बच जाए तो और लढे...

विवेक मराठी    06-Feb-2018
Total Views |

***सतीश दातार***

आज या टप्प्यावर जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा एक समाधान निश्चित आहे की, मी मैदान सोडून पळालो नाही. सर्वशक्तीनिशी मुकाबला केला आतापर्यंत. या लढयाने मला माझीच एक नवी ओळख करून दिली. आज मी म्हणेन, 'बच जाए तो और लढे...'

 निम्न मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला आणि आईवडिलांचे कष्ट ओळखून, गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शिकलेला मी एक इंजीनियर माणूस. त्यातही मशीन ड्रॉईंग हा माझ्या विशेष आवडीचा विषय. चाळिशीच्या उंबरठयावर पोहोचेपर्यंत अगदी सर्वसामान्य माणसासारखं चाकोरीबध्द आयुष्य होतं माझं. आयुष्य इतक्या परीक्षा घेईल असा विचारही कधी माझ्या आसपास फिरकला नव्हता. मला कष्टात मोठं करणाऱ्या माझ्या आईबाबांना सुखात ठेवायचं इतकंच स्वप्न होतं आणि ते मी मेहनतीच्या बळावर पूर्णही केलं होतं. मात्र नंतर जे काही विपरीत घडत गेलं, ते म्हणजे नियतीचे अनाकलनीय खेळ होते.

आयुष्याला हे अनपेक्षित वळण लागल्याला एक तप उलटलं आता. ग्रहणाचे वेध जसे प्रत्यक्ष ग्रहणाच्या खूप आधीपासून लागतात आणि प्रत्यक्ष ग्रहणानंतरही बराच काळ चालू असतात, तसंच काहीसं माझ्या आयुष्यात झालं...!

असं म्हणतात की दु:खं कधी एकटं येत नाही. त्याची प्रचिती मला येत गेली. 26 जुलै 2005 च्या मुंबईतल्या प्रलयात माझं पहिलं लग्न वाहून गेलं. त्यानंतर लगेचच 28 ऑॅगस्टला आईचं हार्टचं ऑपरेशन झालं. त्यातच माझ्या एम्प्लॉयरने वेगळया क्षेत्रात बिझनेस सुरू केल्यामुळे माझी नोकरीही गेली होती. डोक्यावर कर्जाचा बोजा... घरात असाहाय्य आई आणि सगळया परिस्थितीने हतबल झालेले बाबा... साथीला कोणीच नाही... भविष्य अंधारलेलं.... काहीच कळत नव्हतं. पुढे काय करायचं, याची वाट दिसत नव्हती.

त्या वेळी आईवडिलांकडून वारशात मिळालेले गुण कामी आले. आईचा धैर्यशील आणि निग्रही स्वभाव, बाबांची लढाऊ आणि अपार मेहनत घेण्याची वृत्ती यातलं माझ्यात काही प्रमाणात आलं असावं. म्हणूनच आयुष्यात जी उलथापालथ चालू होती, तिला धीराने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

काय वाटेल ते झाले तरी मैदान सोडायचे नाही, हा निर्धार माझ्या मनाने त्याच वेळी केला असावा बहुधा. परिस्थितीशी दोन हात करत मी आला दिवस साजरा करत होतो आणि 6 सप्टेंबरला मला एल ऍंड टी कंपनीतून फोन आला. त्यांच्याकडून एक सबकाँट्रॅक्ट मिळत होतं. गेले काही दिवस निराशेच्या ढगांनी वेढलेल्या माझ्या आयुष्यात या संधीच्या रूपाने आशेचा एक किरण डोकावला. माझ्या मित्रांच्या आग्रहामुळे आणि साथीमुळे, मी 'अभिनव इंजीनिअर्स'या नावाने माझ्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

मिळालेल्या कामात स्वत:ला झोकून दिलं. कामाची प्रशंसा झाली आणि एकामागून एक चांगली कामं मिळत गेली. परिणामी अवघ्या सहा महिन्यांत सर्वांचे कर्ज फेडून पहिली बाईक घेतली आणि त्यानंतर आठ महिन्यांत कार घेतली. दोन कामगारांचे वीस कामगार झाले. व्यवसायाच्या उलाढालीने 1 कोटीचा आकडा पार केला. आईबाबांच्या चेहऱ्यावरचा उदासपणा ओसरायला लागला.

2007च्या सुरुवातीलाच घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि 19 जानेवारी 2008ला माझे दुसरे लग्न झाले. स्नेहल माझ्या आयुष्यात आली आणि वाटले, शिशिर सरून वसंत सुरू झाला. आयुष्य परत सुंदर झाले. वर्षभराने आम्ही दोघे आई-बाबा होणार हे कळले आणि स्वर्ग जणू दोन बोटे उरला.

