मोसादचा विलक्षण गुप्तहेर

विवेक मराठी    28-Feb-2017
Total Views |

1956च्या सुवेझच्या युध्दानंतर वुल्फगँगला मोसादने या संघटनेत काम करण्याविषयी विचारले. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या केसाचा रंग भुरका (blond), त्याचे निळे डोळे व जर्मन भाषेवर प्रभुत्व. त्याचे धाडस व कुठलेही कृत्य करावयाची तयारी असल्यामुळेच मोसादने त्याचा विचार केला. त्याशिवाय एक महत्त्वाची बाब म्हणजे तो कुठेही 'ज्यू' म्हणून ओळखला गेला नसता. वुल्फगँगने नोकरी स्वीकारली व अत्यंत कठीण, कष्टमय, हेरगिरीच्या कामाला आवश्यक असणारे कौशल्य त्याने आत्मसात केले.


स्रायल... एक चिमुकले राष्ट्र. सीरिया, इजिप्त, इराक, जॉर्डन आणि लेबनॉन ह्या आजूबाजूच्या पाच मुस्लीम राष्ट्रांनी हे राष्ट्र वेढलेले आहे. सुरुवातीपासूनच इस्रायलच्या स्थापनेला या राष्ट्रांचा विरोध होता. इस्रायल अस्तित्वात आल्यानंतर ही पाचही राष्ट्रे इस्रायलला आपला शत्रू मानतात. ही पाचही राष्ट्रे इस्रायलच्या तुलनेत 50 पट भूभाग व्यापून आहेत व इस्रायलपेक्षा लोकसंख्येने ही राष्ट्रे 20 पट जास्त आहेत.

तालिबान, लष्कर-ए-तोयबा ह्या संघटनांतर्फे पाकिस्तान भारताशी जसे छुपे युध्द खेळतो, त्याचप्रमाणे ही राष्ट्रे अधूनमधून इस्रायलबरोबर युध्द चालू ठेवतात. सुरुवातीपासूनच इस्रायल सरकारच्या लक्षात आले की आपल्या सरहद्दी सुरक्षित ठेवण्याकरिता केवळ सैन्यावर अवलंबून न राहता, राष्ट्राचे परिणामकारक संरक्षण करेल अशी गुप्तहेर संघटना असणे आवश्यक आहे. शिन बेथ (Shin Beth) ह्या संघटनेकडे राष्ट्रीय सुरक्षिततेची जबाबदारी आहे. अलियाह बेथ (Alliyah Beth) ही संघटना पॅलेस्टाइनमध्ये घुसखोरी करण्याकरिता, तसेच या राष्ट्रांमधील ज्यूंना सुरक्षित आणण्याकरिता अस्तित्वात आली. अमन नावाची गुप्तहेर संघटना ही सैन्याकरिता - विशेषत: या पाच राष्ट्रांविषयी, त्यांचे सैन्य, शस्त्रास्त्रे, शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने यांच्याविषयी माहिती मिळवण्याकरिता निर्माण केली व नंतर मोसाद (MOSSAD) म्हणजे Institute for Intelligence and special assignments ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघटना निर्माण केली. मोसादचे मुख्य काम म्हणजे परराष्ट्रात ज्या काही हालचाली चालतात, त्यांचे निरीक्षण करून इस्रायलचे सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने काम करणे. Special assignments म्हणजे इस्रायली सरकार, सैन्य, पोलीस यांना करता न येणारी कामे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी असणारी कामगिरी. अमेरिकेतील टाइम मॅगझीनच्या मते, जगातील ज्या प्रमुख गुप्तहेर संघटना आहेत - उदा. अमेरिकेची C.I.A. रशियाची KGB, इंग्लंडची MI6 - या संघटनांइतकीच मोसाद कर्तबगार आहे. अर्थात अमेरिका किंवा रशियाकडे याकरिता जेवढा पैसा उपलब्ध आहे, तेवढा पैसा इस्रायलकडे नसेल; पण ह्या संघटनेचा दबदबा व कामगिरी ह्या संघटनांच्या बरोबरीची आहे.

