जमीन ही स्त्रीचं, सर्जनाचं प्रतीक मानली गेली अगदी वेदकाळापासून. ते प्रतीक अरुणाताईंच्या कवितांमधूनही डोकावतंच. पण या दोन कवितांमधून त्या स्त्रीच्या सर्जनशील अन सर्जनविहीन अशा दोन्ही अवस्थांना समोर उभं करतात. ते करत असताना त्या मातीच्याही बाईपणाला स्पर्श करतात. कारण इतरांना दिसतं, आवडतं, लक्षात राहतं ते केवळ तिचं फुललेलं समृध्द रूप. ती तिची फुलण्याची प्रक्रिया आणि फळण्याची स्थिती संपल्यानंतरचं तिचं रितेपण हेही अरुणाताईंना दिसतं. जणू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध भूमिकांमधून दिसत राहणाऱ्या स्त्रियाच माती बनून कवितेत उतरतात.
अकस्मात आलेल्या वळवाच्या सरीनंतर रखरखलेल्या मातीतून मृद्गंधाचा दरवळ उठावा, तशा अरुणाताईंच्या निवडीनंतर साहित्यरसिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या! स्वाभाविक आणि आनंददायक. प्रथमच असं सत्य-शिव-सुंदर असं काही साहित्यरसिकांनी घडताना पाहिलं. अरुणाताईंच्या निवडीनंतर उमटलेला प्रतिक्रियांचा परिमळ हेच सांगतो की विवंचनांनी होरपळलेल्या, व्यवहारात कोरडयाठाक पडलेल्या आजच्या माणसाच्या मनाला असं कोवळं, हळवं, अस्सल अन विचारगर्भ लेखन, त्याची ऊब, त्याचा दिलासा हे सारं मनापासून हवं आहे.
अरुणाताईंनी त्यांच्या गद्य-पद्य लेखनातून संस्कृतीचा-परंपरांचा आदर मनात ठेवून हळुवार हाताने तीवरची अभिनिवेशाची, एकारलेपणाची धूळ झटकून, आतलं अजूनही स्पंद पावत असलेलं निखळ माणूसपण मोकळं केलं. ते आपल्यासमोर आणतानाही त्याला आक्रस्ताळी, बंडखोर झूल पांघरली नाही. आईच्या मायेने, कसलाही विद्वज्जडतेचा आव न आणता सगळया मिथकांमधलं निखळ रसरशीत सत्य, त्यातलं माणूसपण, त्याच्या मर्यादा नि त्याचं सामर्थ्य समोर उलगडून ठेवलं. एखाद्या जुन्या रेशमी वस्त्रात बांधून ठेवलेलं पारंपरिक धन न पाहता त्या वस्त्रावरच फुलं वाहत असलेल्या समाजाला, त्या वस्त्राच्या गाठी हलक्या हाताने सोडवत ते आतलं शुध्द-लख्ख विचारधन दाखवलं.
'मानवतेच्या उन्नयनासाठी आवश्यक असलेलं ज्ञान स्त्री-पुरुष दोघांनाही तितकंच आवश्यक आहे. त्यापासून तिला वंचित ठेवलं जाणं हे केवळ अन्याय्य नाही, तर मानवी प्रगतीसाठी घातक आहे' असं त्या मनापासून सांगत राहतात. तिला ज्ञान मिळालं, संधी मिळाली, तर ती मानवाचं जगणं निरामय करू शकते, अंदाधुंद विस्कटलेल्या जगाला तीच एक सुंदर लय देऊ शकते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच शतकानुशतकं वंचित राहिलेल्या स्त्री-जीवनातल्या शक्यतांचा मोठा पैस त्या आपल्याला दाखवत राहतात.
मैत्रेयी, द्रौपदी, कुंती, गांधारी यांच्यातली स्त्री, माता त्यांना दिसतेच, तशीच विलासी इंद्राच्या दरबारात त्याला रिझवणाऱ्या, केवळ देहभोगात रमणाऱ्या, अलौकिक अ-जर, अ-मर सौंदर्य लाभलेल्या आणि म्हणून आकर्षणाचा, मत्सराचा विषय असलेल्या किंवा ॠषिमुनींच्या तपस्या भंग करणाऱ्या म्हणून खलप्रवृत्तीच्या वाटणाऱ्या अप्सरांमधलीही स्त्री त्यांना दिसते. आणि एखादी दुखरी नस असावी तसं ठसठसत राहतं स्त्रीजीवन त्यांच्या कवितेतून.
जमीन उत्सव करतेय
जमीन उत्सव करतेय
हिरवा चुडा ल्यालेल्या वेली दारी लवलवताहेत
आंब्याफणसांनी सावल्यांचे मांडव सुगंधी केले आहेत
वस्तीला आलेल्या उन्हाचे जरीपदर इथे-तिथे झळझळताहेत
अन् ओंजळभर ओल पाहून किडामुंग्यांचे जथे मजेत फिरताहेत.