पण नियतीच्या मनात माझ्यासाठी काहीतरी वेगळीच खेळी योजलेली होती. 12 एप्रिल 2009ला स्नेहलचा गर्भपात झाला आणि जणू प्रत्यक्ष ग्रहणालाच सुरुवात झाली.

25 एप्रिल 2009ला माझ्याच ऑॅफिसची भिंत माझ्या पाठीवर कोसळली आणि मी कमरेखाली पूर्णपणे निकामी - म्हणजे पॅराप्लेजिक झालो.



 15 दिवसांनी ऑॅपरेशन करून घरी आलो. हा अपघात किती गंभीर आहे, त्याने आपले आयुष्य कोणत्या वळणावर नेऊन ठेवले आहे याची मला त्या वेळी जाणीव झाली नव्हती. अज्ञानात सुखी होतो. Spinal Cord Injury म्हणजे नेमके काय हे मला माहीत नव्हते. मग त्याचे नंतर होणारे परिणाम तरी माझ्या कसे लक्षात येणार होते? 4-5 महिन्यांत आपण नॉर्मल होऊ आणि परत पूर्वीसारखे काम करू शकू अशा भ्रमात मी वावरत होतो. ऑपरेशननंतर एक महिन्याने मी व्हीलचेअरवरून का होईना, पण परत ऑफिसला जायला सुरुवातदेखील केली.

मात्र चार महिने उलटल्यानंतरही माझ्या अवस्थेत काहीच फरक पडत नव्हता, त्या वेळी पहिल्यांदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणखी किती दिवस आपली अशी अवस्था, या प्रश्नाने मला घेरून टाकले. घरातले वातावरणही खूप गढूळ झाले होते.

शेवटी एक दिवस मी माझ्या मित्राला शपथ घातली आणि सत्य काय ते सांगण्याचा आग्रह केला. जे सांगशील ते ऐकायची आणि स्वीकारायची माझी तयारी आहे असे सांगितले. माझ्या या आश्वासनानंतर मन घट्ट करून त्याने, 'मी आता परत कधीही माझ्या पायावर उभा राहू शकणार नाही' हे सांगितले. या अपघाताने मला वडील होण्यासाठीदेखील असमर्थ करून ठेवल्याची जाणीव करून दिली. माझा धीर खचला. डोळयासमोर अंधार पसरला. जे कळले होते, ते स्वीकारायला मन तयार नव्हते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कळलेल्या वास्तवाने मी मनाने आणि शरीराने पूर्णपणे खचून गेलो. आधीच शरीर दुबळे झाले होते. त्यात मला जो मानसिक धक्का बसला होता, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम झाला. 2009च्या सप्टेंबर महिन्यात 15 दिवस के.ई.एम.मध्ये राहून, अक्षरश: यमाच्या दरवाजापर्यंत जाऊन परत आलो. हे वास्तव स्वीकारणे कठीण जात होते. काही केल्या मन उभारी घेत नव्हते. माझ्या बिघडलेल्या मानसिक स्थितीचा परिणाम, आधीच कोसळलेल्या माझ्या आईवडिलांवर आणि पत्नीवरही झाला होता. आहे ते स्वीकारायला स्वत:ला तयार करायला मला चार महिने लागले.  जे आहे त्यात बदल होईल की नाही याची चिंता करण्यात वेळ घालवण्याऐवजी, आता ह्यापुढे काय करायचे, त्यावरच विचार करायचा, हे मी आणि स्नेहलने ठरवले. माझ्या अपघाताने स्नेहलच्या सगळया स्वप्नांची होळी झाली होती, पण तरीही ती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती.

माझ्या बदललेल्या दृष्टीकोनामुळे जानेवारीपासून तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. पण या कालावधीत उपचारांसाठी जो अफाट खर्च झाला होता, त्याने आर्थिक बाजू पूर्णपणे ढासळली. कामावरची माणसे सोडून गेली, काम मिळणे बंद झाले. कामाविना उभी असलेली मशीनरी विकण्याचा निर्णय मनावर दगड ठेवून घेतला. होती नव्हती तेवढी सगळी बचत, गुंतवणूक संपून गेली. मशीनरी विकून आलेल्या पैशातून घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज आणि व्यवसायासाठीचे काही कर्ज फेडले. त्याच वेळी माझे शाळेतले सगळे 'सवंगडी' मदतीला धावून आले. भरीव आर्थिक मदतीच्या जोडीने त्यांनी मला भरभक्कम मानसिक आधार दिला. घरी बसून काम करण्यासाठी प्रवृत्त केले, शेअर मार्केटचे ज्ञान करून दिले.

