ऐहिकाकांक्षी हिंदू समाज..

विवेक मराठी    09-May-2017
Total Views |

 


आधुनिक मूल्यांच्या आधारावर हिंदू मानसिकतेत बदल घडविण्याचा प्रयत्न फक्त दोघांनी केला. त्यापैकी एक संघ व दुसरी भारतीय राज्यघटना. यापैकी पहिला प्रयत्न हा मानसिक पातळीवरचा होता, तर दुसरा व्यवस्थात्मक पातळीवरचा होता. या दोन्हीची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती, परिभाषा वेगळया होत्या, कार्यपध्दती स्वतंत्र होती, पण काही मूलभूत धारणा समान होत्या. संघाचे स्वरूप बाह्यत: एकचालकानुवर्तित्वाचे असले, तरी निर्णय प्रक्रियेतील सहभाग हा त्याच्या कार्यपध्दतीचा अंगभूत घटक होता. संघाचे नाव ठरवत असतानाही त्याचा निर्णय मतदान घेऊन झाला. हुकूमशाही संस्थेत असे घडत नसते. मठ, मंदिरे, आश्रम, मुहूर्त, यज्ञ, देवतांचे पूजापाठ, नवस, कीर्तन, प्रवचन, नामसंकीर्तन, श्रुती, स्मृती, पुराणे यापैकी कोणत्याच पारंपरिक गोष्टींना डॉ. हेडगेवारांनी संघाच्या कार्यपध्दतीत स्थान दिले नाही.

पारंपरिक हिंदू समाजरचना ही व्यक्तिगत मोक्षवादावर आधारलेली होती. अगदी लो. टिळकांनीही कर्मयोगाचे विवेचन करताना ते मोक्षभावनेच्या गृहीतावरच केले आहे. मोक्षासाठी कर्मसंन्यास आवश्यक आहे, असे शंकराचार्यांनी प्रतिपादन केले होते. याचा प्रतिवाद करताना लो. टिळकांनी कर्मसंन्यास शक्यही नाही, इष्टही नाही व मोक्षप्राप्तीकरिता आवश्यकही नाही अशी भूमिका मांडली. कोणत्याही आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानापेक्षा गीतेने सांगितलेला निष्काम कर्मयोग हेच ऐहिक व पारमार्थिक सुखासाठी असलेले सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. केवळ टिळकच नव्हे, तर हिंदू सांस्कृतिक आधारावर ज्यांनी ज्यांनी समाजपरिवर्तनाच्या भूमिका मांडल्या, त्यात काही ना काही पारमार्थिकतेचा भाग होताच. बंगालमधील प्रार्थना समाज असो, स्वामी श्रध्दानंद, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, न्या. रानडे, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक उदाहरणे देता येतील की त्यांनी कालानुरूप समता, समाजसेवा, लोकशाही, स्वातंत्र्य आदी आधुनिक मूल्यांच्या संदर्भात वैदिक, अवैदिक किंवा भक्ती परंपरांची पुनर्मांडणी केली. परंतु आधुनिक मूल्यांच्या आधारावर हिंदू मानसिकतेत बदल घडविण्याचा प्रयत्न फक्त दोघांनी केला. त्यापैकी एक संघ व दुसरी भारतीय राज्यघटना. यापैकी पहिला प्रयत्न हा मानसिक पातळीवरचा होता, तर दुसरा व्यवस्थात्मक पातळीवरचा होता. या दोन्हीची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती, परिभाषा वेगळया होत्या, कार्यपध्दती स्वतंत्र होती, पण काही मूलभूत धारणा समान होत्या. भारतीय राज्यघटनेवरील हिंदी राष्ट्रवादाच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीला निःसंदिग्ध प्राधान्य देण्याऐवजी धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे म्हणजे सेक्युलॅरिझम असे मानून त्या वैचारिक आधारावर तिची मांडणी करण्यात आली. वास्तविक पाहता भारतीय किंवा हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन म्हणजे जातिव्यवस्था, चातुरर््वण्य, विविध स्मृती यांचे पुनरुज्जीवन असे समजण्याचे कारण नव्हते. रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यांना सांस्कृतिक जीवनात उचित स्थान मिळवून देणे, ज्या गीतेने शंकराचार्य, ज्ञानेश्वर, लो. टिळक, म. गांधी, संत विनोबा आदीसारख्या अनेकांना शेकडो वर्षांच्या परंपरेत प्रेरित केले, त्या ग्रंथाच्या सन्मानजनक भूमिकेचा स्वीकार करणे, भारताच्या वैभवशाली इतिहासाच्या खुणा जागोजागी पसरलेल्या आहेत, त्यांची पुनःस्थापना करणे, योगासारख्या आज जगाने स्वीकृत केलेल्या पध्दतीचा गौरव करणे अशा अनेक गोष्टी करता आल्या असत्या. परंतु असे करणे म्हणजे हिंदू जातीयवाद या मनोभूमिकेतून काँग्रेस बाहेर आली नाही. त्यामुळे राज्यघटनेचा स्वीकार हा तांत्रिक व्यवहाराचा भाग बनला. तिने हिंदू समाजाच्या भावविश्वाला, कर्तृत्वाला स्पर्शही केला नाही. हिंदू सांस्कृतिक प्रतीकांची प्रतिष्ठापना म्हणजे मुस्लिमांचा वा धार्मिक अल्पसंख्याकांचा केलेला विरोध नव्हे, असे वातावरण तयार करण्याऐवजी सेक्युलॅरिझमच्या नावे हिंदू मानसिकतेत न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे इथल्या समाजाने या राज्यघटनेचा मनापासून स्वीकार केला नाही. देशाचे दुहेरी व्यक्तिमत्त्व तयार झाले.