मोसादचे काही कर्तृत्ववान व धाडसी हेर होऊन गेले, त्यामध्ये एली कोहेन (Eli Cohen) व वुल्फगँग लोट्झ ही दोन नावे प्रमुख आहेत. त्यातील वुल्फगँग लोट्झविषयी हा परिचयात्मक लेख.

लोट्झ हा जर्मनीमध्ये जन्मलेला ज्यू! मॅनहाइम या शहरात 1921 साली याचा जन्म झाला. वडील व आई विशेष धार्मिक नव्हते, म्हणून त्यांनी लहानपणी लोट्झची 'सुन्ता' केली नाही. (याचा त्याला फायदा झाला.) लोट्झ 10 वर्षांचा झाल्यानंतर जर्मनीमध्ये ज्यूंना ज्या तऱ्हेने वागणूक मिळत होती, ती पाहून लोट्झची आई त्याला घेऊन पॅलेस्टाइनमध्ये आली. ती कलाकार असल्याने एका नाटयसंस्थेत काम मिळवून उदरनिर्वाह करू लागली.

त्यानंतर वुल्फगँगने एका शेतकी शाळेत शिक्षण घेऊन त्यात प्रावीण्य मिळवले. शिवाय त्याने घोडे शिकवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले.

दुसऱ्या महायुध्दाच्या सुरुवातीला त्याने ब्रिटिश सेनेत प्रवेश घेतला. जर्मन, अरेबिक, हिब्रू आणि इंग्लिश या भाषांवर त्याचे प्रभुत्व असल्याकारणाने इजिप्तमध्ये त्याची बदली करण्यात आली व त्याचे काम म्हणजे जर्मन युध्दकैद्यांविषयी माहिती (Interrogation) करून घेणे.

युध्द संपल्यानंतर वुल्फगँग पॅलेस्टाइनमध्ये परत आला व तेथे त्याने हैफा (Haifa) येथील तेल शुध्दीकरण कंपनीत नोकरी मिळवली. पण तेथे तो स्वस्थ बसला नाही. तेथे त्याने हेगनाह (Haganah) ह्या ज्यू इस्रायली गुप्त संस्थेकरिता शस्त्रे जमा करण्याचे काम हाती घेतले. 1956च्या सुवेझच्या युध्दानंतर वुल्फगँगला मोसादने या संघटनेत काम करण्याविषयी विचारले. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या केसाचा रंग भुरका (blond), त्याचे निळे डोळे व जर्मन भाषेवर प्रभुत्व. त्याचे धाडस व कुठलेही कृत्य करावयाची तयारी असल्यामुळेच मोसादने त्याचा विचार केला. त्याशिवाय एक महत्त्वाची बाब म्हणजे तो कुठेही 'ज्यू' म्हणून ओळखला गेला नसता. वुल्फगँगने नोकरी स्वीकारली व अत्यंत कठीण, कष्टमय, हेरगिरीच्या कामाला आवश्यक असणारे कौशल्य त्याने आत्मसात केले.

1957च्या सुमारास नासेरने बऱ्याच जर्मन कार्यकुशल लोकांना इजिप्तमध्ये नोकऱ्या देण्याचे धोरण स्वीकारले. हे जर्मन पूर्वीचे 'नाझी', बेघर झालेले. त्यात शास्त्रज्ञ, इंजीनिअर्स, डॉक्टर्स, पोलीस वगैरेंना नोकऱ्या देण्यात आल्या. इस्रायलला काळजी होती की नासेरने नेमलेल्या एअरक्राफ्ट व एरोस्पेस इंजीनिअर्सनी तेथे कसले काम स्वीकारले असेल? त्याकरिता त्यांनी वुल्फगँगची निवड केली. कारण तेथील जर्मन लोकांत हा सहज मिसळून जाईल व त्यांनाही याचा संशय येणार नाही.

