मला उमगलेले बाबासाहेब

विवेक मराठी    01-Dec-2017
Total Views |

 

काही वर्षांपूर्वी मी साप्ताहिक विवेकमध्ये रुजू झाले आणि रमेश पतंगे सरांची लेखनिक म्हणूनसुद्धा काम करू लागले. पतंगे सरांसोबत लेखनिक म्हणून अनेक विषयांवर लेख लिहिले, त्या लेखांमध्ये अनेकदा डॉ. बाबासाहेबांचेही अनेक लेख लिहिण्याची संधी मिळाली. तसेच लेखनिक म्हणून बाबासाहेबांवरील दोन-तीन पुस्तकांचेदेखील काम केले. त्यानंतर माझ्या मनात पूज्य बाबासाहेबांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. बाबासाहेब हे कुठल्याही चौकटीत बसणारे नेते नसून ते कुशल राष्ट्रउभारणीचा मजबूत पाया आहेत, हे लक्षात यायला लागले. शिवाय बाबासाहेबांनी केवळ राजकीय विचार न करता राष्ट्रहिताचा विचार करत ‘भारत’ ही संकल्पना उराशी बाळगून अनेक विषयांचे चिंतन करून भारत हा ‘समर्थ भारत’ कसा घडेल याचाच विचार केला.

 दि. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेबांचे निधन झाले. या वर्षी भारतरत्न डॉर. बाबासाहेब आंबेडकर यांचा 62वा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त एखादा लेख लिहावा असा विषय माझ्या मनात आला. असा विचार माझ्या मनात येईल असे मला कधी वाटलेही नव्हते, कारणही तसेच. कारण ज्या समाजातून मी आले, त्यात दलित आणि इतर समाज यात कळत-नकळत दरी निर्माण झालेली आहे. समाजाने आणि शिक्षण व्यवस्थेनेसुद्धा बाबासाहेबांना एका चौकटीत बंदिस्त करून ठेवले आहे. बाबासाहेब म्हटले की दलितांचे कैवारी किंवा राज्यघटनेचे शिल्पकार एवढेच अत्यल्प ज्ञान सर्वसामान्य माणसाला असते. तसे मलाही (अज्ञान) होते. काही वर्षांपूर्वी मी साप्ताहिक विवेकमध्ये रुजू झाले आणि रमेश पतंगे सरांची लेखनिक म्हणूनसुद्धा काम करू लागले. पतंगे सरांसोबत लेखनिक म्हणून अनेक विषयांवर लेख लिहिले, त्या लेखांमध्ये अनेकदा डॉ. बाबासाहेबांचेही अनेक लेख लिहिण्याची संधी मिळाली. तसेच लेखनिक म्हणून बाबासाहेबांवरील दोन-तीन पुस्तकांचेदेखील काम केले. त्यानंतर माझ्या लक्षात आले की, पूज्य बाबासाहेबांची वेगळी प्रतिमा माझ्या मनात निर्माण झाली आहे. बाबासाहेब हे कुठल्याही चौकटीत बसणारे नेते नसून ते कुशल राष्ट्रउभारणीचा मजबूत पाया आहेत, हे लक्षात यायला लागले. शिवाय बाबासाहेबांनी केवळ राजकीय विचार न करता राष्ट्रहिताचा विचार करत ‘भारत’ ही संकल्पना उराशी बाळगून अनेक विषयांचे चिंतन करून भारत हा ‘समर्थ भारत’ कसा घडेल याचाच विचार केला.

 पूज्य बाबासाहेबांसारख्या अफाट व्यक्तिमत्त्वाची ओळख इतःया उशिरा झाली, हे एक भारतीय म्हणून खरेच दुर्दैव! अगदी बाबसाहेबांच्या हयातीतदेखील त्यांच्या समकालीन सर्व पिढीला त्यांचे विचार पटले असे नाही, पुढच्या दोन पिढ्या गोंधळातच गेल्या आणि मग हळूहळू त्यांच्या महान कार्याची महती लक्षात येऊ लागली. डॉ. बाबासाहेब गेल्यानंतर तीन-चार पिढ्यांनंतर बाबासाहेबांचे समाजाप्रतीचे, राष्ट्राप्रतीचे योगदान लोकांच्या लक्षात येऊ लागले. राष्ट्रउभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. परंतु शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘बाबासाहेब’ हा विषय अगदी संकुचितरित्या मांडला गेलेला आहे. त्यामुळेच की काय, बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार आणि एका समाजाच्या चौकटीत (दलित नेता) बांधण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे केला गेला आणि आजही तो चालू आहेच.

