मराठवाडा म्हटले की सततचा दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दोन गोष्टी प्रकर्षाने डोळयासमोर येतात. या भागात ज्या ज्या वेळी जलव्यवस्थापनाचा विषय निघतो, तेव्हा इस्रायल देशाचे उदाहरण समोर ठेवले जाते. आश्चर्याची गोष्ट अशी की, शासन व जनता यांच्या एकजुटीने गावाचा कसा कायापालट होतो आणि 'मराठवाडयाचे इस्रायल' म्हणून गावाची ओळख कशी निर्माण होऊ शकते, याचे उदाहरण जालना जिल्ह्यातच आहे. मृद्संधारण आणि जलसंधारण या दोन्हीच्या आधारे या गावाचा अविश्वसनीय कायापालट करण्यात आला आहे. 'कडवंची' असे त्या गावाचे नाव. त्याची ही यशोगाथा.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाडयात यंदाच्या पावसाने दिलासादायक चित्र निर्माण केले असले, तरी मार्चच्या पुढे हे चित्र असे दिसेलच असे नाही. उन्हाळयात पुन्हा पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. यास जालना जिल्हाही अपवाद नाही. या जिल्ह्यात वार्षिक सरासरी 650 ते 750 मि.मी. पावसाचे प्रमाण असले, तरी 350 ते 450 मि.मी. इतकाच पाऊस पडतो. इथून गोदावरी नदी वाहत असली, तरी तिचा फायदा दक्षिणेच्या सीमेलगतच्या गावांना होतो. दुधना, कुंडलिका, पूर्णा या उपनद्या या जिल्ह्यात असल्या, तरी दुष्काळामुळे त्या कोरडयाच असतात. अंबड, घनसांगवी, मंठा व जालना तालुक्यात पाण्याचे क्षेत्र जेमतेम असल्याने मोसंबीच्या बागा पाहायला मिळतात. उर्वरित जिल्ह्यात पावसाळयानंतर ओसाड माळरान नजरेस पडते. अशा जालना शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रस्त्यावर कडवंची गावच्या हद्दीत प्रवेश केल्यावर मात्र आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळेल.
साधारण तीन हजार लोकसंख्येचे हे गाव. मराठा, धनगर, माळी, कुंभार व मातंग समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. वीस वर्षापूर्वीपर्यंत कडवंची हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते. या वर्षीचा अपवाद वगळता या गावात आतापर्यंत 300 मि.मीटरच्यावर कधी पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस आणि तूर या पिकांवर अवलंबून असणारे येथील शेतकरी उन्हाळयात पोटापाण्यासाठी शहराकडे स्थलांतर करत असत. गावात बेकार तरुणांचे थवे पाहायला मिळत. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते. शिक्षणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे गावात परिवर्तन घडवू पाहणारे नेतृत्व उदयास आले नव्हते. अज्ञानाच्या अंधारात अडकलेल्या इथल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा राहत होता. या अनुभवामुळे अनेक कुटुंबांचा शेतीवरचा विश्वास उडाला होता. असे हे गाव शेतीच्या माध्यमातून समृध्द होण्यासाठी 1993 साली, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची येथे मराठवाडा शेती साहाय्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी जलसंधारणाच्या प्रकल्पाची तयारी करण्यात आली. 1994 साली शासनाच्या वतीने जालना कृषी विज्ञान केंद्राने मृद्संधारणाचे काम हाती घेतले. याचा पहिला प्रयोग कडवंची गावात सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे 1.36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे विजय बोराडे यांनी हे काम 1.22 कोटीत पूर्ण केले. या प्रयोगशील कामासाठी पंडित वासरे या कर्तव्यदक्ष कृषी अभियंत्याची निवड झाली. वासरे यांना शेतीविषयी आत्मीयता असल्याने त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मृदेच्या व पाणलोटाच्या कामाविषयी शेतकरी उदासीन होते. नंतर कृषीभूषण विजयअण्णा बोराडे व कृषी अभियंता वासरे यांनी कडवंचीच्या ग्रामस्थांना मृदा आणि जल यांच्या संधारणाचे महत्त्व पटवून दिले आणि या गावाचे रूप पालटले.
