नि:स्वार्थी सेवाभावाचा सन्मान  - वन इंडिया ऍवॉर्ड

विवेक मराठी    30-Nov-2018
Total Views |

ईशान्य भारतातल्या आठही राज्यांत, विविध क्षेत्रांत भरीव योगदान देऊन आजीवन काम करणाऱ्यांना दर वर्षी 'वन इंडिया ऍवॉर्ड' (Our North East Award - ONE India Award) प्रदान करण्यात येतं. या पुरस्काराच्या निमित्ताने, देशाच्या टोकावर वसलेल्या ह्या चिमुकल्या राज्यांमध्ये आयुष्यभर निःस्वार्थीपणे आभाळाएवढं काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय संपूर्ण देशाला करून दिला जातो. या वर्षीचं 'वन इंडिया ऍवॉर्ड' मणिपूरमध्ये सामाजिक स्थैर्य आणि समाजसुधारणा करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या मणिपूरच्या ऐंशी वर्षीय अरिबम ब्रजकुमार शर्मा या ज्येष्ठ समाजसेवी व्यक्तिमत्त्वाला प्रदान करण्यात आला.

 

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत.  तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी  
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज likeकरावे....


तब्बल पाच देशांच्या वादग्रस्त सीमांसकट भारताच्या ईशान्य भागात नांदणारा समाज विविध जनजाती-जमातींनी बनलेला असून दोनशे मुख्य आणि उपजमातींमध्ये विभागल्या गेलेल्या ह्या समाजाची वीण अतिशय अवघड आणि खडतर परिस्थितींनी विणलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथल्या विविध जनजातींचा अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजकीय घडामोडींनी व्यापलेला आहे. पूर्वीच्या सप्तभगिनी आणि आताच्या अष्टलक्ष्मी राज्यांमध्ये गेली काही दशकं विविध ठिकाणी थोडयाबहुत फरकाने झपाटयाने झालेलं धर्मांतर, भाषिक वादांच्या दंगली, वाढता दहशतवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि देशाच्या मुख्य धारेपासून दूर ढकललं गेल्याची भावना जोपासली जात होती. केंद्रात आणि राज्यांमध्ये असलेल्या सरकारांनी ईशान्य भारताची केलेली उपेक्षा, देशाच्या विविध भागांमध्ये ईशान्य भारतीयांवर होणारे हल्ले व वांशिक शेरेबाजी यातून नाकारलं जाण्याची बनलेली सामूहिक मानसिकता आणि देशातील मुख्य प्रसारमाध्यमांनी ईशान्य भारताकडे फिरवलेली पाठ या सगळयाची सरमिसळ होऊन ईशान्य भारत जणू एक दुखरी जागा बनला होता. देशभरात बदलाचे वारे वाहायला लागले असताना ईशान्येकडे मात्र आशादायक चित्र नव्हतं.