1959मध्ये वुल्फगँगला जर्मनीत विशेष शिक्षणाकरिता पाठवण्यात आले. तेथील जर्मन अधिकाऱ्यांना त्याने सांगितले की मला आता जर्मनीतच राहावयाचे आहे. तेथे बर्लिन, म्युनिच वगैरे ठिकाणी राहून 1961मध्ये मोसादने त्याला इजिप्तला जाण्याचा हुकूम दिला. कैरोला गेल्यानंतर त्याने प्रथम काय केले असेल, तर तेथील अश्व प्रशिक्षण क्लबशी (Horse Training clubशी) संपर्क वाढवला. कर्मधर्मसंयोगाने 'गेझिरा' (Gezira) या भागातील कॅव्हलरी क्लबमध्ये त्याला संधी प्राप्त झाली. तेथे त्याची इजिप्तमधील पोलीस दलाचे प्रमुख युसुफ आली गहोरब यांच्याशी ओळख झाली. ''आपण घोडयांची पैदास (breeding) करून अश्वारोहण (riding) शिकवतो'' अशी स्वतःची ओळख करून दिली. दोघांची दोस्ती जमली. त्यामुळे त्याला तेथे डिनर पार्टी, कॉकटेल पार्टी वगैरेची आमंत्रणे येऊ लागली व घोडयांची पैदास व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्याच्या ओळखी वाढत गेल्या. लोट्झ दिसावयास आकर्षक होता. त्यामुळे तेथील उच्चवर्गातील अधिकाऱ्यांच्या बायकांशी त्याच्या ओळखी झाल्या. त्यांच्यावर त्याने निरनिराळया भेटवस्तूंचा वर्षाव करण्यास सुरुवात केली व आपले बस्तान बसवले. त्याने बरेच घोडे खरेदी करून पोलीस प्रमुख गहोरब याच्या मदतीने तेथील कॅव्हलरी क्लबमध्ये आपले घोडे ठेवण्याची व्यवस्था केली.

त्यानंतर सहा महिन्यांनी लोट्झ जर्मनीला युरोपमध्ये अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्याकरिता रवाना झाला. येताना त्याने खूप पैसे व घोडयावर बसण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या लांब बुटांच्या (Riding Bootsच्या) पोकळीत एक रेडिओ ट्रान्समिटर कस्टमला फसवून कैरोत आणला. पण मध्यंतरी त्याने वालट्रॉड मार्था न्यूमन ह्या पूर्व जर्मनीतील मुलीशी लग्न केले होते व मोसादला त्याविषयी कळवले होते. मोसादला ही घटना आवडली नाही. पण त्याला नाइलाज होता. (शिवाय लोट्झने मार्थाला आपण गुप्तहेर असून काम करतो असे सांगितले होते.)

अलेक्झांडि्रया बंदरात बोट आल्यानंतर पोलीस प्रमुख गहोरबने त्याचे स्वागत केले व तेथून कैरोला गेल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ एक मोठी पार्टी दिली.

लोट्झला महिन्याला फक्त 850 डॉलर्स पगार मिळत होता. पण त्याचा खर्च जबरदस्त होता. तेथे त्याने बरेच अरबी घोडे विकत घेतले व अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र (Riding School) चालू केले व राहण्याकरिता कॅव्हलरी क्लबजवळ प्रशस्त जागा घेतली. पिरॅमिड्सजवळील गिझा या भागात तबेले भाडयाने घेतले व घोडयांचे शिक्षण चालू केले.

सैन्यातील व तेथील सरकारी अधिकारी हॉर्स ट्रेनिंगकरिता तेथे येत असत, त्यांच्याशी ओळखी वाढल्या व तेथे इजिप्तमधील इंटेलिजन्समध्ये अधिकारी असलेले ब्रिगेडिअर जनरल फौद उस्मान आणि कर्नल मोहसेन सैद ह्यांच्याशीदेखील त्याचा परिचय झाला. So far so good!

उस्मानकडे येथील रॉकेट तळ (rocket bases)े, सैनिकी कारखाने यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. आणि याविषयीच लोट्झला माहिती गोळा करावयाची होती.

