ओल

विवेक मराठी    29-Dec-2018
Total Views |

नवीन सदर : निमित्तमात्र 

 एखाद्या लेखनाला कधी एखादी घटना निमित्त ठरते, तर कधी एखादं पुस्तक...कधीकधी याही पलीकडचं असंख्य घटनांच्या साखळीतून मनात तयार झालेलं भावभावनांचं कोलाज शब्दरूप घेतं. असं म्हणतात की अनुभव जितका व्यक्तिगत, तितकाच तो वैश्विक असतो. आपल्यापैकी अनेकांनी या विधानाची  व्यक्तिगत पातळीवर केव्हा ना केव्हा प्रचिती घेतलेली असतेच. असे वैश्विक सत्याच्या जवळ जाणारे काही अनुभवही या सदरातील लेखांमधून आपल्यासमोर येतील.

 लेखांचं स्वरूप ललित की वैचारिक की माहितीपर हे नक्की ठरवलेलं नसलं, तरी या माध्यमातून दर पंधरवडयाला तुमच्या भेटीला यायचं पक्कं ठरलं आहे. या लेखांवर तुमचा प्रतिसाद मिळाला, तर आवडेल. आपल्यात होणाऱ्या संवादातून या सदराला नवी दिशा लाभेल आणि कदाचित काही नवीन
विषयही सापडतील...

नाती... मग ती रक्ताची असोत की जोडलेली किंवा कळत-नकळत जुळलेली.. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यातली परस्पर जिव्हाळयाची ओल टिकायला हवी, टिकवायला हवी. एखाद्या नात्यात जेव्हा या अकृत्रिम जिव्हाळयाचं मनोज्ञ दर्शन घडतं, तेव्हा मनाला होणारा आनंद शब्दांपलीकडचा असतो. असाच हा एक अनुभव.

कामं ऐन भरात असलेली ती एक कलती दुपार होती. समोरच्या पीसीवर चालू असलेल्या कामात माझी तंद्री लागली होती. काम चालू असताना एकीकडे फेसबुक वॉल ओपन करून  मिनिमाइज करून ठेवणं, ही माझी नेहमीचीच सवय. कामाच्या ताणावर शोधलेला एक छोटासा विरंगुळाच म्हणा ना. एका लयीत बोटं कीबोर्डवर चालत असताना, पीसीमधून 'टिंऽऽऽग' असा आवाज ऐकू आला आणि, 'आत्ता या वेळेस कोणाला गप्पांची हुक्की आलीय?' असं मनात येऊन कपाळावर किंचित आठया उमटल्या. त्या ऐकलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष करत कामात डोकं घातलं खरं, पण वाजून क्षणात अंतर्धान पावलेली ती नाजूकशी किणकिण मनात येरझारा घालतच राहिली. मध्ये काही काळ गेला. नंतर पुन्हा 'पिंग' झालं. आणि त्यानंतर काहीच सेकंदांत पुन्हा एकदा. कोणाची तरी काही इमर्जन्सी असावी, असं वाटून शेवटी मी मेसेंजरवर गेले. समोरच्या व्यक्तीचं नाव दिसलं आणि प्रोफाइल पिकही. दोन्ही ओळखीचं वाटलं नाही. फोटो पाहून मुलगा अगदी तरुण आहे हे कळलं. 'या अनोळखी मुलाचं आपल्याकडे इतक्या तातडीचं काय काम असावं बरं?' असा विचार करत मी मेसेज वाचायला सुरुवात केली.

पहिलाच मेसेज, ''हाय मावशी, मी xxx. तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला नावाने ओळखतो. तुझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा, xxx हिचा मी भाचा.''

''अच्छा, हो का?'' त्याने नाव सांगताच माझ्या डोळयासमोर तिचा हसतमुख चेहरा आला. आमच्या व्हॉट्स ऍप ग्रूपमधली ती एक मुख्य मेंबर. सर्वांशी मिळून मिसळून वागणारी. ग्रूपच्या कोणत्याही कार्यक्रमात घरातल्या एखाद्या जबाबदार वडीलधाऱ्याप्रमाणे लक्ष घालणारी ती. तिचा हा भाचा. ओळखीची ही प्राथमिक खूण पटल्याने मनावरचा ताण कमी झाला, तरी त्याचं आपल्याकडे काय काम असावं, हे माझ्या लक्षात येईना.

मी विचारलं, ''काय विशेष? म्हणजे माझ्याशी चॅट करण्यामागचं काय विशेष कारण ?''

''हो... अगं तसं विशेषच कारण आहे. आज आमच्या मावशीचा वाढदिवस आहे. आणि ती तुमच्या शाळेच्या व्हॉट्स ऍप ग्रूपमध्ये एकदम ऍक्टिव्ह असते, हे आम्हाला माहितेय. कारण तुमच्या सगळयांची नावं हल्ली सतत तिच्या बोलण्यात असतात. म्हणून तर मी तुला ओळखतो.''

''ओह... आज xxx तारीख नाही का?'' त्याच्या बोलण्याला ब्रेक लावत, समोरच्या भिंतीवरचं कालनिर्णय पाहत मी उद्गारले... म्हणजे मेसेज केला, ''पार विसरले रे... देते थांब तिला शुभेच्छा.''

