समतायुक्त, शोषणमुक्त समाजासाठी...

विवेक मराठी    08-Dec-2018
Total Views |


बीजामध्ये वटवृक्ष सामावलेला असतो. मात्र त्याचा प्रत्यय येण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. आणि या कालावधीत कुणीतरी या बीजाचे संगोपन, संवर्धन करावे लागते. तरच बीजात सामावलेला वटवृक्ष आपण पाहू शकतो. 1983 साली महाराष्ट्रात समरसता विषयाचे काम सुरू झाले. प्रबोधन आणि भावजागृती यांच्या साहाय्याने समाजात समरसता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आता देशभर विस्तारला असून संघरचनेत 'समरसता गतिविधी' म्हणून स्वतंत्र आयाम कार्यरत झाला आहे.

1 व 2 डिसेंबर 2018 रोजी नागपूर येथे समरसता गतिविधी या विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. संघ व्यवहारात कार्यकर्ता बंधूंना प्रशिक्षण देणारे अनेक वर्ग सातत्याने होत असतात. मग याच वर्गाला एवढे महत्त्व कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो. समरसता अभ्यासवर्गामागेही तो आहेच. 'समरस समाज, समर्थ भारत' हे ब्रीद घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी निवडक 404 कार्यकर्ते रेशीमबागेत येतात आणि भारताचे लघुरूप साकार करत एक ध्यास, एक दिशा स्पष्ट करतात, तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते.

'सार्वजनिक ठिकाणी वटवट करण्याचे व्यासपीठ' अशा शब्दात सुरुवातीला समरसता या संकल्पनेची खिल्ली उडवण्यात येत असे. आज समरसता ही संघकामाची महत्त्वाची गतिविधी आहे. संघाची स्वतःची कार्यशैली आहे. कार्यशैलीत स्वतंत्र परिभाषा आहे. गतिविधी म्हणजे अधिक गतीने, ताकदीने काम करणे होय. संघ कोणत्याही गोष्टीची केवळ इच्छा व्यक्त करत नाही, तर ती इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्यासाठी संघातील कर्तृत्ववान प्रचारकांची नियुक्ती गतिविधीच्या कामात होते. समरसता गतिविधीचे अखिल भारतीय पातळीवर संयोजक म्हणून श्यामप्रसाद व सहसंयोजक म्हणून रवींद्र किरकोळे काम पाहत आहेत.

1983 साली महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा विचार करून सामाजिक समरसता मंचाचे काम सुरू झाले. दत्तोपंत ठेंगडी, दामूअण्णा दाते अशा ज्येष्ठ प्रचारकांच्या मार्गदर्शनाखाली मंचाचे काम सुरू झाले. नंतर आवश्यकता म्हणून समरसता मंचाच्या पुढाकाराने भटके विमुक्त विकास परिषद आणि समरसता साहित्य परिषद अशी कामे सुरू झाली. समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद आणि समरसता साहित्य परिषद या तिन्ही संस्थांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवावर समरसतेची रेषा अधोरेखित केली. संवाद व संपर्क या आयुधांनी समाजमन ढवळून काढले. समरसता यात्रा, साहित्य संमेलन, यमगरवाडी प्रकल्प यांच्या माध्यमातून समाजाला समरसतेचा मार्ग दाखवला. श्रीगुरुजींचे जन्मशताब्दी वर्ष 2006 साली होते. तेव्हापासून समरसता हा अखिल भारतीय विषय झाला. ज्येष्ठ प्रचारक मधूभाई यांनी परिश्रमपूर्वक समरसतेचा विषय देशभर रुजवण्यासाठी कष्ट घेतले. या साऱ्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे झालेला अखिल भारतीय समरसता वर्ग हा बीजापासून वटवृक्ष साकार होण्याच्या प्रक्रियेचा अंतिम बिंदू होता. 'समरस समाज, समर्थ भारत' या मंत्राने भारावलेल्या कार्यकर्ता बंधुभगिनींच्या एकत्रीकरणातून व्यक्त होणारे भावी भारताचे ते चित्र होते. समरसता या संकल्पनेबाबत आता चर्चा करण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष कृती, व्यवहार करण्याची ही वेळ आहे आणि आपल्या कृतीतून, व्यवहारातून आदर्श उभा करत समाजाला समरसतेच्या पुण्यप्रवाहात सम्मीलित करून घेण्याचा हा आरंभबिंदू आहे, हेच या अभ्यासवर्गाचे सार आहे, हा समरसता गतिविधीचा अभ्यासवर्ग होता.


