शरद जोशींच्या निष्ठावंतांची मांदियाळी!

विवेक मराठी    18-Dec-2018
Total Views |

 

डिसेंबर 2015ला शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांचे निधन झाले. बऱ्याच अभ्यासकांना असे वाटत होते की आता शेतकरी संघटना शिल्लक राहणार नाही. शेतकरी संघटनेकडे कुणी वलय असलेला नेता नाही. सत्तेची कुठली पदे नाहीत. भविष्यातलेही सत्ता-संपत्तीचे आकर्षण नाही. सध्याच्या काळात गाडी करून पैसे देऊन माणसे बोलवावी लागतात. शेतकरी संघटनेकडे पैसेही नाहीत. मग शरद जोशींच्या पश्चात शेतकरी संघटनेने अधिवेशन भरवले तर कोण येणार?

शेतकरी संघटनेतून सत्तेच्या मोहात फुटून बाहेर गेलेल्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले. पण त्यांना शरद जोशींची जागा घेता आली नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पाठिंबाही मिळविता आला नाही. आपआपल्या गावात मतदारसंघात छोटी-मोठी पदे मिळवीत ही मंडळी मिरवीत राहिली. पण व्यापक अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविणे यांना जमले नाही.

या सगळया पार्श्वभूमीवर शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे 14वे संयुक्त अधिवेशन उत्साहात पार पडले. पदरमोड करून आलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहून भल्या भल्या राजकीय, सामाजिक अभ्यासकांना अचंबित केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वखर्चाने सामान्य शेतकरी, बायाबापडया, तरुण झुंडीच्या झुंडीने अधिवेशनस्थळी येत आहेत. थंडीचा कडाका वाढलेला असतानाही लोकांमध्ये उत्साह आहे. भावनिक भाषणे, धार्मिक अस्मितेला गोंजारणारी मांडणी, समाजवादी भीकमाग्या योजनांची भलावण असे काही काही नाही. केवळ आणि केवळ विशुध्द आर्थिक पायावर आधारलेली मांडणी जिथे चालू आहे, अशा मंडपात दोन दिवस प्रतिनिधी अधिवेशनात लोक बसून राहतात, हे दृश्य मोठे चकित करणारं आहे.

नुकतेच नोव्हेंबर महिन्यात दिल्लीला समाजवादी डाव्यांच्या प्रभावाखालील दोनशे शेतकरी संघटनांनी मिळून किसान मार्च काढला. त्यात परत स्वामिनाथन आयोगासारख्या आर्थिकदृष्टया अतक्र्य मागण्या पुढे रेटण्यात आल्या. सरकारी हस्तक्षेपाचे समर्थन करण्यात आले. आम्ही गरीब आहोत, आम्ही भिकेला लागलो आहोत, आता तुम्हीच आमचे तारणहार म्हणून सरकारच्या गळयात पडण्याचा समाजवादी कार्यक्रमच पुढे रेटण्यात आला. बाजार कोसळलेला आहे, तेव्हा आमच्या मालाची खरेदी आता सरकारनेच करावी आणि आम्हाला किमान अमुक अमुक किंमत तरी द्यावी, असा रडका सूर दिल्लीच्या किसान मार्चमध्ये डाव्यांनी मांडला होता.

शेतकरी संघटनेच्या 14व्या अधिवेशनात याच्या अगदी विरुध्द मागणी करण्यात आली. 'सरकार समस्या क्या सुलझाये। सरकार खुद समस्या है।' या अगदी सुरुवातीपासूनच्या घोषणेचा पुनरुच्चार करण्यात आला.

पहिले दोन दिवस शास्त्रशुध्द पध्दतीने शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर मांडणी करण्यात आली. सगळे वक्ते केवळ भाषणबाजी न करता विषयाचे गांभीर्य ठेवून बोलत होते. आणि ते सगळे समोरचा पाच ते दहा हजाराचा शेतकरी जमाव शांतपणे ऐकत होता. प्रसंगी काही आपल्या जवळच्या कागदांवर टिपणे करून घेत होती. एखाद्या विद्यापीठाच्या परिसंवादातही आढळणार नाही असे हे दृश्य. 

शेतीविरोधी कायदे तातडीने रद्द करून शेतकऱ्यांच्या भोवतीचा फास सोडवावा, अशी मागणी ठरावाद्वारे या अधिवेशनात करण्यात आली. कुठल्याच समाजवादी डाव्या चळवळीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करताना शेतीविरोधी कायद्याच्या मूळ समस्येला हातही लावलेला नाही.