हुसेन अल शेफी हा तेथील मंत्री परिषदेचा उपाध्यक्ष व नासेरचा सल्लागार हादेखील लोट्झच्या पार्टीत येत असे. तो तर इतर अधिकाऱ्यांना काही माहिती देण्याअगोदर लोट्झला बरीच माहिती देत असे. एकंदरीत ह्या पाटर्यांकरिता होणाऱ्या खर्चाचा योग्य मोबदला मिळत असल्याचे लोट्झला दिसून आले. ह्या इजिप्शियन्सव्यतिरिक्त कैरोमध्ये बऱ्याच जर्मन अधिकाऱ्यांशी लोट्झचे संबंध प्रस्थापित होत होते. ह्यामध्ये फ्रॅन्झ आणि नादिया किसोव या दांपत्याशी, तसेच गेरहार्ड बाऊच ह्या अधिकाऱ्याशी संबंध वाढले होते. एके दिवशी तर कमालच झाली. जनरल फौद उस्मान याने लोट्झला बाजूला नेऊन सांगितले, ''वुल्फगँग, एका गोष्टीची काळजी घे. हा बाऊच आहे ना, तो तुझ्याजवळ येऊन प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करतो. हा स्वत: एक उद्योजक म्हणून वावरत आहे, पण आम्हाला माहीत आहे की हा बाऊच बॉन गव्हर्नमेंट (जर्मन)चा गुप्तहेर आहे. राष्ट्राध्यक्ष नासेरना जर्मन सरकारशी चांगले संबंध ठेवावयाचे आहेत, म्हणून आम्ही तिकडे जास्त लक्ष देत नाही. एवढेच नव्हे, तर बाऊचला जी माहिती मिळते, ती C.I.A.कडेदेखील जाते. तू जर्मन असल्याकारणाने तुझा कदाचित तो उपयोग करून घेईल. तेव्हा जरा जपून. हेरगिरी हा किती घाणेरडा व्यवसाय आहे, याची तुला कल्पना नाही. म्हणून तुझ्यासारख्या साध्याभोळया (naive) मित्रास मी हे सांगत आहे.'' लोट्झने फौद उस्मानचे आभार मानले आणि सांगितले, ''मी आता यापुढे बाऊचबद्दल सावधगिरी बाळगेन!''

लोट्झला मोसादकडून जर्मन बांधवांविषयी माहिती मिळतच होती. त्यामध्ये एक जोहान-फोन-लिअर्स हा तर गोबेल्सचा मित्रच होता. या लिअर्सच्या घरी डॉ. इसेल या सुप्रसिध्द जर्मन मनुष्याशी ओळख झाली होती, ज्याने जर्मनीतील यातना तळांमध्ये असंख्य जर्मन ज्यू स्त्रिया-पुरुष-मुलांवर घाणेरडे प्रयोग केले होते. त्याला येथे जीवरासायनिक युध्दतंत्राविषयी संशोधन करण्यासाठी नोकरी दिली होती.

त्याचबरोबर किसोव दांपत्यानेदेखील ''काही जर्मन नाझींपासून सावध राहावे'' असा इशारा दिला होता. पण लोट्झ त्यांना सांगायचा, ''मला राजकारणाचा तिरस्कार आहे.''

ह्या सगळया पाटर्यांकरिता होणारा खर्चदेखील मोसादला परवडण्यासारखा नव्हता. मोसादमधील अकाउंटंट्ने लोट्झचे वर्णन 'शँपेन स्पाय' (The champagne spy) असे केले होते. त्याचे खर्च मोसादला पेलणे कठीण होते. गहोरब या पोलीस प्रमुखाच्या मुलीचे नाक वाकडे होते, ते सरळ करण्याकरिता आलेल्या खर्चाचे डॉक्टरांचे अवाढव्य बिल त्याने मोसादकडे पाठवले होते. मोसादला ते पैसे द्यावे लागले!

जनरल अबदुल सलेम हा आपल्या सैनिकांना सोव्हिएत रशियाचे आधुनिक शिक्षण देत असल्याची माहिती दिली होती. एवढेच नव्हे, तर त्याने लोट्झला एका सैनिक कवायतीसाठी बरोबर नेले होते. या सर्वांकडून त्याला सुवेझ कालव्याभोवती असलेल्या सैनिकी तळांची बातमी मिळाली होती. एके दिवशी लोट्झ दांपत्याला तेथील विमानतळावर असलेल्या मिग विमानांचा ताफा बघण्याचे आमंत्रण मिळाले. त्याने त्याचे फोटोदेखील काढले. एवढेच नव्हे, तर तेथील अधिकाऱ्यांनी त्याला त्या विमानांसोबत काही खोटी (dummy) विमानेसुध्दा उभी आहेत असे सांगून इस्रायलने बाँबफेक केल्यास त्यांची फजिती होईल, असेही सांगितले.

