श्रुतमंदिर  - काळाची गरज

विवेक मराठी    21-Nov-2018
Total Views |

***विजय मराठे***

 

जैन धर्मात शंकेश्वर भगवान हे श्रध्दास्थानी आहेत, त्याचे कारण काय आहे?

85 हजार वर्षांपूर्वी महाभारतपर्वात कृष्ण भगवान या युध्दभूमीवर आले होते, तेव्हा जरासंध आणि त्यांच्यात युध्द झाले. युध्दप्रसंगी जरासंधाच्या जराविद्येमुळे कृष्णदेवाचे 56 कोटी सैन्य बेशुध्द अवस्थेत होते. त्या वेळेस भगवान कृष्णाचे चुलत भाऊ नेमीनाथ भगवान, जे जैन धर्माचे 22वे धर्मगुरू होते, ते त्याच्यासोबत होते. या अशा परिस्थितीत काय करावे हे कृष्ण भगवानांना सुचेनासे झाले. तेव्हा नेमिनाथांनी सांगितले की काही काळजी करू नका, आपण तीन दिवसांचे व्रत करा. जैन धर्मात याला अठम् असे म्हणतात. अठम् या ध्यानधारणेत बसल्यानंतर अंतिम ध्यानधारणेच्या प्रक्रियेत साक्षात देव धर्मेंद्र आणि पद्मावती प्रकट होऊन मनोकामना विचारतील, तेव्हा त्यांच्याकडून, आपण ज्या देवतेची पूजा करता. त्या देवतेची मूर्ती देवलोकातून आम्हाला द्या, असा वर मागा. तेव्हा शंकेश्वर भगवान पाषाणरूपात प्रकट झाले. त्या वेळी शंकेश्वर असे नामकरण झाले नव्हते. त्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. बेशुध्दावस्थेत असलेल्या सैनिकांवर अभिषेकाचे जल शिंपडण्यात आले. सैन्य जागृत झाले आणि युध्दात विजय प्राप्त केला. विजयानंतर कृष्णदेवांनी शंखनाद केला आणि तेव्हापासून पाषाणरूपी देवतेला शंकेश्वर असे नाव देण्यात आले. त्यानंतर या नगरीची स्थापना झाली. शंकेश्वर नगरीत एक विशाल मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली.

शंकेश्वर भगवान यांची मूर्ती स्वयंभू आहे. आपल्या योगशास्त्रात सात चक्रे सांगितली आहेत. जेव्हा पाषाणमूर्ती शंकेश्वर देवतेची प्राणप्रतिष्ठा होत होती, तेव्हा प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या पुजाऱ्यांनी शंकेश्वर देवतेचे हृदयचक्र प्रभावीपणे जागृत केले आणि त्यामुळेच येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना तत्काळ पूर्ण होताना दिसतात.

जागृत प्रभाव क्षेत्र असलेल्या या ठिकाणी आपण श्रुतमंदिर निर्माण करणार आहात. या मंदिराची मूळ कल्पना काय आहे?

जैन धर्माच्या प्रवचनश्रुताचे हृदय 'श्रुतमंदिर' आहे. गणधर, पूर्वधर, श्रुतधर यांनी प्राप्त केलेले ज्ञान हजारो ग्रंथांमध्ये ग्रथित आहे. हे ग्रंथ प्राचीन-अर्वाचीन हस्तलिखित तसेच मुद्रित रूपात संरक्षित करण्यासाठी श्रुतमंदिराची निर्मिती करण्यात येते. शंकेश्वर देवतेच्या पवित्र पुण्यभूमीत आम्ही श्रुतमंदिराची निर्मिती करण्याचे ठरविले. या पूण्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. अभ्यासक, ग्रंथसंशोधक यांचे जिज्ञासापूर्वक माहिती घेण्याचे काम येथे निरंतर चालू असते.

