तीन तलाक आणि मुस्लीम मुखंडांचा कांगावा (भाग - 2)

विवेक मराठी    22-May-2017
Total Views |

 

सर्वोच्च न्यायालयात तीन तलाक संदर्भात सुनावणी होण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने सोम. दि. 8 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाला निवेदन केले. जर तीन तलाकची प्रथा बंद केली, कायदेबाह्य ठरविली तर ते अल्लाच्या आदेशाच्या विरोधात जाईल. तीन तलाकचा नियम न पाळणे हे मुस्लिमांसाठी पाप ठरेल. मंडळाने अशी भीती व्यक्त केली की, घटनेच्या कलम 25प्रमाणे प्रत्येक भारतीयाला त्याचा धर्म निर्वेधपणे पाळण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तीन तलाकला असा निषेध करायला परवानगी दिली, तर काही काळात इस्लामचे अस्तित्व नाहीसे होईल.

लाक तीनदा देण्याबाबत सर्व इस्लाम पंथीयांमध्ये एकवाक्यता असली, तरी ते तीन कसे, केव्हा, कुठे मोजायचे याबाबत मतभिन्नता आहे. त्यातूनच तलाकचे प्रकार अस्तित्वात आले. इस्लामपूर्व काळापासून विभक्त होण्याच्या काही प्रथा अस्तित्वात होत्या. त्यात इल, झिहार आणि तहलील यांचा समावेश होतो.

इल या प्रकारात पती पत्नीपासून दूर राहून शरीरसंबंध टाळण्याची शपथ घेत असे. अशा शपथा त्याला अनेक वेळा घेता येत. त्यामुळे पत्नीला अधांतरी राहावे लागे. पत्नीशी संबंध न ठेवण्याचा आदेश प.कु. 4.34 या आयतीत आला आहे. बदफैली अथवा वाईटपणे वागणाऱ्या पत्नीला प्रथम समज देण्याचा प्रयत्न करावा, त्याने बदलली नाही तर तिच्याशी शारीरिक संबंध तोडा आणि त्यानेही पत्नीची वागणूक बदलली नाही, तर त्यांना मार द्यावा असे या आयतीत सांगितले आहे. याची तुलना साम, दाम, दंड, भेद या चार प्रकारांशी करता येईल. जर पत्नीचे वर्तन सुधारले, तर तिला परत मानाने वागवावे असे म्हटले आहे.

यापुढच्या आयतीत स्पष्ट म्हटले आहे की जर पती-पत्नीतील मतभेद दूर होत नसतील, तर दोघांच्याहीकडून एक मध्यस्थ घेऊन मतभेद मिटविण्याचा प्रयत्न करावा, अशी आज्ञा आहे. (प.कु.4.35).

इस्लाममध्ये पती-पत्नीतील शारीरिक दुरावा चार महिन्यांपेक्षा जास्त वाढला, तर आपोआपच विवाहविच्छेद स्वीकारता येतो. (प.कु.-2.226). पत्नीला ताटकळत बसावे लागत नाही. त्यामुळे इल प्रकाराला आळा बसतो.

झिहार या प्रकारात पती पत्नीला सांगत असे की, तू मला आईसारखी आहेस. असे म्हणताच त्यांच्या दोघांमधील शरीरसंबंध नष्ट होऊन जात. त्याला आपोआपच तिच्यापासून सुटका मिळे. तिला मात्र ना विभक्त होता येत असे, ना वैवाहिक सुख मिळे. प.कु.त दोन ठिकाणी 33.4मध्ये आणि 58.2-4मध्ये याचा निषेध केला आहे. त्यामुळे ती प्रथा आपोआपच मागे पडली.

