स्वामीजी... भगवी वस्त्रे म्हणजे विरक्तीचे लक्षण, त्यागाचे लक्षण... सर्वसंगपरित्याग करून जे अनंताचा शोध घ्यायला निघतात. स्वामीजी, तुम्हीही भगवी कफनी परिधान केलीत पण... पण सर्व त्यागून हिमालयात गेला नाहीत, की अंधाऱ्या गुहेत जाऊन आद्यचिंतनातून आत्माराम प्रकट केला नाही. रामकृष्णांनी संदेश दिला होता - 'शिवभावे जीवसेवा'. हा संदेश म्हणजेच तुमच्या कार्याचा आत्मा. स्वामीजी, तुम्ही पश्चिम दिग्विजय मिळवलात. पश्चिमेला भारताचा धर्म सांगितलात, पण इथे मात्र तुम्ही धर्माऐवजी कर्म सांगितलेत. 'शिवभावाने जीवसेवा करा' हा रामकृष्णांचा संदेश म्हणजे तुमच्या कार्याचा मंत्र. भारताच्या उत्थानाची मूळ कल्पना. स्वामीजी, तुम्ही अखंड भारतभ्रमण केलेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत उभा-आडवा भारत पायाखाली घातलात. या भ्रमणात तुम्ही पाहिलेत दैन्य, दारिद्रय, अस्पृश्यता, अंधरूढी, अज्ञान याचे थैमान आणि म्हणूनच कदाचित तुम्ही अंतरीच्या आत्मारामाला प्रसन्न करण्यापेक्षा जनातील शिव उभा करण्याचा घाट घातला असणार. तुम्ही म्हणाला होतात, ''प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणतत्त्व असते. बाह्यतः दिसणारा माणूस हा त्या तत्त्वाची एक अभिव्यक्ती असते. जणू त्यांच्या रूपाने, त्यांच्या भाषेतून ते अमूर्त तत्त्व व्यक्त होऊ पाहत असते. तसेच प्रत्येक राष्ट्रालासुध्दा एक प्राणभूत राष्ट्रीय तत्त्व असते. ज्या दिवशी त्या प्राणभूत तत्त्वाची जगाला असलेली आवश्यकता संपते, त्या वेळी त्या राष्ट्राचे अस्तित्व संपेल. अंतर्बाह्य दुःख, दारिद्रय, अत्याचार यांनी पिडलेले असूनही हिंदुस्थान अजून जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे. याचे कारण हे की त्याच्या प्राणभूत तत्त्वांची जगाला अद्याप आवश्यकता आहे.'' स्वामीजी, तुम्हाला माणूस उभा करायचा होता. दुःख, दैन्य, दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, अन्याय यापासून मुक्त असणारे राष्ट्र उभे करायचे होते. 'सर्वांसाठी एकच चिरंतन तत्त्व आहे' म्हणूनच सर्वांना समान दर्जा आहे, हे व्यवहाराने सिध्द करायचे होते. म्हणूनच भगवी कफनी परिधान करूनही तुम्ही कर्मवाद सांगितलात. जीवनाला विन्मुख न होता सन्मुख झालात.
