गुणकारी तमालपत्र

विवेक मराठी    19-Apr-2018
Total Views |

 

शेकडो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदाला तमालपत्राचा उपयोग परिचित असल्याने निव्वळ स्वयंपाकात वापरणं ह्या व्यतिरिक्त त्याचे अनेक उपयोग प्रचलित आहेत. ह्या पानांचा, झाडाचा उपयोग ह्याबद्दल गप्पा मारताना काही आयुर्वेदाचार्यांनी आवर्जून सांगितलं की यांच्या झाडाची साल कफ, दमा, सर्दी यासारख्या आजारांसाठी वापरली जाते.

 अनेक वर्षांपूर्वी जंगल वाचन करायला सुरुवात केल्यावर बालसुलभ उत्सुकतेने हे काय आहे? असा प्रश्न पदभ्रमण करताना हमखास विचारला जायचा. ह्या कुतूहलपूर्ण औत्सुक्यात कधी झाडांची, तर कधी फळांची, तर कधी प्राण्याची माहिती विचारली जायची. या प्रश्नोत्तरातून नवनवीन माहिती मिळायची. दक्षिणेकडे केलेल्या अशाच एका पदभ्रमंतीदरम्यान काही लोक जंगलातल्या ठरावीक झाडांच्या फांद्या वाकवून वाकवून पानं ओरबाडताना दिसले. आमच्याबरोबर असलेल्या दादाने सांगितलं की ते खायच्या मसाल्यात घालायचं पान आहे आणि दहा-पंधरा पानं माझ्या हातात कोंबली होती. घरी नेल्यावर ती पानं पाहून आई आणि आजी खूश झाल्या होत्या. ''अगं, तमालपत्र कुठून मिळाली तुला?'' ह्या प्रश्नामुळे मला त्या पानांचं नाव कळलं आणि तमालपत्राच्या झाडाशी माझी पहिली ओळख झाली होती. बरोबर आणलेली पानं महत्त्वाची आहेत आणि घरातल्या स्त्रियांना आवडली आहेत याचा अर्थ ती स्पेशल आहेत एवढाच अर्थ बालमनाला जाणवला होता. पुढे वाढत्या वयाबरोबर जंगलवाऱ्या वाढल्या आणि अनेक जंगलांमध्ये नांदणारी ही झाडं ओळखता यायला लागली. आजच्या मसालेदार यात्रेत तमालपत्राच्या खमंग गप्पा मारू या.

घरी बनवल्या जाणाऱ्या काळया आणि गोडया मसाल्यात हमखास वापरलं जाणारं ते लांबुळकं पान म्हणजे तमालपत्र. सिनॅमॉमम तमाला (Cinnamomum tamala) अशा वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जाणार तमालपत्र आणि परदेशात वापरलं जाणारं बे लीफ यांची कायम गल्लत होत असते. याच गल्लत होण्यातून 'इंडियन बे लीफ' हे तमालपत्राचं एक नाव प्रचलित झालं आहे. तमालपत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो गडद पान, जे इथे लागू होत नाही. परंतु बहुतांश भारतीय भाषांमध्ये हेच नाव थोडयाबहुत फरकाने प्रचलित झालं. तमालपत्राचं दुसरं प्रचलित इंग्लिश नाव म्हणजे 'मलाबाथरम'. या शब्दाची उकल केल्यास तामिळ अथवा मल्याळम भाषेत मला म्हणजे पर्वत आणि तिथे उगवणारी झाडं असा अर्थ मिळतो. रोमन व्यापाऱ्यांनी हे नाव आपल्याबरोबर नेऊन रुळवल्याने, नाव प्रचलित करण्याचं श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही. हिंदीत तेजपत्ता, उर्दूत तेजपात, मणिपुरी भाषेत तेजबात, गुजराती तेजपतो तर दक्षिणेला ई लवंगपत्तीरी किंवा तालिश पत्तीरी म्हणून ओळखलं जाणार तमालपत्र माहीत नसलेली गृहिणी विरळच असेल.