तिसरी इस्लामपूर्व प्रथा तहलीलची होती. तलाक झाल्यावर परत त्याच नवऱ्याबरोबर नांदायचे असेल, तर पुन्हा दुसऱ्या माणसाशी लग्न करून त्याच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करून, मग त्याच्यापासून तलाक घेणे, असा प्रकार असे. त्याला आधीच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे 'हलाला' म्हणतात. यात पहिला पती व दुसरा पती  यांच्यात करार केला जाई. अशा करारांना पै. महंमदांचा तीव्र विरोध होता. इतके असूनही ही प्रथा आजही भारतीय तसेच इतर देशांमधील मुस्लीम समाजात प्रचलित आहे. तिला अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाची मान्यता आहे. त्यांना महिलांची मानसिकता, कामापुरते शरीरसंबंध स्वीकारताना होणारी मनाची तगमग इ. गोष्टींबाबत काही देणेघेणे नाही.

तलाकचे प्रकार

प्रत्यक्ष तलाकचे वस्तुत: पाच प्रकार आहेत.

1) तलाक-इ-अहसान - हा इल प्रकार असून एकदाच तलाक म्हणून शरीरसंबंध थांबवितात. चार महिने वेगळे राहिल्यावर आपोआपच विवाहविच्छेद होतो.

2) तलाक-इ-सन - यात एकेकदा तलाक ठरावीक मुदतीच्या अंतराने म्हटला जातो. या दरम्यान पती-पत्नीतील संबंध सुधारले, तर विवाह करार अबाधित राहतो.

3) तलाक-इ-बिदत - हा तीन तलाक एका झटक्यात म्हणण्याचा प्रकार आहे. याला कुराणची व हदीसची मान्यता नाही, असे अनेक मुस्लीम विद्वानांचे मत आहे. माझ्या संग्रही असलेल्या अल हदीस (चार खंडात) या ग्रंथाचे भाषांतरकार मौ. फजलूल करीम यांनी लिहिल्याप्रमाणे ही प्रथा कायदा करून लौकरात लौकर रद्द केली पाहिजे (खंड 2, पृ. 652 ). हे खंड प्रथम 1999 साली प्रसिध्द झाले. तेव्हापासून अनेक मुस्लीम विद्वानांनी (एका झटक्यात) तीन तलाकच्या विरोधात मत नोंदविले आहे आणि तलाक-इ-बिदत हा तलाकचा प्रकार मोडीत निघाला पाहिजे, असे विचार मांडले आहेत.

सध्या सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोरील सुनावणीला, निष्पक्ष साहाय्यक (amicus curiae) म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस प्रवक्ते आणि पुढारी सलमान खुर्शिद यांची नेमणूक झाली आहे. ते कितपत निष्पक्ष साहाय्यक असतील या बाबतीत मतमतांतरे असली, तरी त्यांनी दै. हिंदूला दिलेल्या मुलाखतीत (दि. 10 मे 2017) म्हटले आहे की, अनेक मुस्लीम विचारवंतांच्या मतांनुसार तीन तलाक अशी कोणतीही मान्यताप्राप्त गोष्ट नाही. या संदर्भात खुर्शिद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. बदर अहमद यांनी दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला आहे, जो खुर्शिद यांच्या मतानुसार अगदी स्पष्ट आहे - The ruling doesn't say we will overrule triple talaq, it says there is no such thing as triple talaq.

न्या. बदर अहमद काय किंवा सलमान खुर्शिद काय, या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल आदर राखून असेच म्हणता येईल की, यथावकाश दिलेले तीन तलाक अस्तित्वातच नाहीत असे म्हणणे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे आहे. तलाक उच्चारून विवाहविच्छेद करणे हे प.कु.सकट सर्वांनी स्वीकारले आहे. त्याला कालमर्यादा आणि संख्या मर्यादा घालण्यासाठी तीन वेळा म्हणणे, तीन महिने वाट पाहणे, ते तीन महिने बायको-मुला-बाळांची काळजी घेणे, अशी समाजहिताच्या दृष्टीने बंधने घालण्यात आली. ते पूर्वी नव्हे, तर आताच्या काळातही सयुक्तिक ठरेल.