भारत मेरा घर

ईशान्य भारत अनेक देशविघातक घडामोडींचं ठिकाण बनलं होतं आणि त्या विळख्यात सापडलेल्या स्थानिक समाजाला अनेक आघाडयांवर मदतीची गरज होती. वेळोवेळी 'राष्ट्राय स्वाहा, इदं न मम्' म्हणत राष्ट्राला समर्पित सेवा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कायम राष्ट्रकार्याला प्राधान्य दिलं आहे. कुठलंही सुखासीन आयुष्य मिळणार नाही याची शाश्वती असताना, 'संपूर्ण देश माझं घर आहे आणि माझ्या या घराच्या उत्कर्षासाठी त्वदीयाय कार्यायबध्दा कटीयम्' या निःस्वार्थी भावनेने अडीअडचणींसाठी धावून जाणारे स्वयंसेवक ईशान्य भारताच्या मदतीला गेले नसते तरच आश्चर्याची गोष्ट झाली असती. ईशान्य भारतात तपभर प्रचारक म्हणून समर्थपणे काम केलेल्या सुनील देवधर यांनी 2005 साली समविचारी मंडळींसह 'माय होम इंडिया' या संस्थेची स्थापना केली. गेल्या तेरा वर्षांत देशभर नेस्ट फेस्टसारखे (NEST Festसारखे) कार्यक्रम करून पूर्वांचलातून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात सामावणं, फ्रॅटर्निटी कप फुटबॉल मॅचेसद्वारे विविध गटांना एकत्र आणणं, ईशान्येच्या नागरिकांना देशभरात वैद्यकीय सोयी मिळवून देणं, मदत करणं याद्वारे लाखो लोकांमध्ये ईशान्य भारताबद्दल जागृती करण्याचं काम माय होम इंडियाने केलंय. चोवीस तास सुरू असणारी ईशान्य हेल्पलाइन, एकमेकांचे साजरे होणारे सण यासारखी कामं 'माय होम इंडिया'कडून सुरू असतात. ईशान्य भारतातल्या आठही राज्यांत, विविध क्षेत्रांत भरीव योगदान देऊन आजीवन काम करणाऱ्यांना दर वर्षी 'वन इंडिया ऍवॉर्ड' (Our North East Award - ONE India Award) प्रदान करण्यात येतं. या पुरस्काराच्या निमित्ताने, देशाच्या टोकावर वसलेल्या ह्या चिमुकल्या राज्यांमध्ये आयुष्यभर निःस्वार्थीपणे आभाळाएवढं काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय संपूर्ण देशाला करून दिला जातो. एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचं या वर्षीचं 'वन इंडिया ऍवॉर्ड' मणिपूरमध्ये सामाजिक स्थैर्य आणि समाजसुधारणा करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या, मणिपूरच्या ऐंशी वर्षीय अरिबम ब्रजकुमार शर्मा या ज्येष्ठ समाजसेवी व्यक्तिमत्त्वाला प्रदान करण्यात आला.

अरिबमजींची राज्यसेवा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भले मणिपूर संस्थान भारतात विलीन झालं, तरीही स्वतंत्र मणिपूर राज्य अस्तित्वात यायला 1972 साल उजाडलं. राज्य निर्मितीपूर्वी केंद्रशासित प्रदेश असलेल्या या भागात प्रचंड अशांतता माजली होती. वारंवार उसळणाऱ्या वांशिक दंगली, फुटीरतावादी गटांचं आणि समाजविघातक कृत्यांचं जणू थैमान सुरू होतं. मणिपूरच्या दक्षिणेकडच्या टेकडयांमधल्या नगा समाजाला नगालँडमध्ये जाण्याची इच्छा होती, तर मिजो कुकी समाजाला मिझोराममध्ये जायचं होतं. तिसरीकडे, युनायटेड लिबरेशन फ्रंट गटाला मणिपूर स्वतंत्र देश बनायला हवा होता. या सगळया वादात तरुणाई भरकटत होती. साठच्या दशकात तरुण अरिबमजी या विभाजनाने होणाऱ्या हिंसाचारामुळे अस्वस्थ झाले होते. मणिपूर राजघराण्याच्या महाराज कुमारप्रियब्रत सिंह यांच्यासह 'मणिपूर कल्चरल इंटिग्रेशन कॉन्फरन्स'ची निर्मिती करून त्यांनी सचिवपद स्वीकारलं. टेकडयांमध्ये राहणाऱ्या नगा, कुकी समाजांशी संपर्क साधत, सामंजस्य वाढवत त्यांनी महिनोन्महिने जंगलंही तुडवली आणि शिक्षण, वैद्यकीय सरकारी सुविधा या आडवाटेवर पोहोचवली. या कामात अनेकदा त्यांना कुटुंबापासून दीर्घकाळ लांब राहावं लागलं, धमक्या सहन कराव्या लागल्या. संख्याशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या शर्माजींनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर, वाढती समाजसंख्या ही घुसखोरांची आहे हेही सिध्द केलं. याच दरम्यान सोयीसवलती देण्याच्या मिषाने, आदिवासी संस्कृती संपवून सुरू असलेला ख्रिश्चन धर्माचा वाढता प्रसार थांबण्यासाठी त्यांनी स्थानिक क्रीडा महोत्सवाचा आधार घेतला. मणिपूरमध्ये होलिकोत्सवादरम्यान तरुणाई नशेत बुडायची. हे थांबवायला त्यांनी पाच दिवस चालणाऱ्या या सणात क्रीडा महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली. यौशेंग फेस्टिवलमुळे मणिपूरने देशाला दिलेली क्रीडारत्नं सर्वपरिचित आहेत. राज्यात दारूबंदी करवण्यासाठी त्यांनी महिलांना एकत्र करून चळवळ उभारली, ज्यामुळे मणिपूर सरकारला राज्यात दारूबंदी लागू करावी लागली. इंफाळजवळच्या गावातली प्रथा म्हणजे गावात फक्त तीस परिवारच राहतात. एकतिसावा परिवार झाला की त्याला गाव सोडून नवीन गाव बनवावं लागतं. मिशनरींनी याचाच फायदा घेऊन या नवीन परिवारांच्या धर्मांतराचा घातलेला घाट शर्माजींच्या सजगतेने उधळला गेला होता. शर्माजींनी सेनेच्या ट्रक्समध्ये घालून परत आणलेलं हे तराव नामक गाव पस्तीस वर्षांनंतरही त्यांचं आभारी आहे.

