अब तो जिद है, ना हारेंगे ये हौसला

विवेक मराठी    23-Jan-2018
Total Views |


मानसी राघव कुलकर्णी

My life has always been a miracle आणि हे आयुष्याचे मौल्यवान गिफ्ट मला पुन्हा जगायला मिळालंय, त्यामुळे त्यानंतरचा प्रत्येक दिवस भरभरून जगायचं असं ठरवलं. सायकॉलॉजीमध्ये बी.ए. केलं. ही पदवी होती, माझ्या स्वप्नाकडे आणि ध्येयाकडे घेऊन जाणारं पहिलं पाऊल! सध्या मी लंडनमध्ये M.Sc. in Health Psychology या विषयात शिक्षण घेत आहे.

नमस्कार वाचकहो, मी मानसी! मी कुठल्या क्षेत्रातली कुणी यशस्वी व्यक्ती वगैरे नाही. माझा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. पण तरीही या लेखाच्या निमित्ताने मला तुमच्यासोबत माझे अनुभव शेअर करता येणारेत, याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे.

माझी गोष्ट सुरू झाली ती शाळेतल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो टप्पा म्हणजे दहावी! सुरुवातीला मीही चारचौघांप्रमाणे शाळेत जाणारी, दहावीनंतर काय-काय करायचं याची स्वप्नं पाहणारी, मित्र-मैत्रिणीत रमणारी विद्यार्थिनी होते. पण त्याच वर्षी आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. एक दिवशी अचानक आलेल्या तापानंतर असंख्य तपासण्या आणि चाचण्यांनंतर झालेलं निदान - ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया! खरं तर ध्यानीमनीही नसणारं हे संकट अचानक फणा काढून आमच्यासमोर उभं राहिलं होतं. मला जेव्हा याबद्दल कळलं, तेव्हा क्षणभर मन सुन्न झालं आणि मग अचानक भानावर आल्यासारखं होऊन मनात असंख्य प्रश्नांचं काहूर उठलं. हे सर्व माहीत असूनही चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा घालून, माझ्यासाठी रात्रंदिवस झटणारे आई-बाबा समोर दिसले आणि मग ठरवलं - जे जसं आहे तसं स्वीकारायचं.

दुसऱ्याच दिवशी, मला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉ. बक्षींशी मी बोलले. ''मला जे काही झालं आहे आणि त्यावर जी काही ट्रीटमेंट असणार आहे, ती मला स्पष्टपणे समजावून सांगा'' असं मी सांगितलं. त्यांनीही मला घाबरवून न टाकता सत्य परिस्थिती समजावून सांगितली. मी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि माझ्या बाजूने संपूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं.

खरं तर कॅन्सरने शरीराला जितक्या वेदना होतात, त्याहीआधी मनाला त्याची झळ पोहोचते. कारण आपण या शब्दाचाच बागुलबुवा करून ठेवलेला असतो. पण या भीतीने मनात घर करण्याआधीच जर डॉक्टरांच्या प्रयत्नांना पुरेपूर साथ देण्याचं ठरवलं, तर आपण स्वत:चीच स्वत:ला केलेली ती मदत ठरू शकते. कधी-कधी आहे ती परिस्थिती स्वीकारून आपल्या परीने जे होईल ते करणं हेच आपल्या हातात असतं. अशा वेळी निराश होणं, खचून जाणं स्वाभाविकच आहे. परंतु माझ्या असं लक्षात आलं की, एखादा वाईट प्रसंग घडून गेल्यानंतर आपलं मानसिक बळ उलट वाढतं. 'आलेला हा प्रसंग आपल्यावरच का आला?' असे त्रासदायक प्रश्न एकदाचे मनातून काढून टाकले की परिस्थिती बदलण्याचं धैर्यही आपोआप येतं.