मीही स्वत:ला या कामांमध्ये गुंतवायचा प्रयत्न करत होतो. पण माझ्या आयुष्याला लागलेले ग्रहण संपायचे नाव घेत नव्हते. लावलेल्या कॅथेटरमुळे वारंवार इन्फेक्शन होत असल्याने मला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत होते. हे सगळे असह्य झालेल्या माझ्या बाबांनी हाय खाल्ली आणि 9 ऑगस्ट 2012ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बाबांच्या चितेला अग्नी देण्याचे भाग्य काही मला लाभले नाही. त्यांचे सगळे दिवसकार्य माझ्या मेहुण्यांनी - ताईच्या यजमानांनी पूर्ण केले. या धक्क्यातून सावरण्याआधी, सहाच महिन्यांनी माझ्या मेहुण्याचे अचानक निधन झाले. घरात अक्षरश: अंधकार पसरला. आभाळच फाटत चालले होते, ठिगळ लावायचे तरी कुठे हेच कळत नव्हते.

त्या अवस्थेत परत सगळा धीर गोळा करून मी कामाला सुरुवात केली. मला एका मोठया मशीनची ऑॅर्डर मिळाली. त्यासाठी वर्कशॉपवर जाण्याकरिता म्हणून मी माझ्या कारमध्ये आवश्यक ते बदल करून घेतले आणि मला चालवण्यायोग्य अशी कार बनवून घेतली. मिळालेल्या कामासाठी रोज टिटवाळयाहून  ठाण्याला जाऊ  लागलो. पण अपेक्षित रिझल्ट न मिळाल्याने मशीन पूर्ण झाले नाहीच, उलट जवळपास सगळे भंगारात विकून टाकावे लागले. कर्जाचा डोंगर उभा झाला आणि परिणामी तब्येत खालावली. पुढच्या आठ महिन्यांत चार वेळा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. सतत व्हीलचेअरवर बसल्याने कमरेचे दोन्ही सांधे झिजून गेले, त्यामुळे कॅलिपर लावणे आणि त्याच्या आधाराने पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणे बंद झाले. कॅथेटर थेट ब्लॅडरमध्ये घातला गेला आणि Urine Bag नावाचा एक नवीन दागिना अंगावर घेऊन आलो. डॉक्टरांनी तर आशा सोडून दिली होती. पण स्नेहलने सोडली नाही. या सगळया दिव्यात माझ्या कुटुंबाच्या बरोबरीने माझे सासरचे संपूर्ण कुटुंब, ताईचे कुटुंब आणि अन्य नातेवाईक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या सर्वांशिवाय यातून तरून जाणे अशक्य होते.

या अवघड वळणावर परत एकदा माझे सवंगडी माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी सगळयांनी एकत्र येऊन माझ्या डोक्यावरचे सगळे कर्ज एकरकमी फेडून टाकले. तेवढयावरच न थांबता त्यानंतर पुढे वर्षभर माझा दर महिन्याचा घरखर्च भागवला. त्यांचे हे उपकार ह्या जन्मी फेडता येतील असे वाटत नाही. म्हणूनच मला बरेचदा असे वाटते की, मी जितक्या वेळेला यमाला भेटलोय, त्यापेक्षा जास्त वेळेला देव बघितला आहे. ह्या संपूर्ण काळात मला भेटलेली अगणित माणसे - ज्यात माझ्या कुटुंबाबरोबरच ताई, सासरची मंडळी, डॉक्टर, माझे सवंगडी, माझे व्यावसायिक मित्र, ड्रायव्हर, शेजारी... किती जण आठवू... - या सगळयांच्या रूपात देवच तर होता बरोबर, अशी माझी श्रध्दा आहे. आणि जोवर ह्या सगळयांची साथ आहे, तोपर्यंत ही लढाई मी सर्वशक्तीनिशी लढेन.

2015 साली परत एकदा मरणाच्या दारात जाऊन आलो, पण आता मात्र हॉस्पिटलमध्ये न जाण्याचा निर्धार केला होता. डिसेंबरमध्ये परत मशीन डिझाईनचे माझे आवडते काम सुरू केले आणि पुढच्या वर्षभरात मशीन डिझाईनची पाच-सहा कामे केली. नोव्हेंबर 2017मध्ये इंजीनिअर्सना शिकवण्याची संधी अचानक मिळाली आणि मी घरी बसून Team Viewerच्या मदतीने Online क्लास सुरू झाले. मिळत गेलेल्या या कामांमुळे मार्च 2017पासून मी घर खर्च करू शकलो. या सगळया जीवघेण्या कसोटयांमधून पार झालो, ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे अशी माझी श्रध्दा आहे.

आता मात्र ग्रहण संपून त्यानंतरचे वेधदेखील संपले आहेत, आणि परत पूर्ण तेजाने तळपायची वेळ जवळ आली आहे. आज या टप्प्यावर जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा एक समाधान निश्चित आहे की, मी मैदान सोडून पळालो नाही. सर्वशक्तीनिशी मुकाबला केला आतापर्यंत. या लढयाने मला माझीच एक नवी ओळख करून दिली. आज मी म्हणेन, 'बच जाए तो और लढे...'

9820323268