महालात असो वा झोपडीत, आई ही आई असते. तिच्या अंगणी बागडणारं चैतन्य तिला जितकं वेडं करतं, तितकंच तिचं निजलेलं तान्हुलं तिला खूळ लावतं. महालातल्या आईची माया आणि झोपडीतल्या आईची माया सारखीच असते. ग.दि. माडगूळकरांच्या या दोन अंगाईगीतांतून त्याचे वर्णन केलं आहे.
दिमांच्या कवितांतून काय निवडायचं! त्यांच्या काव्यांबद्दल किती नि काय लिहायचं! कुठल्याही प्रसंगाला हा परीसस्पर्श झाला की त्यातून लख्ख सोन्यासारखी गीतं-कविता जन्माला येतात. कधी ते सोनं असतं लखलखत्या अलंकारातलं, तर कधी ते असतं सोन्यासारख्या पिकलेल्या शेतशिवारातलं.
राव असो वा रंक, भावना तीच असते. महालात असो वा झोपडीत, आई ही आई असते. तिच्या अंगणी बागडणारं चैतन्य तिला जितकं वेडं करतं, तितकंच तिचं निजलेलं तान्हुलं तिला खूळ लावतं. त्याला न्हाऊ घालणं असो, घास भरवणं असो वा झोपवणं असो, तिचं नागर भाषेवर प्रभुत्व असो वा ग्राम्य शब्दांचे सडे मुखावाटे पडत असोत, महालाच्या गवाक्षातून ती डोकावत असो की झोपडीच्या तुटक्या दारातून ....
माउलीचा गळा आपल्या लाडक्यासाठी गाऊ लागतोच!
भिन्न परिस्थिती पण एकच भाववृत्ती असलेल्या या दोन अंगाई कविता...
नीज वो श्रीहरी
नीज वो श्रीहरी, चांद ये मोहरू
नन्दराणी तुला गातसे हल्लरू
विहगगण झोपला, झोपि गेले तरू
वात हळुवारसा, लागला वावरू
झोपली गाऊली, झोपले वासरू
नीज वो श्रीधर, नीज वो सावळे
माझिया मांडिये, स्वर्गसुख पेंगुळे
शांतरस त्यावरी, घालिते पांघरू
आणखी जपतपा, काय मी आचरू
ब्रह्म ते माझिया पोटिचे लेकरू
आस मी कोणती, आज चित्ती धरू
नन्दराणी तुला, गातसे हल्लरू
* इकडे नंदराजाच्या महालातलं शेजघर. तिथे सुखाला काय उणं! गाईगुरांचे भरलेले गोठे. दुधातुपाची समृध्दी. गोपगोपी मदतीला. प्रजेचं प्रेम सोबतीला. याने सुखावलेली यशोदामाई. अन तिच्या सुखाचा कळस म्हणजे दैवाने तिला दिलेलं ओटीतलं दान! वसुदेवाच्या टोपलीत बसून साक्षात परब्रह्म तिच्या दारी आलं. तिने त्याला पदराखाली घेतलं! केवढं हे भाग्य!!
* तिकडे चहूबाजूला पसरलेलं वावर. त्यात तिची नखाएवढी झोपडी! दिवसभर राबायचं. रात्री चूल पेटवून गरम भाकरीचं अन्नब्रह्म पोटी घालायचं. आपल्याबरोबर गायीगुरालाही चारायचं. तिलाही आनंदाचा ठेवा सापडलाय तो तिच्या लेकराच्या रूपात! त्या बालब्रह्माच्या मुखी आपला पान्हा पडतोय, याचं अपार सुख तिला मिळतंय!
* इकडे निशादेवीने आपला काळा शेला महालावर, गोकुळावर पांघरला. त्यावर लखलखीत बुट्टयासारखा चांद उगवलाय! आता या नटखट कान्हाने डोळे मिटावेत म्हणून नंदराणी हलके हलके गुणगुणतेय, श्रीहरीला जोजवतेय!
* तिकडे झोपडीच्या झापासमोरही चांदणं पसरलंय, अगदी टिप्पूर! काळया आईने पांघरलाय चांदण्याचा शेला. झोपडीच्या आतही येतायत त्याचे क्षीण कवडसे! त्यातच ती आई झोपवतेय तिच्या काळजाच्या तुकडयाला.
* इकडे माई सांगतेय, पाहा बरं.. सारे पक्षी निजले.. झाडं झोपी गेली ..वारादेखील पाहिलंस ना, कसा हळूच वावरतोय! तुझी लाडकी गाऊली नि तिचं वासरूही निजलं बरं! नीज ना रे नंदलाला!
* तिकडे ही झोपडीतली आईही बोलतेय त्या बाळाशी. बग बरं, बाहेर कसा वारा सुटलाय. आपल्या चिंचेला छोटी छोटी फुलं आलीत ना, तीपण कशी डुलताय, पेंगतायत वाऱ्याने. बापाने संध्याकाळी पाणी सोडलं बघ शेतात, ते दूध असतंय बरं झाडावेलींचं. वेलीची लेकरंपण निजेला आलीत.