या सर्व परिवर्तनाच्या प्रक्रियेत संघ हा एकमेव सांस्कृतिक पण विशुध्द इहवादी परिवर्तनाचा प्रयोग होता. संघाचे स्वरूप बाह्यत: एकचालकानुवर्तित्वाचे असले, तरी निर्णय प्रक्रियेतील सहभाग हा  त्याच्या कार्यपध्दतीचा अंगभूत घटक होता. संघाचे नाव ठरवत असतानाही त्याचा निर्णय मतदान घेऊन झाला. हुकूमशाही संस्थेत असे घडत नसते. मठ, मंदिरे, आश्रम, मुहूर्त, यज्ञ, देवतांचे पूजापाठ, नवस, कीर्तन, प्रवचन, नामसंकीर्तन, श्रुती, स्मृती, पुराणे यापैकी कोणत्याच पारंपरिक गोष्टींना डॉ. हेडगेवारांनी संघाच्या कार्यपध्दतीत स्थान दिले नाही. 'शत्रूंच्या गुणांचे अनुकरण करण्यात मला बिलकुल कमीपणा वाटत नाही' ही डॉक्टरांची केवळ उक्ती नव्हती. त्यांच्या कृतीत त्याचे प्रतिबिंब पडले आहे. हिंदू समाजाचा इतिहास व्यक्तिपूजक व त्यामुळे व्यक्तिकेंद्रित राहिला आहे. स्वसामर्थ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा अवताराची वाट बघत बसण्याची मानसिकता त्यातून निर्माण झाली. त्यामुळे डॉक्टरांनी भगव्या ध्वजाची संघाच्या गुरुपदी स्थापना केली. त्यामुळे संघ हे व्यक्तिनिरपेक्ष संघटन बनले. असे संघटन हुकूमशाही बनूच शकत नाही. व्यवस्था पिढयनपिढया टिकायची असेल, तर व्यक्तीच्या नव्हे, तर तत्त्वाच्या आधारे उभी राहावी लागते, हे आधुनिकतेचे तत्त्व इहवादी तत्त्व आहे. संघाची शाखा, गणवेश, संचलन, लष्करी धर्तीची शिबिरे ही सारी सामूहिक, सामाजिक शिस्त निर्माण करणारी आहेत. संघाच्या प्रार्थनेपासून गीते, बौध्दिक वर्ग यात कुठेही स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, मोक्ष यासहित कोणत्याही व्यक्तिगत मागण्यांना स्थान नाही. सर्व प्रार्थना, इच्छा, आकांक्षा, प्रयत्न हे हिंदू समाजाच्या ऐहिक उन्नतीचे. नरहर कुरुंदकर यांनी 'गोळवलकर गुरुजी आणि चातुरर््वण्य' या लेखात संघाचे वर्णन करताना म्हटले आहे, 'लोक गुरुजींकडे आधिभौतिक, आधिदैविक किंवा आध्यात्मिक दु:खे घेऊन जात नाहीत. त्यांच्या आशीर्वादाने अधनाला धन लाभेल, निपुत्रिकाला पुत्र होईल किंवा ईश्वरी साक्षात्कार होईल, मोक्ष मिळेल, अशी त्यांच्या अनुयायांची श्रध्दा नाही. हिंदू धर्मात प्रतिष्ठित असलेले इतर नेते आणि गोळवलकर यांच्यातील हा फरक महत्त्वाचा आहे. गोळवलकरांनी आपल्या अनुयायांना पारलौकिक कल्याणाची हमी दिलेली नाही. त्यांनी हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीच्या, हिंदू राष्ट्राच्या इहलोकातील संरक्षणाची हमी घेतलेली आहे. एकतर गोळवलकरांची हमी इहलौकिक आहे व ही हमी देताना आपल्याजवळ कोणत्या दैवी शक्ती आहेत असा गुरुजींचा दावा नसून इहलोकातील निष्ठावंतांच्या बळकट संघटनेच्या जोरावर इहलौकिक हमींची पूर्तता करू इच्छितात.'