मोसादकडून एकदा संदेश आला - 'इस्मालिया शहराजवळ, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (Ground to air missilesचा) रशियन सरकारचा अड्डा आहे, त्याची माहिती कळव.' लोट्झ आपल्या बायकोला घेऊन गेला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. लोट्झने सांगितले, ''तुम्ही फौद उस्मानशी किंवा गहोरबशी बोलू शकता.'' हे ऐकल्यानंतर तेथील अधिकारी लोट्झ दांपत्याला भोजनाला घेऊन गेले.


एकदा मोसादकडून संदेश आला - 'इजिप्तने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे, त्याची आम्हाला संपूर्ण माहिती हवी आहे. बघू या, तुझ्या पाटर्यांचा काही उपयोग होतो का?' सहा आठवडयांत लोट्झने तेथे काम करणाऱ्या जर्मन अधिकाऱ्यांची नावे व पत्तेही मोसादला कळवले. एवढेच नव्हे, तर प्रत्येक अधिकारी काय काम करत होता हेदेखील कळवले. ह्या क्षेपणास्त्राकरिता लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टिमची मायक्रोफिल्मदेखील मोसादला रवाना केली.

1964मध्ये लोट्झने आणखी घोडे खरेदी केले व एका अधिकाऱ्याने घोडयांच्या तबेल्यांकरिता 'अबेसिया' या भागातील एका लष्करी तळाजवळ जागा दिली! नशीब फळफळले. नाइल नदीच्या आसपास कैरोपासून दहा मैलांवर घोडेस्वारांच्या प्रशिक्षणाकरिता जागा मिळवली. तेथे जवळच मिलिटरीचे रॉकेट्सचे केंद्र होते.

एकदा लोट्झने फ्रेंच चीजच्या पार्सलच्या खाली केलेल्या पोकळीत भयानक धोकादायक स्फोटके लपवून इटलीला पाठवली होती, तेथून ती मोसादकडे रवाना झाली. ह्या स्फोटकांचे पार्सल बाँब व पत्र बाँब करून जर्मन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यात काही मरण पावले व काही जखमी झाले. एका जर्मन अधिकाऱ्याला पत्र रवाना झाले - तुझी मुले व बायको यांची तुला काळजी असेल, तर तू ताबडतोब आपल्या जागेचा राजीनामा दे, नाहीतर फार गंभीर परिणाम होतील.

त्याचबरोबर नशिबाचे चक्र उलटे फिरू लागले. कैरोमधील रशियन अधिकाऱ्यांनी नासेरकडे तक्रार केली की गेहलेन (Gehlen) ही जर्मनीची गुप्तहेर संघटना तेथे कार्यरत असून ती संघटना अमेरिकेच्या C.I.A.लादेखील गुप्त बातम्या कळवत असते. नासेरने तीस जर्मन अधिकाऱ्यांना अटक केली. लोट्झ गेरहार्ड बाऊचशी संबंध ठेवत असल्याने लोट्झला व त्याच्या बायकोलादेखील अटक करण्यात आली. गेरहार्ड बाउच हा हेरगिरी करत असल्याचा संशय होता. त्यामुळे लोट्झला अटक केली गेली. ज्या तीस जर्मन अधिकाऱ्यांना अटक केली होती, त्यात लोट्झ होता. त्याबद्दल जर्मनीच्या दूतावासाने इजिप्त सरकारकडे तक्रार केली. इजिप्त सरकारने सांगितले की पूर्व जर्मनीचे अध्यक्ष वॉल्टर उलब्रिख्ट येत असल्याने ही सुरक्षात्मक (Preventive) कैद आहे. तरीही पोलिसांच्या पध्दतीप्रमाणे लोट्झची चौकशी चालू झाली. त्याला सरळ विचारण्यात आले, ''तुझ्याजवळची सर्व उपकरणे आमच्या स्वाधीन कर. आम्हाला सर्व माहीत आहे. तेव्हा आमचा व तुझा वेळ व्यर्थ घालवू नकोस.''