मृदा व जल यांच्या संधारणाच्या कामांची फलश्रुती
गेल्या चाळीस वर्षांत मराठवाडयात दुष्काळ निवारणाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चा कार्यक्रम झाला. मात्र या कामाची फलश्रुती काय? याचे उत्तर सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या परस्पर सहकार्यातून गाव सुजलाम् सुफलाम् कसे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाडयातलेच कडवंची हे गाव. मृद्संधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे 200 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, हे कडवंची गावाने दाखवून दिले आहे. जालना कृषी विज्ञान केंद्राने इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात काम सुरू केले. माथा ते पायथा उपचारामध्ये सुरुवातीला मृद्संधारणासाठी डोंगरमाथ्यावरून पाणलोटाच्या पायथ्याकडे कामे केली. पुढे पडिक जमिनीवर सलग समतल चर, खासगी वहिती जमिनीवर बांधबंदिस्ती केली. नॅशनल ब्युरो ऑॅफ सॉईल सर्व्हे ऍंड लँड यूज प्लॅनिंग या संस्थेने जमिनीची धूप झाल्याने पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यानुसार प्रतिहेक्टरी सरासरी 25 टन माती दर वर्षी वाहून जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही माती जमिनीचा वरचा थर असल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य घटक (नत्र, स्फुरद, पालाश) वाहून घेऊन जाते व त्याचा परिणाम जमिनीच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे पिकांचे उत्पादन 25-40 टक्क्यांनी कमी होते. या सर्व नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून कडवंची पाणलोट क्षेत्रात प्रचलित पध्दतीतील निव्वळ तांत्रिक निकष न वापरता शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे तांत्रिकदृष्टया योग्य शेत बांधबंदिस्ती करण्यात आली. शेतबंदिस्ती सरासरी 300 मीटर प्रतिहेक्टर करून जास्तीचे पाणी सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी प्रत्येक बांधाला पाईपचे व दगडाचे सांडवे करण्यात आले आहेत. अशा प्रकारची बांधबंदिस्ती 1500 हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे. मृद्संधारणातून साध्य होणाऱ्या जलसंधारणाबरोबरच कडवंची गावात लहान-मोठे दगडी आणि 705 सिमेंटचे नालाबंधारे बांधण्यात आले, तर 700 समतल चर घेण्यात आले. गावाच्या चारही बाजूंनी झाडे लावण्यात आली. याचा परिणाम म्हणजे कडवंची गावातील माती वाहून जाण्याचे थांबले, शिवाय पाणी पातळीतही वाढ झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांना मृद्संधारण व पाणलोट कामांविषयी विश्वास वाढला. आता या गावात गेल्या चार वर्षांपासून गावातील 206 विहिरींतील पाण्याची पातळी वाढली आहे.
गावाच्या विकासाचे पंचसूत्र - पंडित वासरे
''पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय शेतीची उत्पादकता वाढणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कडवंची गावाच्या विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आला. पहिला माथा ते पायथा कार्यक्रम, दुसरा मृद्संधारणातून जलसंधारण राबविणे, तिसरा शास्त्रीय पध्दतीने पीक पध्दतील बदल, चौथा शासनाच्या योजने अंतर्गत शेततळे घेणे आणि शेवटचा पाचवा शंभर टक्के ठिंबक सिंचनाचा वापर करणे या पंचसूत्रीचा वापर केल्यामुळे कडवंचीसारखे कोरडवाहू गाव आर्थिकदृष्टया संपन्न बनले आहे,'' असे जालना कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या वर्षीचा पावसाचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत या भागात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यातही जालना तालुक्यातील कडवंची गावात यापेक्षाही कमी पाऊस झाला होता. पण जलसंधारणाचे काम शास्त्रशुध्द पध्दतीने झाल्यामुळे कडवंची गावावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नाही. पडणाऱ्या पावसाचा एक एक थेंब गावाच्या क्षेत्राबाहेर वाहून जाणार नाही, त्याबरोबर मातीचा कणही धुऊन बाहेर जाणार नाही याची योग्य काळजी घेतल्याने कडवंची गावाला गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्काळाची झळ लागलेली नाही. अलीकडे 2012, 2013 व 2016 साली जालना जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. कडवंचीच्या आजूबाजूची अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागले. पण कडवंची गाव त्या दुष्काळाच्या वणव्यातही हिरवेगार होते. ही किमया फक्त मृद् व जलसंधारणाच्या कामामुळे झाली. पाणलोट विकासामुळे गावातील बागायती क्षेत्र वाढून शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. मृद्संधारणामुळे गावातील जवळपास अठराशे हेक्टर पडीक जमीनही लागवडीखाली आली आहे. हंगामी व बारमाही सिंचनक्षेत्रात वाढ झाल्याने पिकांच्या उत्पादनात व उत्पन्नातही भरीव वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी कडवंची गावात सरकारी योजनेद्वारे कधी पाण्याचा एकही थेंब पुरवठा होत नव्हता. आता हेच गाव पाणीदार झाले आहे. वर्षाचे बाराही महिने हे गाव इस्रायलसारखे हिरवेगार असते. या 1800 हेक्टरवर निसर्गाची अवकृपाची असायची. 20 ते 25 इंच पाऊस हाच या गावाच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा जिरवता येईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला सुरुवात केली.
