तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत.
देहू म्हटले की संत तुकोबाराय डोळयासमोर येतात. वारकरी संप्रदायातील त्यांचे स्थान अढळच आहे. त्यांच्या घराण्याची पांडुरंगावरची श्रध्दा पूर्वावर चालत आली आहे. पांडुरंगाने विश्वंभरबाबांना दिलेल्या दृष्टान्तातून विठ्ठलभक्तीचे महत्त्व लक्षात येते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सान्निध्याने पुनित झालेल्या देहू गावात असंख्य दिंडया सहभागी होऊन पंढरीकडे प्रस्थान करतात. देहू ते पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळयामध्ये 331 दिंडया सहभागी झाल्या आहेत. सोहळयाचे हे 332वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळयात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झालेले आहेत. देहू गावाच्या दिंडीचे स्वरूप, वारीची परंपरा, इतिहास, जोडणारे संत, व्यवस्थापन कसे असते? याविषयी घेतलेला धांडोळा...!
दिंडीचे स्वरूप
दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा समूह. महाराष्ट्र व बाहेरून अशा हजारो दिंडया एकत्र येऊन पालखी तयार होते. तशी प्रत्येक संतांची पालखी वेगळी असते. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायी पायी चालत जातात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक 'वीणेकरी' असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेकऱ्यानंतर टाळकऱ्यांचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे 5 ते 10पर्यंत ध्वज असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष, काही वेळा आख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होत आहे. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात, त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात.
दिंडीचा इतिहास
पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु, पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. याविषयी संतसाहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे एके ठिकाणी सांगतात - ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून पंढरीच्या वारीला जाण्याचा प्रघात होता. परंतु, पहिली दिंडी ही पंढरपुराहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला, तेव्हा संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार, नरहरी सोनार आदी संत मंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून, म्हणजे पंढरपुराहून संत मंडळी माउलींच्या समाधी सोहळयासाठी आळंदीस आले. ज्ञानेश्वर माउलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता, पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर आदी संत परंपरेने हा पुण्यमार्ग वाढविला.
देहू संस्थानाचा इतिहास
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग॥
तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटीवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. देहूला असे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.
आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमच्या गावी आलो असल्याचे सांगून देव आंब्याच्या वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंब्याच्या वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल-रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात मूर्तींची स्थापना केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. प्रतिवर्षी देवाचा महोत्सव होऊ लागला. महोत्सवाच्या खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबांचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्रवृत्तीकडे वळले.
तुकाराम महाराजांची वारी
तुकोबारायाचे घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान्पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या अठव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्नीचा मृत्यू. ते घरदार सोडून संन्यासी झाले होते.
पुढे दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहत झाली. गुरेढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकांतील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने मृत्यू झाला. त्यामुळे तुकोबाही एकांतात राहू लागले. भंडारा येथील डोंगरात पांडुरंगाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगदोध्दाराकरिता कवित्व करण्याचे काम सांगितले. पुढचा इतिहास आपणास ज्ञात आहे. गावातील विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार केला.
संत तुकाराम महाराज आण्ाि हजरत महंमद शेख
श्रीगोंदा येथील हजरत महंमद शेख हे मुस्लीम विचारवंत होते. त्यांची आणि संत तुकाराम महाराजांची घनिष्ठ मैत्री होती. हजरत शेख महंमद हे कुरआन प्रवचन करायचे. त्याला संत तुकाराम महाराजांची आवर्जून उपस्थिती असायची. कुरआनचे कित्येक दाखले तुकारामांच्या गाथेत अभंग स्वरूपात सापडतात. त्यांची ही मैत्री त्यांच्या मृत्यूनंतरदेखील टिकून आहे. देहू गावातून निघणारी दिंडी आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांच्या दफनस्थळी तीन दिवस मुक्कामाला असते, इतका हजरत शेख महंमद यांचा मान आहे असा काहीसा संदर्भ मिळत आहे.
तुका झालासे कळस
संतकृपा झाली, इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस
संत ज्ञानदेव व नामदेव महाराज पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी अधिष्ठान दिले. नामदेव महाराजांनी संप्रदायाची खरी ओळख पंजाबपर्यंत पोहोचवली, तर तुकोबा महाराज या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले. तुकोबांनी आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन केले. पंढरीच्या पांडुरंगांची त्यांनी भक्ती केली नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंगाला खडे बोल करणारे पहिले संत होत.
तुकोबांच्या वैकुंठगमनानंतरची वारी
तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि सांप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून 'ज्ञानोबा-तुकाराम' असे भजन करीत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले. तेव्हापासून ज्ञानोबा-तुकाराम भजनाची निर्मिती झाली. आजतागायत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या नामघोषाने भजनपरंपरेची सुरुवात होते. पालखी सोहळा वाढल्यानंतर दोन्ही पालख्या विभक्त झाल्या. पुढे हैबतबाबा यांनी ज्ञानोबारायाची पालखी सुरू केली.