बहुतांश भारतीय मसाल्यांच्या घटक पदार्थांची गम्मत म्हणजे, ते पदार्थ सुकल्यावर त्याचे गुणधर्म तर वाढतातच, तशीच त्याची किंमतही वाढते. तमालपत्रही याला अपवाद नाहीच. भारतीय उपखंडात आढळणार तमालपत्राचं झाड भारतातल्या अनेक जंगलांचा अविभाज्य घटक आहे. साधारण वीस फुटांची उंची गाठणारं हे डेरेदार हिरवागार झाड त्याच्या पानांमुळे आणि खडबडीत सालीमुळे लक्षात राहतं. या झाडाची पानं साधारण पाच ते सात इंच लांब असतात. पानांचं वैशिष्टय म्हणजे प्रत्येक पानांची मधली एक आणि बाजूला दोन अशा मिळून तीन शिरा अगदी ठळकपणे दृष्टीस पडतात. ही पानं हिरवी असताना तजेलदार दिसतातच, सुकल्यावरही रखरखीत जीव नसलेली वाटत नाहीत. हिरवी असताना या पानांना चुरगाळून पाहिल्यास अतिशय तीव्र सुगंध येतो. ह्या वासाचं कारण म्हणजे यात असलेलं तेल. किचकट शास्त्रीय भाषेत मांडायचं म्हटलं, तर यात असलेलं volatile तेल या सुवासाचं कारण असतं. Volatile म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यावर लगेच उडून जाणारं. या तेलात लिनॅलूल नावाचा पदार्थ निम्म्याहून जास्त असतो. या घटकामुळे पानाला एक विशिष्ट गंध येतो. पानं वाळल्यावरही हा गंध येतच असतो. सदाहरित असलेल्या तमालापत्राच्या झाडाला जानेवारीच्या सुमारास घोळक्याने लहान लहान फुलं येतात. पुढे याच फुलांमधून लहान आकाराची गोल फळं साधारण मे महिन्यापासून धरायला सुरुवात होते. जुलै-ऑॅगस्ट महिन्यापर्यंत ही फळं धरून मोठी होऊन पिकतात. जांभळया रंगाच्या ह्या फळांमध्ये एकच बी असते. या बियांमधून नवीन झाडांची निर्मिती होते. हिमालयाच्या टेकडयांवरच्या आणि दक्षिणेकडच्या कित्येक झाडांनी पाऊणशेहून जास्त वयोमान पार केल्याचं दिसल्याने हे झाड शतायुषी आहे असं म्हणायला हरकत नाही.

तमालपत्राच्या सिनॅमॉमम लॉरेसी कुटुंबात सुमारे अडीचशे प्रजाती विविध खंडांमध्ये आढळतात. कापूर, बे लीफ, तमालपत्र ही काही ठळक उदाहरणं आपण लक्षात ठेवू शकतो. शेकडो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदाला तमालपत्राचा उपयोग परिचित असल्याने निव्वळ स्वयंपाकात वापरणं ह्या व्यतिरिक्त त्याचे अनेक उपयोग प्रचलित आहेत. ह्या पानांचा, झाडाचा उपयोग ह्याबद्दल गप्पा मारताना काही आयुर्वेदाचार्यांनी आवर्जून सांगितलं की यांच्या झाडाची साल कफ, दमा, सर्दी यासारख्या आजारांसाठी वापरली जाते. या सालीचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे मुख आणि दात दुर्गंधी दूर करायला हिचा वापर केला जातो. स्त्रियांची गर्भाशयाची दुखणी, अंतर्गत दाह कमी करायलाही यांचा वापर केला जातो. शरीरातील मेद कमी करणं, अपचन दूर करून पचनशक्ती वाढवणं यासाठी तमालपत्र चूर्ण वापरलं जातं. एखाद्या ठिकाणी आलेली सूज कमी करणं, ताण कमी करणं यासाठी आपण जे झटपट पेन रिलीफ स्प्रे वापरतो ना, त्यात उडून जाणारा अतीव गुणकारी एक घटक पदार्थ म्हणूनही तमालपत्राच्या तेलाचा वापर केला जातो.