पडल्यापडल्याच ती ते दूध चाटतायत बघ.
* इकडे माई म्हणतेय, तुला काय काय म्हणून विनवावं बरं! नीज रे श्रीधरा, माझ्या लाडक्या, नीज ना रे सावळया!
किती वेळ जोजवते आहे तुला! चंदनाचा पाळणा तुला नाही ना चालत? तुला लबाडा माईची मांडीच हवी ना? बघ आता हे नाचरे डोळे कसे पेंगुळले!! स्वर्गसुखाचं दान मला लाभलंय! विश्वाचा जो विसावा, तोच माझ्या मांडीवर विसावलाय. त्याला पांघरायला तरी काय आणू? साक्षात शांतरसच त्याच्या अंगावर शोभेल. कारण तोच तर कर्ताधर्ता! तोच सगळयाचं केंद्र! तो शांत झाला की सारंच सुनं. शांत...
* तिकडे ती थकलीभागली आई सांगतेय, बघ, गव्हाणी उघडया आहेत, तरीपण आपले बैल आता शांत बसून खाल्लेलं रवंथ करतायत. तो आपला मोत्या बघ, त्याला तर राखणीचं काम आहे. तरी तोही कसा चुपचाप बसलाय पेंगत.
तो सावध आहे, पण डोळे मिटू लागलेत त्याचेपण. या टीचभर झोपडीत तुला पाळणा राहू दे, झोळीसुध्दा बांधायला जागा नाही बघ! हा मांडीचाच पाळणा करून झोपवते तुला.
रानातली अंगाई
झोपडीच्या झापाम्होरं,
कसं चांदणं टिप्पूर
वाऱ्यासंगं हेलावतो,
उभ्या चिंचेचा मोहोर
सभोंवार काळं रान
गेलं दुधात भिजून.
रानवेलींची लेकरं,
त्यास चाटती निजून.
उगडया गवाणीशीं
बैल करीती रवंथ
करी रानाची राखण,
मोत्या जागत, पेंगत.
बाळा, दमून भागून
तुझं वडील झोपलं
(करू) नको किरकीर
झोप उगाच मोडल.
मीट रं डोळे लेकरा.
* सुखावलेली माई तृप्त होऊन म्हणतेय, हे निजलेलं गोमटं रूप पाहून भरून येतंय मला. कोणतं पुण्य फळाला आलं नि माझ्या पदराखाली पोटचं लेकरूच म्हणून साक्षात ब्रह्मच विसावलं! आता आणखी मिळवण्यासारखं, मागायसारखं काही उरलंयच कुठे! कशाला आता अन्य कुणाची भक्ती, जप-तप नि आराधना करू! कुणी माग म्हटलं तरी मागावं काय हेच सुचणार नाही इतकं मिळालंय मला!
नीज तान्ह्या! नीज कान्ह्या!!
* तिकडे झोपडीतल्या आईला निराळीच चिंता.
तिच्या अंगात मावत नाहीयेत आजचे कष्ट. तिचे न तिच्या धन्याचे. तिला दिसतोय उद्याचा दिवस. उद्याच्या कामाची रास. तांबडं फुटता फुटता कामाला लागायचं, झोप रे लवकर पोरा!! धन्याचा आत्ता कुठं डोळा लागलाय.
आणि हे किरकिर करत राहिलं, तर त्याची झोप मोडंल. लाखमोलाचा माझा धनी. त्यावर सारा संसाराचा भार. उद्या पुन्हा तो घाम शिंपायला निगंल. त्याची झोप व्हायला हवी. झोप रं माज्या गुण्या! झोप आता. नको मोडू बापाची झोप!
दोन्ही कवितांचा हेतू एकच! माया तीच. कुठल्याही भोवतालातून बाळाला चांगलं निवडून दाखवते, त्याला रिझवते, त्याला या सृष्टीची ओळख करून देते, त्याला आपल्या मायेने जगाशी प्रेमाने वागायला शिकवते ती खरी आई! तिला सर्वात समाधान देतं तिच्या लेकराचं सुख. त्याला मधाचं बोट लावत ती त्याला हळूहळू मोठं, जबाबदार बनवणार असते. त्याला झोपवलं की तिच्या डोळयात त्याच्या मोठं होण्याची स्वप्नं फेर धरतात. लेकरालाही स्वर्ग मिळतो तो आईच्या मांडीवरच!
काळया आईच्या मांडीवर लोळत आभाळाएवढं कर्तुक केलेलं 'गदिमा' नावाचं सरस्वतीचं लाडकं लेकरू! त्याच्यासाठी शारदेने कोणत्या शब्दात अंगाई म्हटली असेल बरं?