Enter your Email Address to subscribe to our newsletters
माणसाला जीवनामध्ये जी अनंत दुःखे प्राप्त होतात, त्याचे तीन प्रकार आहेत. १) आधिभौतिक दुःख, २) आधिदैविक दुःख व ३) आध्यात्मिक दुःख. या तीन प्रकारच्या दुःखापैकी पहिली दोन दुःखे शरीराने भोगावी लागतात, तर तिसरे दुःख मनाने भोगावे लागते, असे गीतारहस्यात लो. टिळक म्हणतात. प्रपंच हा दुःखमय आहे. तरीही निरर्थक प्रपंच परमार्थ वृत्तीने अर्थपूर्ण करता येतो. ‘कर्मे इशु भजावा।’ Work is Worship हा सुखाचा मंत्र आहे.
मागील लेखात आपण ‘जनी सर्व सुखी असा कोण आहे?’ या प्रश्नाचा विचार केला. मानवी जीवनातील सुखदुःखाचा विचार सर्वच संतांनी, ऋषिमुनींनी केलेला आहे. समर्थांनी तो मनाच्या श्लोकातील पाच श्लोकांत अधिक नेमक्या शब्दांतून केलेला आहे. एवढेच नव्हे, तर माणसाच्या दुःखाचे मूळ त्यांनी ठळकपणे अधोरेखित केलेले आहे. देहबुद्धी, चिंता आणि अहंता या गोष्टी दुःखाचे मूळ कारण आहेत, असे समर्थ म्हणतात आणि विवेकबुद्धीने, ‘देहदुःख हेच सुख’ मानण्याचा उपायही सुचवितात. अर्थात हे दिसते तेवढे सोपे नाही. बर्याच वेळा हे कळते पण वळत नाही. आणि हीच सामान्य माणसांची दुर्बलता आहे. या मानसिक दौर्बल्यातच माणसाच्या समस्त दुःखाची अगतिकता दडलेली आहे. हे मानसिक दौर्बल्य दूर करण्यासाठीच समर्थांनी मनाच्या श्लोकातून मनालाच थेट उपदेश-बोध केलेला आहे.
मानवी स्वभावाचे एक विचित्र वैशिष्ट्य म्हणजे, माणूस सुख गिळून टाकतो आणि दुःख मात्र चघळत बसतो. हे लक्षात घेऊनच मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात - ‘दुःखाची स्वये सांडी जीवी करावी।’ आणि ती कशी? तर ‘विवेके सदा सस्वरूपी भरावे।’. मनातून दुःख काढून टाकण्यासाठी मन विवेकाने भरून टाकावे. कारण मन केव्हाही रिक्त राहू शकत नसते. त्याला सुविचारात – सदाचारात गुंतविले की दुःखाचा विचार येणारच नाही.
देहबुद्धी हे आपल्या दुःखाचे मूळ आहे, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. देहबुद्धी जाणून घेणे आणि ती प्रयत्नपूर्वक साधनेने ईश्वरी चिंतनाने नष्ट करणे हे सोपे नसले, तरी प्रयत्नसाध्य निश्चित आहे. स्वामी विवेकानंद, आचार्य रमणमहर्षी, संत तुकाराम-ज्ञानेश्वर यांची दिव्य जीवने पाहा. त्यांनाही देहदुःख, शारीरिक व्याधी होत्या, पण त्यांनी आपल्या दुःखाचा-व्याधींचा बाऊ केला नाही. उलट त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या इष्टकार्यावर लक्ष केंद्रित केले आणि आपल्या प्रयत्नाने-साधनेने आपले जीवन दिव्य केले. स्वामी विवेकानंदांचे आत्मचरित्र वाचा. त्यांना अनेक रोग व व्याधी होत्या, हे त्यांनीच लिहिले आहे म्हणून खरे वाटते, अन्यथा त्यांच्या ध्येयवादी दिव्य जीवनाकडे पाहता ते खरे वाटले नसते. योगी रमणमहर्षी कर्करोगाने ग्रस्त होते, पण त्यांच्या जीवनव्यवहारात – विचारात त्यांच्या या दुर्धर रोगाची कोठेही पुसटशी सावलीही आढळत नाही. संत तुकोबांचे जीवन पाहा - दुष्काळ, दिवाळखोरी, पत्नीचे निधन अशा अनेक संकटांनी घेरलेले, पण त्यांचे चित्त विठ्ठलचरणी-भजनी अविचल राहिले. हे कसे? तर ‘विवेके देहबुद्धि सोडूनि द्यावी।’ आणि ‘देहदुःख ते सुख मानीत जावे।’ या वृत्तीमुळे. समर्थांनी फार मोठे विवेचन न करता अगदी एका ओळीत दुःखनिवारणाचे व चिरसुखाचे सूत्र साधकांना सांगितले आहे, ती ओळ म्हणजे - ‘देहदुःख ते सुख मानीत जावे।’
दुःखाचे एक कारण शोक व चिंता आहे. माणूस वर्तमानात जगतो, पण भूतकाळाचा शोक किंवा भविष्यकाळची चिंता करीत जगतो. आपल्याजवळ जे आहे, त्याचा सुखा-समाधानाने, आनंदाने उपभोग घेण्याऐवजी तो जवळ जे नाही, त्याचे दुःख करीत बसतो. इतरांकडे असलेल्या वस्तू-गोष्टीकडे पाहून अनेकांना आपल्याकडे त्या नाहीत म्हणून उदास वाटते. अशी आपल्या दुःखाची कारणेही आपल्या भलत्याच अपेक्षेतून जन्माला आलेली असतात. स्वप्ने जरूर पाहावीत, अधिकाधिक संपन्न व समृद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न जरूर करावा व केलाच पाहिजे. पुरुषार्थासाठी दाही दिशा मोकळ्या असून परिश्रमाने संपन्नता प्राप्त करण्यास कोणाही संतांचा - समर्थांचा विरोध नाही. फक्त या गोष्टी विवेकाने कराव्यात व अपेक्षित यश प्राप्त झाले नाही, तर खचून जाऊ नये, दुःखी-कष्टी होऊ नये. खिलाडू वृत्तीने जीवनातील सुखदुःखांच्या प्रसंगाकडे पाहावे. ‘सुखदुःखे समेकृत्वा’ असा भगवद्गीतेतही उपदेश आहे.
