मना सज्जना

विवेक मराठी    15-Jan-2018
Total Views |

आपण या पाक्षिक अक्षरभेटीत समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा भावार्थ पाहणार आहोत. 'मनाचे श्लोक'मध्ये एकूण 205 श्लोक आहेत. चाफळ येथे एका रामनवमी उत्सवादरम्यान समर्थमुखातून त्याचे प्रकटीकरण झाले, अशी कथा आहे. मनाच्या श्लोकांना 'मनोबोध' म्हणूनही ओळखले जाते. या मनोबोधाच्या भाषेत चैतन्य आहे, ओज आहे, आवेश आहे, तेज आहे. सहज, सरळ, सोप्या पण रोखठोक शब्दात उपदेश करणारे हे 'मनाचे श्लोक' म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयाचे नवनीत आहे.

 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।

जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥

राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रबोधक-प्रासादिक वाङ्मयातील 'मनाचे श्लोक' समस्त मराठी माणसांना परिचित आहेत. 'मनाचे श्लोक' म्हणत अवघ्या मराठी माणसांच्या काही पिढया संस्कारित झालेल्या आहेत. सहज, सरळ, सोप्या पण रोखठोक शब्दात उपदेश करणारे हे 'मनाचे श्लोक' म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयाचे नवनीत आहे.

आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी वैभवशाली परंपरा आहे. या संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत समर्थ रामदास स्वामी या पाच संतांना महाराष्ट्राचे 'पंचप्राण' म्हणून गौरविले गेले आहे. या पाच संतांपैकी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम वारकरी सांप्रदायिक विठ्ठलभक्त संत आहेत, तर संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक व श्रीराम-हनुमंताचे भक्त आहेत. या संतांमध्ये वरीलप्रमाणे पंथ-संप्रदाय आणि इष्ट उपास्य देवतेचा फरक असला, तरी या नामाच्या व रूपाच्या भेदाच्या पलीकडे  हे सर्व संत एकच आहे. संत ज्ञानदेव-तुकोबांचा 'विठ्ठल' आणि समर्थ रामदासांचा 'कोदंडधारी राम' ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत. कोदंडधारी श्रीराम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आहे, तर विठ्ठल उर्फ गोपाळ - श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचाच आठवा अवतार आहे.

आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी वैभवशाली परंपरा आहे. या संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत समर्थ रामदास स्वामी या पाच संतांना महाराष्ट्राचे 'पंचप्राण' म्हणून गौरविले गेले आहे. या पाच संतांपैकी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम वारकरी सांप्रदायिक विठ्ठलभक्त संत आहेत, तर संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक व श्रीराम-हनुमंताचे भक्त आहेत. या संतांमध्ये वरीलप्रमाणे पंथ-संप्रदाय आणि इष्ट उपास्य देवतेचा फरक असला, तरी या नामाच्या व रूपाच्या भेदाच्या पलीकडे  हे सर्व संत एकच आहेत. 'साधु दिसती वेगळे। परी ते स्वरूपी मिळालेले।' असे खुद्द संत रामदास स्वामींनीच म्हटलेले आहे व ते यथार्थ स्वरूप स्थितीचे दर्शन घडविणारे आहे. काळ, स्थिती व उपास्य देवता - कार्यपध्दती यानुसार या संतांमध्ये जो फरक दिसतो, तो वरवरचा असून अंतरंगी स्वरूपाच्या दृष्टीने सर्व संत एकरूपच आहेत. आपणही अशा एकत्वाच्या दृष्टीनेच संतांकडे पाहिले पाहिजे. पंथ, उपास्य देवता आणि जाती यावरून आपण संतांमध्ये भेदाभेद करणे हा समाजद्रोह असून तो आपण कटाक्षाने टाळला पाहिजे. ज्या संतांनी अवघा समाज एक करण्यासाठी आपले जीवन वेचले, त्यांच्या उदात्त व्यापक कार्याला आपण त्यांच्या भक्तांनीच सुरुंग लावणे हे कोणत्याही प्रकारे समाजहिताचे ठरणार नाही. संत ज्ञानदेव-तुकोबांचा 'विठ्ठल' आणि समर्थ रामदासांचा 'कोदंडधारी राम' ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत. कोदंडधारी श्रीराम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आहे, तर विठ्ठल उर्फ गोपाळ - श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचाच आठवा अवतार आहे.

महाराष्ट्राच्या या भव्य-दिव्य अशा संत परंपरेत संत रामदास स्वामी (इ.स. 1608 ते 1682) यांचे स्थान व कार्य वैशिष्टयपूर्ण व विशेष आहे. त्यांच्या प्रबोधन कार्याचा परिचय करून घेण्यापूर्वी प्रथम संत रामदासांबद्दल जाणून घेणे अगत्याचे व आवश्यक आहे.

संत रामदास स्वामींचा जन्म इ.स. 1608मध्ये चैत्र शुध्द नवमीला, म्हणजे रामनवमीच्या दिनी मराठवाडयातील जांब येथे झाला.

