मराठीच्या महाराष्ट्रा...

विवेक मराठी    30-Apr-2018
Total Views |

 

 इंदिरा संतांनी लिहिलेलं एक अलक्षित महाराष्ट्र काव्य नव्याने साकारलेल्या महाराष्ट्राचं, आईच्या मायेने कोडकौतुक करणारं. मोठया संघर्षानंतर हातात आलेला 'मराठी भाषिकांच्या' महाराष्ट्राचा मंगल कलश! तो काय असा नुसताच आणून बसवायचा? त्याचा साग्रसंगीत सोहळा व्हायला हवा! मराठमोळया लेकीसुनांनी कौतुकाने औक्षण करून त्याचं स्वागत करायला हवं! 

 1 मे - महाराष्ट्र दिन जवळ आलाय. रस्तोरस्ती महाराष्ट्रगीतं वाजू लागतील. सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या अभिमानाची त्सुनामी येईल! तरीही लहानपणापासून कानावर पडलेलं 'बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' ऐकलं की मन तरारून उठतंच. खणखणीत स्पीकरवर 'गर्जा महाराष्ट्र माझा' लागतं नि खरंच मनगट फुरफुरू लागतं.

पण या सगळया गीतांपेक्षा एक वेगळंच, अलक्षित महाराष्ट्र काव्य वाचनात आलं. इंदिरा संतांनी लिहिलेलं. नव्याने साकारलेल्या महाराष्ट्राचं, आईच्या मायेने कोडकौतुक करणारं. मोठया संघर्षानंतर हातात आलेला 'मराठी भाषिकांच्या' महाराष्ट्राचा मंगल कलश! तो काय असा नुसताच आणून बसवायचा? त्याचा साग्रसंगीत सोहळा व्हायला हवा! मराठमोळया लेकीसुनांनी कौतुकाने औक्षण करून त्याचं स्वागत करायला हवं!  महाराष्ट्र केवळ नररत्नांची नाही, तर नारीरत्नांचीही खाण. हे सारे सोहळे करायचा मान यांच्याशिवाय कुणाला मिळणार!

 इंदिराबाईंनी ही कविता लिहिताना मराठी साहित्य, कला, धर्म, राज्य, शौर्य अशा सगळया क्षेत्रांतल्या प्रथम आणि अग्रिम स्थान असलेल्या मराठी कन्यांना बोलावलंय. कवितेत त्या त्या कन्येचं वैशिष्टय आणि स्वागताचे सारे उपचार सुरेख गुंफले आहेत व प्रत्येक कन्येच्या गुणाचा किती अचूक वापर केलाय. यातल्या एक एक शब्दासाठी नेमका संदर्भ आहे. तो लक्षात आला की इतिहासाला काव्यात गुंफण्याच्या इंदिराबाईंच्या कौशल्यापुढे नतमस्तक व्हायला होतं.

महाराष्ट्राच्या स्वागतासाठी ताठ खडा असलेला सह्याद्री अन् त्याच्या अंगावर येऊन आदळणारा वारा, दोघे मिळून नौबत वाजवत आहेत. सह्याद्रीच्या खडया राकट पहाडांनी काळाचा किती मोठा प्रवाह पाहिलाय. त्याच्या अंगाखांद्यावरचे किल्ले आताआताचे, पण काळाच्या निरनिराळया तुकडयांचे किती बंद दरवाजे याच्या कपारीकपारीत दडलेत. असा एकेक दरवाजा उघडून एकेक कन्या येतेय आणि एकेक उपचार पार पडतोय. या लेकींना त्यांच्या माहेरीच नव्हे, तर साऱ्या समाजात फार मान आहे नि त्यामुळे माहेरी त्यांचं साहजिकच खूप कौतुक आहे. या मानाच्या धनिणी आज माहेरी आल्यात नि पदर खोचून तयारीला लागल्यात!

