आधुनिक लोकशाही व्यवस्था पेलण्याकरिता जो शिक्षणाचा प्रसार असावा लागतो किंवा आर्थिक स्तर असावा लागतो, त्याचाही भारतात अभाव होता. असे असतानाही दुसऱ्याच पिढीत अणीबाणीला पराभूत करून भारतात लोकशाहीची बीजे रुजली आहेत, याचा येथील जनतेने प्रत्यय दिला. त्यानंतर भारतात अनेक सत्तांतरे झाली. लोकांनी अनेक पक्षांना राज्य करण्याची संधी दिली. भारतात हे घडू शकले, कारण भारतात असलेला बहुसंख्य हिंदू समाज...
दुसऱ्या महायुध्दानंतर भारत स्वतंत्र झाला, त्या सुमारास अनेक देश स्वतंत्र झाले. त्या सर्वच देशांना या ना त्या प्रकारचा ब्रिटिश सत्तेचा वारसा मिळाला होता. परंतु लोकशाहीचा वारसा टिकविण्याचे भारताइतके यश आणखी क्वचितच एखाद्या देशाला मिळाले असेल. वास्तविक पाहता अन्य कोणत्याही देशांपेक्षा भारतातील लोकसंख्या, विविधता यांचे प्रमाण कितीतरी अधिक. अमेरिका-युरोपमधील अनेक देशांमध्ये लोकशाही रुजण्यासाठी काही शतके जावी लागली. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारताने प्रौढ मतदानावर आधारित लोकशाहीचा स्वीकार केला. शेकडो वर्षांत भारताला मध्यवर्ती सत्ताकेंद्राचा अनुभव नव्हता. त्यातच आधुनिक लोकशाही व्यवस्था पेलण्याकरिता जो शिक्षणाचा प्रसार असावा लागतो किंवा आर्थिक स्तर असावा लागतो, त्याचाही भारतात अभाव होता. असे असतानाही दुसऱ्याच पिढीत अणीबाणीला पराभूत करून भारतात लोकशाहीची बीजे रुजली आहेत, याचा येथील जनतेने प्रत्यय दिला. त्यानंतर भारतात अनेक सत्तांतरे झाली. लोकांनी अनेक पक्षांना राज्य करण्याची संधी दिली. भारतात हे घडू शकले, कारण भारतात असलेला बहुसंख्य हिंदू समाज. भारतात सेक्युलॅरिझम टिकण्याचे कारणही भारतात हिंदूंची असलेली लोकसंख्या हेच आहे. आता मोदी सत्तेवर आल्यानंतर भारतातील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, सेक्युलॅरिझम धोक्यात आल्याचा प्रचार केला जात आहे. भाजपाच्या किंवा संघाच्या नेतृत्वाखाली हिंदू समाज असहिष्णू बनत चालला आहे असा प्रचार जे करीत आहेत, त्यांनी कधीही आजवर या साऱ्या गोष्टी हिंदू समाज बहुसंख्य असल्यामुळेच भारतात टिकून राहिल्या आहेत हे मान्य केले नव्हते. कारण ते मान्य केले असते तर तर भारतात ही मूल्ये टिकवून ठेवायची असतील, तर हिंदू समाजाची बहुसंख्या टिकविली पाहिजे ही गोष्ट मान्य करणे भाग पडले असते. सर्व धोरणांचा विचार त्या अनुषंगाने करावा लागला असता. तसे झाले असते, तर ज्यांचा ते हिंदू जातीयवादी म्हणून उपहास करीत होते, त्यांच्या यांच्या दृष्टीकोनात फार तर तपशिलाचा फरक पडला असता. म्हणूनच तृतीय सरसंघचालक बाळसाहेब देवरस हे हिंदू समाजाचे संरक्षण व लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, सेक्युलॅरिझम यांचे संरक्षण या दोन्ही गोष्टी समकक्ष असल्याचे प्रतिपादन करीत.
