“पैसा झाला मोठा…”

विवेक मराठी    18-Jan-2018
Total Views |

***प्रसाद शिरगावकर***

मध्यमवर्गातून आलेल्या, पण ‘पैसा झाला मोठा’ अनुभवणाऱ्या ह्या पिढीतल्या एकाने ह्या सुबत्तेच्या पावसाचं आपण काय करू शकतो, यासंबंधी केलेलं मुक्त-चिंतन म्हणजे ही लेखमाला - ’धन की बात’!

 नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचे आणि नव्या सहस्रकात माहिती युगाचे वारे वाहायला लागले आणि हे सारं झपाट्याने बदललं. मध्यमवर्गातल्या नव्या पिढीसाठी नोकरी-व्यवसायाच्या अनंत संधी निर्माण व्हायला लागल्या. नव्या युगासाठी लागणाऱ्या नव्या कौशल्यांची आणि ज्ञानाची मागणी जगभर प्रचंड वाढली. अर्थातच, त्यांचं मूल्य आणि मोबदलाही चक्रवाढ गतीने वाढला. याच काळात, मध्यमवर्गाची नवी पिढी नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर प्रवास करायला लागली. रुपयांबरोबरच डॉलर्स-पाउंडामध्येही कमवायला लागली. नव्वदच्या दशकाच्या आधी ‘खाऊन-पिऊन सुखी’ असलेल्या कुटुंबांतल्या पुढच्या पिढीच्या हातात अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला.

 मध्यमवर्गीय कुटुंबांचं आयुष्य पूर्वी खूप साधं सोपं आणि सरळ असायचं. गेल्या शतकातल्या नव्वदीच्या दशकाआधीपर्यंत बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंबं ही ‘खाऊन-पिऊन सुखी’ प्रकारची असायची. घरात एकच व्यक्ती - सहसा कुटंबप्रमुख - ही कमावती व्यक्ती असायची. तीही सहसा सरकारी किंवा खाजगी नोकरी करणारी अथवा छोटासा व्यवसाय करणारी असायची. नवरा-बायको-दोन मुलांचं चौकोनी कुटुंब असायचं. एका व्यक्तीच्या कमाईवर कुटुंबाचा संसार सुखाने चालायचा. वर्षातून एक-दोनदाच, फक्त सणसमारंभांनाच, कपडे-दागिने खरेदी केली जायची. TV, Scooter वगैरे गोष्टी चैनीच्या वाटायच्या आणि पंच-दशवार्षिक योजना करून त्यांची खरेदी केली जायची. ‘ऋण करून सण करणं’ फारसं योग्य मानलं जायचं नाही. बँकांमधून कर्जं मिळणंही दुरापस्तच असायचं. त्यामुळे स्वतःच्या घराचं आणि चारचाकी गाडीचं स्वप्न लोकांना आवाक्याबाहेरचं वाटायचं. चाळीशी-पन्नाशीत कधी ते पूर्ण झालंच, तर स्वर्ग चार बोटं असल्यासारखं वाटायचं.

 नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचे आणि नव्या सहस्रकात माहिती युगाचे वारे वाहायला लागले आणि हे सारं झपाट्याने बदललं. मध्यमवर्गातल्या नव्या पिढीसाठी नोकरी-व्यवसायाच्या अनंत संधी निर्माण व्हायला लागल्या. नव्या युगासाठी लागणाऱ्या नव्या कौशल्यांची आणि ज्ञानाची मागणी जगभर प्रचंड वाढली. अर्थातच, त्यांचं मूल्य आणि मोबदलाही चक्रवाढ गतीने वाढला. याच काळात, मध्यमवर्गाची नवी पिढी नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर प्रवास करायला लागली. रुपयांबरोबरच डॉलर्स-पाउंडामध्येही कमवायला लागली. नव्वदच्या दशकाच्या आधी ‘खाऊन-पिऊन सुखी’ असलेल्या कुटुंबांतल्या पुढच्या पिढीच्या हातात अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला.

