Enter your Email Address to subscribe to our newsletters
समृध्दीची सुरुवात बचतीतून होते आणि बचतीची सुरुवात कोणत्याही वस्तूचा गरजेइतकाच वापर करण्यातून होत असते. कोणतीही गोष्ट वाया घालवू नये, या शिस्तीची पहिली पायरी म्हणजे अन्नसंस्कार. गरिबीने आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर हा संस्कार केला. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ही वयाच्या पाचव्या वर्षापासून मिळालेली शिकवण मी आजही काटेकोर पाळतो.
माझ्या जन्मानंतर पाचच वर्षांत नियतीने मला दोन टोकांना फिरवून आणले. मी तान्हा असताना माझ्या बाबांची नेमणूक पंजाबातील पतियाळा शहरात होती. तेथे मुबलक दूध-दुभते व पौष्टिक आहार मिळाल्याने पुढील चार वर्षांत मी चांगलाच गुटगुटीत झालो. पण नंतर बाबांची बदली मुंबईत झाली. माझ्या पाठीवर वर्षभराने जन्मलेला धाकटा भाऊ होता. आम्हा भावंडांचे एकटीने संगोपन करण्यात आईची तारांबळ उडू लागली. त्यातून बाबा हवाई दलात कनिष्ठ पदावर नोकरीला असल्याने हातात पडणारा पगार तुटपुंजाच होता. अखेर मन घट्ट करून आईने तिच्या आई-वडिलांकडे - म्हणजे शिरखेड (जिल्हा - अमरावती) येथे प्राथमिक शिक्षणासाठी माझी रवानगी केली. या आजोळी चार वर्षे मी गरिबीत आणि काटकसरीत काढली.
आजोबा सरकारी दवाखान्यात कंपाउंडर असल्याने त्यांचीही स्थिती बेतासबात होती. आजोळच्या या घरी मी सकाळी वरण-पोळी, तर रात्री दही-पोळी इतकेच जेवण रोज जेवत होतो. या तीन पदार्थांखेरीज भात हा चौथा पदार्थ केवळ सणासुदीलाच ताटात बघायला मिळायचा. भाजी बाजारात स्वस्त मिळाली तरच चाखता यायची. चटणी-कोशिंबिरीचे लाड नसत. कधी जीभ चाळवलीच तर आजीला लाडी-गोडी लावून मसाल्याची किंवा लाल तिखटाची चिमूट मिनतवारीने ताटात पडायची. मला रोज रात्री आंबट दह्याबरोबर पोळी खाण्याचा कंटाळा यायचा. मग मी आजीकडे थोडी साखर मागायचो, पण त्यावर आजीचे उत्तर ठरलेले असायचे ''साखर चहापुरतीच आहे. सध्या तू दह्यात साखर आहे, असे समजून ते खा.'' अजाणतेपणामुळे मला तिची असाहाय्यता उमजायची नाही आणि मी हट्ट करायचो, पण हळूहळू गरिबीची जाणीव होऊ लागली तसतसा मी परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलो. भुकेच्या वेळी समोर येईल ते आणि पानात पडेल तितकेच खाऊन भूक भागवायला शिकलो.
माझे आई-बाबा स्वाभिमानी होते. ते आम्हा भावंडांना नेहमी सांगत, ''बाळांनो, आपण गरीब असलो तरी रोज तुमच्या पोटात काही तरी पडेल आणि तुम्ही कधी उपाशी राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, पण तुम्ही चुकूनही परान्नाचा लोभ धरू नका. दुसऱ्याच्या घरात भले श्रीखंड-पुरी असली, तरी त्यांची त्याना लखलाभ. पण म्हणून आपल्या घरच्या चटणी-भाकरीची निंदा करू नका.'' हा उपदेश माझ्या मनात पक्का ठसल्याने मी अगदी इयत्ता दुसरीत असतानाच इतका प्रौढपणाने वागू लागलो, की कुणाच्या घरी गेल्यावर त्यांनी काही खाण्याचा किंवा जेवणाचा आग्रह केला, तर मी खुशाल सांगायचो की ''माझे नुकतेच जेवण झाले आहे आणि पोटात कणभरही जागा नाही.'' दुसऱ्याच्या घरच्या जेवणावर नजर ठेवण्यापेक्षा खोटे बोलण्याचे पाप परवडले, अशी मनाची समजूत घालत असे.