'ज्या विचारसरणीसाठी गोळवलकर उभे आहेत, त्या विचारसरणीसाठी जोपासना केलेल्या संघटनेतच गोळवलकरांचे सामर्थ्य आहे. ही संघटना परंपरागत धर्म मानणाऱ्यांची संघटना नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ परंपरावादी माणसाचे पटणारही नाही. संघ सार्वजनिक कार्यक्रम म्हणून यात्रा-जत्रा भरवत नाही किंवा यज्ञयागही करीत नाही. संघातील तरुणांना हिमालयात जाऊन तप करण्याची किंवा योगसाधना करण्याची प्रेरणा दिली गेलेली नाही. शेंडी, जानवे, संध्या, एकादशी, वैश्वदेव, श्राध्दपक्ष या बाबतीत फार मोठा आग्रह धरणारी ही संघटना नव्हे. आधुनिक सुशिक्षितांची ही संघटना असून हे सर्व तरुण हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाच्या प्रतिज्ञेने गोळवलकरांच्या भोवती जमलेले आहेत.'

हिंदू मूलतत्त्ववादी संघटना म्हणून आजही अनेक प्रसारमाध्यमे संघाचा उल्लेख करीत असतात. संघ असेलच तर ती हिंदू सुधारणावादी संघटना आहे, मूलतत्त्ववादी नव्हे.

सुधारणावादाचे स्वरूप

'संघ हिंदू सुधारणावादी संघटना आहे' असे स्पष्टपणे म्हणणे हे संघसमर्थक व विरोधक या दोघांनाही वेगवेगळया कारणाने जड जाते. हिंदू धर्म सनातन व शुध्द आहे, त्यात जे दोष आले आहेत ते काळाच्या ओघात आलेले आहेत, त्यामुळे हिंदू धर्म शुध्द करायचा नसून तो शुध्द स्थितीत पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायचा आहे अशी अनेक संघसमर्थकांची भूमिका असते. डॉ. हेडगेवार संघस्थापनेमागच्या आपल्या भूमिकेत म्हणतात, 'ऐतिहासिक काळातसुध्दा अखिल भारतीय स्वरूपाचे संघटनेचे जे प्रयत्न झाले नाहीत, ते आता व्हावेत.'  त्यांना केवळ इतिहासातील शुध्द स्वरूपातील हिंदू धर्म पुनरुज्जीवित करायचा असता, तर तसे त्यांनी स्पष्टपणे म्हटले असते. निखळ वेदांच्या आधारे हिंदू समाजाची पुनर्बांधणी करण्याचे काम आर्य समाजाद्वारे स्वामी दयानंद सरस्वती केले होतेच. पण डॉक्टरांना हिंदू परंपरा पुनरुज्जीवित करायच्या नसून हिंदू समाजाला विसाव्या शतकातील जीवनसंघर्षासाठी सक्षम बनवायचे होते. संघविरोधकांपुढे तर सुधारणावादाचे ठोकळेबाज स्वरूप आहे. सुधारणावादासाठी लेख, भाषणे, परिसंवाद, अधिवेशने, व्यवस्था बदलण्यासाठी चळवळी, कायदे बदलण्याची मागणी यातून सामाजिक वातावरण तयार करायचे, राजकीय दबाव उत्पन्न करायचा अशी सुधारणावादाची चौकट तयार झाली आहे. या चौकटीत संघ कुठेही बसत नाही. मग तो सुधारणावादी कसा? असा प्रश्न विचारला जातो. या मार्गाने अनेक सुधारणा झालेल्या आहेत हे मान्य केले, तरी त्यात मूलगामी, स्थायी परिवर्तन किती झाले आहे? याचा हिशोबही मांडणे आवश्यक आहे.

