इस्रायलची ऐतिहासिक पार्श्वभूमी

विवेक मराठी    14-May-2018
Total Views |

***डॉ. अपर्णा लळिंगकर***

 संशोधनाच्या कामानिमित्त ऑॅक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2017 असे एक वर्षभर इस्रायलमध्ये माझे वास्तव्य होते. इस्रायलमधील वास्तव्यात अनेक स्थानिकांशी गप्पा झाल्या, विविध ऐतिहासिक स्थळांना भेटीही दिल्या गेल्या. कुतूहल म्हणून अनेक प्रश्न पडत गेले आणि त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न झाला. यातूनच इस्रायलचा इतिहास आणि वर्तमान यांचे तपशील समजत गेले. या सगळयाचे मला आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने केले गेलेले निरीक्षण यांची सांगड घालून 'इस्रायलच्या डायरीतून' या लेखमालेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे.

 इस्रायल हा भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर असलेला मध्यपूर्वेतील एक अत्यंत लहान क्षेत्रफळ (20,770 - 22,072 चौ.कि.मी.) असलेला छोटा देश आहे. लेबनान, सीरिया, जॉर्डन, पॅलेस्टाइन आणि इजिप्त अशा पाच अरब मुसलमान देशांशी इस्रायलची सीमारेषा जोडलेली आहे. इतके छोटे राष्ट्र असूनही आपली स्वत:ची हिम्मत आणि अमेरिकेचे आर्थिक पाठबळ याच्या जोरावर, सगळया अरब राष्ट्रांनी वेढलेले असूनही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवले आहे. संपूर्ण जगात इस्रायल हे एकमेव ज्यू राष्ट्र असायलाही इतिहासातील अनेक घटनांचा संदर्भ आहे. ज्यू राष्ट्र याचाच अर्थ असा की इस्रायलमध्ये ज्यू संस्कृती, इतिहास, परंपरा यांनाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. अगदी सुट्टयादेखील ज्यू कालगणनेवर आधारित असतात.

इस्रायलमध्ये 20% अरब (त्यातील 17% मुसलमान, 2% ख्रिस्ती, 1% ड्रुज आहेत) आणि त्यांना मतदानाचा अधिकारही आहे. पण 75% ज्यूंना अधिक अधिकार आहेत आणि त्यातील सर्वाधिक पांढरपेशा समाजात मोडतात. 20% अरब हे आर्थिक आणि सामाजिकदृष्टया मागासलेले आहेत. इस्रायल सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करते, पण त्यांच्या सांस्कृतिक कडवेपणामुळे सगळे प्रयत्न फोल ठरतात.

इस्रायल, जॉर्डन, सीरिया, लेबनान, पॅलेस्टाइन हा सध्याचा भाग इंग्रजांनी टर्किश लोकांना हरवून जिंकल्यावर त्याचे विविध देशांत विभाजन करेपर्यंत एकच भाग समजला जात होता. कित्येक शतके सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे राज्य होते. डेव्हिड, सॉलोमन, हेरॉद असे त्यांचे विविध राजे होऊन गेले. पुढे बॅबेलॉनी, असीरियन, रोमन, ग्रीक, तुर्की, अरब यांनी वेळोवेळी हल्ले करून ज्यू राजांचा पराभव केला. यामुळे अधिकाधिक ज्यू इस्रायलच्या बाहेर पडले आणि जगभरातील इतर भागांत - युरोप, आशिया, आफ्रिका, रशिया, अमेरिका (मुख्यत: समुद्रमार्ग आणि जमिनीचा मार्ग जिथे नेईल तिथे) आदी ठिकाणी स्थायिक झाले. ज्यू लोकांना या देशांत चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांना भूमिपुत्रांचा दर्जादेखील या राष्ट्रांत मिळाला नाही. त्यांचा धर्म पाळणे आणि भाषेचे जतन करणे या गोष्टी फारच दूर राहिल्या. यातूनच प्रतिकूल परिस्थितीत आपला धर्म, आपली संस्कृती, आपली भाषा जतन करण्याचा गुण ज्यू लोकांमध्ये कायमचा अंतर्भूत झाला.

याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ज्यू लोकांनी झायोनिझम (म्हणजेच ज्यू धर्मीयांचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन) ही चळवळ उभी केली आणि ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या आपल्या मातृभूमीकडे परत येण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांच्या मातृभूमीत परतण्याला हिब्रू भाषेत 'अलिया' असे म्हणतात. 1882 ते 1903 या कालावधीत सुमारे 35,000 ज्यूंनी पॅलेस्टाइनमध्ये अलिया केला. त्यानंतर 1904 ते 1914 या काळात 40,000 ज्यू लोकांनी अलिया केला. इस्रायलच्या दक्षिणेकडे जो माउंट सिनाई आहे, त्याच्यावरून झायन हा शब्द घेतलेला आहे. आजही आपल्याला इस्राएलमधील इलात या ठिकाणाच्या इजिप्तकडील टाबा या सीमारेषेजवळ माउंट सिनाईचे दर्शन होते.

युरोपात राहणाऱ्या ज्यू लोकांना नाझी कालावधीत हॉलोकॉस्टच्या माध्यमातून टोकाचा तिरस्कार सहन करावा लागला. यात लाखो ज्यू मारले गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यातूनच वाचलेल्या काहींनी आपल्या मातृभूमीत आश्रय घेतला. रशियातही स्टॅलिनने ज्यू-विरोधातील चळवळ तीव्र करून ज्यूंचे शिरकाण आरंभले. त्यातून जे ज्यू वाचले, त्यांनी आपल्या मातृभूमीत - म्हणजेच इस्रायलमध्ये (तेव्हाच्या पॅलेस्टाइनमध्ये) आश्रय घेतला. ज्यू लोकांना स्वत:चे असे स्वतंत्र राष्ट्र हवे, ही संकल्पना अधिकच जोर धरू लागली आणि अखेर दुसऱ्या महायुध्दाच्या समाप्तीनंतर इस्रायल या स्वतंत्र ज्यू राष्ट्राची स्थापना करण्यात ज्यू लोकांना यश आले.

पण पॅलेस्टाइनमधील अरबांनी झायोनिझमला विरोध केला. अरब आणि ज्यू यांचे ऐतिहासिक काळापासून हाडवैर असल्याने ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र ही संकल्पनाच अरबांना मान्य नाही. म्हणून 1948मध्ये इस्रायल स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यावर इजिप्त, जॉर्डन, सीरिया, इराक आणि लेबनान या पाच अरब राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला केला. याच सुमारास इस्रायलमधील स्थानिक अरबांनीदेखील अंतर्गत उठाव करून या पाच अरब राष्ट्रांना साथ दिली. या युध्दात संधी होऊन इस्रायलला आपली गाझा पट्टी इजिप्तला, वेस्ट बँक जॉर्डनला द्यावी लागली. त्यानंतर या अरब राष्ट्रांनी इस्रायलवर अनेक वेळा हल्ले केले. प्रत्येक वेळी इस्रायलने आपल्या लढाऊ बाण्याच्या जोरावर आणि अमेरिकन आर्थिक पाठबळावर त्या अरब राष्ट्रांच्या भूमीत जाऊनच ते हल्ले जिंकले. यातच सीरियाकडून गोलन हाइट्सकडील माउंट हारमोनचा भाग घेतलाच, तसेच गाझा पट्टी व वेस्ट बँकही परत व्यापून घेतले. सद्य परिस्थितीत इस्रायलने गाझा पट्टी पॅलेस्टाइनला परत केली, तर तिथे हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीचा ताबा घेतला. अजूनही गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूभागांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही हमासवर हल्ले केले जातात. यातूनच सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाइन प्रश्नाची निर्मिती झाली आहे.

aparnalalingkar@gmail.com