मशिदीवरील लाऊडस्पीकर बंदी: एक अनोखा आणि अनुकरणीय प्रयोग

विवेक मराठी    22-Apr-2017   
Total Views |

सध्या गाजत असलेला, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी वाचा फोडलेला अत्यंत संवेदनशील विषय मी काही वर्षांपूर्वी म्हापसा शहरात थोड्या वेगळ्या पद्धतीने  हाताळला आणि त्यात यशस्वी झालो. सोनू निगम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी हा लेखन प्रपंच. 
काही वर्षांपूर्वी म्हापसा शहरातल्या प्रमुख मशिदीवरील दिवसातून 4-5 वेळा उच्च स्वरात वाजणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे सर्व समाज त्रस्त झाला होता. आजूबाजूला असलेल्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कारखाने इथे वावरणा-या सर्व मंडळींना त्याचा भरपूर त्रास होत होता. माझ्याही मनात काहीतरी केलं पाहिजे असं बऱ्याच दिवसापासून येत होतं. या विषयाला धार्मिक रंग न देता कायद्याचा आधार घेऊन काही करता येतं का याचा विचार केला आणि शेवटी एक नक्की योजना तयार केली. शाळेच्या पालकांची भेट घेतली, हॉस्पिटलच्या कर्मचारी, कारखान्याचे मालक व अन्य नागरिक यांना भेटलो व सर्व विषय सांगितला. सारे सहकार्य करायला तयार झाले. दहा जणांचा एक गट तयार केला व म्हापसा पोलीस स्टेशनच्या प्रमुखांची भेट घेतली व दहा जणांच्या स्वाक्षरीने अधिकृत तक्रार केली. तक्रारीचे सार असे - मशिदीवरच्या ध्वनिक्षेपकाच्या परवानगीची पोलिसांनी मागणी करावी. आम्हाला खात्री होती की, परवानगी असणे शक्यच नाही. कारण कायम परवानगी मिळणे अशक्य व पहाटे ध्वनिवर्धक लावण्यासाठी तर नाहीच नाही.
आम्ही मागणी केली की, कायदेशीर परवानगी घ्यावी व हवं ते करावं. कुठल्याही कार्यक्रमास ध्वनिवर्धक वापरायचा तर परवानगी लागते. म्हापसा पोलीस प्रमुखांनी मशिदीच्या कमिटीला बोलावणे पाठविले व त्यांच्याकडे लाऊडस्पीकर परमिशनची अधिकृत मागणी केली व दोन दिवसांची मुदत दिली. दोन दिवसांनी परत पोलीस स्टेशनमध्ये आमच्याबरोबर सर्वांची बैठक झाली. आमची अगोदरच भूमिका होती की कोणतीही तडजोड करायची नाही, ध्वनिवर्धक पूर्ण बंद झाला पाहिजे. पोलीस प्रमुखांनी कमिटीला स्पष्ट सांगितले की, एकतर परवानगी दाखवा वा पूर्ण बंद करा. अन्यथा आम्हाला ध्वनिवर्धकाचे सामान जप्त करावे लागेल. कमिटीने दोन दिवसांची मुदत मागून घेतली व पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितले की ते ध्वनिवर्धक बंद करतील.
सांगायला आनंद वाटतो की मुस्लीम धर्मीयांचे ठराविक सण वगळता सन 2004 पासून आजतागायत त्या मशिदीच्या बाहेर ध्वनिवर्धक नाही. मी त्याच मुस्लीम बांधवांचा वर्षातून एक रक्षाबंधन कार्यक्रम घेतो व ईदच्या दिवशी मित्रांबरोबर मी त्यांच्या घरी बिर्याणी व खीर खायला जातो. या सर्व प्रकरणात पोलीस प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली व समाजातील दोन गटांत कोणत्याही प्रकारची कटुताही राहिली नाही. या प्रकरणाशी कुठल्याही संघटनेचा किंवा संस्थेचा संबंध नाही. केवळ व्यक्तिगत पातळीवर मी हे हाताळले आहे. माझी सोनू निगम यांना आणि असे करू इच्छिणा-या अन्य लोकांना विनंती आहे की, त्यांनी हा मार्ग अवलंबून बघावा.
 
- संजय वालावलकर
म्हापसा, गोवा
9422065101

संजय वालावलकर

संजय वालावलकर हे गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.