व्यावसायिक वृध्दीसाठी सोशल मीडिया वापरला जात असतो, त्या वेळी केवळ ग्राहक-व्यावसायिक संबंध एवढाच त्याचा परीघ न राहता याद्वारे अनेक व्यावसायिकदेखील एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाची निकड प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यावसायिक वापरासाठी त्याचा प्रभावी उपयोग करून आपला व्यवसाय वृध्दिंगत करता येऊ शकतो.
सोशल मीडिया हा आजच्या काळातील परवलीचा शब्द मानला जातो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकेल अशी त्याची ताकद आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर अगदी सरकारी यंत्रणेद्वारेदेखील सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केला जाताना आपण पाहतो. अशा पार्श्वभूमीवर व्यवसायासाठी त्याला किती वाव आहे, हे चाचपडून बघितले पाहिजे.
ब्रँडविषयी जागरूकता - व्यावसायिक वापरासाठी जेव्हा सोशल मीडिया हाताळला जातो, त्या वेळी व्यवसायाच्या ब्रँडविषयी जागरूकता निर्माण करणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. डिजिटल मार्केटिंगच्या युगात सोशल मीडियाद्वारे प्रभावीपणे ब्रँड जागरूकता करता येऊ शकते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या 91% तज्ज्ञांचे मत आहे. आपला व्यावसायिक ब्रँड जेवढा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तेवढीच व्यवसायाची वृध्दी होत असते.
ग्राहक एंगेजमेंट - कोणताही व्यवसाय करताना ग्राहक एंगेजमेंट हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय ठरत असतो. आपल्या व्यवसायिक ब्रँडकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक तऱ्हा पूर्वीपासून वापरल्या जात आहेत. टी.व्ही., एफ. एम. रेडिओ यावर जाहिराती देणे असो किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जाहिराती देऊन त्याबद्दल ग्राहकांना आकर्षित करण्याची पध्दती असो, या सर्व पध्दती आता जुन्या झाल्या आहेत. तसेच यात एकेरी संभाषण असल्यामुळे, ग्राहकाला काय वाटते हे जाणून घेता येत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हे संभाषण दोन्ही बाजूंनी करता येते. त्यामुळे ग्राहक एंगेजमेंट पूर्वीच्या पध्दतीपेक्षा सोशल मीडियाद्वारे अधिक प्रभावीपणे करता येते.
विश्वासार्हता - विश्वासार्हता ही व्यावसायिक वृध्दीची गुरुकिल्ली मानली जाते. एखाद्या ब्रँडप्रती ग्राहकांची विश्वासार्हता संपली तर तो व्यवसाय तळाला जातो, याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. ती टिकवण्यासाठी, किंबहुना वाढवण्यासाठी सोशल मीडिया मोठया प्रमाणात उपयोगी ठरताना दिसत आहे. आजच्या टेक्नोसेव्ही जगात जेव्हा ग्राहक तुमच्या व्यवसायाला सोशल मीडियावर पाहतात, तेव्हा तुमच्या व्यवसायाशी जोडले जाण्याचा सहज मार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे ग्राहकाला येणाऱ्या अडचणी तेथे सहज मांडल्या जाऊन व्यावसायिकांनादेखील त्या सोडवण्यात जलद गती प्राप्त होते, ज्यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील संबंध घट्ट होतात. परिणामी व्यवसायाप्रती विश्वासार्हता वाढत असते.
व्यवसायिक संबंध - जेव्हा व्यावसायिक वृध्दीसाठी सोशल मीडिया वापरला जात असतो, त्या वेळी केवळ ग्राहक-व्यावसायिक संबंध एवढाच त्याचा परीघ न राहता याद्वारे अनेक व्यावसायिकदेखील एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. स्टार्ट-अप्ससारख्या नवीन व्यवसायांना गुंतवणुकीसाठी सोशल मीडिया बळ देऊ शकते, त्याच प्रकारे लघुउद्योजकदेखील यातून आपला परीघ वाढवून विविध गटांशी जोडले जात असतात, ज्याद्वारे व्यावसायिक संबध अधिक दृढ आणि घट्ट होऊन आपला व्यापार वाढवण्याचे प्रभावी मध्यम बनू शकते.
खर्च - आजच्या जाहिरात युगात सोशल मीडिया हाताळणे ही सर्वात स्वस्त आणि कमी खर्चीक बाब आहे. कुठल्याही सोशल मीडियाला साइन-अप करण्यासाठी पैशांची गरज भासत नाही. त्यामुळे अनेक बाबतीत खर्च कमी होत जातो. जोपर्यंत यावर पेड-प्रमोशन (पैसे देऊन जाहिरात करणे) केले जात नाही, तोपर्यंत हे माध्यम मोफत उपलब्ध आहे. विविध व्यावसायिक गरजेनुसार याचा वापर ठरत असतो.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाची निकड प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यावसायिक वापरासाठी त्याचा प्रभावी उपयोग करून आपला व्यवसाय वृध्दिंगत व्हावा, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
9579559645