एकीकडे ही अशी स्वाभिमानाची शिकवण मिळत असताना आईने आम्हाला ताटात काहीही न टाकण्याचाही दंडक घालून दिला होता. कधी नातेवाइकांच्या किंवा परिचितांच्या घरी भोजनासाठी बोलावले, तर आई प्रथम आम्हा मुलांना जेवायला घालून स्वत: घरधनिणीला वाढपात मदत करत असे आणि बहुधा शेवटच्या पंगतीला बसत असे. वाढताना तिचे लक्ष आमच्या पानाकडे असायचे. आम्ही कोणताही पदार्थ ताटात टाकून देत नाही, याकडे तिचे बारीक लक्ष असे. प्रथम वाढलेला पदार्थ सक्तीने खायचा, चव न आवडल्यास तो पुन्हा मागून घ्यायचा नाही, पण वाढायला सांगून ताटात टाकायचाही नाही, असा तिचा दंडक होता. आईच्या नजरेचा धाकच आम्हाला इतका पुरेसा होता, की आम्ही हा दंडक कधीच मोडला नाही.
मी मोठा मुलगा असल्याने आई मला नेहमी व्यंकटेश स्तोत्रातील एक वाक्य सांगायची, ते म्हणजे 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा.' ती म्हणायची, ''दादाऽ, ज्यांना मस्ती असते तेच लोक अन्न पानात टाकून त्याचा अपमान करतात. खाऊन माजावे, टाकून माजू नये ही म्हणसुध्दा आपल्यासारख्या गरिबांसाठी नाही. माणसाने भूक भागेल इतकेच घ्यावे, पण कधीच माजू नये.'' आईचे हे शब्द माझ्या मनावर लहान वयापासून कोरले गेले आणि मी नेहमी त्या भाकरीला वंदन करत गेलो. बाबांनी दुबईत नोकरी बदलली, तेव्हा नव्या कंपनीने व्हिसा न दिल्याने ते सहा महिने मुंबईत घरी बेरोजगार म्हणून बसून होते. साठवलेली शिल्लक घरखर्चात भरभर संपत होती. एक वेळ तर अशी आली की घरात धान्याचा दाणा आणि खिशात एकही पैसा नाही. ती रात्र आम्हाला पाणी पिऊन काढावी लागणार होती. पण माझ्या आईने असे परीक्षा घेणारे दिवस खूपदा पाहिले होते. तिने हळदी-कुंकवाला ओटीत मिळणाऱ्या तांदळाच्या छोटया पुरचुंडया देव्हाऱ्यात साठवून ठेवल्या होत्या. त्या दिवशी आईने त्या तांदळाची खिचडी केली, पण आम्हाला उपाशी राहू दिले नाही.
मी दुबईत बाबांना मदत करायला गेलो, तेव्हा लहानपणाप्रमाणेच रोजच्या जेवणात भात, पातळ भाजी आणि बेकरीतून विकत आणलेल्या पावासारख्या रोटया (खुबूस) अशा तीन पदार्थांवर तब्बल साडेतीन वर्षे गुजराण केली. नंतरच्या काळात मला आम्लपित्ताचा तीव्र त्रास झाल्याने माझे रोजचे जेवण म्हणजे कोंडयाची चपाती व हळद-मीठ घालून उकडलेल्या भाज्या इतकेच होते. हे जेवणही मी सलग सहा वर्षे खात होतो. निरोगी राहण्यासाठी साधे जेवणच उपयुक्त असते, हे मी त्यातून शिकलो. एकदा एक परिचित महिला आमच्या घरी आली होती. माझे साधे जेवण बघून तिला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, ''दातार, तुम्ही चांगल्या स्थितीतले असूनही हे असले कोरडे जेवण का जेवता?'' त्यावर मी गंमतीने त्यांना म्हणालो, ''ताई, हेच जेवण माझा परमेश्वर आहे. माणूस श्रीमंत झाला म्हणून सोने खात नसतो. पोटाची भूक भाकरीच शमवते.''