माक्र्सवादी विश्लेषणानुसार, आपल्या देशावर ब्रिटिशांची आलेली राजवट हे सरंजामशाही समाजव्यवस्थेकडून औद्योगिक समाजव्यवस्थेकडे झालेले व्यवस्था परिवर्तन होते. आल्विन टॉफलरच्या विश्लेषणानुसार तो कृषिसंस्कृतीकडून औद्योगिक संस्कृतीकडे झालेला प्रवास होता. अशी परिवर्तने स्वत:चे असे मूल्यसंचित घेऊन येतात. जर प्रचलित जुन्या मूल्यसंचितांचा नव्या मूल्यसंचिताशी मेळ बसला नाही, तर त्यातून अनेक सामाजिक व मानसिक उद्रेक तयार होतात. अशा परिवर्तनासाठी सामाजिक वातावरण तयार करावे लागते. ते करण्यासाठी संघटना, चळवळी निर्माण कराव्या लागतात. वर म्हटल्याप्रमाणे कदाचित एखाद्या प्रश्नापुरत्या अशा चळवळी उपयोगीही ठरू शकतात. परंतु प्रश्न जेव्हा युगपरिवर्तनाचा असतो, त्या वेळी चळवळी तर सोडूनच देऊ, पण केवळ व्यवस्था परिवर्तनातून स्थायी बदल घडत नसतात. स्वातंत्र्यचळवळीच्या वेळी जगातील लोकचळवळींवर माक्र्सवादाचा प्रभाव होता. व्यवस्था परिवर्तन झाले पाहिजे या माक्र्सवादी भूमिकेने नवशिक्षित क्रांतिकारक तरुणांना आकर्षित केले होते. त्या वेळी म. गांधींनी त्यांच्यापुढे, 'मानसिक परिवर्तन झाले नाही, तर केवळ व्यवस्था परिवर्तन होऊन कसा बदल होईल?' असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. त्यातून अनेक माक्र्सवादी गांधीवादी झाले. मानसिक परिवर्तनातून मूल्यपरिवर्तन व त्यातून व्यवस्था परिवर्तन हे हिंदू सामजपरिवर्तनाचे वैशिष्टय आहे. माक्र्सच्या परिभाषेत सांगायचे तर, मानसिक परिवर्तन हा थिसिस आहे, त्यातून प्रत्यक्ष जीवनात घडणारे मूल्यपरिवर्तन हे प्रत्यक्ष दिसणारे स्ट्रक्चर आहे व त्यातून निर्माण होणारी व्यवस्था हे सुपर स्ट्रक्चर आहे. संघाच्या बाबतीत स्वयंसेवकांची मानसिकता घडविणारी संघाची कार्यपध्दती हा थिसिस आहे, त्यातून घडलेली संघाची संघटना व त्यातून निर्माण झालेली मूल्यव्यवस्था हे स्ट्रक्चर आहे व संघप्रेरणेतून उभी राहिलेली विविध कामे हे सुपर स्ट्रक्चर आहे. आजच्या संगणकीय भाषेत बोलायचे, तर संघ कार्यपध्दती हे स्वयंसेवकांच्या 'मेंटल प्रोग्रामिंग'सारखे आहे. कोण काय म्हणते त्यापेक्षा या कार्यपध्दतीतून काय उत्पन्न होते, त्याची शास्त्रीय चिकित्सा आवश्यक आहे. ती केली, तरच इतिहास, वर्तमान व भविष्य याची संगती लावता येऊ शकते. तेवढे कष्ट न घेता कोणाच्यातरी विधानावर चर्चेचा गदारोळ निर्माण करायचा सोपा मार्ग आज अवलंबिला जात आहे.