दुःख म्हणजे काय? तर मला जे नको आहे आणि तरीही भोगावे लागते, ते सर्व दुःख आहे. खरे तर तात्त्विकदृष्ट्या पाहिले, तर जिवाचा - म्हणजे मानवाचा मूळ स्वभाव आनंदस्वरूप आहे. पण अज्ञानाने या मूळ स्वभावाचे त्याला विस्मरण होते व दुःखी होतो. तत्त्वज्ञानाच्या जगात सांख्यविचाराची एक मतप्रणाली आहे. भगवद्गीतेत सांख्ययोग म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचा परिचय करून दिलेला आहे. या सांख्यविचाराप्रमाणे जग हे दुःखमय व दुःखमूलकच आहे. या जगात माणसाला (जिवाला) १) आधिभौतिक, २) आधिदैविक आणि ३) आध्यात्मिक अशी तीन प्रकारची दुःखे भोगावी लागतात. या तीन प्रकारच्या दुःखांविषयी लो. टिळकांनी गीतारहस्यात म्हटले आहे की या तीन दुःखापैकी पहिली दोन - म्हणजे ‘आधिभौतिक’ आणि ‘आधिदैविक दुःखे’ देहाने-शरीराने भोगावी लागतात, तर तिसरे ‘आध्यात्मिक दुःख’ मनाने भोगावे लागते. या तीन प्रकारच्या दुःखांना ‘त्रिविध ताप’ असेही म्हणतात. समर्थांनी दासबोधातील तिसर्या दशकात समास ६, ७ व ८मध्ये या तीन तापांचे (दुःखाचे) सविस्तर वर्णन केलेले आहे, जिज्ञासूंनी ते मूळातून वाचावे.
या जगात जो जन्माला आला, त्या प्रत्येकाला कोणत्या न् कोणत्या प्रकारचे दुःख भोगावेच लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी ‘जनी सर्व सुखी असा कोण आहे?’ असा प्रश्न विचारला आहे. पण या दुःखावर काही उपाय आहे का? आहे. आणि तोही समर्थ सांगतात. कोणता उपाय? तर परमार्थ! समर्थ म्हणतात - या त्रिविध दुःखांनी जो पोळला व संतसंगाने निवाला, तोच परमार्थाचा अधिकारी होतो. ‘जो तापत्रये पोळला। संतसंगे निवाला।’, ‘तोचि एक अधिकारी जाला। परमार्थासी॥
परमार्थ म्हणजे परम अर्थ. ही एक वृत्ती आहे. संसार हा दुःखमय असल्याने निरर्थक आहे. निरर्थक संसार परमार्थ वृत्तीने अर्थपूर्ण करता येतो. परमार्थ म्हणजे संसार सोडून संन्यास घेणे वा २४ तास देवपूजादी पाठ, कर्मकांड करणे नव्हे, तर संसारात राहून सर्व कर्मे करताना ईश्वरी भाव मनात जागृत ठेवून जीवन जगणे होय! ‘दळीता, कांडिता तुज गाईन अनंता’ असे म्हणणारी, कष्टाची कामे करणारी दासी जनाबाई या संत झाल्या. असे आपण आपणास मिळालेले कोणतेही काम ईश्वरी कार्य आहे या भावाने करणे हीसुद्धा एक ईश्वरपूजा आहे - परमार्थ आहे. संत ज्ञानेश्वरांनी यालाच ‘कर्मे इशु भजावा।’ असे म्हटलेले आहे. Work is Worship असे महात्मा बसवेश्वरांचे एक वचन आहे. आपल्या कामालाच देव मानणे असा भाव मनीमानसी ठसला की मग संसारदुःखाने कधीच शोक होत नाही. दुःख येते आणि जाते. कारण दुःखही अल्पजीवी असते. मात्र आपण त्या दुःखाचा शोक अनंतकाळ करीत राहतो. हा शोक परमार्थ वृत्तीने दूर होतो. म्हणूनच समर्थ म्हणतात – भल्याने परमार्थी भरावे। शरीर सार्थक करावे॥ जय जय रघुवीर समर्थ।
(पुढील अंकात – ‘अहंता गुणे सर्वही दुःख होते।’)
- विद्याधर ताठे