पिकांचे योग्य नियोजन व विकासाचे मॉडेल
गावकऱ्यांची एकजूट, पाणलोटाच्या कामाची फलश्रुती यामुळे कडवंची गावात कमी पाण्यातही शेतकऱ्यांनी आपली बाग फुलवली आहे. वीस वर्षांपूर्वी ऊस, केळी, मोसंबी ही पिके घेणारे शेतकरी आता कमी पाण्यात येणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंब पिकांकडे वळले आहेत. पिकांचे शास्त्रीय नियोजन करून कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नामुळे पीक रचनेत बदल झाला. मृद् व पाणलोट प्रकल्प सुरू होण्यापूर्वी या गावात फक्त 3 हेक्टर क्षेत्रावर असलेली फळबाग आज 600 हेक्टर क्षेत्रावर पसरली झाली आहे. यामध्ये 480 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. 200 शेतकरी डाळिंबाकडे वळले आहेत. आले 12 हेक्टर व भाजीपाला 120 हेक्टरवर घेतला जात आहे. कडवंचीच्या द्राक्षांना प्रामुख्याने विदर्भात व मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. येथील शेतकरी माल घेऊन विक्रीसाठी बाजारात कधीच जात नाही, तर स्वत: व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन माल घेऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाया जात नाहीत. शेतकऱ्यांना शेतात बसूनच नगदी पैसा मिळू लागल्याने त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
नापिकी, बाजारभाव, दुष्काळ या कारणांमुळे गेल्या वीस वर्षांत कडवंची येथे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. यापूर्वी या गावात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत हे विशेष आहे. या गावातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळाला नाही म्हणून कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. उलट या गावाच्या मुली ज्या गावात दिल्या आहेत, त्या गावात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यात येते. पाणलोटापूर्वी कडवंची गावचे वार्षिक उत्पन्न 75 लाखांपर्यंत होते. पाणलोटानंतर आज या गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला जवळपास 55 कोटीपर्यंत पोहोचले आहे. आज गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत द्राक्षाच्या हिरव्यागार बागा नजरेस पडतात. गावात प्रत्येक वर्षी सरासरी फक्त 200 ते 350 मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे द्राक्षासारखे नगदी पीक घेणे ही जोखीम असतानाही येथील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून द्राक्षाच्या बागा फुलवल्या आहेत. अनेक शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. सर्वांच्या हाती नगदी पैसा खेळत आहे. पुरेसा पाऊस पडो अथवा न पडो, येथील शेततळी नेहमी भरलेली असतात. पारंपरिक शेतीच्या पध्दतीचा अवलंब न करता, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेटमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांना शासनाचा व इतर सामाजिक संस्थांचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. शेतीमुळे आपल्या जीवनात बदल झाला आहे. काळया आईची रात्रंदिन सेवा करता यावी, यासाठी 80 टक्के शेतकरी शेतात कायमचे राहायला गेले आहेत. त्यामुळे गावाच्या शिवारात अनेक टुमदार बंगले पाहायला मिळतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरांसमोर पर्जन्यमापक यंत्र बसविल्याचे चित्र नजरेस पडते. पावसाचे प्रमाण व आर्द्रता शेतकरी शेतात बसूनच पाहतात. पाण्याने भरलेली शेततळी, शेडनेटमधील विविध भाजीपाला, घरासमोर शेतात ट्रॅक्टर, दुभती जनावरे पाहून आपण दुष्काळी भागात आलो आहोत यावर विश्वास बसत नाही.