माझ्या ऐन उमलण्याच्या काळात हे सर्व अनुभवायला लागलं हे खरं तर माझं दुर्दैव नसून सुदैव आहे, असंच मला मागे वळून पाहताना वाटतं. माझ्यासमोर असलेल्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा असाच तो काळ ठरला. मला कविता करण्याची आणि लिखाणाची आवड लहानपणापासूनच होती. माझ्यातला हा गुण हेरून, कॅन्सरशी दोन हात करतानाचे अनुभव पुस्तकरूपात पाहण्याची प्रेरणा नंदिनी बर्वे बाईंनी दिली आणि त्यांच्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच मी 'आकाश कवेत घेताना' हे पुस्तक लिहू शकले. मानसोपचार म्हणजेच Psychology हे क्षेत्र निवडण्याची माझी इच्छा होतीच. मी जेव्हा यातून बरी झाले आणि हॉस्पिटलमधील एखाद्या रुग्णाशी बोलायला, त्यांचं मन फुलवायला डॉक्टर आणि नर्स माझ्याकडे आशेने पाहायला लागले, तेव्हा तर मानसशास्त्रातच करियर करायची ही माझी इच्छा अधिकच दृढ झाली.

या ट्रीटमेंटनंतरच्या काळातही काही प्रसंग आले, ज्यामुळे इतकं सगळं होऊनही नियतीचं मन भरलं नसेल का? असा प्रश्न पडावा. मी बारावीत असताना थोडं कुठे नॉर्मल लाइफ चालू झालं असं वाटत असतानाच मी कॉलेजमध्ये पाय अडखळून पडले. खरं तर इतकं गंभीर काही नसूनही केवळ केमोथेरपीचा परिणाम शरीरात असल्याने माझी ठिसूळ झालेली हाडं अक्षरश: चक्काचूर झाली. पुन्हा हॉस्पिटल आणि चार महिने जाडजूड प्लॅस्टर! बारावीची बोर्ड परीक्षा माझ्या पायातल्या या दागिन्यासकटच दिली! बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी लगेचच परदेशी जाण्याची माझी इच्छा होती. पण आता पायाने धड चालता येईल का इतकीही खात्री वाटू नये अशी परिस्थिती होती. पण ठरवलं की जसं आत्तापर्यंत निभावून नेलं, हेही होऊन जाईल. कॅन्सरच्या ट्रीटमेंटदरम्यान एक वेळ अशी होती की, मी जवळजवळ स्वर्गाला हात टेकून आले होते आणि पायाला प्लॅस्टर घालावं लागलं तेव्हाही मला माझं मनोधैर्य टिकवून ठेवता आलं, तर ही परिस्थितीही एक दिवस नक्कीच बदलेल याबद्दल मला विश्वास होता.

टि्रटमेंटच्या काळात मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे जर मनात सकारात्मकता असेल, तर कोणतीही लढाई आपण अर्धी तिथेच जिंकतो! अर्थात हे सांगताना खूप सहजपणे लिहिते आहे. पण त्या प्रसंगी असं सकारत्मक राहणं नक्कीच कठीण असतं. मलाही कधीकधी वाटायचं, इतक्या गोळया आणि औषधं यामध्ये एखादं सकारात्मकतेचं इंजेक्शन असतं तर किती बरं झालं असतं, नाही! ते इंजेक्शन येईल तेव्हा येईल, पण मी माझ्यापुरता सकारात्मकतेचा डोस मिळत राहील अशी साधनं जाणली होती. मनात अशी भावना रुजण्यसाठी आनंदी असणं महत्त्वाचं. मग असा आनंद मिळवण्याची प्रत्येकाची साधनं वेगळी असू शकतात. गाणी आणि वाचन हे माझे एकटेपणाचे साथी. परंतु अशा परिस्थितीत बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधूनच खूप मोकळं वाटतं.

