प्राचीन हिंदू आणि बौध्द साहित्यात उत्तर कुरू अर्थात तारिम बेसिन या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. काश्मीरच्या वायव्येला असलेल्या या प्रांतावर चीनचे राज्य आले आणि चीन भारताचा सख्खा शेजारी झाला. तारिम बेसिनच्या पाऊलखुणा भारतीय संस्कृती, भाषा, साहित्य, चित्रकला यांच्याशी मिळत्याजुळत्या आहेत.
बह्लिक देश (Bactria) मागे टाकून आपण उत्तरेला प्राचीन सोगडिया प्रांतात जातो. सोगडियाची राजधानी होती समरकंद. या प्रांतात मोठया प्रमाणात बौध्द साहित्य मिळाले आहे. अनेक बौध्द सूत्र, जातक कथा, प्रज्ञापारमिता सूत्र आदींच्या प्रती इथे मिळाल्या आहेत. सोगडियाच्या पूर्वेला पामीर पर्वतरांगांतून चीनकडे जाणारा महामार्ग आहे. हा मार्ग काश्मीरच्या पलीकडून जातो. या मार्गाने काश्मीरमध्ये उतरले की आपण गिलगिटमध्ये येतो. चीन आणि काश्मीर यांना जोडणारा हा प्राचीन हमरस्ता. तर, पामीर पर्वतातून हा मार्ग तारिम बेसिनमध्ये येतो. तारिम बेसिनच्या दक्षिणेला तिबेटचे पठार व उत्तरेला झुंगारिया (Dzungaria) प्रांत आहे. तारीम बेसिनचा अर्धाअधिक प्रदेश ताकलामकानच्या वाळवंटाने व्यापला आहे. तारिम बेसिनच्या प्रांताला वैदिक साहित्यात व महाभारतात 'उत्तर कुरू' असे नाव येते. ग्रीक साहित्यात या भागाचे नाव Ottorokorrhas (1) असे येते.
तारिम बेसिनमध्ये इसवीसनपूर्व काळापासून प्राकृत गांधारी भाषा बोलली जात असे. येथील काशगर, तुर्फान, याराकंद, खोतान आदी शहरांत गांधारीचे प्राबल्य होते. सोगडियामधून किंवा काश्मीरमधून आलेल्या मार्गातील पहिला टप्पा आहे काशगर. काशगरचे जुने नाव, संस्कृतमधून 'चमकणारा पर्वत' या अर्थाने काशगिरी असे होते. Silk Routeवरचे हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र. इथे फार पूर्वीपासून भारतीय व्यापाऱ्यांची ये-जा होती. ब्रिटिश राजच्या काळातसुध्दा काशगरमध्ये अनेक हिंदू व्यापारी होते. व्यापाऱ्यांबरोबरच काश्मिरी पंडितांचीदेखील या भागात ये-जा होती. चिनी ज्योतिषशास्त्रावर भारतीय ज्योतिषशास्त्राची छाप पडलेली दिसते ती काश्मिरी पंडितांमुळे.
काशगरच्या दक्षिणेला खोतान नावाचे गाव आहे. याचे प्राचीन नाव गौस्थान होते, असे सांगितले जाते. येथील नाण्यांवरील लेख खरोष्टी लिपीत व गांधारी भाषेत आहेत. गांधारी ही प्राकृत भाषा संस्कृतशी जवळीक साधणारी होती. या प्रांतातील शकांची बोलीभाषा संस्कृतच्या जवळची होती. त्यामुळे भारतात आलेल्या शक राजांनी संस्कृत भाषेत शिलालेख लिहिले, यात काहीच आश्चर्य नाही. शक राजा रुद्रदामनचा, पहिल्या शतकातील जुनागडचा शिलालेख हा उत्तम संस्कृत काव्याचा नमुना मानला जातो.
तर, तारिम बेसिनमध्ये जशी गांधारची गांधारी भाषा होती, तशीच गांधारची चित्रशैलीसुध्दा पोहोचली होती. दुसऱ्या शतकापासून इथे गांधार शैलीच्या प्रभावातून निर्माण झालेली Serindian शैली विकसित होऊ लागली. ग्रीक, भारतीय व चिनी शैलींच्या मिश्रणातून ही शैली तयार झाली आहे. अकराव्या शतकापर्यंत या शैलीतून तयार झालेली अनेक चित्रे व शिल्पे पाहायला मिळतात.
गांधारमधून, म्हणजेच आजच्या उत्तर अफगाणिस्तानमधून तारिम बेसिनमध्ये बौध्द धर्मसुध्दा पोहोचला. इ.स. दुसऱ्या शतकात गांधारमध्ये कुशाण राजा कनिष्कचे राज्य होते. कनिष्कच्या दरबारातील राजकवी अश्वघोषने भगवान बुध्दावर व बौध्द धर्मावर अनेक सुंदर संस्कृत काव्य व नाटके लिहिली. त्यापैकी एक नाटक होते सारीपुत्तप्रकरण. सारीपुत्र व मौद्गलायन या दोन भिक्षूंच्या संवादावर आधारित असलेले हे नाटक त्या काळी अतिशय लोकप्रिय ठरले होते. काश्मीर, गांधार, बह्लिक या प्रदेशांमध्ये या नाटकाचे सादरीकरण होत असे. तुर्फान येथील उत्खननात सापडलेली या नाटकाच्या संहितेची हस्तलिखिते सांगतात की अश्वघोषाचे नाटक तुर्फानमध्येसुध्दा सादर केले जात होते!
इ.स. 4थ्या शतकात काश्मीर पंडित कुमारयान, पामीर पर्वत उल्लंघून तारिम बेसिनमधील कुचा (Kuqa) येथे स्थायिक झाला. इथे त्याने बौध्द धर्मीय जीवा नावाच्या कन्येशी विवाह केला. यांचा पुत्र कुमारजीव हा एक थोर बौध्द तत्त्वज्ञ झाला. त्याने काश्मीरमधील मठातून महायानाच्या माध्यामक पंथाची दीक्षा घेतली. त्याच्या विद्वत्तेची कीर्ती दूर चिनी सम्राट यावो झिंगपर्यंत पोहोचली. यावो झिंगने त्याला पाचारण करून घेतले. या राजाच्या विनंतीनुसार कुमारजीवने अनेक बौध्द ग्रंथांचे चिनी भाषांतर केले - उदा., सुखावती व्यूह, वज्रछेदिका प्रज्ञापारमिता सूत्र, सध्दर्मपुंडरीक, विमलकीर्तिनिर्देश इत्यादी. कुमारजीवच्या मृत्युपश्चात चिनी राजाने त्याच्या स्मरणार्थ गान्सू प्रांतात एक पॅगोडा बांधला. पाचव्या शतकातील पॅगोडा मोडकळीस आल्यावर विसाव्या शतकात पुन्हा बांधला. कुमारजीवचा पॅगोडा हे आजही चीनमधील एक धार्मिक तीर्थस्थान आहे.
अकराव्या शतकापर्यंत तारिम बेसिनमध्ये बौध्द धर्माचे व प्राकृत भाषेचे प्राबल्य होते. त्यानंतर तुर्कांनी हा प्रदेश काबीज केला. पुढे तो पूर्व तुर्कीस्तान म्हणून ओळखला गेला. तारिम बेसिन हा प्रांत आता उघूर (Uyghur) म्हणून ओळखला जातो. इ.स. 1949-50मध्ये चीनने हा प्रांत काबीज केला. काश्मीरच्या वायव्येला असलेल्या प्रांतावर चीनचे राज्य आले आणि चीन भारताचा सख्खा शेजारी झाला.
संदर्भ -