दिंडयांच्या संख्येत वाढ
संत तुकाराम महाराज यांनी आपल्यासमवेत 1400 वारकरी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. आता याच वारीचे रूप दिवसेंदिवस वाढतच आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या दिंडयांची संख्या लक्षणीय होत आहे. या वर्षी राज्यभरातील तब्बल 331 संख्या सहभागी झाल्या आहेत. पालखी रथाचा मान यंदा वडगाव मावळ येथील बाबुराव वायकर यांच्या 'थैमान-संज्या' या आणि वाडे बोल्हाईच्या पंढरीनाथ तुकाराम पठारे यांच्या 'सोन्या-हिरा' या बैलजोडीला प्राप्त झाला आहे.
दिंडीचे व्यवस्थापन
वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. दिंडीचे व्यवस्थापन हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.
दिंडीचा एक कार्यक्रम निश्चित केलेला असतो. पालखी निघण्यापूर्वी जेव्हा माउलींच्या पादुकांची पूजा केली जाते, तेव्हा पालखी निघण्याची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी पाच-दहा मिनिटांच्या अंतराने तीन वेळा कर्णा होतो. पहिला कर्णा झाला की वारकारी निघण्याच्या तयारीला लागतात. अशा प्रत्येक गोष्टीचे अचूक नियोजन करण्यात येत असते. दिंडीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते. संत तुकाराम महाराजाची पालखी ही स्वयंपूर्ण आहे. धान्य, रॉकेल, सरपण, चहापान, दूध, कपडे, इतर वस्तू, हे सामान वाहून नेणाऱ्या बैलगाडीच्या व रथाच्या बैलास कडबा, पेढया, पेंड लागते. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली असते.
दिंडीतील चोपदार
चोपदार हा दिंडीचा मुख्य व्यवस्थापक. मखमली कापडाचा अंगरखा, डोक्यावर फेटा आणि खांद्यावर चांदीचा राजदंड, असा चोपदारांचा पोषाख असतो. व्यवस्थापनाची सर्व कामे तो करतो. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात परंपरेने चालणारी परभणीतील पाथरी तालुक्यातील माई दिंडी, बीडची कानसूरकर दिंडी आणि अंबेजोगाई येथील देशमुख दिंडी या तिन्ही दिंडयांचे चोपदार हे सोहळयातही प्रमुख चोपदार म्हणून सेवा देत आहेत. यामध्ये माई दिंडीचे ह.भ.प. काकामहाराज गिराम हे सेवा देत असून, त्यांची ही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील निवृत्तीमहाराज व आजोबा यांनीही सेवा दिली. कानसूरकर दिंडीकडून कानसूरकर सेवा देत असून, अंबेजोगाई येथील देशमुख दिंडीकडून देशमुख मंडळींची सेवा सुरू आहे. तर, काळूस येथील नारायण खैरे हे संस्थानचे चोपदार म्हणून सेवा देत आहेत. त्यांचीही तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील शंकर लक्ष्मण खैरे यांनी चोपदारकी केली.
दिंडीतील वीणेकरी
वीणेकरी हा दिंडीतील प्रमुख. वारकऱ्यांना वीणा प्रिय आहे. 'तो' विठ्ठलाचे रूप आहे. ती वीणा असे वारकरी म्हणत नाहीत. 'तो' वीणा असे म्हणतात. दिंडी निघताना वीणेची पूजा करतात. विणेकरी विठ्ठल होतो. तो दिंडीचे नेतृत्व करतो.
दिंडीतील हरकरा
हरकरा म्हणजे काम करणारा हरकाम्या. दिंडीतील हरकरा पुढे पत्र घेऊन जातो. तो तेथील सर्व प्रमुख मंडळींना भेटतो. दिंडीचे आगमन, निवास, भोजन, कीर्तन, प्रवचन, पूजा, आरती व मिरवणूक अशा सर्व बाबींचे व्यवस्थापन करतो.
दिंडीतील रिंगण
दिंडीचा प्रवास सुरू असताना वारकरी थकतात. ही मरगळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी 'रिंगण' नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मेंढयाचे रिंगण, अश्वरिंगण, उभे रिंगण आदी रिंगण प्रकार होतात. हे ठरावीक गावातच होतात. उदा., अश्वरिंगण इंदापुरात होते. यात आधी झेंडेकऱ्यांचे, तुळशीधारक महिलांचे, विणेकरी व नंतर मानाच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणत: असतो. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काटेवाडी गावात दाखल झाल्यावर पहिले रिंगण मेंढयाचे असते. या वेळी परीट समाजाकडून धोतराच्या पायघडया घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. 136 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
दिंडीचे बदलते स्वरूप
देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे दिंडीच्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलताना म्हणाले, ''वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. इतक्या समूहाने समाज एकवटत आहे. त्याचे नेतृत्व करणारा एकमेव विठ्ठल आहे. ज्ञानोबा माउली आणि तुकोबा - एक या वारीचा पाया आहे, तर एक कळस आहे. एक ज्ञानाचा राजा आहे, तर दुसरा जगद्गुरू आहे. या वारीमध्ये तरुणांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वारीमध्ये असलेला तरुणांचा सहभाग आध्यात्मिकतेला वाव देणारा आहे.''
9970452767