परागंदा झालेल्या पाखरांचे थवे परत आले आहेत
राघूंच्या ओठांवरचे इषारे रंगेल होताहेत
साळुंक्यांचे पिवळे पाय नव्या पोपटी पालवीवर थरकताहेत
अन वाहत्या पाण्यावर मनातले हेतू नितळ खळखळताहेत.
उतरत्या सांजेवर घारीची उंच दीर्घ हाक भिरभिरतेय
जमीन उत्सव करतेय.
जमीन ही स्त्रीचं, सर्जनाचं प्रतीक मानली गेली अगदी वेदकाळापासून. ते प्रतीक अरुणाताईंच्या कवितांमधूनही डोकावतंच. पण या दोन कवितांमधून त्या स्त्रीच्या सर्जनशील अन सर्जनविहीन अशा दोन्ही अवस्थांना समोर उभं करतात. ते करत असताना त्या मातीच्याही बाईपणाला स्पर्श करतात. कारण इतरांना दिसतं, आवडतं, लक्षात राहतं ते केवळ तिचं फुललेलं समृध्द रूप. ती तिची फुलण्याची प्रक्रिया आणि फळण्याची स्थिती संपल्यानंतरचं तिचं रितेपण हेही अरुणाताईंना दिसतं. जणू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध भूमिकांमधून दिसत राहणाऱ्या स्त्रियाच माती बनून कवितेत उतरतात. या कविता दहा-वीस ओळींच्या कविता बनून राहत नाहीत. त्यातला आशय महाकाव्यांच्या आशयाइतका विस्तारत राहतो.
' जमीन उत्सव करतेय' या कवितेत दिसतात दोन स्त्रीरूपं.
एक ती... सर्जनाचा पूर्ण बहर अनुभवलेली. तिचं आताचं असणं, दिसणं हा एक उत्फुल्ल उत्सवच. त्या समृध्द जमिनीवर, तिच्या परिपूर्ण जगण्यात काय नाही? नवथर सुनांसारख्या हिरव्या लवलवत्या वेली आहेत, पर्णभारांनी शीतल सावली देणारे नि फळभारांनी आसमंत सुगंधी करणारे कर्ते वृक्ष आहेत, सजलेल्या माहेरवाशिणींसारखं आलेलं झळझळीत ऊन आहे अन किडामुंगीलाही उपाशी न ठेवणारी काळजातली ओल तिच्याकडे आहे. तिची उडून गेलेली पाखरं वसतीला आलीत. तिच्या गोतावळयातल्या, वयाची कोवळीक पार करू पाहणाऱ्या राघूंना नि साळुंक्यांना तारुण्याचे रंगीत वेध लागलेत. तिच्याकडे वाहत्या पाण्यासारखी समृध्दी आहे. विचारांना मुक्त निर्भरपणे वाहू देण्याची मुभा तिच्या आवारात आहे. एखादी घार दुरून या साऱ्यावर आपली सावध नजर ठेवून संध्याकाळच्या अपशकुनांना दूर ठेवते आहे. असा तिच्या अंगणात, तिच्या संसारात परिपूर्ण उत्सव रंगलाय!
आणि हे गावाबाहेरचं ओसाडीचं रान. हा माळरानावरचा संसार. हीही जमीनच. पण जलविहीन. तिच्या सोबतीला जीवन नाही.
तिची सारी भिस्त पावसावर. तो आला नाही, भेटला नाही, तिच्यात मिसळला नाही अन ती अशी रूक्ष, रेताड होऊन गेली. एकेका ॠतूत वाट पाहत राहते ती. ते जीवनाचं दान मिळालं नाही, की नेटाने सांभाळलेला साध्यासुध्या आशा-अपेक्षांचा झाडोराही मान टाकतो. पोपटी गवताची सुखद मखमल उमलत नाही, नि मग उघडा पडतो मनातला विस्कटलेला संसार. तिला आठवत राहतो जगण्याच्या कठोर तापत्रयांनी भाजून निघालेला काळ. तिला दिसत राहते सरकत गेलेली आयुष्याची माळ. एकेक पान बिनबोभाट गळून पडावं, तसं सरून गेलेलं दु:खमय जगणं. तिला आठवते तिने थोडयाशा ओलाव्याकरता जिवाच्या आकांताने केलेली याचना. आणि तिच्या असण्याची दखलही न घेता ढगाच्या सावलीसारखं सरकून गेलेलं सुख..