लोट्झने सांगितले, ''बाथरूमध्ये वजनाचा काटा आहे, त्यात रेडिओ ट्रान्समिटर लपवून ठेवला आहे.'' हा रेडिओ ट्रान्समिटर अत्यंत आधुनिक असून जगातील सर्वोत्तम समजला जात असे. बाथरूममधील साबणामध्ये स्फोटक व मायक्रोफिल्म दडवली होती, तेही सांगितले.

लोट्झला खास चौकशी केंद्रात नेण्यात आले. लोट्झला दोन गोष्टी करावयाच्या होत्या - आपल्या बायकोला वाचवायचे होते व कमीत कमी माहिती द्यावयाची होती. त्यात लोट्झ वाकबगार होता. लोट्झने सांगितले, ''मी युध्दानंतर जर्मनीत गेलो. तेथे मला रायडिंग क्लबमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तेथे एक एल्यास गॉर्डन म्हणून भेटला. त्याने त्याला आपण अरबी घोडे बाळगणार असून इजिप्तमध्ये ट्रेनिंग सेंटर चालू करणार असल्याचे सांगितले व मला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. कैरोत आल्यानंतर माझ्या लक्षात आले की आम्ही इस्रायलतर्फे हेरगिरी करीत आहोत. हे सर्व नाटक आहे. माझ्या लक्षात आले की मी नाही म्हणून सांगितले, तर इस्रायली माझा प्राणही घेतील. म्हणून मी नाइलाजाने तेथे नोकरी चालू ठेवली. त्या दोघांनी मला फोटोग्राफी शिकवून ते मोसादला फोटो पाठवत असत. एवढेच नव्हे, तर त्यांनी जर्मन अधिकाऱ्यांना पत्र बाँब व पार्सल बाँब पाठवावयास सांगितले. माझी फार वाईट स्थिती होती.'' लोट्झने ही बनावट कथा इतक्या कौशल्याने सांगितली की त्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच सुमारास एली कोहेन ह्या गुप्तहेराला सीरियन सरकारने अटक केली होती. त्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे लोट्झची आणखी तपासणी करण्यात आली. ''तू जर जर्मन आहेस आणि ज्यू नाहीस असे सांगत असलास, तर आम्हाला तुझी शारीरिक तपासणी करावयाची आहे.'' त्याच्या आईने त्याची सुन्ता केली नसल्याचा त्याला फायदा झाला. कसून तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला कपडे घालावयास सांगितले. एकंदरीत तो ज्यू नसल्याची त्यांची खात्री झाली.

उलटतपासणी करणारा अधिकारी सलाह नसर हा इजिप्शियन इंटेलिजन्सचा वरिष्ठ अधिकारी होता. त्याने लोट्झला सांगितले, ''आम्ही तुला फाशी देण्याकरिता उत्सुक नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी गुप्तहेराची कारकिर्द संपली आहे. परंतु तू आम्हाला सहकार्य कर, म्हणजे तुला त्रास होणार नाही. आम्हाला तुझी सविस्तर माहिती दे. तुझे आणखी कोणी सहकारी, त्यांची नावे, तसेच तुला कोणी प्रशिक्षण दिले, हे सर्व सांग.'' त्याच वेळेस मोसादचा क्र. 1चा गुप्तहेर एली कोहेन पकडला गेला होता. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. लोट्झने इतक्या कौशल्याने आपला बचाव केला की त्यामुळे इस्रायल व तो स्वत: जास्त पेचात सापडले नाहीत. त्याच्या बायकोच्या आईवडिलांची सुटका करण्यात आली, पण बायकोची सुटका झाली नाही.

लोट्झ टीव्हीवर निवेदन करण्यास तयार झाला. त्याने निवेदन केले - मी 1961पासून इस्रायलकरिता इजिप्तमध्ये हेरगिरी करीत होतो. सुवेझ कालव्याच्या आवतीभोवती असणारी रशियाची मिसाइल केंद्रे व इतर बऱ्याच गोष्टी कळवल्या. मला याचा पश्चात्ताप होत आहे. मी हे पैशाकरिता केले. मला चांगली वागणूक मिळाली. इस्रायलला मी हे सांगू इच्छितो की त्यांनी यापुढे आपली माणसे पाठवावीत. त्याकरिता माझ्यासारख्या जर्मन मनुष्याचा उपयोग करू नये.