लोकशाहीत एखाद्या समाजाची मूल्यचौकट तेथील बहुसंख्य समाजावर अवलंबून असते. सीरियामध्ये अल्पसंख्य शिया बहुसंख्य सुन्नी समाजावर राज्य करू शकतात, कारण तेथे हुकूमशाही राजवट आहे. युरोपमधील अनेक देशात जी लोकशाही रुजली आहे, याचे कारण चर्चच्या धार्मिक हुकूमशाहीच्या विरोधात तिथे सातत्याने लढे दिले गेले. आज तेथील मुस्लीम लोकसंख्या वाढत असल्याने तेथील जनमानस अस्वस्थ झाले आहे व तेथील उजव्या प्रतिक्रियावादी शक्ती वाढण्यात त्याचा परिणाम झाला आहे. जर तेथील मुस्लीम लोकसंख्या एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढली, तर त्या देशांनाही यादवी युध्दाला सामोरे जावे लागेल. तिथे भविष्यात असे समजा यादवी युध्द झालेच, तर त्याची जबाबदारी कोणावर असेल? आपल्या देशाची मूल्यचौकट कायम राहावी या आग्रहापोटी तथाकथित असहिष्णू बनलेल्यांवर, की ज्यांनी आंधळेपणे, किंवा डोळसपणाने किंवा एखाद्या उदारमतवादी विचारसरणीच्या कैफात ही स्थिती येऊ दिली, त्यांच्यावर? भारतातील स्थितीही तशीच आहे. भारतात हिंदू समाजामध्ये जेवढी लोकशाही मूल्ये टिकविण्याची प्रवृत्ती होती, व्यक्तिस्वातंत्र्याबाबत आस्था होती, इतर धर्मांबद्दलचा आदरभाव होता, तेवढीच ही मूल्ये टिकली. पण याचा उपयोग हिंदू समाजाच्या खच्चीकरणाकरिता होत आहे हे हिंदू समाजच्या लक्षात येऊ लागल्यावर त्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गिरिलाल जैन यांनी त्यांच्या एका लेखात त्यांची सैय्यद शहाबुद्दीन यांच्याशी झालेली चर्चा नमूद केली आहे. जेव्हा शहाबुद्दीन हिंदू-मुस्लीम प्रश्न असा सतत उल्लेख करू लागले, तेव्हा त्यांना गिरिलाल जैन म्हणाले की, ''हा हिंदू-मुस्लीम प्रश्न नसून मुस्लिमांबाबत कोणती भूमिका घ्यायची हा हिंदूंच्या मधला प्रश्न आहे.'' काश्मीरच्या खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंची जेव्हा ससेहोलपट केली गेली व त्याबद्दल अन्य मुस्लीम संघटना तोंडात मूग धरून गप्प बसल्या किंवा शहाबानू खटल्यातील सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर मुस्लीम नेत्यांनी जी विखारी भाषणे केली, त्याबद्दल त्यांना कोणी हटकले नाही. त्यामुळे आपण या देशात असेही वागले तरी चालू शकते अशी गुर्मी जातीयवादी मुस्लीम नेतृत्वात निर्माण झाली. त्यातूनच गोध्रा घडले आणि त्याची प्रतिक्रिया गुजरातवर झाली. या देशात आपण काहीही केले तरी चालू शकते असे बहुसंख्य मुस्लिमांना वाटू लागले आणि येथे आपणाला कधीही न्याय मिळणार नाही असे हिंदूंना वाटू लागले. त्यामुळे गुजरातमधील दंगलीतील रक्तपाताची जबाबदारी हे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पडते. त्यांच्या हातावर त्या रक्ताचे डाग आहेत, मोदींच्या नाहीत. पुढे घडणाऱ्या घटनांनी तोच कौल दिला आहे.