प्रेरणा

निवृत्तीनंतर समाजकार्याप्रती शर्माजींच्या तळमळीमुळे रा.स्व. संघाने त्यांना मणिपूर संघसंचालकाचं पद दिलं. त्यांनी अठरा वर्षं ही जबाबदारी निभावली. इतर वेळी शांत असलेले अरिबमजी गावाखेडयांमध्ये ह्याही वयात जातात आणि उत्साहाने काम करतात. त्यांच्या या अखंड राज्यसेवेसाठी माय होम इंडियाने त्यांना वन इंडिया ऍवॉर्डने सन्मानित केल्याने जणू ह्या पुरस्काराचाच सन्मान झालाय अशी भावना माय होम इंडियाचे संस्थापक आणि आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भाजपा त्रिपुरा प्रभारी व राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केली. नागालँडचे राज्यपाल मा. पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते अरिबमजींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ईशान्य भारताच्या या दुर्गतीला, तुटलेपणाला उर्वरित भारताची वर्तणूक जबाबदार असल्याची कानउघडणी त्यांनी भाषणात केली. आज जास्तीत जास्त लोकांनी माय होमसारख्या कामात जोडलं जाऊन देश नामक शरीराचा हा हिस्सा बळकट केला पाहिजे, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. आचार्यजींचं भाषण नर्मविनोदाने, फटकाऱ्यांनी आणि चिमटयांनी रोखठोक झाल्याने सभागृहाला नवीन विचार मिळाले. गृहराज्यमंत्री प्रकाश मेहता यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे कार्यक्रम मोठया प्रमाणात व्हायला हवे असं मत भाषणात व्यक्त केलं. माय होम इंडियाचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानतानाच तन-मन-धन देऊन माय होम इंडियाबरोबर काम करण्याचं आवाहन आवर्जून केलं. युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष मोहित कंभोज यांनीही माय होम इंडियाशी जोडलं जाण्याचं आवाहन केलं.

 आठवडयाच्या पहिल्या दिवशी खचाखच भरलेलं सावरकर सभागृह, रांगोळया, पारंपरिक वेशातले ईशान्येकडचे बांधव, व्यासपीठावरची भारतमाता, राणीमां गाइडिंलिऊ आणि यू किआंग नांगबाह यांच्या सुशोभित तसबिरी, पारंपरिक पध्दतीने गायलेलं वंदे मातरम, सपनोंसे अपनों तक हा माय होमचा माहितीपट, मणिपूरच्या लता मंगेशकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लैश्राम मेमा यांनी गायलेलं मणिपुरी गीत आणि ने मजसी ने परत मातृभूमीला हे गीत, माय होमच्या कार्यकर्त्यांचे केलेले सत्कार आणि राष्ट्रगीतानंतरही उसळलेली गर्दी माय होम इंडियाने वाढवलेली ईशान्य जागरूकता दर्शवणारी होती आणि पुन्हा पुन्हा हेच सांगत होती की 'पूर्वांचलका नारा है, सारा देश हमारा है।'

वंदे मातरम।

roopaliparkhe@gmail.com