मी हिलाही समजून घेते आहे. ते उत्सवी जगण्याचं भाग्य लाभलेल्या तिला पाहतानाच मला अभावांच्या, वंचनेच्या, होरपळीच्याच ॠतूंचं भागधेय असलेली हीदेखील समजून घ्यावीशी वाटते आहे. मी त्या उत्सवी जगण्यात न रमता जेव्हा हिच्या निश्चलतेमागचं दुर्धर जगणं समजून घेऊ पाहते, तेव्हा माझ्याही मनात मातीचा खरा उत्सव सुरू होतो!
अरुणाताईच एकदा म्हणाल्या होत्या, तसं कवितेचे शब्द म्हणजे केवळ जिना. तो अर्थाच्या सरोवरापर्यंत नेऊन सोडतो आपल्याला. एकेका ओळींच्या नव्हे, शब्दांच्याही मध्ये खूप काही सांगत असतो कवी. अरुणाताई खूप समजूत वाढवत नेतात, शब्दागणिक. त्यांच्याचमुळे उमगत जातं धुपत चाललेल्या मातीचं दु:ख. माती सर्जक खरी, पण तिचाही बहराचा काळ कधीतरी संपतोच!
अन मग
'माती निकामी होते'
उमेदीच्या काळात स्वप्नांचा पाठलाग करतानाही तिने असोशीने जपलेलं असतं जगण्याचं प्रयोजन. ती जगत असते नि जगवत असते. सगळयालाच. तिला जे हवं असतं, जे ती निर्माण करू पाहत असते, ते जगण्यातलं मांगल्य ती फुलवतेच, पण तिच्याच जीवनरसातून कधी काही अमंगलही निपजतं. तिला कळूनही न वळणारं. तिच्याच अंगाखांद्यावर वाढलेलं, पण तिलाच नाकारणारं. ती तेही सोसते, कारण तेव्हा तिच्यात जिवंत असतात सर्जनाच्या शक्यता. अजूनही नवं निर्माण करू शकू, ही उमेद. हा गर्व. पण मग तिच्याही आयुष्यात एक वळण येतं. मागे मागे पडत जातात वासंतिक ॠतू. ती काही काळ निरर्थक धडपड करून पाहते.
निघून चाललेल्या वासंतिक वाऱ्यांना निलाजरेपणे बांधून घालायला धडपडते. पण मग ते दु:खद, तप्त सत्य तिच्यासमोर ठाकतंच.
माती निकामी होते
हळूहळू धुपून जाते उमेदीचे सकस आयुष्य.
माती निकामी होत जाते.
सावकाश सैलावतात आकांक्षांची दूरवर पसरलेली मुळे,
चिवट कार्यशक्ती मंद मंद होत जाते,
खिळखिळे होतात कष्टांनी टिकवून धरलेले मूल्यगर्भ आधार
उपद्रवी तण रक्तातली जीवनसत्त्वे कशी शांतपणे शोषत राहते
हे मातीलाही कळते.
कोणत्याच विरोधाला न जुमानता
एकेकाळी जोमदार वाढलेली रानदांडगी झाडे
आता वाऱ्यापाखरांच्या गोष्टींत दंग झालेली,
आभाळाचे निळे वेध आकंठ लागलेली,
अगदी आपोआप आपले मातीतले पाय विसरत चाललेली.
मातीला आपले नि:सत्त्व होत जाणे कळते, पण वळत नाही.
घसघसशीत वासंतिक रंगटिळा लावून,
वळिवाचा सडसडता पदर उडवत आपले निबर जुनेपण ती मिरवते
उठवळपणे, पुन्हा एकदा बहराचा जोर करते,
पण आता मुळी शक्यताच नसते सर्जनाची क्षीणसुध्दा.
मातीला हेही कळते.
मग उरतो तो ओसरत गेलेल्या सुखाने कळ लागून
दुखणाऱ्या वेदनांचा निमूट स्वीकार,
आणि मागे, चकित करणाऱ्या सर्जनाच्या धडकांनी
छिन्न झालेल्या भूतकाळाचा लखलखीत विस्तार.
वांझ आयुष्यात पाऊल ठेवताना
सगळे भविष्यच किती दीनवाणे होत जाते
हेही मातीला कळतेच, पुन्हा पुन्हा एखाद्या तप्त मुद्रेसारखे
अगदी चरचरून कळते.
आता काहीही निर्माण करू शकत नसल्याचं चरचरीत सत्य स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसतं तिला. सरून गेलेलं सुख, केवळ उरातली वेदना अन पावलातली धग अशा खुणा सोडतं मागे.
आपल्यातल्या सर्जक शक्यता, काही फळल्या, काही बाहेर पडण्यासाठी नुसत्याच धडका मारून छिन्न झाल्या, त्या पाहताना चकित होऊन जाते ती. आता पूर्ण नि:सत्त्व झालेल्या तिच्यासमोर असतं केविलवाणं भविष्य. त्याची जाणीव चटके देत राहते तिला पुन्हापुन्हा...