आपण जर्मन आहोत हे सिध्द करण्याकरिता व मोसादला वाचवण्यासाठी त्याने जर्मन (पश्चिम) राष्ट्राकरिता हे निवेदन केले.

जुलै 1965मध्ये त्याच्यावरील खटला चालू झाला. त्या दोघांच्या बचावाकरिता एक वकील देण्यात आला. इजिप्तला एवढेच दाखवावयाचे होते की ते एक सुसंस्कृत राष्ट्र आहे व तो जर्मन असूनसुध्दा आम्ही त्याला चांगली वागणूक दिली. कबुलीजबाबात लोट्झने सांगितले की, ''माझा पहिला ट्रान्समिटर बिघडल्याने व दुरुस्त करण्यासारख्या नसल्याने त्याचे तुकडे तुकडे केले व नाइलमध्ये फेकून दिले. मी ती जागा दाखवावयास तयार आहे. माझ्या ट्रान्समिटरमुळे माझ्या बायकोला याबद्दल थोडीशी कल्पना आली. तिची कल्पना झाली की मी हे नॅटो (NATO) करिता करत आहे.'' लोट्झच्या बायकोने सांगितले, ''मी हे सर्व त्याच्यावरील प्रेमामुळे सहन केले.'' तिने कोर्टाला सांगितले, ''माझ्या नवऱ्याचा छळ करू नका.'' लोट्झच्या बचाव करणाऱ्या वकिलाने सांगितले की हा मोसादकरिता काम करीत आहे, याची वालट्रॉडला (लोट्सच्या बायकोला) अजिबात जाणीव झाली नाही. ती इस्रायलचा तिरस्कार करते. लोट्झ एकदा अग्निपरीक्षेतून वाचला. ह्या खटल्यादरम्यान म्युनिकच्या एका वकिलाने कोर्टाला कळवले की लोट्झ हा इस्रायली नागरिक आहे. त्याने असेही सांगितले की, तो जर्मनी सोडून गेला, तसेच त्याची आई ज्यू होती. त्याने पुढे सांगितले की, लोट्झ इस्रायलच्या सैन्यात एक अधिकारी होता, तो मोसादचा माणूस आहे. लोट्झने सांगितले, ''हा सगळा बनाव आहे. जर्मनीतील जे शास्त्रज्ञ येथे रॉकेट्स केंद्रात काम करीत होते, त्यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे ते असा सूड घेत आहेत. माझी आई ज्यू नसून प्रोटेस्टंट होती व 1944 साली बर्लिनवर जेव्हा इंग्लंडच्या विमानांनी बाँबहल्ले केले, त्यात ती मरण पावली. मी इस्रायलला 1964मध्ये गेलो होतो व तेथे फक्त सहा दिवस होतो. युरोपमधील माझ्या वरिष्ठांनी तेथे मोसादच्या मेयार ह्या अधिकाऱ्याला भेटण्यास पाठवले होते. ह्या पत्रामधील एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे माझा जन्म मॅनहाइम येथे झाला.'' कोर्टाने हा बचाव स्वीकारला.

लोट्झला 21 ऑगस्ट 1965 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व 33000 इजिप्शियन पाउंड्स दंड आकारण्यात आला. बायकोला 3 वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. 1000 पौंड दंड ठोठावण्यात आला. इजिप्शियन पोलीस प्रमुख गहोरब यालासुध्दा कैद करण्यात आले.

तुरुंगात लोट्झला चांगली वागणूक मिळाली. बायकोला भेटण्याची परवानगी मिळाली. इजिप्तमध्ये बाँबस्फोट घडवून आणणाऱ्या हिक्टर लेव्हीशी तेथील तुरुंगामध्ये त्याची भेट झाली. लेव्हीने तेथे जवळजवळ 11 वर्षे कैदेत काढली होती. 'तुरा' येथील तुरुंगामध्ये राजकीय कैदी ठेवत असत, तेथे लोट्झला ठेवण्यात आले होते.

