केदार अमंगल आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य

विवेक मराठी    29-Sep-2017
Total Views |

 

केदार मंडल ह्या क्षुद्र माणसाने देवी दुर्गेला उद्देशून अपशब्द वापरले, म्हणून देवीची महती कमी होत नाही; पण जाणूनबुजून सर्वसामान्य हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हक्क ह्या देशात कुणालाच नाही. अगदी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क सर्व नागरिकांना बहाल करणाऱ्या भारताच्या घटनेनेही अनिर्बंध हक्क आपल्याला दिलेले नाहीयेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण समाजहिताला, देशहिताला आणि सामाजिक सलोख्याला थेट बाधा आणणारे लिखाण करण्याचा हक्क मात्र कोणालाही नाही.

देशभरात शारदीय नवरात्र मोठया श्रध्देने साजरे केले जात असतानाच दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग कॉलेजमध्ये हिंदी शिकवणाऱ्या एका साहाय्यक प्राध्यापकाने आपल्या फेसबुक पेजवरून देवी दुर्गेच्या संबंधात अत्यंत अश्लाघ्य आणि असभ्य शब्दांचा वापर करून एक पोस्ट टाकली. केदार मंडल हे त्या माणसाचे नाव. निव्वळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे ह्या एकमेव हेतूने ह्या माणसाने ती पोस्ट टाकलेली आहे, हे जाहीर आहे. पुढे गदारोळ झाल्यानंतर त्याने ती पोस्ट डिलीट केली, पण तोपर्यंत ह्या पोस्टचे स्क्रीनशॉट सगळीकडे पोहोचले होते. पण केदार मंडलसाठी हे नवे नाही. त्याचे फेसबुक प्रोफाइल बघितले की त्याची मानसिक विकृती आणि हिंदू धर्माबद्दल त्याच्या मनात असलेला द्वेष स्पष्ट दिसून येतो. ह्याआधीही त्याने बरेचदा जाणूनबुजून हिंदूंना दुखावणारे खोडसाळ पोस्ट टाकलेले आहेत, पण ह्या खेपेला मात्र देवी दुर्गेच्या संबंधात लिहिताना त्याने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडलेल्या आहेत.

हा केदार मंडल दोन्ही पायांनी अधू आहे आणि दयाल सिंग कॉलेजमधली ही नोकरी त्याला दिव्यांग कोटयातून मिळालेली आहे हे स्पष्ट आहे. पण त्याचे फेसबुक पेज नुसते चाळले, तरी तो पायाबरोबरच मेंदूनेही अधू आहे ह्याची कुणाचीही खात्री पटेल. अभिव्यक्तिस्वातंत्र्य ह्या गोंडस नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावणारे लेखन करणे हा स्वत:ला 'पुरोगामी विचारवंत' वगैरे समजणाऱ्या लोकांचा आवडता छंद आहे, कारण ह्या देशातला हिंदू सध्या 'कुणीही यावे, टिकली मारून जावे' अशा स्थितीत आहे. कुठल्या तरी धर्माच्या प्रेषितांविरुध्द एक वाक्य बोलले, म्हणून भाजपा नेते कमलेश तिवारी ह्यांना तुरुंगात जावे लागले. बशीरहाट ह्या बंगालमधल्या जिल्ह्यात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला त्याने इस्लामविरुध्द काहीतरी लिहिले म्हणून तुरुंगात जावे लागले. तिथल्या मुसलमानांनी रस्त्यावर उतरून मोठया प्रमाणात जाळपोळ केली, हिंदूंच्या घरांना, सरकारी मालमत्तेला आगी लावल्या, तरीही पारंपरिक मीडियामधून ह्या गुंडगिरीविरुध्द कुणीही बोलले नाही. कमलेश तिवारी वा तो बशीरहाटमधला मुलगा ह्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने कुठल्याही भाडोत्री पत्रकाराने घाऊक गळा काढला नाही. पण आज केदार मंडलच्या आक्षेपार्ह, अश्लाघ्य लिखाणामुळे जेव्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली, तेव्हा मात्र 'तो बिचारा अपंग आहे, त्याने केली देवी दुर्गेवर टीका, तर काय झालं?' अशा स्वरूपाचे पुरोगामी उमाळे बऱ्याच पत्रकारांनी काढायला सुरुवात केलेली आहे.

केदार मंडल हा माणूस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवतो. ज्या माणसाच्या नसानसात हिंदूंबद्दल, त्यांच्या देवी-देवतांबद्दल एवढा द्वेष भरलेला आहे, तो माणूस तोच हिंदुद्वेष त्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम चोख करील ह्यात शंकाच नाही. अशा माणसाचा पगार सर्वसामान्य हिंदू नागरिकांच्या करातून दिला जातोय. एका परीने आपण सर्व कर भरणारे हिंदू केदार मंडलला त्याचा हिंदुद्वेष खदखदता ठेवण्यासाठी अर्थसाहाय्य देतोय! केदार मंडलचे पोस्ट वाचताना माझ्या मनात किळस दाटून आली होती. जनसामान्यांना पूज्य असणाऱ्या देवीबद्दल जो माणूस इतके किळसवाणे, घाणेरडे विचार करू शकतो, त्याची आपल्या स्त्री सहकाऱ्यांकडे, आपल्या विद्यार्थिनींकडे बघण्याची दृष्टी किती दूषित असेल? ज्याला मानसशास्त्राचे थोडेबहुत ज्ञान आहे, त्यालाही कळू शकेल की जो माणूस स्त्रियांकडे अशा मानसिकतेने बघतो, त्याचे कुठल्याच स्त्रीशी निरोगी संबंध आलेले नसावेत - ना शारीरिक, न मानसिक. आयुष्यभराच्या लैंगिक उपासमारीतून मग अशी विकृत मन:स्थिती तयार होते, जी स्त्रीकडे निव्वळ एक भोगवस्तू म्हणून बघते, मग ती स्त्री मानवी असो वा दैवी.