सहिष्णू हिंदू विरुध्द असहिष्णू हिंदू
आजवर भारतात सेक्युलॅरिझम विरुध्द हिंदुत्ववादी अशी लढाई सुरू होती. परंतु आता सेक्युलॅरिझमकडे लोक मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे लोक म्हणून उपहास करीत असल्याने आता हिंदूंची सहिष्णू परंपरा विरुध्द असहिष्णू परंपरा असा प्रचार सुरू झालेला आहे. जर या देशातील हिंदू समाज बहुसंख्य राहिला, तरच आधुनिकतेची मूल्ये टिकून राहू शकतात ही वस्तुस्थिती मान्य केली की कोणत्या मार्गाचा अवलंब केल्यानंतर हिंदू समाजाचा प्रभाव शिल्लक राहील व त्याचबरोबर अधुनिक लोकशाही जीवनमूल्येही टिकून राहतील याचा विचार करणे आवश्यक आहे. संघाची प्रेरणा जशी हिंदू सुधारणावादाची आहे, तसेच त्याच्या प्रेरणेतून निघालेल्या विविध कामांचीही आहे. रामकृष्ण मिशनचे काम हे विविध मठांच्या आधारे चालते. त्यामुळे मठांची संख्या अधिक वाढणे हे रामकृष्ण मठाच्या वाढीचे गमक आहे. स्वामीनारायण संप्रदायाच्या वाढीचे प्रतीक म्हणून विविध ठिकाणी अक्षरधाम मंदिरे उभी राहत आहेत. संघाला पारंपरिक धर्मश्रध्दांचे पुनरुज्जीवन करायचे असते, तर त्याने मठ, मंदिरे, आश्रम वाढविण्यावर भर दिला असता. परंतु संघाच्या कार्यपध्दतीत ज्याप्रमाणे भगवा ध्वज व भारतमाता याव्यतिरिक्त अन्य कशाचेही पूजन केले जात नाही, तसेच संघाच्या सहा उत्सवांतही गणेश चतुर्थी, दिवाळी यासारख्या धार्मिक सणांचा अंतर्भाव नाही. डॉ. हेडगेवारांना हिंदू समाजात जे गुण संक्रमित करायचे होते, त्या गुणांच्या अनुषंगाने जे उत्सव डॉक्टरांना आवश्यक वाटले, तेवढयाच उत्सवांचा त्यांनी कार्यपध्दतीत स्वीकार केला. मृतप्राय झालेल्या लोकांमध्ये संघर्षाची प्रेरणा उत्पन्न करणाऱ्या शालिवाहनाची आठवण करून देणारी वर्षप्रतिपदा, हिंदवी स्वराज्याची स्फूर्ती देणारा हिंदू साम्राज्य दिन, बंधुत्वाचा संस्कार करणारे रक्षाबंधन, समर्पणाची प्रेरणा देणारे गुरुपूजन, विजयाकांक्षा निर्माण करणारी विजयादशमी व स्नेहभाव निर्माण करणारी संक्रांत अशा उत्सवांचा त्यांनी संघाच्या कार्यपध्दतीत समावेश केला. यातील रक्षाबंधन व संक्रांत हे उत्सव तर प्रामुख्याने महिलांचे म्हणूनच मानले जात होते.
स्वातंत्र्यापूर्वी संघाचे काम केवळ शाखांच्या स्वरूपातच चालत होते. स्वातंत्र्यानंतर ते अन्य क्षेत्रांतही विस्तारू लागले. ते विद्यार्थी, कामगार आदी संघटनांच्या स्वरूपात, राजकीय पक्षाच्या रूपात, शिक्षण, आरोग्य आदी प्रकल्पांच्या स्वरूपात, वेगवेगळया नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सेवा कार्याच्या स्वरूपात असे विस्तारू लागले. ही सर्व नागरी समाजाची क्षेत्रे आहेत. विश्व हिंदू परिषद वगळता निखळ धार्मिक क्षेत्रात अगदीच अपवादात्मक स्थितीतच संघाचे काम असेल. कारण संघाची स्थापना ही धार्मिक पुनरुज्जीवनासाठी झाली नसून आधुनिक काळातील संस्थाजीवनही हिंदू परंपरेत कालानुरूप परिवर्तन घडवून निर्माण करणे शक्य आहे हे सिध्द करण्यासाठी झाली आहे. फरक एवढाच आहे की इतर आधुनिक संघटनांत आधी विचार, मग कृती असते; मात्र संघ ही कृतिप्रधान संघटना असल्याने विशुध्द सामाजिक हिताची प्रेरणा घेऊन काम केले, त्या कृतीतून विचारांची चौकट आपोआपच तयार होत जाते यावर संघस्वयंसेवकांचा विश्वास असतो. आपल्या विचारांपेक्षा आपल्या कामातून संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा विश्वास संपादन केला आहे. समज-गैरसमजातून, विरोधातून किंवा द्वेषातून निर्माण झालेल्या टीकेचे प्रहार सोसूनही संघ वाढत राहिला आहे. संघाचा विचार प्रतिगामी असता, तर त्यातून आधुनिक काळाचा संदर्भ असलेली कामे उभी राहिलीच नसती. ती कधीच कालबाह्य झाली असती. विश्व हिंदू परिषदेची स्थापना करीत असतानाही, हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी धर्माचार्यांना एकत्र आणणे असाच त्या संस्थेचा उद्देश होता. त्यामुळे विचारातून व कार्यपध्दतीतून निर्माण झालेला संघाचा कार्यकर्ता हिंदू समाजाच्या ऐहिक हितासाठीच झटणारा असतो. तो परमार्थवादी नसतो.
