रागाच्या भरात

विवेक मराठी    16-Oct-2018
Total Views |

विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

राग व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीवर योग्य त्या वेळी आळा घालणं गरजेचं असतं. खरं तर ते लहान वयातच व्हायला हवं. कुमारवयीन मुलांच्या वागणुकीवर ताबा ठेवणं हे खरं तर तितकं सोपं नाही. परंतु काही गोष्टी मुलांना आपण नक्की शिकवू शकतो, जेणेकरून मुलांना त्यांच्या स्वत:च्या वागणुकीवर ताबा मिळवणं शक्य होईल.

कुमारवयीन मुलं आणि राग हे अगदी रोजचंच समीकरण. राग येत नाही असं कोणतंही मूलच नव्हे, तर अशी कोणती व्यक्तीही या जगात सापडणार नाही. परंतु मुलांमध्ये रागाचं प्रमाण मोठया प्रमाणावर बघायला मिळतं. काही वेळा अगदी काही कारण नसतानासुध्दा मुलांना राग येतो, असं पालकांचं म्हणणं असतं. अभ्यास करायला सांगितल्यावर राग, टी.व्ही. बघू नको सांगितलं की राग, मोबाइलवर खेळणं खूप वाढलंय असं म्हटलं की राग, रात्री लवकर झोपत जा असं सांगितलं की राग, कपडयांवरून, केसांवरून काही बोललं की राग, कोणत्या गोष्टीला नकार दिला की राग. थोडक्यात, मुलांना जवळजवळ सगळयाच गोष्टींचा राग येत असतो.

 

काही वेळा हा राग इतका अनावर होतो की मुलं अगदी हिंसक पध्दतीनेसुध्दा तो बाहेर काढतात. उदा., वस्तू इकडेतिकडे फेकून देणं, समोरच्याच्या अंगावर खूप जोरात ओरडणं, मारणं आणि काही वेळा अगदी स्वत:ला इजा पोहोचवणं इथपर्यंत मुलांचा राग जातो. आणि हे सगळं रोज घरात व्हायला लागलं, तर घरात तणावाचं वातावरण निर्माण होणं ही अगदी स्वाभविक गोष्ट आहे.

मुळात राग ही एक नैसर्गिक भावना आहे. आणि आपण माणूस आहोत, त्यामुळे आनंद, दु:ख, भीती या भावना जशा आपण वेळोवेळी अनुभवतो, तसा रागही आपल्याला येणारच. त्यामुळे जर तुम्ही मुलांना असं सांगत असाल की, 'राग आणणं बंद कर', 'एवढा राग आलाच नाही पाहिजे', 'रागावर नियंत्रण करता यायलाच हवं' तर ते कुठेतरी चुकीचं आहे. आपण स्वत:सुध्दा आपल्या रागाला पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही किंवा मला राग आलाच नाही पाहिजे असं ठरवू शकत नाही. आपण सुजाण असून आपल्याला हे करणं कठीण आहे, तर मग मुलांना ते नक्कीच कठीण जाऊ शकतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्याला मुलांचा राग नाही, तर राग आल्यानंतरची त्यांची वागणूक, तो राग व्यक्त करण्याची त्यांची पध्दत यामध्ये बदल घडवायचा आहे.

आता राग व्यक्त करण्याची त्यांची पध्दत मुळात लहानपणापासून ते कुठेतरी शिकत आलेले असतात. याला learned behaviour असं म्हणतात. It is a behaviour that occurs as a result of experience. थोडक्यात, एखादी गोष्ट आपण कशी शिकतो? तर आपल्याला आलेल्या अनुभवांवरून. मग त्याचप्रमाणे राग व्यक्त करण्याची ही पध्दती बऱ्याचदा मुलं हळूहळू शिकत आलेली असतात. अगदी सोपं उदाहरण लक्षात घ्या. तुमचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा लहान होती, तेव्हा कधीतरी तुम्ही त्यांना चॉकलेट दिलं असेल. ते त्यांना आवडलं असेल. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी परत तुमच्याकडे चॉकलेट मगितलं, तेव्हा तुम्ही सांगितलं की चॉकलेट रोज खायचं नसतं. काल खाल्लं ना? आता आज परत नाही खायचं. पण मुलाला जेव्हा ते हवंच असतं, तेव्हा ते हट्ट करायला लागतं. मग तुम्ही विचार करता - जाऊ दे, देऊ या आजचा दिवस. मग तिसऱ्या दिवशी मुल हट्टच करायला लागतं. तुम्ही नाही म्हणता. मग मूल चॉकलेटसाठी रडायला लागतं. तुम्ही विचार करता - जाऊ दे रडतोय ना, देऊ या चॉकलेट. चौथ्या दिवशी हेच मूल चॉकलेटसाठी आरडाओरडा करायला लागतं. मग आदळआपट करायला लागतं आणि मुलाचं हे असं सगळं वर्तन टाळण्यासाठी तुम्ही त्याला चॉकलेट देत जाता. पण यामध्ये त्याची वागणूक सुधारण्याऐवजी त्याच्या हट्टाला, रडण्याला, आदळआपट करण्याला तुम्ही कुठेतरी खतपाणी घालत असता. आणि मग मुलं आपोआप शिकत जातात की, मी काय केलं, कसं वागलं की मला हवी ती गोष्ट मिळते. राग व्यक्त करणं मुलं असंच काहीसं शिकतात.

 मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या वयातील मेंदूची अविकसित वाढ, शरीरात होणारे बदल आणि स्वत:ची मतं तयार करण्याची, आपण मोठे झालोय हे सिध्द करण्याची धडपड या सगळया गोंधळामुळे रागाच्या भावनेवर नियंत्रण करणं किंवा राग आलेला असता संयमाने वागणं मुलांना कठीण होतं. तसंच लहानसहान गोष्टीत राग येण किंवा चिडचिड होणं यासाठी अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. अभ्यासाचा ताण, वाढत चाललेली स्पर्धा, शाळेत इतर मुलांकडून होणारी चिडावाचिडवी, त्रास, एखाद्या गोष्टीबद्दलचं अपयश, पोषक आहाराची कमतरता, अपूर्ण झोप, घरातील तणावपूर्ण वातावरण इत्यादी अनेक कारणं असू शकतात.

परिस्थिती योग्य रीत्या हाताळता येत नसल्याने या रागाचा बऱ्याचदा उद्रेक होतो. वाढत्या वयाबरोबर हा रागही वाढू शकतो आणि पुढे जाऊन त्याचे पडसाद भयंकर पध्दतीने समोर येऊ शकतात. उदा., 1) सतत एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार करत राहणं, तिरस्काराच्या दृष्टीकोनातूनच सगळं जग बघणं, 2) एखादी गोष्ट आपण करू शकत नाही याबद्दल स्वत:चा राग करत राहणं, परिणामी हतबलतेची भावना निर्माण होणं, 3) राग अनावर झाल्याने हिंसक होणं आणि पुढे जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणं, 4) व्यसनांच्या आहारी जाणं, 5) स्वत:ला इजा पोहोचवणं, राग आल्यानंतर ब्लेड, सुरी याने स्वत:ला इजा करून घेणं, डोकं भिंतीवर आपटणं, वेगवेगळया पध्दतीने स्वत:ला हानी पोहोचवणं इत्यादी. परिणामी त्यांचं मानसिक संतुलन ढळू शकतं.

राग व्यक्त करण्याच्या प्रवृत्तीवर योग्य त्या वेळी आळा घालणं गरजेचं असतं. खरं तर ते लहान वयातच व्हायला हवं. कुमारवयीन मुलांच्या वागणुकीवर ताबा ठेवणं हे खरं तर तितकं सोपं नाही. परंतु काही गोष्टी मुलांना आपण नक्की शिकवू शकतो, जेणेकरून मुलांना त्यांच्या स्वत:च्या वागणुकीवर ताबा मिळवणं शक्य होईल.

1) वेळ देणं - मुलांच्या रागीट वागण्याने बऱ्याचदा पालकांनादेखील राग येतो आणि मग दोघंही आपला राग व्यक्त करत असतील तर त्यातून फक्त वाद होतात. त्यामुळे तुम्ही किंवा तुमचं मूल रागात असेल तर थोडा वेळ घ्या, तुमच्या मुलाला थोडा वेळ द्या. राग शांत झाल्यानंतर त्या गोष्टीबद्दल योग्य रितीने बोला.

 

2) नियम/अपेक्षा याबद्दल स्पष्ट आणि ठाम असणं - घरातील नियम, कसं वागायचं याबद्दलचे नियम आणि अपेक्षा मुलांना शांतपणे समजावून सांगा. नियम आणि अपेक्षा याबद्दल आई-वडील आणि घरातील इतर सदस्य यांचं एकमत असणं गरजेचं आहे.

 

3) रागाचं कारण समजून घेणं - मुलांना नेमका कशामुळे राग येतो आहे, त्यांच्या रागामागचं नेमकं कारण काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. समोर घडत असलेल्या गोष्टींचा राग येतो आहे की त्यांच्या मनात काही गोष्टी आहेत ज्या ते मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, हे जाणून आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा.

 

4) परिणामांची जाणीव करून देणं - राग चुकीच्या पध्दतीने व्यक्त केल्यावर त्याचे काय वाईट परिणाम होऊ  शकतात, हे मुलांना शांतपणे समजावून सांगा. असा राग व्यक्त करण्याचा पुढे आपल्याला कसा अडथळा निर्माण होऊ  शकतो, हे समजावून सांगा.

 

5) खेळ/व्यायाम करायला प्रोत्साहन देणं - खेळामुळे/व्यायाम केल्याने मुलांमधील अनावश्यक ऊर्जेला योग्य दिशा मिळू शकते. त्यांची मनःस्थिती चांगली राहायला मदत होऊ  शकते.

 

6) स्वत:मध्ये बदल करायला सांगणं - एखाद्या व्यक्तीची मतं बदलणं, तिची वागणूक बदलणं हे आपल्या हातात नसतं, तर आपण त्या परिस्थितीत कसं वागायला हवं ते आपल्या हातात असतं हे पालकांनी लक्षात घेऊन मुलांना समजावून देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वत:च्या वागणुकीमध्ये बदल करायचा प्रयत्न करतील.

वरील सर्व प्रयत्न करताना पालकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे संयम. मुलांचा राग हा ते जसा हळूहळू शिकत गेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या वागणुकीतील बदलदेखील हळूहळूच होणार आहे. तुमच्या सर्व प्रयत्नांना अनेकदा अपयश येऊ शकतं. परंतु सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. राग योग्य पध्दतीने व्यक्त करणं हे एक कौशल्य आहे आणि ते विकसित करावं लागतं. त्यासाठी पालकांनी संयम ठेवून मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. वेळप्रसंगी तज्ज्ञांची मदत घेणं योग्य ठरेल.        

लेखिका समुपदेशक आहेत.

 muditaa.7@gmail.com