भारताला सात-आठशे वर्षे मुस्लीम आक्रमकांचा त्रास सहन करावा लागला होता. काही काळ विजयनगरच्या साम्राज्याच्या रूपाने व नंतरच्या काळात शिवाजी महाराज व रणजितसिंग यांच्या रूपाने या प्रश्नावर राजकीय उत्तर दिले गेले. परंतु त्या प्रश्नाचे सांस्कृतिक उत्तर अजूनही मिळालेले नाही. ते मिळायला सुरुवात झाली आहे असे फार तर आज म्हणू शकतो. सामूहिक मानसिकता, धार्मिक व्यवहारात समता व धर्माच्या ऐहिक विजयासाठी प्राण समर्पण करण्याची तयारी ही मुस्लीम समाजाची सामर्थ्यकेंद्रे आहेत. त्या तुलनेत जात, रूढी, भाषा, प्रांत आदीमध्ये विभाजित झालेली मानसिकता, त्यातून निर्माण झालेला उच्च-नीच भाव व मोक्षप्रधान व व्यक्तिनिष्ठ असलेली धर्मभावना हिंदूंमध्ये होती. डॉक्टरांनी संघाची कार्यपध्दती निर्माण करीत असताना, पारंपरिक हिंदूंच्या मनातील धर्म हा केंद्रबिंदू बदलून आधुनिक राष्ट्रवाद हा केंद्रबिंदू निर्माण केला व त्यातून राष्ट्रीय भावनेच्या आधारावर सामूहिक मानसिकता, संघटनेच्या पातळीवर समानता व राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पणाची भावना यांचे संस्कार मनावर होतील अशा घटकांचा त्यात अंतर्भाव केला. सार्वजनिक जीवनातील शिस्त, चर्चेद्वारे सामूहिकरित्या निर्णय घेण्याची प्रक्रिया, प्रत्यक्ष अनुभवांचे विश्लेषण करून त्या आधारे निर्णय घेण्याची पध्दती, शुध्द सार्वजनिक चारित्र्याचा आग्रह, केवळ समारंभी नव्हे तर सातत्यपूर्ण काम करण्याची कार्यसंस्कृती, आपणाला जी गुणनिर्मिती करायची आहे त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणावर दिलेला भर अशा अनेक गोष्टी डॉक्टरांनी युरोपीय संस्कृतीतून घेतल्या. याचबरोबर बाह्यत: संघाचे स्वरूप लष्करी थाटाचे दिसत असले, तरी हिंदू परंपरेतील कौटुंबिक भाव कायम ठेवल्याने संघाचे स्वरूप विशाल कुटुंबाप्रमाणे बनले. लो. टिळकांनी निष्काम कर्मयोगाचे विवेचन केले होते, तोच आशय संघाच्या कार्यपध्दतीत त्यांनी राष्ट्रीय कर्मयोग या स्वरूपात आणला. संघाची कार्यपध्दती एवढी सोपी केली की कुणीही संघाची शाखा सुरू करू शकतो. त्यासाठी फक्त मोकळे मैदान पुरते, कोणत्याही निधीची आवश्यकता राहत नाही. 'Ask not what your country can do for you - ask what you can do for your country' असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी आपल्या प्रथम अध्यक्षीय भाषणात विचारला होता. संघ स्थापनेच्या वेळीच 'समाज आपणासाठी काय करणार हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आपण समाजासाठी काय करणार? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे' असा संस्कार डॉक्टरांनी केला. कार्यपध्दतीतील या सर्व संस्कारातून पारंपरिक हिंदू समाजापेक्षा वेगळी मानसिकता असलेली सामूहिक राष्ट्रीय संस्कृती तयार झाली व प्रत्येक स्वयंसेवक हा परिवर्तनाचे केंद्र बनला.