माती निकामी होते!
ही कविता वाचताना वरवर दिसतं उताराला लागलेल्या स्त्रीचं जगणं. पण अरुणाताई बोट दाखवतात त्याही पल्याड. पृथ्वी नावाच्या स्त्रीकडे. मानवाने स्त्रीला देवी मानण्याची सुरुवात झाली, त्याने जमिनीची, मातीची एकातून अनंत निर्माण करण्याची शक्ती पाहिल्यावर. हे सामर्थ्य 'त्या'ला नवं होतं. असाध्य होतं. पण हळूहळू तो सरावला. त्याचं धाडस वाढलं. पृथ्वीचा पुत्र असलेला 'तो' तिलाच भोगू लागला. त्याच्या उपभोगाच्या लालसेला मर्यादाच राहिली नाही. तिच्यातून त्याने इतकं काही शोषून घेतलं आणि वर तो असा उद्दाम झाला! वेडीवाकडी वाढलेली त्याची हाव! तिनेच जन्माला घातलेलं हे रानदांडगं मूल तिलाच नि:सत्त्व करून सोडत असताना ती पाहतेय. तिला दिसतोय तिचा व त्याचाही भीषण भविष्यकाळ. आपल्याच पोटी जन्माला घातलेलं तिचं मरण...
पण अरुणाताईंनी केलेल्या ॠग्वेदातील पृथ्वीसूक्ताच्या अनुवादात याचा उतारा सापडतो.
जननि भूमिदेवी, गे तुझ्या गूढगर्भी
खनन करुनि आम्ही ठेवितो बीज नामी
विफल कधी न व्हावे सर्व ते अंकुरावे
सतत तव गुणांचे नित्य नव शोध घ्यावे
कधि न मर्मबंधी घाव लागो तुझ्या गे
व्यथित कधि न होवो मन तुला अर्पिले जे।
आपला मूळ विचार किती उदार, उदात्त होता हे वाचून ऊर भरून येतो. आपली मूळ धारणा काय आहे हे दाखवून देणाऱ्या अरुणाताईंविषयी परत फार कृतज्ञ वाटतं. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अंधाऱ्या प्रवासात या सूक्ताचा दिवा घेऊन अरुणाताईंचं शांत, सौम्य, समजूतभरलं हसू उभं असतं.
मैत्रेयीत तिच्या तोंडी अरुणाताईंनी लिहिलंय - 'माती खरी कळली तिघांनाच. कुंभाराला, हरळीच्या मुळांना नि पाण्याला.'
तिच्या आयुष्यातली तीन महत्त्वाची नाती! तिला घडवणारा पिता, तिचा जीवनरस पिऊन तिच्यातून जन्मणारी अपत्यं नि तिच्यात मिसळून जाणारा तिचा सखा. यांनाच माती कळली नाही, तर ती इतरांना कशी, कधी कळेल? ती कळावी यासाठी अरुणाताई तिचं सूक्त आपल्याला सांगतात.
बीज धारण करणाऱ्या स्त्रीजातीला तिच्यातले सर्व गुण प्रकट करायची संधी मिळो. तिच्या मर्मबंधावर, तिच्या स्वत्वावर कधी कुणाचा घाव न पडो. तिला वा तिच्यावर जीव जडवणाऱ्यांना कधी व्यथित होण्याची वेळ न येवो! अरुणाताईंनी हाती दिलेलं हे पृथ्वीसूक्त या मातीच्या कवितेतल्या व्यथेवरचा उतारा वाटतो.
माती कायम असतेच. बदलत राहते तिची अवस्था. ती निर्लेप मनाने जे पडेल त्याला आपला जीवनरस पाजत राहतेच. पण त्याआधी आणि नंतरही ती असते. पाणी होऊन तिच्यात मिसळणारा जाणिवेचा, समजुतीचा थेंब जरी तिला मिळाला, तरी ती पुन्हा सर्जनाचे सोहाळे मांडते. अगदी कस गेल्यावरसुध्दा अग्नीच्या स्वाधीन होतानाही उडणाऱ्या राखेतूनही ती पुढे देत राहते सर्जनाचा वारसा.
अरुणाताईंच्या कवितांमुळे पृथ्वीला - जमिनीला - मातीला - म्हणजेच बाईपणाला, कधीतरी असंच समजूतभरलं थेंबभर पाणी वाटयाला येईल अशा आशेने जीव सुखावतो! अरुणाताई पेरत असलेली ही स्त्रीविषयक जाणीव पक्व होऊन समाजाच्या व्यवहारात दिसू लागेल, तेव्हा खरा सुरू होईल मातीचा उत्सव!