 सूर्य अजून उगवला नाहीये, तोवरच तयारीला लागायला हवं ना! अज्ञानाचा अंधार घालवायला एक दिवली पुढे यावी तशी शतकानुशतकांच्या दबलेल्या स्त्रीस्वराला पहिला हुंकार देऊन जगासमोर आणणारी महादंबा.

चक्रधरांची शिष्या. चिकित्सक. बुध्दिमान. प्रश्न विचारणारी, उत्तरं शोधणारी महादंबा. तिने लिहिलेले 'धवळे' हा मराठीतला पहिला काव्यप्रकार समजला जातो. तिने हा शकुनाचा दिवा लावला नि पाठोपाठ कितीतरी कवयित्री, लेखिका यांच्या दीपमाळांनी सह्याद्री उभा-आडवा 'धवळून', उजळून निघाला! त्या लेकींच्या साहित्यप्रकाशाने विश्वाचे डोळे दिपले! पण पहिला दिवा लावायचा मान महादंबेचाच!

तिच्या दिवलीच्या प्रकाशात हातात खराटा घेऊन संत जनाबाई आलीय लगबगीने. 'झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी' असं तिचं काम! ती सरळ त्याला हाताला धरून कामाला घेऊन येते ! मग काय... तिने टाकलेल्या सडयातून तिच्या हाताला लागलेला अबीर मंजिऱ्यांचा अलौकिक दरवळ सारा आसमंत गंधाळून टाकतो.

साहित्यलक्ष्मी म्हणून गौरवली गेलेली रेव्हरंड टिळकांची लक्ष्मी! ती तर कधी साधनांसाठीही थांबली नाही. चुलीतली जळकी काटकी घेऊनही तिने धडे गिरवलेत. स्वत:च्या आयुष्याचं चित्र रेखाटलेली, 'स्मृतिचित्रे' लिहिणारी ही कर्तबगार कन्या. स्वागताच्या रांगोळया घालायचा मान हिचा.

बाई सुंदराबाई हे नाव तसं अपरिचित. या मातीतल्या पहिल्या मोजक्या गात्या गळयांपैकी एक अलौकिक गाता गळा. सनईच्या स्वरासारखा उंच, लवचीक, सुरेल, भावपूर्ण आवाज. लावण्या, गझल, ठुमरी, कव्वाली, भजनं, गाणी असे अनेक प्रकार सहज गायलेली, अभिनय करणारी, 'एकच प्याला'तील पदांना चाली दिलेली, मुंबईत राहणाऱ्या अनेक गायिका मैत्रिणींना रेडिओच्या तंत्राचं महत्त्व पटवून ध्वनिमुद्रणाला आणणारी, पदरी मोटारगाडया व अलिशान घराचं वैभव बाळगलेली, तरीही अत्यंत सोज्ज्वळ. सनईच्या स्वरासारखा दर्द आणि मांगल्य एकवटलेला तिचा आवाज! 'मन पापी भूला'पासून 'सखे नयन कुरंग'सारखी अत्तरगाणी गाणारा, तिच्या सुरांनी स्वागत म्हणजे सुरांना सुगंध!

आत येण्याआधी भाकरतुकडा ओवाळून टाकायचा. 'परिस्थितीचे चटके सोसल्यावरच तव्यावर भाकरीचा चंद्र उगवतो' हे सांगणारी खान्देशकन्या बहिणाबाईच हवी ना त्यासाठी! 'माझं सुख माझं सुख हंडया झुंबरं टांगलं, माझं दु:ख माझं दु:ख तळघरात कोंडलं' असं तत्त्वज्ञान जगलेली बहिणाबाई तत्परतेने हसतमुखाने दारात उभी राहिली आहे.

भाकरतुकडा ओवाळला की डोळयाला पाणी लावायचं.

