Enter your Email Address to subscribe to our newsletters
तीन वर्षे मराठवाडयात प्रचारक राहून चंदू पुण्यात परतला. आता वसंत ताम्हनकर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. डॉ. आप्पा पेंडसे यांचा पूर्वसहवास होताच. अप्पासाहेब पेंडसे म्हणजे मानवी हिऱ्याला पैलू पाडणारे कुशल कारागीर. ताम्हनकरांची बुध्दिमत्ता त्यांनी हेरली होती. प्रबोधिनीच्या कामाबरोबर अप्पांनी पध्दतशीर, नियोजनपूर्वक अभ्यास करवून घेतला. याच काळात प्रबोधिनीच्या कामात ते अधिकाधिक गुंतत गेले. अप्पासाहेब पेंडसे यांचे ते निकट सहकारी झाले. आयुष्याची पुढची दिशा निश्चित झाली. तसे ते जन्मजात प्रचारक वृत्तीचे होते. आता आजन्म ज्ञानप्रबोधिनीचे काम करायचे, ही प्रतिज्ञा केली. म्हणजे भगवा वेष धारण न केलेला संन्यासीच!
ज्ञानप्रबोधिनी ही पुण्यातील एक आगळीवेगळी शिक्षण संस्था आहे. संस्थापक डॉ. अप्पासाहेब पेंडसे हे पूर्वाश्रमीचे संघप्रचारक. स्वामी श्रध्दानंदांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की ते काम मी पुढे चालवीन. भगवी वस्त्रे धारण केली नाहीत, पण आजन्म संन्यासी राहिले. सुमारे पंधरा वर्षे पूर्णवेळ संघकार्यकर्ता (प्रचारक) या नात्याने कार्य करून, शिक्षण क्षेत्रातल्या अत्युच्च पदव्या प्राप्त करून, ज्ञानप्रबोधिनी या आगळयावेगळया शिक्षण संस्थेची स्थापना केली. बुध्दिमंत विद्यार्थी निवडून, त्यांच्यावर उचित संस्कार करून ती बुध्दिमत्ता समाजकारणी व राष्ट्रकारणी लावण्याकरिता उत्तम नियोजन व कार्यवाही या संस्थेमार्फत गेली पन्नास वर्षे होत आहे. या कामातील त्यांचे प्रमुख सहकारी व पहिले उत्तराधिकारी म्हणजे डॉ. वसंत सीताराम ताम्हनकर. त्यांचे नुकतेच वयाच्या पंचाएेंशीव्या वर्षी सोलापूर येथे दु:खद देहावसान झाले.
लौकिक नाव वसंत सीताराम ताम्हनकर, परंतु पन्नास आणि साठच्या दशकात संघवर्तुळातील त्यांचे आवडते नाव म्हणजे 'चंदू ताम्हनकर'. बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या चंदू याची काम करण्याची तत्परता, परिश्रमी वृत्ती व संघशरणता यामुळे अल्पवयातच संघकामात त्याला गती मिळाली. आजूबाजूच्या स्वयंसेवकांत हा सदैव नेता असे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी व पुढे B.M.C.C.मधून B.Com.ची पदवी त्याने उत्तीर्ण केली. तोपर्यंत संघकामातील शिक्षणाचे सर्व टप्पे पार करून घोष विभागात त्याने विशेष प्रावीण्य मिळवले होते. त्या काळापासून माझा त्यांचा अत्यंत निकटचा परिचय, आजपर्यंत सुमारे पासष्ट वर्षे अखंड व घनिष्ट होत राहिला. पदवी प्राप्त झाल्याबरोबर संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता (प्रचारक) म्हणून त्या काळच्या खडकी जिल्ह्यामध्ये (आजचा औरंगाबाद-जालना मिळून) त्यांची नियुक्ती झाली. अत्यंत परिश्रमी, कुशल संघटक, शिस्तबध्द, लाघवी स्वभाव व घोष विभागातील पूर्ण तज्ज्ञता यामुळे कार्यकर्त्यांचे मोहोळच त्यांच्याभोवती असे. त्या भागातील आज साठी-सत्तरीतील असलेले अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवलेले आहेत. आजही अशा कार्यकर्त्यांना त्यांचे स्मरण प्रेरणादायी वाटते.
माझा व चंदू ताम्हनकरचा संबंध घोष विभागाच्या निमित्ताने आला. चंदू ताम्हनकर विशी-पंचविशीतच घोष विभागात 'गड्डा' बनला होता. घोष विभागातील सर्व वाद्ये तो कुशलतेने वाजवीत असे. आनक (ड्रम), बंशी (बासरी), शंख (बिगुल) ही तीन मूलभूत दले (विभाग). या तिन्ही विषयांत तो प्रवीण होता. शंखाचे उद्घोष (Calls) वाजवावेत ते चंदूनेच. अगदी उच्च स्वर असो किंवा निम्न स्वर (note), चंदूच्या आवाजात केसभरही फरक नसे. म्हणून सर्व मोठया कार्यक्रमात, संघशिक्षा वर्गात उद्घोष वाजवण्याची जबाबदारी चंदूचीच. याखेरीज पणव (ढोल), त्रिभुज (Triangle), झल्लरी (झांजा) हेही वाजवण्यात तो प्रवीण होता. साहजिकच घोषप्रमुख म्हणून दायित्व त्याच्याकडे आले. घोषासमोर घोष दंड घेऊन अत्यंत रुबाबदारपणे चालणे व घोषदंडाच्या साहाय्याने संपूर्ण घोषाचे नियंत्रण करणे हे घोषप्रमुखाचे काम, सोबतच घोषदंडाची उत्तम कवायत तो करत असे. संचलनात मध्येच तो घोषदंड उंच उडवणे व गिरक्या घेत खाली घेणारा घोषदंड वर न पाहता अलगद झेलणे अशा नेत्रदीपक कवायती तो करत असे. स्वर्गीय बापूराव दाते व चंदू ताम्हनकर या जोडगोळीने पुणे घोषाचे नाव भारतभर केलेहोते. याखेरीज विशेष म्हणजे शृंगदलातील (Brass पथकातील) विविध वाद्ये तो लीलया वाजवीत असे. पुण्यातील सुमारे शंभर स्वयंसेवकांचा घोष, त्यांचे तालबध्द संचलन, पुढे घोष दंड देऊन-घेऊन रुबाबात चालणारा चंदू हे स्वयंसेवकांनाच नव्हे, तर समाजालादेखील विलक्षण आकर्षण असे. आम्ही त्याला गमतीने म्हणत असू की, चंदू ताम्हनकर घोषदंड हातात घेऊनच जन्माला आला आहे.