स्वामीजी... तुमचे एक शिष्य कालीबाबू. कालीबाबूंनी जेव्हा तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काही मागण्याची विनंती केली, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात, ''तुला गुरुदक्षिणा द्यायची आहे ना? मग यापुढे आयुष्यात मला कधी तोंड दाखवू नकोस. वाराणसीला जा आणि आजारी माणसांची सेवा कर. तेही शक्य झाले नाही तर पाण्याचे दोन माठ घेऊन पाणपोई सुरू कर, पण जेवढी म्हणून दीनदु:खितांची सेवा करता येईल, तेवढी सेवा कर.'' संन्यासधर्माची दीक्षा घेऊन वैराग्याच्या कोषात निमग्न होण्याची मनीषा असणाऱ्या आपल्या असंख्य शिष्यांना, सहकाऱ्यांना तुम्ही अशा कर्मयोगाकडे वळवले. 'माणसात परमेश्वर पाहा आणि त्याचीच अनन्यभावाने, शिवभावाने सेवा करा' असे जेव्हा तुम्ही सांगत होता, तेव्हा स्वामीजी.. तुमच्या कार्याने, विचाराने प्रभावित होऊन मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी होती. एक तरुण तुम्हाला भेटला आणि ''वेदान्तावर काही मार्गदर्शन करा'' म्हणला. तेव्हा तुम्ही म्हणालात ''आधी फुटबॉलला किक मारायला शिक. अध्यात्माने मन घडेल आणि व्यायामाने शरीर. या दोन्हीची आवश्यकता आहे.'' प्रज्वलित मने आणि पिचलेली मनगटे यातून भारत उभा राहणार नाही. हे तुम्ही जाणून होता स्वामीजी, आणि म्हणूनच कृतिरूप जीवन अध्यात्माचे पाठ तुम्ही देत राहिलात. तुम्ही व्यावहारिक वेदान्त शिकवलात. तुम्ही म्हणाला होता, ''आत्मश्रध्दा अंतकरणात उदेजू द्या. तुम्हाला संपत्ती पाहिजे असेल तर सर्वस्वाने त्यासाठी प्रयत्न करा. संपत्ती तुमच्या दारी चालत येईल. तुम्हाला विद्वान व्हायचे असेल तर विद्येची उत्कट उपासना करा. तुम्ही श्रेष्ठ विद्वान व्हाल. तुम्हाला मुक्ती हवी असेल तर प्रखर अध्यात्मसाधना करा. तुम्ही मुक्तच व्हाल. चिरंतन, आनंदाचे, निर्वाणाचे तुम्ही अधिकारी व्हाल. आमची मुख्य चूक हीच झाली की आम्ही वेदान्त हा अध्यात्माच्या पातळीवर ठेवला. त्याचे दैनंदिन व्यवहारात आचरण केले नाही. आज व्यावहारिक वेदान्ताची गरज आहे. आता तो रहस्यरूप राहून चालणार नाही. लोकांच्या दैनंदिन जीवनात तो स्फुरला पाहिजे. सम्राटाच्या प्रासादामध्ये, गोरगरिबांच्या झोपडयांमध्ये सर्वत्र त्याचे आचरण झाले पाहिजे.''
स्वामीजी, तुम्ही जगाला कृतिरूप वेदान्त सांगितलात आणि तो प्रत्यक्ष जगलातही. या जगण्यातून तुम्ही आदर्श उभा केलात. केवळ आदेश नव्हे, तर आचरण हेच तुमच्या शिकवणीचे स्वरूप पाहिले. 'संन्यासी होऊन भगवी वस्त्रे घालून निबिड अरण्यात जाण्यापेक्षा समाजात जाऊन सेवायज्ञ चेतवा,' असे तुम्ही आपल्या शिष्यांना-सहकाऱ्यांना सांगत राहिलात. हे कशासाठी? संन्याशाने हा खटाटोप कशासाठी करावा? कशासाठी समाजात जायचे? स्वामीजी, तुम्ही हिंदुस्थानचे वर्णन केले आहे. या समाजाचे वर्णन केले आहे. तुम्ही म्हणाला होता, ''मनुष्यदेह नावापुरताच धारण केलेला. तीन कोटी निःसत्त्व जनांचा, स्वदेशी बांधवाकडून आणि विदेशींकडून पायी तुडवला गेलेला हा समाज. स्वतःच्या धर्माकडून आणि अन्य धर्मपंथांकडून दडपला गेलेला गुलाम. सर्व प्रकारच्या उत्साहाचा अभाव असलेला. भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. आशेचा अंधुकसा किरणही नाही. चालू असलेले आयुष्य कसेबसे पुढे रेटावे, एवढीच आकांक्षा असलेला असा हा समाज. गुलामाला शोभेल अशा क्षुद्र वृत्तीचा, संकुचित मनाचा. आपल्याच बांधवांना श्रीमंती लाभली तर मत्सराने जळणारा, सर्व प्रकारच्या श्रध्देचा अभाव असलेला. ज्यांच्या सर्व आशा मृत झालेल्या आहेत, असा हा समाज.'' स्वामीजी, तुम्हाला हा समाज उभा करायचा होता. पण मोडतोड करून नव्हे, तर व्यवस्थित पुनर्बांधणी करून. एक एक माणूस घडवायचा होता, त्याचे आत्मतत्त्व जागृत करून ते राष्ट्रतत्त्वाशी जोडायचे होते. एक सशक्त समाज आणि राष्ट्रनिर्माणाचे कार्य तुमच्या नजरेसमोर होते.