गावात आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेचा परिसर जसा स्वच्छ आहे, तसाच विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास घडविण्यासाठी शिक्षक कष्ट घेत असतात. गावात तीन-चार वस्तिशाळा आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे पालकांचे व शिक्षकांचे लक्ष असते. मुख्य शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिकविला जातो व इंग्लिश शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकले आहेत, हे शाळेत लावण्यात आलेल्या पारितोषिक पदकांवरून लक्षात येते. आज या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मुले पुढील शिक्षणासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर शहरात आहेत. गावात एकही तरुण बेरोजगार दिसत नाही. त्यामुळे या गावाचे नाव शेतीबरोबर शिक्षणातही अग्रेसर झाले आहे. विशेष म्हणजे पैसा हातात आला म्हणून केवळ मौजमजा करणारे तरुणांचे टोळकेही गावात नजरेस पडत नाही. प्रत्येक तरुण आपापल्या शेतात काम करताना नजरेस पडतो. महिला मजुरांना गावातच बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. दुपारच्या वेळी गावात फक्त वृध्द नागरिक नजेरस पडतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतला किलबिलाट तेवढाच ऐकू येतो. ''नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे कडवंची गावाचा शाश्वत विकास झाला आहे'' असे शेतकरी रमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
''माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्या वेळी शहरात जाऊन छोटी-मोठी नोकरी करण्याची इच्छा झाली. पण घरची सात एकर शेती होती. गावात मृद् व पाणलोट क्षेत्राखाली अनेकांची शेती आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसत होते. त्यामुळे मी शहरात जाण्याचा निर्णय बदलला. आज माझ्या शेतात द्राक्षाचे नगदी पीक घेतल्याने माझे आर्थिक जीवनमान उंचावले आहे'' असे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी सांगितले.
''आमच्याकडे आठ एकराचे कोरडवाहू शेत होते. वीस वर्षांपूर्वी या शेतातून कोणतेच धान्य पिकत नव्हते. त्यामुळे आम्ही मेंढपाळाचा आमचा पारंपरिक व्यवसाय करत या गावाहून त्या गावात स्थलांतर करत असू. आज गावाचे चित्र बदलले आहे. आम्हीही भटकंतीचा मेंढपाळाचा व्यवसाय बंद करून कोरडवाहू शेतात द्राक्षाचे व डाळिंबाचे नगदी पीक घेत आहोत. यात चांगला नफा मिळत गेल्याने शेतात चांगले घर बांधले आहे. शेतीकामात समाधानी आहोत'' अशी प्रतिक्रिया अनिरुध्द झारे यांनी दिली.
''मी उन्हाळयात पाण्याचे काटेकर नियोजन करून विविध पिके घेतो. विशेषत: द्राक्ष पिकास आम्ही पसंती देतो. या पिकांतून भरघोस उत्पन्न मिळते. शिवाय व्यापारीही द्राक्ष खरेदीसाठी आमच्याकडे येतो. भाव योग्य मिळाला तर द्राक्षाची विक्री करतो,'' असे शेतकरी भगवान कायंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान- चंद्रकांत क्षीरसागर
''आज कडवंची गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, याचे श्रेय जालना येथील कृषी विज्ञान केंद्रास जाते. या गावात एप्रिल, मे व जून महिन्यांत शेततळयातून बागांना पाणी देण्यात येते. याच तीन हजार लोकसंख्येच्या गावात 550 शेततळी आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. आज आमच्या गावात कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यामुळे कडवंची गावात सुख, शांती व समृध्दी नांदत आहे,'' असे कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांनी संगितले.