केदार मंडल ह्या क्षुद्र माणसाने देवी दुर्गेला उद्देशून अपशब्द वापरले, म्हणून देवीची महती कमी होत नाही; पण जाणूनबुजून सर्वसामान्य हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हक्क ह्या देशात कुणालाच नाही. अगदी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क सर्व नागरिकांना बहाल करणाऱ्या भारताच्या घटनेनेही अनिर्बंध हक्क आपल्याला दिलेले नाहीयेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण समाजहिताला, देशहिताला आणि सामाजिक सलोख्याला थेट बाधा आणणारे लिखाण करण्याचा हक्क मात्र कोणालाही नाही. केदार मंडलविरुध्द पोलिसात तक्रारी केल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी आंदोलने केली की असला गलिच्छ मानसिकतेचा प्राध्यापक आम्हाला नको. दयाल महाविद्यालयानेही ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंडलला पुढची चौकशी होईपर्यंत पदावरून निलंबित केले आहे. हा मंडल काँग्रेसचा कार्यकर्ताही आहे. राहुल गांधीबरोबरचे त्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. एखाद्या समाजाविरुध्दच्या द्वेषाने बरबटलेल्या ह्या माणसाला अजून एकही काँग्रेस नेत्याने धिक्कारलेले नाहीये.

पत्रकारिता आणि सामान्य नागरिकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य लोकशाही राज्यव्यवस्थेत सन्मानपूर्वक जपले पाहिजेत, याबद्दल शंकाच नाही; पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य ह्या गोंडस नावाखाली जर कुणी जाणूनबुजून समाजात द्वेष पसरवायची कामगिरी करतोय, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जर कमलेश तिवारी एखाद्या धर्माच्या प्रेषिताबद्दल एक वाक्य लिहिले म्हणून महिनोंनमहिने तुरुंगात खितपत पडू शकतो, तर केदार मंडललाही अटक झालीच पाहिजे. त्याच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन जर केदार मंडल हिंदूंविरुध्द द्वेष भडकवायचे कृत्य करत असेल, तर ते अत्यंत तिरस्करणीय आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहायला पाहिजे, तेव्हा त्याच स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे वाचकांचे वाचण्याचे, पाहण्याचे, आणि ऐकण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्यही आहे, हे सगळयांनीच लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे.

मुद्दा असा आहे की अनिर्बंध अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ही ढाल ह्या देशात नेहमी हिंदूंविरुध्दच का वापरली जाते? बहुसंख्य हिंदू गोमांस खात नाहीत, तरी त्यांच्या नाकावर टिच्चून केरळमध्ये भर वस्तीत काँग्रेस पक्षाचे लोक कुठल्याही परवानगीशिवाय गाय कापतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आणि चेन्नई आयआयटीमध्ये 'बीफ फेस्टिवल्स' आयोजित केले जातात. नवरात्र जवळ आले की महिषासुराचा कसा खरा 'हिरो' होता ह्या संदर्भात लेख लिहिले जातात. श्रीराम कसे अन्यायी होते आणि रावण कसा चांगला होता ह्यावर करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये चर्चासत्रे घेतली जातात. इस्लामच्या विरोधात काहीही लिहिले, तर त्याचे परिणाम हिंसेत होतात. केरळमध्ये टी. जोसेफ ह्या प्राध्यापकाने त्याच्या लिखाणातल्या एका विवादास्पद व्यक्तिरेखेचे नाव एका धर्माच्या प्रेषितावरून घेतले होते, म्हणून पीएफआय ह्या कट्टरवादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हातच छाटून टाकला. ना त्यांना चर्चने मदत केली, ना सरकारने. झाल्या प्रकाराने व्यथित होऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. मागे महाराष्ट्रात लोकमतने आयसिसला पैसे कुठून येतात हे दाखवण्यासाठी नुसते 'पिगी बँक' हे रेखाचित्र वापरले होते, तर इस्लामी कट्टर संघटनांनी वृत्तपत्रावर मोर्चे आणले आणि संपादकांना माफी मागणे भाग पाडले. कोलकात्याच्या टेरेसाच्या तथाकथित संतपदाच्या विरोधात अग्रलेख लिहिण्याचे धाडस दाखवणाऱ्या वृत्तपत्रावर छापलेला अग्रलेख 'मागे घेण्याची' नामुश्की ओढवली. पण हिंदू धर्माच्या विरोधात मात्र कुणीही काहीही बोलले, तरी ते लोकांनी खपवून घ्यायचे आणि वर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गायचे, असा काहीसा विचित्र खेळ भारतात चालू आहे. केदार मंडल हे ह्या खेळातले फक्त एक प्यादे आहे. ते प्यादे कदाचित ह्या प्रकरणामुळे पटावरून दूर होईलही, पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य ह्या गोंडस नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायाखाली राजरोस तुडवण्याचा पुरोगामी खेळ मात्र जोपर्यंत हिंदू समाज आपली ताकद एकवटत नाही, तोपर्यंत तरी भारतात चालूच राहील!

shefv@hotmail.com