'तेज घेउनी जन्मती तारका।

जसा जन्मतो मोर घेउनि पिसारा।'

तसेच समर्थ रामदास भक्ती व वैराग्य घेऊनच जन्मले होते. त्यांना वयाच्या 8व्या वर्षीच इष्टदेवतेचे दर्शन झाले होते व अनुग्रहही प्राप्त झालेला होता. त्यामुळे घरच्यांनी लग्न ठरवताच ते घर सोडून मंडपातून पळून गेले. नाशिकजवळ टाकळी येथे त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली आणि पुढे 12 वर्षे केदारनाथ (हिमालय) ते कन्याकुमारी त्यांनी संपूर्ण भारतदेशाची पायी भ्रमंती केली. स्वानुभव, प्रचिती आणि साक्षात्कार यांनी त्यांचे जीवन झळाळून निघाले. इ.स. 

1645 साली ते पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या सातारा परिसरात आले व आता यापुढे हेच आपले कार्यक्षेत्र मानून त्यांनी आपल्या जनजागृती-प्रबोधन कार्याचा श्रीगणेशा केला. 'हनुमंत आमुची कुळवल्ली।' असे म्हणत मसूर येथे बलोपासनेच्या उद्दिष्टाने मारुतीची स्थापना करून श्रीरामनवमीचा उत्सव सुरू केला.

1648 साली चाफळ येथे श्रीराममूर्तीची स्थापना केली. पुढे शिवाजीराजांनी त्यांना परळीचा गड (पुढे याचेच नाव 'सज्जनगड' झाले) भेट दिला आणि जीवनाच्या अखेरपर्यंत सज्जनगड येथूनच त्यांनी धर्मकार्याचे व राष्ट्रकार्याचे नेतृत्व केले. 1682 साली माघ कृष्ण नवमीला त्यांनी सज्जनगडावरच देह ठेवून आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.

समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचे मुख्य वैशिष्टय म्हणजे त्यांनी केलेले राष्ट्रकारण! सर्व संतांनी आपल्या उपदेशात भक्ती, कर्म आणि ज्ञान या गोष्टींनाच प्राधान्य दिलेले आहे, तसे ते समर्थ रामदास स्वामींनीही दिलेले आहे. पण थेट 'राजकारण' नाव घेऊन रोखठोक राष्ट्रकारण (राज-नीती) म्हणजेच राष्ट्रकारण समर्थ रामदास स्वामींनी केले.

'पहिले ते हरिकथा निरूपण। दुसरे ते राजकारण।

   तिसरे ते सावधपणे। सर्वांविषयी॥

असे रोखठोकपणे समर्थ रामदास 'दासबोधा'त म्हणतात. अर्थात राजकारण-राष्ट्रकारण यांना रामदासांनीही दुसरे स्थान दिले आहे व 'पहिले ते हरिकथा निरूपण।' म्हणत हरिकथा, भक्तिमार्ग यालाच प्रथम स्थान दिलेले आहे. समर्थांनी राष्ट्राची, राजकीय पारतंत्र्याची जेवढी चिंता वाहिली, तेवढी रोखठोकपणे इतर संतांच्या साहित्यात आढळत नाही. समर्थ रामदासांनी आपल्या समाजाचे स्वरूप, परिस्थिती, स्वभाव लक्षात घेऊन धर्माधिष्ठित विवेक-वैराग्यप्रधान प्रयत्नवादाचे बीजारोपण केले. त्यांचे समग्र वाङ्मय भक्तीबरोबरच शक्तीची उपासना व उपदेश करणारे आहे. 'दासबोध' व 'आत्माराम' हे त्यांचे मुख्य दोन ग्रंथ असून मनाचे श्लोक, करुणाष्टके, रामायण, स्फुट रचना, आरत्या असे त्यांचे विपुल साहित्य आहे. 'आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वत: सिध्द।' असे खुद्द समर्थांनीच म्हटलेले आहे.

आपण या पाक्षिक अक्षरभेटीत (स्तंभामध्ये) समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा भावार्थ पाहणार आहोत. खरे तर यावर प्राचार्य अ.दा. आठवले, प्रा. बेलसरे यांनी अधिकारवाणीने ग्रंथलेखन केलेले आहे, ते जिज्ञासूंनी आवर्जून पाहावे. 'मनाचे श्लोक'मध्ये एकूण 205 श्लोक आहेत. चाफळ येथे एका रामनवमी उत्सवादरम्यान समर्थमुखातून त्याचे प्रकटीकरण झाले, अशी कथा आहे. मराठी साहित्यातील 'भुजंगप्रयात' या वृत्तामध्ये ही काव्यरचना असून आता साहित्यातील वृत्त व अलंकार खुद्द मराठी कवींच्या व रसिकांच्या विस्मरणात गेले आहेत, हे आपले करंटेपणच आहे. मनाच्या श्लोकांना 'मनोबोध' म्हणूनही ओळखले जाते. या मनोबोधाच्या भाषेत चैतन्य आहे, ओज आहे, आवेश आहे, तेज आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा।

गमू पंथ आनंत या राघवाचा॥

या श्लोकाद्वारे गणेशाला व सरस्वतीला वंदन करून समर्थांनी या उपदेशात्मक मनाच्या श्लोकांचा श्रीगणेशा केलेला आहे. आपण पुढील लेखात त्याचा अधिक विचार पाहू.

जय जय रघुवीर समर्थ !

 विद्याधर मा. ताठे

9881909775