या काळात ऑलराउंडर बनून माझी काळजी घेणारी, वेळापत्रक पाळणारी, माझी जिवलग मैत्रीण बनून मला आनंदी ठेवणारी, प्रसंगी स्वत:च रडू लपवून मला धीर देणारी माझी आई सतत माझ्याबरोबर असायची. माझे बाबा आणि मित्र-मैत्रिणी सगळेच माझ्या जगण्याची उमेद ढासळू न देणारे भक्कम आधार होते. तसेच माझा दादा माझ्यामागे पहाडासारखा उभा होता. त्याचा आश्वासक हात नेहमीच माझ्या पाठीवर असायचा. कुटुंबाची आणि आप्तेष्टांची साथ होती, म्हणूनच तर मी दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडू शकले. या काळात एकलकोंडं न होता किंवा जगापासून आपण तुटलोय असं कधीच जाणवून न घेण्याचा सगळयात सोपा उपाय होता तो म्हणजे संवाद!  मनातील निगेटिव्ह विचार घालवण्यासाठी सगळयात सोपा उपाय म्हणजे ते विचार समोरच्यांना सरळ धडाधड सांगून टाकायचे, किंवा अजिबात संकोच न करता अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. मनसोक्त हसणं जसं गरजेचं आहे, तसंच कधीकधी रडणंही आपल्याला हलकं करून टाकतं. माझ्या व्यक्तिगत अनुभवांतून मला कोणतातरी दोष आयुष्यभरासाठी राहून जाणार असं डॉक्टरांना वाटत असताना, तब्बल आठ महिन्यांनंतर मी चालायला लागले, हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु त्यानंतर एक गोष्ट नक्की कळली, ती म्हणजे My life has always been a miracle आणि हे आयुष्याचे मौल्यवान गिफ्ट मला पुन्हा जगायला मिळालंय, त्यामुळे त्यानंतरचा प्रत्येक दिवस भरभरून जगायचं असं ठरवलं. सायकॉलॉजीमध्ये बी.ए. केलं. ही पदवी होती, माझ्या स्वप्नाकडे आणि ध्येयाकडे घेऊन जाणारं पहिलं पाऊल!

जेव्हा 'आकाश कवेत घेताना' हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हाच ठरवलेलं की, या पुस्तकांचं सारं उत्पन्न माझ्या कॅन्सरपीडित बांधवांसाठी द्यायचं. जेव्हा सायकॉलॉजी घेतलं, तेव्हाही ही गोष्ट मनात सतत होती की मी या माझ्या पेशंट बांधवांसाठी काही करू शकले तरच माझ्या या लढाईत ज्यांचे माझ्यावर ऋण आहेत ते कुठेतरी फेडता येऊ शकतील. माझ्या ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग मला सापडला तो होता M.Sc. in Health Psychology या विषयात. शरीराचं दुखणं कसं मनाचा ताबा घेऊन जीवन पोखरून टाकू शकतं, हे मी खूप जवळून पाहिलं होतं आणि अनुभवलं होतं. हेल्थ सायकॉलॉजी म्हणजे याच संदर्भात मानसशास्त्रावर आधारित रिसर्च आणि उपाययोजना. हेच क्षेत्र माझ्या अनुभवांना पूरक आहे. आणि सध्या मी लंडनमध्ये याचं शिक्षण घेत आहे.

...तर ही होती माझी छोटीशी काहाणी, पण ही इथेच संपणार नाही बरं का! कारण अजून खूप काही शिकायचं आहे, करायचं आहे! त्यामुळे जाता-जाता फक्त इतकंच सांगेन...

अरमनोंकी है अब सारी दास्ताँ

कितनी ख्बाहिशें मंजिल का ताके रास्ता

चाहे राह में पत्थर मिले या काटों का नोचना

अब तो जिद है, ना हारेंगे ये हौसला

एक जिंदगी जब मौत से तुझे छीन लाया

हर एक नयी धडकन से वादा था हमने किया

अगर तूफान हो पहाडोंसे भी बडा

उम्मीद की चिंगारी से रोशन करना है सारा जहाँ

ख्वाब दिल में आया तो अब कैसाडरना

उसे पूरा करे बगैर ना पलटेंगे अब कहानी का ये पन्ना!

 

9594108080

 07448545699