''अगं, त्यासाठीच तर तुला पिंग केलं मी. आणि तूच नाही, ग्रूपमधले सगळेच विसरला आहात बहुतेक. घरी नेहमीसारखं आम्ही सेलिब्रेशन केलं गं, पण इतक्या वर्षांनी भेटलेल्या शाळेतल्या दोस्तांनी आपल्याला विश केलं तर भारी वाटतं ना... त्यामुळे तीही तुमच्या मेसेजेसची वाट बघते आहे. तसं स्पष्ट बोलली नाही ती. पण लक्षात आलं आमच्या. आम्ही तिला चिडवलंही यावरून. म्हटलं, काय तुझी मित्रमंडळी... अशी कशी तुझा वाढदिवस विसरली...''

या मेसेजबरोबर त्याने पाठवलेली हसणारी स्मायली टोचलीच मला. खजील होत त्याला मेसेज पाठवला, ''खरंच सॉरी... असं नको होतं व्हायला आमच्याकडून... काय म्हणाली ती? मी करतेच तिला लगेच मेसेज. आणि बाकीच्यांनाही आठवण करून देते.''

''कूऽऽऽल मावशी. आत्ताशी तर संध्याकाळ होते आहे. आणि आमची मावशी म्हणालीच की, अलीकडेच मी ग्रूप जॉइन केलाय ना, त्यामुळे विसरले असतील... ती जरी असं म्हणाली असली, तरी आम्हालाच वाटलं की तुम्ही तिला विश केलंत तर ती जास्त खूश होईल. हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा कसा, याचा विचार करत असताना माझ्या आईला आठवलं की तू फेसबुकवर आहेस. तिच्या सांगण्यावरून तुला काँटॅक्ट केला मी.''

''थँक्स डिअर... तू आठवण करून दिलीस हे खूप छान केलंस. ती ग्रूपमध्ये गेल्या वर्षीच आली असली, तरी साखरेसारखी विरघळून गेली आहे लगेच. जणू काही मधला काळ आम्ही एकमेकांपासून लांब नव्हतोच मुळी. सर्वांच्या नकळत ती ग्रूपची एक सूत्रधार बनली आहे.''

''थँक्स नको गं! फक्त तिला शुभेच्छा दे. तुमच्या ग्रूपवरूनच दे, म्हणजे बाकीचेही देतील. ती खूश होईल. तुमच्या शुभेच्छांमुळे तिला जो आनंद होईल, तो आम्हाला तिच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे. बाऽऽऽय... आणि हो, सॉरीसुध्दा...''

''सॉरी???? ते कशासाठी बाबा?'' माझा प्रश्न.

''अगं, काहीच ओळख नसताना मी पिंग केलं... तुला हक्काने सांगितलं... त्यासाठी.'' त्याचा साधासरळ प्रांजळ रिप्लाय.

त्याच्या या गोड क्षमायाचनेवर खूश होत, मी मनोमन त्याला आशीर्वाद देत निरोपाचा मेसेज धाडणार, इतक्यात त्याचा नवा मेसेज स्क्रीनवर झळकला.

''मावशी, आणि एकच रिक्वेस्ट आहे. मी तुला तिच्या वाढदिवसाची आठवण करून दिली, हे सांगू नकोस...तिला आणि कोणालाच. कोणीतरी आठवण करून दिल्यामुळे Birthday wishes आल्या आहेत, हे कळलं तर तिला वाईट वाटेल म्हणून...''

''अरे बाळा, मी अजिबात रागावले नाहीये. तुझ्या बोलण्यामुळे मला किती छान वाटतंय ते कसं सांगू तुला? मावशीचं मन जपायला धडपडणारा भाचा ही तुझी ओळख माझ्या मनात कायमची राहील. मनाचा हा चांगुलपणा असाच जपून ठेव.'' त्याला हा रिप्लाय करताना डोळे कधी ओले झाले, ते कळलंच नाही.

कामाच्या गर्दीत अनपेक्षितपणे आलेला हा हळवा, सुखद अनुभव मला नवा उत्साह देऊन गेला. लगेचच मोबाइल काढून मी ग्रूपवर मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अक्षरश: पुढच्या काही मिनिटांतच सर्व दोस्तमंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दुसऱ्या दिवशी दुपारी त्या भाच्याने पुन्हा पिंग केलं. ''हाय मावशी, आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप थँक्स. किती खूश झाली ती तुमच्या मेसेजमुळे... You may not believe.. but you all made her day more cheerful. Thanks once again n bye.. Have a good day ahead.''

त्याच्या शब्दांतून ओसंडून वाहणारा आनंद, मावशीबद्दलचा ओतप्रोत असलेला जिव्हाळा सगळं सगळं माझ्यापर्यंत पोहोचलं.

मी रिप्लाय केला, ''एका निरपेक्ष आणि नितांतसुंदर प्रेमाचं मला दर्शन घडवलंस, त्याबद्दल खरं तर मी तुला थँक्स दिले पाहिजेत. मोठा हो बाळा... बाऽऽऽय''

***

चार वर्षं होऊन गेली या घटनेला. आजही त्या भाच्याला मी प्रत्यक्ष भेटलेली नसले, तरी मेसेंजरवर झालेली त्याची भेट, त्या भेटीतले संवाद अधूनमधून आठवतात. नाती विरळ होत चालल्याचे अनुभव एकीकडे अस्वस्थता देत असताना जेव्हा दोन नात्यांमधल्या निरपेक्ष प्रेमाचं असं लोभस दर्शन घडतं, तेव्हा मनाला आलेली मरगळ आपोआप दूर होते. 'सगळंच काही संपलेलं नाही' याची झालेली लख्ख जाणीव जगण्याला नवा अर्थ अन् जगायला नवा उत्साह देते.   

m.ashwinee@gmail.com