दररोज पंचवीस लीटर पाणी घेऊन गुरुजी हायवेवर जातात आणि झाडांना घालतात. गेली दहा वर्षे गुरुजींचा हा नेम आहे. गुरुजींच्या परिश्रमामुळे काही झाडांची उंची पाच-सहा फूट झाली आहे. आता त्यांच्या निगराणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. भांडूप पूर्वच्या हायवेवर सुमारे दोन-अडीच किलोमीटरचा पट्टा हिरवागार दिसतो, त्यामागे गुरुजींचे परिश्रम आहेत. गुरुजी हे काम कोणाच्या आदेशावरून किंवा कोणाला खूश करण्यासाठी करत नाहीत. ती त्यांची मौन साधना आहे.
आता उन्हाची काहिली सुरू होईल. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतील. अशा वेळी पाण्याच्या शोधात भटकणारे प्राणी आपण पाहू. उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने गतप्राण झालेले पक्षी आपण बघू. पाण्याअभावी मान मोडून पडलेली झाडे आपण पाहू. एकूणच काय, तर उन्हाळा आणि पाणी हे दोन विषय पुढील काही दिवसांत सतत चर्चेत राहतील. आताच जसे जसे तापमान वाढू लागले, तसे ‘पाणी वाचवा’, ‘पक्ष्यांना पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागले आहेत. अशा संदेशांचे महत्त्व असतेच, पण असे संदेश प्रत्यक्ष आचरणात आणणारे किती जण असतात? असा प्रश्न पडण्याची गरज नाही. आपल्या आसपास असे अनेक जण असतात. कोणताही गाजावाजा न करता ते आपले काम मूकपणे करत असतात. एका अर्थाने ते ‘मौनी साधक’ असतात. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीसाठी, कौतुकासाठी त्याचे काम नसते. गरज असते ती त्यांची तळमळ समजून घेण्याची.
अभिमन्यू सरोदे. भांडूप पूर्व परिसरात सरोदे गुरुजी म्हणून ओळखले जातात. गुरुजी आजच्या काळातील मौनी साधक आहेत, कारण ते जे काम करतात, ते कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नाही. गुरुजी काम करतात ते निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचे. सरोदे गुरुजी बीड जिल्ह्यातील. पोटाची खळगी भरण्यासाठी ते मुंबईत आले. प्रीमिअर कंपनीत नोकरीला लागले आणि प्रामाणिकपणे काम करून सेवामुक्तही झाले. आजच्या घडीला गुरुजींचे वय ऐंशीच्या आसपास आहे. वाढत्या वयाबरोबर गुरुजींचा उत्साहही कायम वाढताना जाणवतो. भांडूपच्या विविध सामाजिक चळवळींत गुरुजींचा सहभाग असतो. नेमकेपणाने मत मांडणे आणि स्वागतशील भूमिकेतून समोरच्या व्यक्तीला ऐकणे ही गुरुजींची स्वभाववैशिष्ट्ये आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची विलक्षण हातोटी गुरुजींकडे आहे. तर असे हे सरोदे गुरुजी उन्हाची काहिली वाढू लागली की एक काम करतात - झाडांना पाणी घालणे. गुरुजींच्या या कामात विशेष काय? असा प्रश्न आपणास पडू शकेल आणि तो बरोबरही असेल. गुरुजी भांडूप पूर्वेला राहतात. त्यांच्या घरापासून पूर्व द्रुतगती महामार्ग (ईस्टन एक्स्प्रेस हायवे) दीड किलोमीटर अंतरावर आहे. हायवेच्या दोन्ही बाजूंनी झाडांची लागवड केली आहे, पण पुढे त्यांची काळजी घेणारी व्यवस्था अस्तित्वात नाही. हायवेलगतचे गवत नष्ट करण्यासाठी सरसकट आग लावली जाते. त्यात छोटी-मोठी झाडेही होळपळून निघतात. उन्हाळ्यात या झाडांना पाणी देण्याची कोणतीही व्यवस्था नसते. ही गोष्ट सरोदे गुरुजींच्या लक्षात आली आणि या समस्येचे उत्तर त्यांनी स्वतःच्या पातळीवर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. दररोज पंचवीस लीटर पाणी घेऊन गुरुजी हायवेवर जातात आणि झाडांना घालतात. गेली दहा वर्षे गुरुजींचा हा नेम आहे. गुरुजींच्या परिश्रमामुळे काही झाडांची उंची पाच-सहा फूट झाली आहे. आता त्यांच्या निगराणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. भांडूप पूर्वच्या हायवेवर सुमारे दोन-अडीच किलोमीटरचा पट्टा हिरवागार दिसतो, त्यामागे गुरुजींचे परिश्रम आहेत. गुरुजी हे काम कोणाच्या आदेशावरून किंवा कोणाला खूश करण्यासाठी करत नाहीत. ती त्यांची मौन साधना आहे. तथागतांचे तत्त्वज्ञान जगण्याचा हा एक मार्ग आहे. ही साधना करताना गुरुजींना जो आनंद मिळतो, तो केवळ अनुभूतीचा विषय आहे. तो शब्दात मांडणे अशक्य गोष्ट आहे.
सरोदे गुरुजींशी परिचय झाला तो विहारात. आम्ही सुरू केलेल्या वाचनालयास दान मिळालेल्या पुस्तकांची सूची करणे आणि त्यांची मांडणी करणे या कामात गुरुजींनी खूप मदत केली होती. शांत स्वभावाचे आणि हसतमुख चेहऱ्याचे सरोदे गुरुजी या वयातही कार्यरत आहेत. विहारातील आभ्यासिका व इतर धम्मकार्य यात गुरुजी लक्ष देतात. वाढत्या वयाबरोबर शरीराला जडणाऱ्या व्याधींचा ते कधी बाऊ करत नाहीत की कधी नकारात्मकतेच्या गर्तेत बुडून जात नाहीत, कारण तथागतांचा जीवन मंत्र आचरणात आणत मूक राहून फळाची अपेक्षा न ठेवता काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे गुरुजी नेहमी प्रसन्न दिसतात आणि यापुढेही ते प्रसन्न राहतील. आपल्या मौन साधनेतून इतरांसाठी आदर्श होतील.
9594961860