महाराष्ट्रच नव्हे, देशभरातल्या नद्यांचं पुण्यसलील जिने घाट बांधून राखलं, वाटेच्या वाटसरूंची तहान पाणपोयांतून भागवली, त्या पुण्यश्लोक अहिल्येच्या हातून डोळयाला पाणी लावलं की तन-मन पवित्र होऊन जाणारच!

पण हा कलश काही सुखासुखी आलेला नाही, याची जाणीव इंदिराबाईंना आहेच. हुतात्म्यांच्या बलिदानाचा मान ठेवायचा तर तिलक हवा रक्ताचा. तो करायला अधीर होऊन उभी आहे एक रणरागिणी! तांबेकुलवीरश्री, पराक्रमाची ज्योत, मनकर्णिका उर्फ लक्ष्मी! ती हातात करंडा नाही, तलवारच घेऊन उभी आहे. तिच्या रक्ताचा टपोरा लालबुंद तिलक आता तिने रेखलाय.

प्रत्यक्ष औक्षण करायला मात्र आईच हवी. जरीचं टोपपदरी नऊवार लुगडं नेसून ताठ कण्याच्या आऊसाहेब - साक्षात जिजाऊ साहेब आरती घेऊन उभ्या आहेत. त्या महाराष्ट्र माउलीने कोटिसूर्यप्रभा असलेलं तिचं पुत्ररत्नच ओवाळून टाकलं होतं या महाराष्ट्रावरून!

असं झोकदार स्वागत या महाराष्ट्राचं!

ही केवळ कविता नाही. केवळ स्वागतगीत नाही. हे आहे महाराष्ट्राचं संचित! इंदिराक्काही याच परंपरेतल्या मानकरी. संयुक्त महाराष्ट्र आकाराला आला, तेव्हा त्या बेळगावला प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. त्या महाराष्ट्राच्या लेकीला कुशीत न घेताच, बेळगावविना, महाराष्ट्र तयार झाला. माहेरच्या एवढया महत्त्वाच्या सोहळयाचं भागीदार होता येत नाही म्हणून खंतावल्या असतील का त्या? साध्या लग्नमुंजीला जाता आलं नाही तरी लेक मनाने तिथेच त्या कार्यात असते. आता अक्षता पडल्या असतील.. आता पंक्ती उठत असतील.. असं मनाने ती सारं अनुभवत असते.


ही कविता मला अशाच एका लेकीच्या मनोराज्यात घेऊन गेली!

मराठीच्या महाराष्ट्रा

आज स्वागत स्वागत :

सह्याद्रीच्या कडयावरी

वाजे वाऱ्याची नौबत!

 

काळ-कवाड फोडून

आल्या आल्या साऱ्या जणी

महाराष्ट्राच्या स्वागता

आज मानाच्या धनिणी!

 

शकुनाचा हाती दीप

महदंबा आधी येई :

रचे दीपांची आरास

धवळल्या दिशा दाही!

 

नामयाच्या जनाईने केले

सडासंमार्जन,

हात अबीर मंजिरी

गंधें भारिलें गगन !

 

केली जळक्या काडीची

लक्ष्मीबाईने लेखण

चित्रें रेखिली स्वागता

रंग प्राणांचे भरून!

 

बाई सुंदराबाईची

कंठसनई सुस्वर

मंगलाला आळवितां

झाले वाळयाचें अत्तर!

 
अहिराणी बहिणाबाई

आणि तव्याची भाकर

ओवाळून टाकायला

उभी राहिली तत्पर!

 

देवी अहिल्येच्या हाती

पुण्यतीर्थाचा कलश

नेत्र कराया पवित्र

उभी राहिली सहर्ष!

 

तळपत्या पात्यावरी

थेंब रक्ताचा धरून

उभी तिलक लावाया

लक्ष्मी अधीर होऊन

 


ओवाळाया महाराष्ट्रा

आज जिजाईच्या हाती

कोटि सूर्यांच्या तेजाने

उचंबळे पंचारती!