 

सन्मान आणि स्मरण

आज समरसता हा विषय संपूर्ण देशभर पोहोचला असला, तरी त्याची सुरुवात महाराष्ट्रात 1983 साली झाली. सामाजिक समरसता मंच या नावाने हे काम सुरू झाले. अनेक समस्यांशी आणि आव्हानांशी झगडत पहिल्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी समरसता चळवळीस आकार दिला. त्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान आणि स्मरण या अभ्यासवर्गात करण्यात आले. स्व. दत्तोपंत ठेंगडी, स्व. दामूअण्णा दाते, स्व. नामदेवराव घाटगे, स्व. मोहनराव गवंडी, स्व. प्रतापशेठ किनवडेकर इत्यादी दिवंगत कार्यकर्त्यांचे स्मरण करण्यात आले, तर रमेश पतंगे, भि.रा. इदाते, रमेश महाजन, रमेश पांडव, श्याम अत्रे, देवजीभाई रावत, अशोक मोढे इत्यादी मान्यवरांचा सन्मान मा. मोहनजींच्या हस्ते करण्यात आला.

काय होते या अभ्यासवर्गाचे मुख्य सूत्र? समाजात जर समरसता आणायची असेल, ती कृतीतून प्रकट व्हायची असेल तर प्रथम ती कार्यकर्त्यांच्या व्यवहारात यायला हवी. त्याच्या घरातून त्यांची अनुभूती मिळायला हवी आणि म्हणूनच संघस्वयंसेवकाचे आचार-विचार समरसतायुक्त असायला हवेत, त्याच्या परिवाराचा प्रभाव आसपासच्या परिसरावर निर्माण झाला पाहिजे हे सूत्र धरून या अभ्यासवर्गात दोन दिवस विविध विषय झाले.

दोन दिवसांत एकूण चार वेळा पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभले. समरसता या विषयात संघ किती गंभीरपणे विचार करतो, हेच मा. मोहनजींच्या मार्गदर्शनातून लक्षात येते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ''आपल्याला समरसतेचे काम करायचे नाही, तर आचरण करायचे आहे.मागील दोन हजार वर्षांपासून आपल्या समाजात विषमता आहे. ती आता समाप्त झालीच पाहिजे. समरसता हे काही निवडक समूहाने करण्याचे काम नसून सर्वांनी मिळून ते करायचे आहे. एकरस, समतायुक्त, शोषणमुक्त समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. संघटनेच्या आत आणि समाजातही समरसतेचे प्रतिबिंब आपणास दिसायला हवे. त्यासाठी स्वयंसेवकांनी आपला व्यवहार बदलायला हवा. समाजातील प्रत्येक स्तरावर, संघटनेतील प्रत्येक स्तरावर मित्रता वाढवून आपले संबंध अधिक घट्ट अाणि निर्दोष केले पाहिजेत. समरसता हा फावल्या वेळात करण्याचा विषय नाही. त्यासाठी नियमित वेळ द्यावा लागेल. अभ्यास करावा लागेल. आपल्या कामाची गती बदलावी लागेल. व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जीवन, सामाजिक जीवन या चारही पातळयांवर आपले व्यवहार समरसतापूर्ण असायला हवेत.