भगवान महावीरांनी पूर्ण विश्वाचे सार सांगितले आहे. ''ज्याला आपण जगत् म्हणतो, त्याची तीन स्वरूपे आहेत - उत्पन्न होणे, स्थिर राहणे, विनाश होणे. प्राचीन काळी मौखिक पाठ असत - मौखिक - बोलायचे, कंठस्थ - कंठस्थ करायचे आणि लक्षात ठेवायचे, ही परंपरा जवळजवळ 980 वर्षे चालली. परंतु बारा वर्षीय दुष्काळी परिस्थितीत प्रज्ञाशक्ती, मेदाशक्ती कमकुवत होत गेली, तेव्हा आचार्यांनी एक निर्णय घेतला की याची काही वैकल्पिक योजना केली पाहिजे. महावीरांच्या निर्वाणानंतर गुरुकुल परंपरेतील वलभीपूर या सर्वविख्यात असलेल्या गावात 500 आचार्य एकत्र आले आणि त्यांनी ज्ञानसंगोष्टी तयार करून लिखित स्वरूपाचे हस्तलिखित तयार केले. परंतु यवनांचा हिंदुस्थानात प्रवेश झाला आणि हिंदू आणि जैन धर्मीयांची श्रध्दा असलेल्या मंदिरांचा विनाश सुरू झाला. तसेच धर्मग्रंथांचाही विनाश त्यांनी सुरू केला. वलभीपूरमधील एक कोटी धर्मग्रंथांचे जे सर्जन केले होते, त्याचादेखील त्यांनी विनाश केला. त्यानंतर जे काही शिल्लक ग्रंथ असतील, त्याच्या सुरक्षेचे काम चालू झाले. एक काळ असा आला की दिल्लीमधील एका श्रेष्ठ आचार्यांच्या विनंतीवरून अकबर बादशाहाने फतेपूर सिक्री येथे पहिल्या श्रुतमंदिराची स्थापना केली. दुर्भाग्य आपल्या हिंदुस्थानाचे की त्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनी विध्वंसाचा सुळसुळाट केला. श्रुतमंदिराचे रूपांतर मश्ािदीमध्ये केले. धर्मग्रंथांचा वापर इंधनासाठी केला, असे निर्दयी कार्य करण्यात आले. 1642 सालानंतर जेवढे धर्मग्रंथ शिल्लक राहिले, त्यांचा संग्रह करण्यात आला.

या पवित्र भूमीत चालू केलेल्या नवनिर्माणाच्या कामाच्या योजना कशा प्रकारच्या आहेत?

श्रुतमंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी, दर्शनासाठी एक केंद्रस्थान, साधुसंत, साध्वी यांच्यासाठी आराधना भवन, भक्तांसाठी धर्मशाळा, अन्नशाळा या सर्व प्राथमिक गोष्टींची निर्मिती केली गेली. यानंतर सर्वात महत्त्वाचे केंद्रस्थान म्हणजे श्रुतमंदिर. या श्रुतमंदिराची शिलास्थापना 22 एप्रिलला झाली. तीन वर्षांत 80 हजार चौ.फूट भव्य श्रुतमंदिर उभारण्यात येणार आहे. मध्यभागी सरस्वती मातेची 108 इंची मूर्ती साकारण्यात येणार आहे. या भव्य मूर्तीच्या स्थापनेमागे येणाऱ्या भाविकांमध्ये सदसद्विवेकबुध्दी जागृत व्हावी, अशी भावना आहे. मूर्तीच्या समोर एक साधनाखंड उभारण्यात येईल.

धर्मग्रंथ संरक्षणाविषयी आपण काय संदेश द्याल?

धर्मग्रंथ हेच विश्वाला खरा मार्ग दाखविणारे आहेत. आपल्या दुर्लक्षामुळे किंवा अशा काही परिस्थितीमुळे धर्मग्रंथ नष्ट झाले. धर्मग्रंथ संरक्षित करणे हे विश्वकल्याणाचे काम आहे. धर्म जरी वेगवेगळे असले, तरी त्यांची शिकवण एक आहे. या शिकवणीचे, ज्ञानाचे संचित धर्मग्रंथात केलेले असते. त्यामुळे त्या-त्या धर्माच्या धर्मग्रंथाचे रक्षण करणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि जैन धर्मग्रंथाच्या सुरक्षेसाठी श्रुतमंदिराची निर्मिती होणे गरजेचे आहे.     

अनुवाद - पूनम पवार