तीन तलाक देण्याच्या संदर्भात एक हदीस आहे. महमूद बीन लबीदने सांगितल्याप्रमाणे, अल्लाचे पैगंबर यांना एका व्यक्तीबाबत सांगण्यात आले की त्याने एका दमात तीन वेळा पत्नीला तलाक देऊन विवाहविच्छेद केला. हे ऐकताच पैगंबर अत्यंत रागात येऊन उभे राहिले आणि म्हणाले, ''तू पवित्र कुराणाच्या आणि अल्लाच्या शिकवणीच्या विरोधात मी (जिवंत) असताना जातो आहेस.'' ते ऐकून एक व्यक्ती-अनुयायी उभा झाला आणि म्हणाला, ''मी त्याला ठार मारू?'' (नसई हदीस, अल हदीस, खंड 2, पृ. 669 )

वरील हदीस लक्षात घेता इस्लाममध्ये तीनदा तलाक देणे अस्तित्वात नव्हते असे म्हणता येत नाही. ते कसे द्यावेत यावर विचार करायचा आहे. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. तीन तलाकच्या प्रथेची पुष्टी करणारा तलाकचा एक प्रकार आहे, त्याला लीअन म्हणतात. या प्रकारात पती आपल्या पत्नीवर बदफैली असण्याचा आरोप करतो व तलाक देतो. ती अर्थातच नाकारते. हे आरोप करणे आणि नाकारणे हे काही साक्षीदारांसमोर केले जाते. असे तीनदा केल्यावर चौथ्या वेळीही जर पतीने आरोप करत तलाक दिला आणि पत्नीने नाकारला, तर दोघांपैकी कुणीतरी एक खोटे बोलत आहे असे ठरते. या प्रसंगात बदफैलीपणाचा पुरावा देणारी दुसरी व्यक्ती नसते. अशा वेळी जो धाक आहे, तो खोटेपणाबद्दल नरकात मिळणाऱ्या यातनांचा आहे. त्याची भीती वाटून जो खरे बोलत असेल, त्याचा निर्णय कयामतच्या दिवशी होईल. या तलाक प्रकारात पती-पत्नी लगेच विभक्त होतात. कुठली स्वाभिमानी महिला स्व:च्या चारित्र्यावर असे सर्वांसमक्ष शिंतोडे उडविणाऱ्या नवऱ्याबरोबर राहू शकेल? असा प्रसंग हदीसमध्ये आला आहे. तसेच प.कु. 4.6 ही आयत त्या संदर्भात आहे.

तलाक-एक-मुबारात या प्रकारात पती-पत्नी दोघेही मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतात. तो निर्णय एकतर्फी नसल्याने लगेच त्याची स्वीकृती होते.

'खुला' तलाक या प्रकारात पती नाही, तर पत्नी तलाक मागण्यात पुढाकार घेते. काही प्रासंगिक घटनेमुळे जर पत्नीने विभक्त होण्याची मागणी केली, तर त्याला 'खुला' तलाक म्हणतात. पतीने पत्नीच्या इच्छेविरुध्द दुसरा विवाह केला, तर पत्नी खुला तलाक मागू शकते. पूर्वीच्या काळी माहेरची सधन असलेली पत्नी कदाचित तसे करू शके. आजच्या काळात पत्नी सुविद्य व चांगली नोकरी अथवा व्यवसाय करणारी असेल, तर खुलाचा पर्याय उपलब्ध आहे. एकूणच आताचे इस्लाममधील तलाक प्रकारसुध्दा पूर्णपणे पुरुषप्रधान आणि जहिलीया काळापेक्षा फार काही वेगळे नाहीत.

