थितीत लहानाची मोठी झाली आहे. आता ती धनकनकसंपन्नांच्या राजवैभवाने वावरत आहे. तिच्या तैनातीत आज चाळीस-पन्नास हजार दास-दासी झुलून राहिल्या आहेत. अशा माझ्या वैभवसंपन्न बाळीला पाहून व तिचा पंचविसाचा वाढदिवस म्हणजे तिची 'सिल्वर ज्युबिली' एखाद्या राजालाही लाजवील अशा थाटामाटाने होत आहे हे पाहून, कोणत्या पित्याला धन्य वाटणार नाही..'' पुढे फाळकेंनी जे उद्गार काढले, त्याने वाचकाच्या डोळयात पाणी येते - ''.. वैभव किंवा द्रव्य ह्यांची मोहिनी इतकी विलक्षण आहे की त्यांनी पछाडलेल्या लोकांचे डोळे जननी-जनकालादेखील न ओळखण्याइतके कधीकधी धुंद होत असतात! तसेच काहीसे माझ्या सिनेमाकन्येच्या संबंधात झालेले आहे...''
ज्या पध्दतीने फाळकेंची उपेक्षा झाली, तशीच त्यांच्यावरच्या या ग्रंथाचीसुध्दा काहीशी उपेक्षा झाली की काय, अशी मला शंका येते. कारण 8 वर्षे होऊन गेल्यावरही या ग्रंथांचे संदर्भ फारसे कुणी देताना दिसत नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ग्रंथालयांत याची प्रत असेल का? याची मला तरी शंका येते. या विषयावर दडकरांनी बोलण्यासाठी (दडकर तसे भाषणे देण्यासाठी फारसे प्रसिध्द नाहीत. वयोमानाने ते फारसे फिरतही नाहीत.) कुणी बोलावले असेल का?
दडकरांना नसेल फिरता येत, पण तरुण सिनेअभ्यासकांना बोलावून यावर बोलते केले गेले का? याचेही उत्तर नकारार्थीच येते. प्रभात चित्र मंडळाच्या वतीने 'वास्तव रूपवाणी' या नावाने चित्रपटविषयक एकमेव नियतकालिक काढण्यात येते (संपा. अभिजीत देशपांडे) याची तरी किती जणांना माहिती आहे?
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर येथे आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले जात आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. या महोत्सवांची पैशाची गणिते काय आणि कशी आहेत, ते जरा बाजूला ठेवू. पण त्या निमित्ताने मराठीत जी काही चित्रपटविषयक पुस्तके निघाली आहेत, त्यांच्यावर एखादे चर्चासत्र, त्यांचे एखादे छोटे प्रदर्शन असे का नाही आयोजित केले जात?
सत्यजीत रे यांनी चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान सगळयांना माहीत असते. पण त्यांनी फिल्म सोसायटयांची चळवळ रुजवली, वाढीस लावली हे मात्र फारसे कुणाला माहीत नसते. श्याम बेनेगल असो किंवा किरण शांताराम किंवा आता महाराष्ट्रात यासाठी काम करणारे सतीश जकातदार, सुधीर नांदगावकर असो, यांच्या कामाबाबत चित्रपट रसिकांना किती माहिती असते?
मराठीत चित्रपटविषयक लिखाण करणारे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, धनंजय कुलकर्णी, विजय पाडळकर, प्रा. अभिजीत देशपंाडे, गणेश मतकरी, अमोल उदगीरकर, जितेंद्र घाटगे, अक्षय शेलार, श्रीकांत ना. कुलकर्णी असे कितीतरी आहेत. त्यांना सर्वांना जोडून घेत, मराठीत चित्रपटविषयक जे काही लिखाण झाले आहे, त्याबाबत सर्वत्र जागृती व चर्चा घडवून आणता येईल. तसेच सध्या फेसबुक-ब्लॉग-ऑॅनलाइन न्यूज पोर्टल यांच्यावर मराठीतून चित्रपटविषयक मोठया प्रमाणात लिहिले जात आहे, त्याचीही सविस्तर दखल घेता येईल. फाळकेंच्या 150व्या जयंतीनिमित्त चित्रपट रसिकांनी पुढाकार घेऊन हे काम करायला पाहिजे. दादासाहेब फाळके या चित्रपटवेडया मराठी माणसाला तीच खरी श्रध्दांजली ठरेल.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
9422878575