 याच सुमारास, बँकिंग क्षेत्रामध्ये झालेल्या खाजगीकरणामुळे आणि बदलांच्या झपाट्यामुळे कर्ज काढणं, कर्ज मिळणं सहजसाध्य झालं. स्वप्नातलं घर, गाडी अगदी तरुण वयात विकत घेणं शक्य व्हायला लागलं. आपल्याकडे क्रेडिट कार्डंही आली. खिशात सतत उपलब्ध असणाऱ्या या ‘ऋणा’मुळे हवा तो ‘सण’ हवा तसा साजरा करणं शक्य व्हायला लागलं अन आपण तसा तो करायलाही लागलो. वर्षातून एखाद-दोन सणांनाच खरेदी करण्यात बालपण काढलेली पिढी, मनात येईल तेव्हा मनात येईल ते विकत घ्यायला लागली. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी, अनंत प्रकारच्या आकर्षक वस्तूंनी झगमगणारी मॉलसंस्कृती आपल्याकडे उदयाला आली.

 आपल्या मध्यमवर्गाने गेल्या तीस-चाळीस वर्षांत प्रचंड मोठा प्रवास केलाय! पूर्वी आख्खं चौकोनी कुटुंब ‘बजाज’च्या स्कूटरवर बसून बागेमध्ये जाऊन भेळ खाऊन रविवार साजरं करायचं. आता आलीशान गाडीतून चकचकीत मॉलमध्ये किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्न-पिझा खाऊन साजरं करतं. यातला बजाजची स्कूटर ते आलीशान कार, बागेतली भेळ ते मल्टिप्लेक्समधले पॉपकॉर्न हा तर प्रवास मोठा आहेच, तसाच उत्पन्न, खर्च, जीवनशैली आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी असलेला ‘पैसा’ या साऱ्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनातल्या बदलाचा प्रवासही खूप मोठा आहे.

ह्या प्रवासाचा वेग आणि व्याप्ती बघून जुनी पिढी गांगरून गेलेली दिसते. एकेकाळी रेशनच्या दुकानांसमोर रांगा लावून किराणा आणलेल्या आजी-आजोबांना नातवाचे दोनशे रुपयांचे ‘चोकोज’ ही उधळपट्टी आणि पाचशे रुपयांचा पिझा ही लूटमार वाटते. ते स्वाभाविकही आहे. पण खरी ओढाताण होते ती मध्यमवर्गात लहानपण गेलेल्या, पण आता नवश्रीमंत असलेल्या सध्या तिशी-चाळीशीत असलेल्या आमच्या पिढीची. आमच्यावर मध्यमवर्गाचे काटकसरीचे, साध्या राहणीमानाचे संस्कारही असतात, पण हातात पैसा आणि तो खर्च करून सुबत्ता, सुखं मिळवण्याच्या अफाट शक्यताही. आम्हाला साधेपणाने राहणाऱ्या आई-वडिलांचंही पटत असतं आणि आमच्या सुबत्तेत जन्माला आलेल्या मुलांचे हट्टही पुरवावेसे वाटत असतात.

 ह्या आमच्या पिढीचं लहानपणचं आवडीचं बालगीत - ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ असायचं. त्यात पैसा खोटा व्हायचा आणि पाऊस मोठा यायचा. आता मात्र आमच्या आयुष्यात, ‘पैसा झाला मोठा’ असं झालंय! ह्या पैशाच्या, सुबत्तेच्या आणि आकर्षणांच्या पावसाचं नेमकं काय करायचं, हे आम्हाला माहीत नाही. मनात अपराधीपणाची भावना न ठेवता या पावसात भिजायचं का आणि किती हे आम्हाला माहीत नाही. भविष्यात गरज पडली, तर गाठीला असावं म्हणून या पावसाचं पाणी साठवून किती ठेवायचं, याची आम्हाला कल्पना नाही.

 मध्यमवर्गातून आलेल्या, पण ‘पैसा झाला मोठा’ अनुभवणाऱ्या ह्या पिढीतल्या एकाने ह्या सुबत्तेच्या पावसाचं आपण काय करू शकतो, यासंबंधी केलेलं मुक्त-चिंतन म्हणजे ही लेखमाला - ’धन की बात’!

  पैशाच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाच्या येण्या-जाण्याचं नियोजन. पुढचा लेख या नियोजनाविषयी - म्हणजे ‘बजेट’ आखण्या-पाळण्याविषयी असेल. योगायोगाने, आपलं केंद्रीय बजेट ज्या दिवशी असतं, त्याच दिवशी तो लेख प्रकाशित होईल!