कार्यकर्ता बंधूंनी आपल्या आचरणातून समाजाला समरसतेची अनूभूती दिली पाहिजे. समाजात काम करताना महापुरुषांची जयंती, पुण्यस्मरण हे सर्वांनी मिळून केलेपाहिजेत, यासाठी कार्यकर्ता बंधूंनी प्रयत्न करावेत. समाजात विद्वेष पसरवणारे लोक आणि त्याच्या संस्था यांचाही अभ्यास आपण करायला हवा. समाजिक समस्यांचे निराकरण करण्यात आपला पुढाकार असायला हवा. बौध्दिक स्पष्टता, जिवंत संपर्क, समाजातील गुणवान व्यक्तींचा समूह आणि समरसता गतिविधीचे कार्यकर्ते ही पुढील काळात चतुरंग सेना असणार आहे. या बळावरच आपण सामाजिक समरसतेची अनुभूती समाजला देणार आहोत.''

समरसता गतिविधी म्हणून आपण काय साध्य करणार आहोत, याबाबत मार्गदर्शन करताना मोहनजी म्हणाले, ''समरसतेचे हे काम आपल्याला नवीन नाही. हे काम खूप काळापासून चालू आहे. बऱ्याच वेळा समता शब्दाचा उल्लेख येतो. समतेच्या मुळातच समरसता आहे. आपल्याला समरस हिंदू समाज उभा करायचा आहे याचा अर्थ असा की, शोषणमुक्त समाज उभा करणे, आत्मविस्मृती-भेद-स्वार्थ-विषमता यापासून समाजाला मुक्त करणे. सर्व प्रकारच्या विषमतांना भारतीय चिंतनात स्थान नाही. विचाराच्या आधारावर आचरण करणे म्हणजे हिंदू समाज होय. अधर्माचा व्यवहार धर्माच्या नावाने केल्यामुळे आपल्या समाजाची ही परिस्थिती आहे. आपली धर्मशास्त्रे सांगतात - सुख बाहेर नाही, तर ते आतमध्ये आहे. व्यवहारात संतुलन साधण्याचे मार्गदर्शन सर्वच तत्त्वदर्शनांनी केले आहे. देश-काल-परिस्थितीनुसार आपण त्याचा विचार करायला हवा. एकांतसाधना आणि लोकार्थ जीवन हे हिंदुत्व आहे. आपल्या समाजात जी विकृती आली, ती समजून घेतली पाहिजे. ही विकृती मानसिकतेशी जोडलेली आहे. बऱ्याच वेळा मनच आपल्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जाते. म्हणून मन:परिवर्तन आवश्यक आहे. मनातील भेद दूर करून भारतीय जनसिंधूचा प्रत्येक बिंदू आपला आहे हा मनोभाव निर्माण करायला हवा. संघात आपण सर्व हिंदू असतो. पण समाजात जात असते आणि भाव मनात असतात, म्हणून मन बदलण्यावर भर दिला पाहिजे.

 आपण तात्कालिक परिणामाबरोबरच दीर्घकालीन परिणामांचाही विचार करायला हवा. आपले काम गतीने करत समताविरोधी प्रचार-प्रसारांना उत्तर दिले पाहिजे. आता आपल्या कामाची टेक-ऑफ स्थिती आली आहे. आपण उंच भरारी घेण्यास सिध्द झालो आहोत. आता कोणत्याही प्रकारचा संदेह न बाळगता आपण गतीने काम केले पाहिजे. या प्रवासात आपल्या ऐकून घेण्याची क्षमता वाढवावी लागेल. विषमतेबाबत समाजात प्रचंड चीड आहे आणि विषमतेच्या मुळाशी धर्म आहे अशा प्रकारचा भ्रमही समाजात आहे. आपण शांतपणे ऐकण्याची क्षमता विकसित करताना समरसतेचा भाव सहजपणे मनात उतरेल याची काळजी घेतली पाहिजे. अनेक प्रश्न येतील, टीका होईल... या साऱ्याचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