विकासातील बीज वृक्ष न्याय

विकास अनेक पध्दतींतून होतो. काही विकासमार्ग सरळ रेषेतून जातात. माक्र्सने कम्युनिस्ट क्रांती कशी होईल याचा मार्ग गणिती पध्दतीने स्पष्ट केला आहे. 'आप'चा विकासमार्ग हा आकस्मिक उद्रेकासारखा आहे. उद्रेक बदल घडवितो, पण त्याचा जीवनकाल अल्प असतो. प्रत्येक विकासाचा आराखडा त्याच्या सिध्दान्तातच दडलेला असतो. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी संघाच्या विकासक्रमाचे वर्णन करताना 'बीज वृक्ष न्याया'चे उदाहरण देत. पूर्ण विकसित झालेल्या झाडाचा आराखडा त्याच्या बीजातच असतो व तो कालानुक्रमे दृष्टिपथात येतो. पूर्ण विकसित झालेल्या वृक्षाची ज्यांना कल्पना असेल, तेच या विकासक्रमाचा अचूक अंदाज बांधू शकतात. पण जे याबाबत अज्ञानी असतात, त्यांची मात्र अंदाज बांधताना फसगत होऊ  शकते. संघाच्या बाबत टीकाकारांची व सहानुभूतिदारांचीही अशीच फसगत होत असते. संघाने तरुणांचे लोणचे घातले आहे अशी टीका ज्या संघाबद्दल होई, त्याच संघप्रेरणेतून देश-विदेशात लक्षावधी कामे सुरू झाली आहेत. संघ ही केवळ उत्तरेतील संघटना आहे, काही विशिष्ट जातींचे संघटन आहे, संघात दलित कधीही सहभागी होऊ शकणार नाहीत अशी अनेक भाकिते एकेकाळी केली गेली, जी कालांतराने खोटी ठरली. संघ मुस्लीमद्वेषाचे राजकारण करतो असा आज आरोप केला जात आहे. संघाच्या कार्यपध्दतीतून जे बीज पेरले गेले आहे, ते नीट समजावून न घेण्याचा हा परिणाम आहे. संघाच्या आकलनाची अशी चूक संघाच्या जन्मापासून घडत आहे.

नरहर कुरुंदकरांच्या वर उल्लेख केलेल्या लेखाचा शेवट करताना ते म्हणतात,

'उद्या जर संघाच्या ताब्यात भारतीय राज्य आले, तर ते राज्य धनुर्वेदाच्या शाळा काढणार नाही. विद्यालयाचे नाव द्रोणाचार्य विद्यालय असले, तरी अभ्यासक्रमात अधुनिक शस्त्रविद्या शिकविली जाईल. संघाची राजवट स्मृतींचा कायदा लागू करणारी, स्त्रियांचे शिक्षण बंद करणारी व बालविवाह सुरू करणारी राजवट असणार नाही. ती राजवट लोकशाही मान्य नसलेली पण आधुनिक राजवट असेल.'

कुरुंदकरांच्या या लेखानंतर संघ अणीबाणीच्या विरोधात लोकशाही मूल्यांकरिता लढला. संघप्रेरणेतून निर्माण झालेला भाजपा लोकशाही मार्गाने केंद्रात सत्तेवर बसला आहे. काँग्रेसच्या पतनानंतर भाजपाचा पर्याय नसता, तर जे अराजक निर्माण झाले असते, त्यातून काय घडले असते याची कल्पना करणेही अवघड आहे. मुळातच भारतासारख्या एवढी बहुविधता असलेल्या देशात हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करणे शक्य तरी आहे काय? वरील विधान करताना याचा विचार त्यांनी केला नसावा. भारतीय सांस्कृतिक पर्यावरणात लोकशाहीचे स्वरूप कसे असेल यावरही अजून कोणी गांभीर्याने विचार केलेला नाही. संघाने निर्माण केलेले वातावरण व भारतीय पर्यावरणातील लोकशाहीचे स्वरूप यावर आज विचारमंथन होणे आवश्यक आहे. संघाच्या विरोधकांना संघाच्या वाढीत हुकूमशाहीची बीजे दिसतात. वास्तविक पाहता प्रचलित लोकशाहीतील दोष दूर करून लोकशाही ही देशाचा विकास करण्याचा राजमार्ग बनविण्यात संघ कोणती भूमिका बजावू शकतो, यावर निरोगी वातावरणात चर्चा घडण्याची आवश्यकता आहे.

kdilip54@gmail.com