1967मध्ये इजिप्त-इस्रायलचे सात दिवसांचे युध्द झाले. तेव्हा त्या कैद्यांना अतिसुरक्षित विभागात ठेवण्यात आले होते. मोसाद ह्या बाबतीत काही करू शकत नव्हते. पण युनोचे अध्यक्ष यू थांट यांच्या मध्यस्थीमुळे इजिप्त व इस्रायल यांच्यात बोलणी चालू होती. इस्रायलने इजिप्तच्या 5000 युध्दबंदींच्या मोबदल्यात इस्रायलच्या पायलट्सच्या व इतर अधिकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली. एवढेच नव्हे, तर इस्रायलच्या युध्दकैद्यांमध्ये इजिप्तच्या नऊ जनरल्सच्या व बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यात दहा इस्रायली गुप्तहेरांची सुटका करण्याची मागणी केली. ह्या दहा इस्रायली गुप्तहेरांच्या यादीत सर्वप्रथम वुल्फगँग लोट्झ व त्याची बायको वॉलट्रोड यांची नावे होती! ह्या वाटाघाटी जवळजवळ 9 महिने चालू होत्या. कोणालाही मान खाली घालावी लागणार नाही म्हणून वर्तमानपत्रात ह्या हेरांची नावे येणार नाहीत अशी काळजी घेतली गेली. त्याशिवाय इस्रायलने राष्ट्राध्यक्ष नासेर यांनी मानवी दृष्टीकोन स्वीकारून निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली. एवढेच नव्हे, तर इस्रायलने कोणतीही अट न घालता इजिप्तच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुटका केली.

नासेरने आपला शब्द पाळला. जे गुप्तहेर होते, त्यांना असाध्य रोगाने पछाडल्याकारणामुळे, काहींना कॅन्सर झाला म्हणून, तर काही जणांना हृदयरोग झाल्याकारणाने मानवी दृष्टीकोनातून सोडण्यात आले.

लोट्झ दांपत्याला कैरोला आणून 4 फेब्रुवारी 1968 रोजी त्यांना म्युनिकला पाठवण्यात आले. तेथून पुढे लंडनला व नंतर तेल अवीवला नेण्यात आले. लंडनला लोट्झ दांपत्याने लंडनमधील माक्र्स ऍंड स्पेन्सरच्या दुकानातून नवे कपडे विकत घेतले व त्या कपडयांत ते तेल अवीवला उतरले.

लोट्झ दांपत्य काही दिवस तेल अवीवमध्ये राहिले. त्याचे टोपणनाव 'सुस' (Sus) म्हणजे घोडा असे होते. लोट्झने तेथे अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र चालू केले आणि त्याची बायको वॉलट्रॉड हिने हिब्रू भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांनी अल्पश: आजारानंतर वॉलट्रॉडचे निधन झाले. नंतर लोट्झचे दुर्दैव आड आले. त्याची अश्वशाळा बंद करण्याची वेळ आली आणि 1974मध्ये लोट्झ अमेरिकेत गेला. पण तेथे त्याला फार यश प्राप्त झाले नाही. प्रथम तो लॉस एंजेल्समध्ये राहिला. त्यानंतर तो सिऍटल येथे गेला व त्याने निओमी ह्या इस्रायली मुलीशी लग्न केले. तेथे त्याने प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली. परंतु तेथे दुर्दैव पुन: आड आले. त्याच्या भागीदाराच्या बायकोने कंपनीचे सर्व पैसे घेऊन ती फरार झाली. कंपनी बंद पडली.

1978मध्ये लोट्झ 1000 डॉलर्स घेऊन म्युनिकला गेला. तेथे त्याने एका डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये सेल्समनची नोकरी केली. परंतु पगार फार तुटपुंजा होता. शेवटी बिचाऱ्याला मोसादच्या 200 डॉलर्सच्या पेन्शनवर गुजराण करण्याची वेळ आली.

आपल्याला पुन्हा कैरोला जाण्यास मिळाले तर किती बरे होईल, असा त्याच्या मनात विचार येत असे. अर्थात हे शक्य नाही हे त्याला ठाऊक होतेच.

ज्या लोट्झने कैरोमध्ये हजारो पौंड खर्च करून शँपेन पाटर्या  दिल्या व इतरांनी दिलेल्या पाटर्यांची मजा चाखली, त्या लोट्झवर हलाखीचे जीवन जगण्याचा प्रसंग आला. 'परिस्थितीचा किंकर असे प्राणिमात्र' हेच खरे.                                 

022-28728226