मधुमेहावरही याचा गुणकारी उपयोग होत असल्याचं अलीकडेच दिसून आल्याने, या झाडाला आर्थिक महत्त्व प्राप्त झालंय. या व्यतिरिक्त, तमालपत्र तेलाच्या लिनॅलूल या घटक पदार्थाच्या ऍंटीबॅक्टेरियल म्हणजेच जीवाणूनाशक गुणधर्मामुळे  सफाईच्या अनेक उत्पादनांमध्ये तमालपत्राच्या तेलाचा उपयोग केला जातो. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे फिनेलचा वास आपल्याला परिचित असतोच. तमालपत्र तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधनासाठीही केला जातो. यातलं एखादं झाड, त्याचं कुटुंब, प्रजाती याची माहिती शोधताना तज्ज्ञ व्यक्तीकडे गेल्यावर त्याची एवढी माहिती मिळते की अवाक व्हायला होतं आणि जाणवतं की निसर्गात अक्षरश: अशा हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच नसतात. आणि मग खंत वाटते की अशा किती तरी गोष्टी माहीत करून घेताना एक आयुष्य अपुरं पडतं.

सावली देणं किंवा छान हिरवं दिसणं याव्यतिरिक्त एखाद्या झाडाचा आणखी काही उपयोग असतो, हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. पण जेव्हा असे अनेक उपयोग समजतात, तेव्हा त्याला व्यावसायिक ओरबाडणं सुरू होतं. काही पौर्वात्य देशांनी याची खास लागवड सुरू केली असून तिथली सरकारं त्याकडे विशेष लक्ष देताहेत. आपल्याकडे हा अमूल्य नैसर्गिक ठेवा जपण्यापेक्षा ओरबाडण्याकडेच जास्त कल दिसतोय, हे आपलं दुर्दैव आहे.

आपल्या मसाल्यात हमखास सामावलेल्या ह्या रुचकर पानांची एक गम्मत जाताजाता सांगते. लॉरेल लीफ किंवा बे लीफ हे याच प्रजातीतलं सदस्य पान. ग्रीक लोक सूप्समध्ये या पानांचा हमखास वापर करायचे, कारण त्याने पदार्थाची चव वाढते, हे आपण जाणतोच. पण जुन्या ग्रीसमध्ये या लॉरेल पानांना खास महत्त्व होतं, ते म्हणजे या पानांचा मुकुट - अर्थात लॉरेल टिआरा केला जायचा. राजदरबारातल्या फक्त विद्वान व्यक्तींच्या माथ्यावर हा गोल मुकुट घातला जायचा. या विद्वानांबरोबरच राजघराण्यातले लोक आपापल्या दर्जानुसार अशा पानाचे मुकुट घालायचे. विद्वान, ज्ञानी आणि कलाकार व्यक्तींचा राजसन्मान करायची ही पध्दत आजही परदेशात अभिनव पध्दतीने सुरू ठेवली आहे. आजही अनेक परदेशी विद्यापीठांमधून स्नातकोत्तर पदवी दीक्षान्त समारोहाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या माथ्यावर असे मुकुट घातले जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो आणि त्या व्यक्तीला बहुगुणी जाहीर केलं जात.

एका मसाल्याच्या पानाचं मूळ शोधताना थेट त्याच्या कुळाची मजेशीर कथा जाणून घेतल्यावर, तमालपत्राबद्दल माझा आदर द्विगुणित झालाय हे मात्र नक्की.

roopaliparkhe@gmail.com