मानसिक द्विधावस्था, द्वैत-अद्वैत संबंध
हिंदू समाजाने युरोपीय प्रबोधन काळातून निर्माण झालेली संस्थात्मक चौकट स्वीकारली, परंतु त्याला सुसंगत अशी मानसिकता निर्माण झालेली नाही. त्यामुळे व्यवस्था व मानसिकता या संघर्षातच सामाजिक कर्तृत्वशक्तीचा ऱ्हास होत आहे. केवळ भारताबाबतच नव्हे, तर जागतिक पातळीवरही प्रचलित व्यवस्था आंतर्द्वंद्वात सापडली आहे. एकेकाळी समाजवाद किंवा लोककल्याणकारी राज्य ही लोकशाही व आर्थिक न्याय या दोन्हीमध्ये सुसंवाद निर्माण करण्याची हमी मानली जात होती. पण त्यातून आलेल्या आर्थिक मंदीतून बाजारपेठीय मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकीकरण ही आर्थिक प्रगतीची हमी मानली जाऊ लागली. ब्रेक्सिट व ट्रंपच्या निवडीने याला धक्का दिला. फ्रान्सच्या निवडणुकीत उजव्या उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी उमेदवाराला पडलेली मते लोकांच्या विचाराची दिशा दाखवायला पुरेशी आहेत. युरोपमधील लोकांमध्ये जेव्हा स्वत:च्या राजकीय हक्कांची जाणीव झाली, तेव्हा त्यातून राष्ट्रवादाची भावना जागी झाली. त्या भावनेने भविष्यात अनेक वळणे घेतली. त्यातूनच ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँडस् आदी राष्ट्रांत त्याने साम्राज्यवादी राष्ट्रवादाचे रूप घेतले, जर्मनी, इटली, जपानमध्ये हुकूमशाही व आक्रमक राष्ट्रवादाचे रूप घेतले, तर आता त्याने प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाचे रूप घेतले आहे. याच काळात मानवी हिताचा व्यापक विचार करणाऱ्या मानवी हक्कांच्या संकल्पनेचाही उदय झाला. त्याच्या रक्षणासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाही स्थापन झालेल्या आहेत. त्या सर्वांना राष्ट्रवाद ही मानवी स्वातंत्र्य, मानवी हक्क, त्याची संवेदनशीलता यांना चिरडून टाकणारी हिंसक व आक्रमक संकल्पना वाटते. त्यामुळे संघ आणि मोदी यांची गणना ते त्यातच करतात. स्वत:ला मानवतावादी व पुरोगामी म्हणविणाऱ्या सर्वांनी हा पूर्वग्रह करून घेतल्याने त्यातून निर्माण झालेल्यांचे एक प्रस्थापित विश्व तयार झालेले आहे. एकेकाळी या विश्वाने बदलत्या जगाचे नेतृत्व केले होते. पण त्यांच्या विचारातून आपले प्रश्न सुटत नाहीत याची लोकांना जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे लोक वेगळा पर्याय शोधत आहेत. ही प्रस्थापित माध्यमे आता लोकमनाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यातच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे लोक यांना टाळून स्वत: एकमेकाशी संवाद साधू शकतात. त्यामुळे त्यांची चरफड आणखी वाढली आहे. एकेकाळी पश्चिमेने सर्व क्षेत्रांत नेतृत्व दिले होते, पण आज तशी स्थिती राहिलेली नाही.
