दैनंदिन इंटरनेट, कॉम्प्युटर वापरणाऱ्यांनी डेटा सिक्युरिटीबाबत नक्कीच जागरूक असले पाहिजे. आजच्या डिजिटल जगात डेटा सिक्युरिटीसारखे महत्त्वाचे विषय कसे हाताळले जातात? याबद्दल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न.
आपल्या दैनंदिन व्यवहारात कॉम्प्युटर, इंटरनेट, पेन ड्राइव्ह, हार्ड-डिस्क या सर्व गोष्टी मोठया प्रमाणात वापरल्या जातात, किंबहुना यामुळे व्यवहार सुरळीत व्हायला मोठया प्रमाणात मदत झाली आहे. परंतु हे सर्व वापरताना आपण माहिती सुरक्षिततेची (डेटा सिक्युरिटीची) काळजी घेतो का? आपल्या वाढत्या वापरामुळे आपली माहिती मोठया प्रमाणात सोशल होते, ती विविध सोशल साइट्सच्या माध्यमातून इंटरनेटवर येत असते. मात्र त्याचा कुणी दुरुपयोग करत नाही ना...!! हे पाहणे आपलेच काम आहे. त्यामुळे डेटा सिक्युरिटीची काळजी कशी घ्यावी, याबद्दल आज जाणून घेऊ या.
डेटा सिक्युरिटी म्हणजे काय?
डेटा सिक्युरिटी ही अशी एक पध्दती आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर, डेटाबेस, तसेच इंटरनेटवरील माहिती अनधिकृत व्यक्तीपासून अथवा प्रणालीपासून वाचवता येते. आपल्या माहितीची सुरक्षितता यामुळे राखून ठेवता येते. आजच्या डिजिटल जगात माहिती सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय मानला जातो, त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डेटा सिक्युरिटी या संकल्पनेला मोठया प्रमाणात वाव आहे.
डेटा सिक्युरिटी संकल्पनेत केवळ माहिती इतर माध्यमांपासून संरक्षित करणे हा भाग नसून, असलेली माहिती गमावू नये याचीदेखील काळजी घेतली जाते. अनेक वेळेला आपण ऐकतो की पेन ड्राइव्ह 'करप्ट' झाला, म्हणजे त्यातील माहिती गमावलेली असते. यात अनेक वेळा महत्त्वाची माहिती अचानक डिलीट होत असते. हा प्रकार घडू नये म्हणून सावधगिरी बाळगलेली असते.
एन्क्रिप्शन तंत्रज्ञान
डेटा सिक्युरिटीसाठी सर्वाधिक महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजेच 'एन्क्रिप्शन' होय. एन्क्रिप्शन तंत्रज्ञानात माहिती ही वेगळया स्वरूपात रूपांतरित केली जाते, त्यामुळे प्रथमदर्शनी ती माहिती दिसत असलेल्या स्वरूपात साठवलेली नसते, त्यामुळेच कोणीही त्याची मूळ ओळख बघू शकत नाही. केवळ 'डीक्रिप्शन की' अर्थात पासवर्ड असलेल्या यूजर्सनाच ते पाहता येते.
याचे एखादे उदाहरण द्यायचे असल्यास, जसे गुप्तचर विभागात विशिष्ट संदेश देण्यासाठी विविध तऱ्हा वापरल्या जातात, एखाद्या पत्रातील संदेश कुणाला कळू नये, केवळ विशिष्ट व्यक्तींनाच ते कळावे अशा भाषेत/लिपीत/एखाद्या छायाचित्राच्या आडून लिहिले जाते. हेच सर्व माहिती तंत्रज्ञानाच्या जगात प्रोग्रामिंगच्या साहाय्याने केले जात असते. एन्क्रिप्शन करताना एन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरला जातो, ज्यामुळे संदेश वेगळया स्वरूपात रूपांतरित होतो. ज्याला पाठवायचे असते त्या यूजरकडे 'डीक्रिप्शन की' असते, त्याच्या साहाय्याने तो संदेश मूळ भाषेत पुन्हा रूपांतरित केला जातो.
यामुळे कुणी इतर व्यक्तीच्या हातात ती माहिती लागल्यास डीक्रिप्शन की नसल्याशिवाय त्याला तो संदेश लक्षात येत नाही, आणि परिणामी माहिती संरक्षित होते. त्यामुळेच एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाला डेटा सिक्युरिटीची गुरुकिल्ली मानली जाते.
अधिप्रमाणन (ऑॅथेन्टिकेशन)
अधिप्रमाणन अर्थात ऑॅथेन्टिकेशन हीदेखील डेटा सिक्युरिटीसाठीची महत्त्वाची प्रणाली आहे. इंटरनेटवर ऑॅथेन्टिकेशन असण्यासाठी विविध प्रश्नावली विचारली जात असते. इंटरनेट बँकिंगसारख्या महत्त्वाच्या प्रणालीत तर पासवर्ड, त्याचबरोबर प्रोफाइल पासवर्डदेखील दिलेला असतो, ज्यामुळे यूजर्सचा डेटा अधिक सुरक्षित राहील.
अनेक वेबसाइट लॉग-इन करताना यूजरनेम, पासवर्डबरोबर 'कॅपचा'देखील दिलेला असतो, ज्यामुळे मानव आणि रोबोट यांतील फरक साइट ऍडमिनला ओळखता येतो. 'वन टाईम पासवर्ड' (ओटीपी) नावाची नवीन संकल्पना हल्ली आलेली आहे, ज्यामुळे दुहेरी ऑॅथेन्टिकेशन मिळायला मदत होते. बायोमेट्रिक हेदेखील ऑॅथेन्टिकेशन तपासण्याचे प्रभावी माध्यम आहे. बायोमेट्रिकच्या वापरामुळे यूजर जलदगतीने लॉग-इन करू शकतो, त्यामुळे खोटया अकाउंटला पुढे वाव मिळत नाही.
दैनंदिन इंटरनेट, कॉम्प्युटर वापरणाऱ्यांनी डेटा सिक्युरिटीबाबत नक्कीच जागरूक असले पाहिजे. आजच्या डिजिटल जगात डेटा सिक्युरिटीसारखे महत्त्वाचे विषय कसे हाताळले जातात? याबद्दल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न होता.
9579559645