तीन वर्षे मराठवाडयात प्रचारक राहून चंदू पुण्यात परतला. आता वसंत ताम्हनकर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. डॉ. आप्पा पेंडसे यांचा पूर्वसहवास होताच. त्यातून वसंतराव ताम्हनकर ज्ञानप्रबोधिनीच्या कामात गुंतत गेले. अप्पासाहेब पेंडसे म्हणजे मानवी हिऱ्याला पैलू पाडणारे कुशल कारागीर. ताम्हनकरांची बुध्दिमत्ता त्यांनी हेरली होती. प्रबोधिनीच्या कामाबरोबर अप्पांनी पध्दतशीर, नियोजनपूर्वक अभ्यास करवून घेतला. पाठोपाठ B.Ed., M.Ed., M.A. d Ph.D. हे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठात प्रथम क्रमांकाने वसंत ताम्हनकरांनी अर्जित केले. किमान वेळात पीएच.डी. पूर्ण करणे या विषयीचा त्यांचा पुणे विद्यापीठातील विक्रम बहुधा आजही अबाधित आहे. याच काळात प्रबोधिनीच्या कामात ते अधिकाधिक गुंतत गेले. अप्पासाहेब पेंडसे यांचे ते निकट सहकारी झाले. आयुष्याची पुढची दिशा निश्चित झाली. तसे ते जन्मजात प्रचारक वृत्तीचे होते. आता आजन्म ज्ञानप्रबोधिनीचे काम करायचे, ही प्रतिज्ञा केली. म्हणजे भगवा वेष धारण न केलेला संन्यासीच! संघकामात अर्जित केलेली सर्व गुणवत्ता अधिक घासून पुसून, टोकदार करून ज्ञानप्रबोधिनीच्या कामात समर्पित झाली. पुढील पन्नास वर्षांचा कालावधी आता 'अण्णा ताम्हनकर' या नावाने प्रबोधिनीच्या माध्यमातून 'राष्ट्राय स्वाहा । इदं न मम।' या भावनेतून पूर्णायुष्य समाजचरणी अर्पण करण्यात गेला. हा सर्व कालावधी वेगळा परामर्श घेण्याचा आहे. अण्णांविषयी संघस्मृती जागविण्याचे या लेखाचे प्रयोजन आहे. म्हणून पुढील काळातही स्वयंसेवकत्व जपलेले अण्णा कसे दिसले, त्याची एक-दोन उदाहरणे देऊन हा लेख संपवतो.
1986-87 साल असावे. मुंबईहून गाडीतून परत येताना अण्णांना अपघात झाला. गंभीर अवस्थेत त्यांना पुण्यात डॉ. संचेती यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉ. संचेती माझे जवळचे मित्र. मी त्यांना ताम्हनकरांच्या जीवनक्रमाविषयी कल्पना दिली. डॉ. संचेती यांनी या गंभीर अपघाताचे उपचार पूर्ण नि:शुल्क केले. पूर्ण दुरुस्त झाल्यावर अण्णांचे मला पत्र आले. त्यांनी लिहिले होते, 'मी प्रचारक, तुम्ही संघचालक. तुम्ही माझी काळजी नाही घेणार तर कोण घेणार?' संघरचनेतील एका नाजूक नात्याचा त्यांनी असा 'मार्मिक' उल्लेख केला होता. सन 1989-90 या वर्षांत अयोध्या आंदोलन जोरात होते. अण्णा ताम्हनकर नित्य संघकामात नव्हते, पण अयोध्या आंदोलनात सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. संस्था म्हणून ज्ञानप्रबोधिनीचे धोरण तेथील प्रमुख मिळून ठरवतील; परंतु संघस्वयंसेवक म्हणून हिंदुत्वाच्या या व्यापक चळवळीत मी सहभागी होणारच, म्हणून त्यांनी निर्णय व कृती केली.
या लेखाचे शीर्षक आहे - 'धगधगता मौनतपस्वी साधक अण्णा (व.सी.) ताम्हनकर' यातील शब्दात काहीसा विरोधाभास आहे, परंतु चंदू (अण्णा) ताम्हनकर यांच्या जीवनात या प्रत्येक शब्दाचा अर्थ भरभरून अनुभवास येतो.
वृत्तपत्रमें नाम छपेगा
पहनूँगा - स्वागत समुहार
छोड चले ये क्षुद्र भावना, हिन्दुराष्ट्र के तारणहार
कंकड पत्थर बनकर हमको
राष्ट्रनींव को है भरना
ब्रह्मतेज के क्षात्रतेज के, अमर पुजारी है बनना।
या काव्यपंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे शब्दश: जगलेल्या या स्वयंसेवकाच्या स्मृतीस शतश: नमन.
शल्यचिकित्सक
विवेकानंद रुग्णालय, लातूर