शेतीला चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा, शिवाय ही वीज मोजून दिली जावी, आम्ही तिचे पैसे भरण्यास तयार आहोत; फुकटची वीज देण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना लुटते आहे, इतर क्षेत्रांतील चोरी आणि वीज गळती शेतकऱ्यांच्या माथी मारून आपला हलगर्जीपणा लपवत आहे अशी जी मांडणी शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात करण्यात आली, ती कधीच कुठल्याच इतर शेतकरी आंदोलनांत करण्यात आलेली नाही. आम्हाला फुकट काहीच नको, हा स्वाभिमान फक्त आणि फक्त शरद जोशींचा वारसा सांगणारी शेतकरी संघटनाच दाखविते आहे. केवळ नावातच स्वाभिमान असणारे आजही सरकारकडे लाचारीने हात पसरण्याचे काम करत आहेत. सत्तेसाठी याचा-त्याचा पदर पकडत फिरत आहेत.

साखरेच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने गेली 25 वर्षे सतत एक भूमिका मांडली होती, ती म्हणजे साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा. अशी स्वाभिमानी मांडणी आजही कुणी करायला तयार नाही. आता तर साखरेची अशी परिस्थिती आहे की कारखाने कबूल केलेले पैसेही देऊ शकत नाहीत. सहकारी साखर कारखानदारीचे अवास्तव कौतुक करणारे आता तोंडाला कुलूप लावून चूप बसले आहेत. या स्थितीत शिर्डीला जमलेले शरद जोशींच्या विचारांचा वारसा पुढे चालविणारे अग्रहाने सांगत आहेत की साखर उद्योग मोकळा करा. उसापासून आम्ही इथेनॉल काढू, गूळ करू, वीज तयार करू किंवा परत चांगला भाव आला तर साखर काढू. पण तुमची बंधने आम्हाला नकोत.

शेतीला उद्योगाचे स्थान द्यावे ही मागणी या अधिवेशनात करण्यात आली. दिल्लीला निघालेला भीकमागा 'किसान मार्च' अशा मागण्यांचा विचारही करायला तयार नाही. इतर भारतीय नागरिकांप्रमाणे सन्मानाने आणि सुखाने जगण्याची शपथ शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात, अधिवेशनात, कार्यक्रमांत सर्व शेतकरी भावा-बहिणींना दिली जाते. त्या अनुषंगाने इतर नोकरी-व्यवसाय-उद्योग यांना मिळणारे स्वातंत्र्य शेतीलाही द्या, अशी शास्त्रशुध्द मागणी शेतकरी संघटना सतत करत आली आहे. सध्याच्या शेतीच्या प्रचंड संकटाच्या काळातही आम्हाला स्वातंत्र्य द्या ही मागणी धाडसाची आहे. पण सामान्य कष्टकरी शेतकरी मोठया हिमतीने हे धाडस करतो आहे. आणि दुसरीकडे 'तू दुबळा आहेस, तू गरीब आहेस, तुला फुकट देतो, सूट-सबसिडी देतो' अशा मागण्यांत शेतकऱ्यांच्या इतर संघटना अजूनही अडकल्या आहेत.