 प.कु.तील तलाकच्या आयती

प.कु. 65 सुराशिवाय इतर काही सुरांमध्ये तलाकसंबंधात आयती आल्या आहेत. तो एक वेगळया लेखाचा विषय आहे. येथे काहींचा परामर्श घेतला आहे. सर्वात महत्त्वाची असलेली सुरा क्र.2, अल-बकराहमध्ये आयत 226 ते 237 या आयती तलाकसंदर्भात आल्या आहेत. आयत क्र. 228मध्ये तीन महिन्यांच्या इद्दत काळाचा उल्लेख आहे. त्या काळात त्यांचे वैवाहिक संबंध पुन्हा प्रस्थापित होऊ  शकतात. त्या पुढच्या आयातीत क्र. 229 तलाक दोन वेळा घडतो - अत्तलाकू मरतानी - असे स्पष्ट दिले आहे. याचे प्रत्यंतर पूर्वी रोकानाहच्या घटनेच्या संदर्भात येते. दोन वेळा त्याने पहिल्याच पत्नीशी संबंध प्रस्थापित केले. आयत क्र. 230मध्ये मात्र तीनदा तलाक पूर्ण केल्यावर परत त्याच पतीबरोबर नांदायचे असेल तर हलाला झाला पाहिजे, अशी अट टाकण्यात आली आहे. या बाबतीत असे स्पष्टीकरण देण्यात आले की पती प्रत्येक वेळी तलाक देत राहील आणि परत नांदवायला घेईल, तर पत्नी सतत तलाकच्या दडपणाखाली असेल. तसे होऊ नये, तिला नव्या घरठावाचा मार्ग खुला असावा. नवे लग्न तुटण्यावरच तिला परत पहिल्या नवऱ्याबरोबर नांदणे विहित ठरेल. या प्रथेचा अनेकदा गैरवापर केला जातो. इंडिया टाइम्सने दिलेल्या बातमीप्रमाणे इंग्लंडमध्ये एका सर्वेक्षणात पुढे आले आहे की तीनदा तलाक म्हणून परित्यक्ता झालेल्या तलाकपीडितेशी लग्न करून, तिला तलाक देण्यासाठी हे तात्पुरते नवरे पैसे उकळतात. त्यांचे लैंगिक शोषण करतात. हे सर्व धर्मसंमत म्हणून स्वीकारणारे सर्व पुरुषी मनोवृत्तीचे मुल्ला असतात. त्यांना महिलेला होणाऱ्या मानसिक यातनांची कल्पना येत नाही अथवा जाणून घ्यायची नाही. या ठिकाणी या तात्पुरत्या नवऱ्यापासून तलाक घेण्याची महिलेची इच्छा असल्याने त्याला खुला तलाक ठरवून, हे पुरुषी शोषण स्वीकारले जाते.

लग्नाच्या वेळेस मुस्लीम पुरुष पत्नीला मेहेर भेट देतो, अशी पध्दत आहे. तलाकनंतर ती भेट पतीने स्वत:कडे न ठेवता तिची खासगी मालमत्ता समजून परत केली पाहिजे, अशा आशयाची आयत 4.19 ही आहे. त्यामागे जहिलीया काळातील प्रथा होती. तलाक मिळालेल्या अथवा पती मरण पावलेल्या महिलेला जर माहेरी जायचे असेल, तर कौटुंबिक मालमत्तेतून काही नेता येत नसे. यावर उपाय म्हणून मदिनेतील एका विधवा महिलेच्या संदर्भात ही आयत अवतरली आहे. तिच्या सावत्र मुलाने पतिनिधनानंतर कौटुंबिक मालमत्तेतील वाटा नाकारला होता. तेव्हा तिला लग्नाच्या वेळी दिलेला मेहेर परत केलाच पाहिजे असा आशय.

मुस्लीम मुखंडांचा कांगावा

सर्वोच्च न्यायालयात तीन तलाक संदर्भात सुनावणी होण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने सोम. दि. 8 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाला निवेदन केले. जर तीन तलाकची प्रथा बंद केली, कायदेबाह्य ठरविली तर ते अल्लाच्या आदेशाच्या विरोधात जाईल. तीन तलाकचा नियम न पाळणे हे मुस्लिमांसाठी पाप ठरेल. मंडळाने अशी भीती व्यक्त केली की, घटनेच्या कलम 25प्रमाणे प्रत्येक भारतीयाला त्याचा धर्म निर्वेधपणे पाळण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तीन तलाकला असा निषेध करायला परवानगी दिली, तर काही काळात इस्लामचे अस्तित्व नाहीसे होईल. जरी एका झटक्यात तीन वेळा तलाक म्हणून विवाहविच्छेद करणे हे सर्वसंमत नसले, तरी ती प्रथा प.कु.मध्ये आलेल्या आयतच्या आधारे असल्याने कायदाबाह्य ठरविता येणार नाही. त्याला अल्लाच्या आदेशाचे स्वरूप आहे. मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, एकदा का तलाकचा उच्चार तीन वेळा केला की त्या पुरुषाची तलाक दिलेली पत्नी त्याच्यासाठी अवैध - हराम ठरते. हलालाची प्रथा पार पाडल्यावरच ती त्याच्याबरोबर नांदण्यास वैध ठरते. हलालाची प्रथा पाळण्याचे कारण महिलेला पुनर्विवाह करून तिच्या स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्याची, नांदण्याची मुभा देणे हे आहे, असे मंडळाचे निवेदन, वकील एझाज मकबुल याच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे (टाइम्स ऑॅफ इंडिया, दि. 28 मार्च 2017). खरोखरी मुस्लीम महिलांना मनाप्रमाणे वागता येते?

मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळ हे मध्ययुगीन मानसिकता असणाऱ्या व्यक्तींचे आहे. त्यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व कायम ठेवायचे आहे. एकंदरच मुस्लीम समाजात आपल्यावर अन्याय होतो आहे, सध्याचे सरकार हे या ना त्या प्रकारे मुस्लिमांवर अन्याय करण्यासाठीच प्रयत्नशील आहे, सच्चर समितीच्या अहवालात मुस्लीम मागासलेपण अधोरेखित झाल्यावर तो कमी करण्यासाठी भारतीय शासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत असा सतत ठणाणा करण्याचे धोरण गेले दशकभर व्यवस्थित अंमलात आणले आहे. त्यालाच धरून मुस्लिमांमध्ये - विशेषत सुन्नी पंथीयांमध्ये अरबीकरणाने मूळ धरले असून गैर मुस्लिमांविषयी काफिरद्वेषाच्या (Kafirophobiaच्या) भावनेला प्रोत्साहन मिळते आहे. सुन्नी पुरुषांचा पाठिंबा मिळत राहावा, यासाठी मंडळांवर असलेले सर्व मुखंड हा तीन तलाकच्या विरोधात कांगावा करत आहेत. याच दरम्याश जमियत उलेमा-इ-हिंद या मोठया मुस्लीम संघटनेच्या 25 सदस्यांनी आणि अध्यक्ष मो. महमूद मदनी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन तीन तलाकच्या प्रथेवरून त्याचे राजकिय भांडवल न करण्याचे निवेदन दिले आहे. मुस्लीम मुखंडांनी अशा तऱ्हेची लगबग करण्याचे कारण नुकत्याच झालेल्या उ.प्र.च्या निवडणुकांमध्ये अनेक तरुण मुस्लीम महिलांनी तीन तलाकच्या विरोधात भाजपाला मतदान केले. त्यामुळे अत्यंत पुरुषी मनोवृत्ती असलेल्या या तथाकथित नेत्यांनी सर्वसाधारण मुस्लीम समाजामध्ये केंद्रीय शासन इस्लाम धर्माचा अव्हेर करते आहे, त्यामुळे 'इस्लाम खतरेमे'चा माहोल तयार करण्यास सुरुवात केली आहे.

 यापूर्वी तलाकसंदर्भात आलेल्या आयता आणि हदीस यांचा मागोवा घेतला असता, कुठलाही विवाहविच्छेद करण्यापूर्वी दोन वेळा इद्दतचा काळ जाऊ  देणे आवश्यक आहे. त्यादरम्यान दोन्हींकडून समेटाचा प्रयत्न होणे, इद्दत काळात पत्नीला खर्च देणे इ. गोष्टी प.कु.नेच दिल्या आहेत, याचा सोईस्कर विसर या मुखंडांना पडला आहे. लग्नाचा करार एकतर्फी मोडणे ही महिलांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणे ठरत नाही काय? तसेच हलाला लग्न मोडण्यासाठीच करायचे असेल, तर ते तात्पुरते लग्न अल्लाला न आवडणारी गोष्ट नाही काय? असे अनेक प्रश्न या सर्वोच्च न्यायालयापुढे चर्चेत आले पाहिजेत. त्यातून इस्लाम एकविसाव्या शतकानुरूप बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात व्हावी.

 9975559155

drpvpathak@yahoo.co.in