 आरक्षणासारखा विषय समोर येईल. आपली आरक्षणाची भूमिका ठामपणे पण शांत स्वरात समजावून सांगायला हवी. कसे बोलायचे हे आपण शिकायला हवे. समरसतेला अनुकूल वातावरण असले, तरी समाजात भ्रम निर्माण करणारेही आहेत. त्यांना वैचारिक मार्गाने उत्तर देत, संवाद साधत बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्यासारख्या समरस आचरण करणाऱ्यांची संख्या वाढवणे आणि त्याचा प्रभाव निर्माण करणे म्हणजे हिंदू समाज समरस करणे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आवश्यक असेल तेवढे काम करण्याची आपली मानसिकता असायला हवी. आपल्याला संघटन निर्माण करायचे नाही, तर समाजाच्या आधारावर समाजात परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठी सक्रिय कार्यकतर्े उभे करून त्याच्या बळावर अपेक्षित परिणाम साध्य करायचा आहे. आपला मूळ विचार हा हिंदू संघटन करण्याचा आहे. सामाजिक समरसता हा त्या विचाराचा एक आयाम आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि काम आदेश देऊन नाही, तर विवेकानेच होणार आहे.''

या दोन दिवसांच्या अभ्यासवर्गाचा समारोप करताना मा. मोहनजी म्हणाले, ''आपण युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचे घटक आहोत. आपल्या कार्याची आपल्याला स्पष्टता हवी. आपल्यासारखे अन्य कुणी विचार करत नाही आणि अन्य लोकांसारखे आपल्याला कामही करायचे नाही. आपला विचार आणि पध्दती वेगळी आहे. सामाजिक समरसतेचा संकोच होता कामा नये, तर ती स्वाभाविकरीत्या प्रकट व्हायला हवी. आज समाजात विविध भ्रम पसरवले गेले आहेत. आपण समतेचे, समरसतेचे समर्थक आहोत. आपलेपणाचा व्यवहार व नैसर्गिक दृष्टीने समतेचे आचरण या आधारावर आपली वाटचाल करायची आहे. धर्माची परिभाषा सांगते की आपण सर्व एक आहोत. मन, कर्म व वचन यांतून हे सत्य प्रकट होईल, तरच समाजाकडून त्याचा स्वीकार होईल याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे. 'आधी केले, मग सांगितले' अशा मानसिकतेत आपण उभे राहिले पाहिजे. दररोज वेळ काढून या विषयात स्वतःला समर्पित केले पाहिजे.

 संघकार्यपध्दतीत विकासात्मक रचनावादाला महत्त्व आहे. त्यामुळे आपण आपल्या विषयाशी समरस होत त्याच्याशी तादात्म्य पावले पाहिजे. समाजाची स्थिती बदलायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला काम करायचे आहे. त्याशिवाय आपल्याला दुसरी कोणतीही गोष्ट नको नाहे. नियती नेहमी प्रामाणिकता, सचोटी पाहत असते. आपण आपले मन, वचन आणि कर्म यांच्या केंद्रस्थानी आपला समाज ठेवून वाटचाल सुरू केली, तर आपल्याला जे साध्य करायचे आहे, ज्या समरस समाजाचे आपण स्वप्न पाहिले आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या व्यवहारातून समाजावर प्रभाव निर्माण केला पाहिजे.'' समरस समाज, समर्थ भारत हे ध्येय डोळयासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या कार्यकर्ता बंधूंसाठी मा. मोहनजींनी जी शिदोरी दिली आहे, ती दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या अभ्यासवर्गास देशभरातून कार्यकर्ता बंधू आणि भगिनी उपस्थित होते. आपापल्या स्थानी आपल्या क्षमतेनुसार समरसतेचे काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना आपली दिशा स्पष्ट करण्याची आणि कृतीला गती देण्याचे संधी या वर्गामुळे प्राप्त झाली. अनेक प्रांतांनी तयार करून आणलेली समरसता प्रदर्शने, अभ्यासवर्गांचे ध्येयभारित गीत आणि आधिकारिवर्गाशी सहज संवाद यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला नवी ऊर्जा मिळाली. समरसतेसमोरची आव्हाने, समाजाच्या अपेक्षा इत्यादी विषयांवर या अभ्यासवर्गातून मार्गदर्शन मिळाले. या वर्गात समरसता गतिविधीचे पालक म्हणून अनेक प्रांतांचे संघचालक व प्रांत प्रचारक उपस्थित होते. सहसरकार्यवाह मा. भय्याजी आणि सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनीही या वर्गात मार्गदर्शन केले.

9594961860