स्वामीजी, म्हणूनच तुम्ही संदेश दिलात, 'वैराग्यसंपन्न व्हा, तुमच्या पूर्वजांनी श्रेष्ठ तत्त्वासाठी जगताचा त्याग केला. आजसुध्दा स्वत:च्या मुक्तीसाठी जगताचा त्याग करणारे लोक आहेतच. पण मी म्हणतो, सर्वस्वाचा त्याग करा, मुक्तीच्या कांक्षेचा त्याग करा आणि सेवेला जीवन समर्पित करा. आता अन्य देवदेवतांना मनात स्थानसुध्दा नको. आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र. त्याचीच आराधना करा. ते जागृत आहे. सर्वत्र त्याचेच चरण, त्याचेच हात, त्याचेच श्रवण. ते सर्वव्यापी आहे. बाकी सर्व दैवते झोपली आहेत. त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे. त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल. आपल्या भोवतालच्या सर्वांत त्या विराटाला पहा. मनुष्यमात्र आणि प्राणिमात्र, आपले सर्व देशबांधव ही आपली दैवते आहेत. सर्वप्रथम त्यांची पूजा करा.'' स्वामीजी, 'जीवभावे शिवसेवा' कशी करावी, त्यांचे उपास्य दैवत काय, हे तुम्ही सांगितलेत. या उपासनेची कार्यपध्दतीही विकसित केलीत. तुम्ही म्हणालात, ''मी भारतवासी आहे, प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे. अज्ञानी भारतवासी, दरिद्री आणि दलित भारतवासी, ब्राह्मण भारतवासी आणि भंगी भारतवासी हे सारे माझे भाऊ आहेत.'' हा बंधुभाव दृढ करण्यासाठी तुम्ही संन्यासधर्मालाच नवा आयाम जोडलात, सेवेचा. सेवेतून अध्यात्म, पर्यायाने समाजउन्नती आणि राष्ट्रउन्नती व्हावी यासाठी तुमची पराकाष्ठा. अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सेवाभावाची जपणूक करून तुम्ही एक परिपाठ घालून दिला. स्वामीजी, तुमचा तुमच्या विचारावर, कार्यावर प्रचंड विश्वास. म्हणूनच तुम्ही म्हणू शकलात, ''भारत उभा राहतो आहे.'' या भारताला उभे करण्यासाठी तुम्ही तरुण मनाला साद घालीत म्हणालात, ''माझा युवा पिढीवर फार विश्वास आहे. या युवकांमधून मला हवी असलेली माणसे मिळतील.'' स्वामीजी, तुम्हाला माणसे कशासाठी हवी होती? भारताच्या उत्थानासाठी ना! स्वामीजी, तुमच्या विचाराच्या परीसस्पर्शाने आज देशभर लाखो युवक कामाला भिडले आहेत. तुमच्या 'स्वप्नातील भारत' उदयाला येतो आहे. साधू आणि गृहस्थी आपापल्या परीने या उत्थानाच्या सेवायज्ञात आपली समिधा अर्पण करतो आहे. सर्वसंगपरित्याग करून जीवनाकडे पाठ फिरवणारे संन्यासी आजही समाजजीवनात सक्रिय होऊन सेवाकार्याची मालिका निर्माण करत आहेत. स्वामीजी, हा केवळ तुमच्या विचाराचा प्रभाव. स्वामीजी, तुम्हीच म्हणाला होता, ''एकदा कामाला भिडा तर खरे. मग तुम्हाला कळेल की, अशा विलक्षण शक्तीचा आपल्यात संचार होत आहे की, तो पेलून धरणे कठीण. दुसऱ्यासाठी केलेली छोटी गोष्टसुध्दा आपल्यात एक शक्ती जागवीत असते. म्हणून मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग. सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. असा परित्यागीच समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो.''
(सदर लेख १२ जानेवारी २०१४ साली प्रसिद्ध झाला होता.)
- 9594961860