कडवंची गावाची प्रगती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चढाओढ लागली आहे. युनियन बँकेने गावात शाखा उघडली आहे. 1996 ते 2000 या सालात पाणलोट अंतर्गत शेतात बांधबंदिस्तीतून मृद्संधारणाची कामे केल्याचा हा परिणाम आहे. कडवंची गावाने योग्य पाणी व्यवस्थापन करून दुष्काळातही आदर्श शेती नावारूपाला आणली. आज कडवंची हे गाव विकासाचे मॉडेल म्हणून उदयाला आले आहे. हैदराबाद येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिटयूट फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर या संस्थेने कडवंची येथील मृद् व पाणलोट कामाचे मूल्यांकन करून अहवालामध्ये प्रशंसा केली आहे.
पाण्याचे आदर्श व्यवस्थापन
कडवंची गावात पाण्याची मुबलकता असली, तरी सर्व शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी 100 टक्के ठिबक सिंचनाचा अवलंब करतात. केळी, ऊस व मोसंबी या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना हद्दपार करण्यात आले आहे. शेतात पाटपाणी देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. पाणलोट विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन गावकऱ्यांनी पाणलोट विकास समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शेतकरी भगवानराव क्षीरसागर यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या समितीत सात सदस्य असून समितीच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचा काटेकोर वापर करून कमी पाण्यात जास्त नफा मिळवून देणारी पिके घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे शेतकरी जास्त पाण्याचे पीक घेत होते, त्या शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल करायला सुरुवात केली आहे. आज सर्व शेतकरी या पध्दतीचा अवलंब करतात. उन्हाळयात बागांना पाणी मिळण्यासाठी शेततळे घ्यावे लागते. त्यासाठी कडवंची पाणलोटामध्ये 550 शेततळी आहेत. गेल्या चार वर्षांत सातत्याने दुष्काळ पडून या गावातील कृषी उत्पादनाचा आलेख मात्र वाढताच राहिला आहे. गावच्या परिसरात 26 शेडनेट, जवळपास 206 विहिरी आहेत. यापैकी बहुतांश विहिरींमध्ये उन्हाळयात पाणी असते.
आदर्शवत वाटचाल
राज्यात मराठवाडा व विदर्भ येथील अवर्षणसदृश परिस्थितीचा परिणाम विकासावर होत आहे. दुष्काळ व नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. यावर उपाय म्हणून सरकार विविध पायलट प्रकल्प राबवीत आहे. पण स्थानिक जनतेच्या उदासीनतेमुळे यातले अनेक प्रकल्प अयशस्वी झाले आहेत. परिणामी सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येते. हे निसर्गाचे लहरी चक्र लक्षात घेऊन, शासन व जनता यामध्ये सुसंवाद साधला गेला तर शेतीचा स्वयंपूर्ण विकास करता येतो, हे आपण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावावरून पाहिले आहे. जलसंधारणाचे आदर्श गाव म्हणून हिवरेबाजाराचा उल्लेख केला जातो. आता हिवरेबाजाराच्या पंक्तीत कडवंची गाव येऊन बसले आहे. मराठवाडयासारख्या दुष्काळी भागातील कडवंची गावाचा आज कायापालट झाला आहे. मृद्संधारणाचे व जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल कडवंची गावामध्ये पाहायला मिळाले असून दुष्काळाशी सामना कसा करायचा, याचे उत्तम उदाहरण कडवंचीने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. आता जलव्यवस्थापनाचा धडा शिकण्यासाठी इस्रायलला जाण्याची गरज नाही. इस्रायलचे प्रतिरूप शोभावे असे गाव महाराष्ट्र राज्यातील मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात आहे हे पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांनी या गावास भेट देऊन आपल्या शेतीच्या पध्दतीत बदल केला पाहिजे.
2017च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करताना सरकारने शेतकरी, गावे, गरीब, दलित आणि समाजातील अविकसित गटाचे कल्याण कसे होईल याला प्राधान्य दिले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पाणलोट विकास या क्षेत्रांमध्ये खूप मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे. 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शेती क्षेत्राचे चित्र पालटण्यासाठी कडवंचीसारखे पायलट प्रोजेक्ट करण्याकरिता सरकारने 50 गावांची निवड करून ही गावे समृध्द करणे गरजेचे आहे.
9970452767