युवकांच्या प्रश्नांवर मांडणी करताना या अधिवेशनात वक्त्यांनी शेतीवर आधारित ग्रामीण उद्योगांना चालना देण्याची आग्रही मागणी केली. गावोगावचे आठवडी बाजार सक्षम करण्याची मागणी केली. शेतमालावर छोटया-मोठया प्रक्रिया करण्याच्या मार्गातील सरकारी परवाने, किचकट नियम, कायदे, अडथळे त्वरित दूर करून हे क्षेत्र खुले करण्याची मागणी करण्यात आली. म्हणजे एकीकडे शेतकरी जमातींच्या युवकांना आरक्षणाच्या मुद्दयावरून भरकटविले जात असताना, शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात ''आमच्या पायातील बेडया काढा, आम्हाला स्वतंत्र शेती उद्योग करू द्या'' असे शेती करणारे युवक म्हणत आहेत, हे दृश्य कौतुकास्पद होते.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्दयावर नेहमीच अशी मागणी करण्यात आली की ज्या पुरुषांच्या जागा आहेत, यावर स्त्रीला हक्क मिळाला पाहिजे. पण व्यवस्थाच बदला अशी मागणी जगभरच्या स्त्रीवादी चळवळीने कधी केली नाही. ज्याप्रमाणे गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला.. व्यवस्था तीच राहिली, तसेच पुरुष जाऊन तिथे स्त्रीला बसू द्या, बाकी काहीच बदलणार नाही अशा मागण्या जगभरच्या स्त्रीवादी चळवळी डाव्यांच्या प्रभावाखाली करत राहिल्या. केवळ आणि केवळ शेतकरी संघटनेची महिला आघाडीच अशी आहे की तिने ही मांडणी नाकारली आणि स्त्री शक्तीच्या जागृतीत स्त्री-पुरुषमुक्ती अशी आगळीवेगळी घोषणा देत स्त्रियांच्या प्रश्नांची वेगळी स्वाभिमानी स्वातंत्र्यवादी मांडणी केली. शिर्डीच्या अधिवेशनात साध्या लुगडयातल्या अशिक्षित राधाबाई कांबळेसारख्या बाईनेही चतुरंग शेतीचे तत्त्वज्ञान आपल्या पोवाडयातून गाऊन उपस्थितांना चकित केले.

शेतकरी संघटनेच्या या अधिवेशनात तरुण नेतृत्वाला समोर येताना पाहून या क्षेत्रातील लोकांना एक आश्वासक दिलासा मिळाला. शरद जोशींच्या अंगारमळयात (अंबेठाण येथील शरद जोशींचे निवासस्थान) लहानाचे मोठे झालेला अभिजित शेलार किंवा सीमाताई नरोडे हे आता नेतृत्व करायला पुढे आलेले दिसत आहेत. सध्याचे अध्यक्ष अनिल घनवट गेले एक वर्ष उभा महाराष्ट्र पिंजून काढत होते. त्यांच्या जोडीला युवा आघाडीचे सतीश दाणी व महिला आघाडीच्या गीता खांदेभराड हे मेहनत घेताना दिसत होते. शरद जोशींनी केलेली शेतीच्या प्रश्नाची अर्थवादी मांडणी सध्याच्या काळात महाराष्ट्रभरातून नवीन पिढी उत्साहात करताना पाहून अभ्यासकांना आश्चर्य वाटत आहे.

कुठलीही दयामाया, करुणा या मार्गाने शेतीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी स्वातंत्र्यवादी दृष्टी ठेवून शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजेत, शेतीच्या विकासाच्या मार्गातील सरकारी नियमांचे, कायद्याचे अडथळे दूर केले पाहिजे अशी वेगळी आश्वासक आणि स्वाभिमानी मांडणी अधिवेशनातून समोर आली.

संघटनेचे सर्वात ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील यांनी ध्वजारोहण करून आणि पंजाब किसान युनियनचे नेते माजी खासदार भूपेंद्रसिंग मान यांनी शरद जोशींच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अधिवेशनाचे उद्घाटन केले.

शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, ऊस प्रश्नाचे अभ्यासक अजित नरदे, डॉ. श्याम अष्टेकर, संपूर्ण परिसंवादाची वैचारिक शिस्त घालून देणारे डॉ. मानवेंद्र काचोळे, शेतीविरोधी कायद्याची क्लिष्ट भाषा समजावून सांगणारे ऍड. अनंत उमरीकर असे ज्येष्ठ आणि विदर्भातील सचिन डाफे, पश्चिम महाराष्ट्रातील शीतल राजोबा, नवनाथ पोळ, उत्तर महाराष्ट्रातील ईश्वर लिधुरे, तंत्रज्ञान आघाडी सांभाळणारे गंगाधर मुटे, रामेश्वर अवचार, खुल्या अधिवेशनाचे सूत्रसंचालन करणारा मराठवाडयातील सुधीर बिंदू अशी तरुणाई असे चित्र अधिवेशनात ठळकपणे जाणवत होते.

महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश येथून आलेले शेतकरी नेते आणि त्यांच्याबरोबरचे सामान्य शेतकरी यांची उपस्थिती मोठी आश्वासक होती.

शरद जोशींची शेतकरी संघटना संपली म्हणणाऱ्यांना प्रचंड उपस्थिती आणि वैचारिक शुध्द स्पष्ट मांडणी या दोन्ही अंगांनी या अधिवेशनाने सणसणीत उत्तर दिले आहे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575