याचे एक महत्त्वाचे मूलभूत कारण म्हणजे देकार्तने mind आणि matter यांची केलेली विभागणी. तर्कबुध्दीच्या आधारे कार्यकारणभावाचा विचार करून matterचा विचार करता येतो. त्याच्या मते mind गणिती पध्दतीत बसविता येत नाही. त्याचा परिणाम म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा विचार उपयुक्ततावादी पध्दतीने व केवळ तर्कवादाच्या आधारे केला जाऊ लागला. त्यातून अनेक विचारसरणी निर्माण झाल्या, व्यवस्थापरिवर्तनाचे प्रयोग झाले, त्यातून क्रिया-प्रतिक्रियांची साखळी निर्माण झाली. परंतु त्यातून मानवी समाधान कुठेतरी लुप्त झाल्याचा अनुभव येत गेला. माणूस म्हणून जगण्याचे उद्दिष्ट हरवत गेले. विज्ञानाची प्रगती झाली, पण त्या प्रगतीला कवेत घेईल अशी मानवी मनाची प्रगती झाली नाही. त्यामुळे व्यवस्था वाढत गेल्या, पण त्या पेलू शकणारी मानसिकता तयार झालेली नाही. पारंपरिक धार्मिक परंपरा ते करू शकत नाही, कारण नव्या व्यवस्था पेलण्याचा त्यांच्यात आवाका नाही. प्रचलित व्यवस्था अपयशी ठरत असल्याने काही काळ त्या आभासात्मक पलायनवादी आधार देऊ शकतात. पण त्यात खरी उत्तरे नाहीत. राजकीय व सामाजिक क्षेत्रांत व्यवस्था परिवर्तनापेक्षा मानसिक परिवर्तनाला महत्त्व देणारे तत्त्वज्ञान म. गांधींनी मांडले. जागतिक क्षेत्रातील विचारवंतांत या वेगळया दृष्टीकोनामुळे त्यांना महत्त्व प्राप्त झाले. पण ब्रिटिशांच्या हृदयपरिवर्तनातून भारताला काही स्वातंत्र्य मिळाले नाही. गेलेच, तर ते श्रेय दुसरे महायुध्द सुरू करणाऱ्या हिटलरला जाईल. त्यांचा हृदयपरिवर्तनाचा प्रयोग मुस्लीम लीगबाबतही अयशस्वी ठरला. भारताला फाळणी व त्यानंतरची हिंसा यांना तोंड द्यावे लागले. जगातील व्यवस्थांबाबत सार्वत्रिक अस्वस्थता आहे. त्यातील अनेक कोलमडून पडत आहेत. पारंपरिक राजकीय पक्षातील नेत्यांऐवजी राजकारणात नवख्या असलेल्या नेत्यांवर लोक विश्वास टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर एका विचारधारेच्या आधारे मोदी पंतप्रधान झाले आहेत. भविष्यकाळाचा विचार या सर्व पार्श्वभूमीवर केला पाहिजे.
mind आणि matter यांचे संबंध दोन समांतर जाणाऱ्या रेषांप्रमाणे आहेत की त्यांचा कुठल्यातरी पातळीवर विलय होणार आहे? तत्त्वज्ञानात्मक पातळीवर बोलायचे असेल, तर मानवी मन आणि व्यवस्था यांचे संबंध नेहमीकरिता द्वैतात्मक आहे की अद्वैतात्मक आहे? संघपरिवाराने या दृष्टीने एकविसाव्या शतकातही काम करू शकेल, असे काही 'मॉडेल' विकसित केले आहे काय? असे असेल, तर त्याचे स्वरूप कोणते? हे प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात, ज्याची उत्तरे आपण शोधली पाहिजेत.
kdilip54@gmail.com