मला व्यावसायिक भेटीनिमित्त एकदा अन्य आखाती देशात जावे लागले. माझी ज्यांच्याशी भेट होणार होती, ते गृहस्थ प्रचंड श्रीमंत व राजघराण्यातील होते. त्यांनी मला एका पंचतारांकित हॉटेलात चर्चेसाठी बोलवले होते. अरब देशांमध्ये असा शिष्टाचार आहे की आधी भेट होते, अभिवादनानंतर कुटुंबाची ख्याली-खुशाली विचारली जाते, नंतर रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला जातो आणि सगळयात शेवटी चर्चा केली जाते. त्यानुसार आधी भोजन मागवले गेले. त्या गृहस्थांनी त्यांना आवडेल अशा ढीगभर पदार्थांची ऑॅर्डर दिली. चिकन, मटण, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मिठाया, सरबते असे टेबल भरून पदार्थ मांडले गेले. इतके सगळे पदार्थ केवळ दोघांसाठी, या विचाराने माझ्यावर दडपण आले. मी मोजकेच पदार्थ ताटात वाढून घेतले. त्या गृहस्थांनीही थोडेफार आपल्या ताटात वाढून घेतले, उष्टावल्यासारखे केले आणि चक्क टाकून दिले. वेटर ते अन्न घेऊन जाताना मला गलबलून येत होते. खरे तर ज्या पदार्थांत 25 गरजूंचे पोट भरू शकले असते, तेच अन्न आता खरकटे म्हणून वाया जात होते. मी एक छोटा व्यावसायिक होतो. बडया लोकांपुढे काय बोलणार! मी गप्प राहिलो आणि कामाचे बोलून निघून आलो, पण अन्नाच्या नासाडीचे ते चित्र मनातून जाता जात नव्हते. आई-वडिलांनी मुलांवर केलेले अन्न संस्कार किती महत्त्वाचे असतात, हे मला समजून आले.
मित्रांनो! मी आजही जेवणाच्या बाबतीत काटेकोर आहे. मी स्वत: ताटात टाकत नाहीच, तसेच माझी मुले मोठी असली तरी त्यांनाही ताटात टाकू देत नाही. मंगल कार्यालयांतून आणि हॉटेलांमधून रोज जी अन्नाची नासाडी होते, त्यामुळे माझे मन व्यथित होते. मला कुठेही भोजनासाठी आमंत्रण दिल्यास मी प्रत्येक पदार्थ एकदाच वाढून घेतो आणि तेवढयावरच जेवण आटोपतो. त्याचा दुहेरी फायदा होतो. मोजके खाल्ल्याने माझे आरोग्यही सांभाळले जाते आणि माझ्या ताटात काहीही वाया जात नाही. कुणी मला समृध्दीच्या वाटेवर जाण्याची सोपी युक्ती विचारल्यास मी म्हणेन, की ''आधी पानात न टाकण्याची सवय लावून घ्या. जी भाकरी आपल्याला जगवते, तिचा अपमान करू नका. त्याचबरोबर समाजामध्ये ज्यांना एक वेळचे जेवणही पोटभर मिळत नाही, त्या गरिबांचा विचार करून तशी मदत करा.''
हिंदीमध्ये एक म्हण आहे - 'रोटी की कीमत भूखाही जाने.'
(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर किंवा 00971505757887 या व्हॉट्स ऍप क्रमांकावर पाठवू शकतात.)