राज्यघटना हा राज्य कसे चालवायचे हे सांगणारा सर्वोच्च कायदा. डॉ. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या शिल्पकाराचे स्थान आहे.  या राज्यघटनेचा विचार करताना राज्यपद्धती कशी असावी, राज्यघटना निर्माण करण्यात राष्ट्रहित काय असेल, याच गोष्टींचा विचार बाबासाहेबांनी केलेला दिसतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशाला समान सूत्रात बांधून ठेवणे फार गरजेचे होते. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेची जी उद्देशिका लिहिली आहे, त्या उद्देशिकेत सगळ्यांना बांधून ठेवणारी सूत्रे सांगितली आहेत. यात सामाजिक, राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचा समावेश आहे. याचा अर्थच असा होतो की, देशात राहणारे सगळे नागरिक एकमेकांशी भावनिकदृष्ट्या घट्ट जोडले गेले पाहिजेत. बंधुता अशी भावनिक एकता निर्माण करते.

डॉ. बाबासाहेबांच्या मते लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची जीवनतत्त्वे मान्य करणारी पद्धती. राज्यघटना निर्मितीत देशातील अल्पसंख्याकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले. तसेच, एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्यात सहभागी होता आले म्हणजे त्या कार्यातील यश म्हणजे आपले यश, त्यातील अपयश म्हणजे आपले अपयश, असे त्याला वाटू लागते. ही भावनाच मनुष्याला एकराष्ट्रीयत्वास बांधून ठेवण्यास कारणीभूत ठरते. केंद्राच्या आणि राज्याच्या विधिमंडळात अनुसूचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. हे प्रतिनिधित्व एकाच अल्पसंख्य समुदायाला मिळता कामा नये, तर ते देताना अल्पसंख्याक समाजाचा आर्थिक दर्जा, सामाजिक दर्जा आणि शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊनच प्रतिनिधित्व दिले पाहिजे, बाबासाहेबांचा एवढा दूरचा आणि सर्वसमावेशक विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सगळ्यात महान कार्य म्हणजे, त्यांनी हिंदू समाजातील अस्पृश्यता राज्यघटनेच्या कलम 17नुसार नष्ट केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधी बंदिस्त विचार न करता राष्ट्रहिताचा व्यापक, दूरदृष्टी ठेवणारा विचार मांडला. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कामगार, शेतकरी, महिला, जलसंपदा, संरक्षण, जातीची उतरंड, चलन, औद्योगिकीकरण अशा विविध विषयांचे चिंतन करून बाबासाहेबांनी आपल्याला अभ्यासपूर्ण विचारधन दिले आहे. बाबासाहेब केवळ कागदी विचारवंत नव्हते, तर ते आपले विचार अमलात आणून समाजाची प्रगती कशी होईल आणि त्यासाठी संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी असे. बाबासाहेबांचा संघर्ष अहिंसक मार्गाचा होता.

सामाजिक न्याय या तत्त्वावर राष्ट्र चालावे असे बाबासाहेबांचे स्वप्न होते, परंतु ते सहज शःय नव्हते. त्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे लढे आणि संघर्ष करावे लागले. महाड ‘चवदार तळ्याचा’ सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश, अमरावती आंबामाता मंदिर सत्याग्रह, महार वतन खालसा, हिंदू कोड बिल, पुणे करार इत्यादी.

बाबासाहेबांच्या संघर्षाचा काळ हा स्वातंत्र्यापूर्वीचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राष्ट्रपुरुषांनी देशासाठी संघर्ष, लढे, बलिदान दिले, ते देशभक्त म्हणून अजरामर झाले. डॉ. बाबासाहेबांनी प्रत्यक्षरित्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला नाही. भारतावर जेव्हा इंग्रजांचे शासन होते, तेव्हा दोन प्रकारची गुलामी होती. पहिली राजकीय आणि दुसरी सामाजिक. ही सामाजिक गुलामी इंग्रजांकडून नाही, तर स्वकीयांकडूनच (हिंदू आणि हिंदू धर्मशास्त्र यांच्याकडून) आली होती. बाबासाहेबांचा प्रश्‍न असा होता की, इंग्रजांशी लढाई केल्यामुळे जे राजकीय स्वातंत्र्य मिळणार आहे, त्या राजकीय स्वातंत्र्यात आमची - म्हणजे अस्पृश्यांची सामाजिक गुलामी संपणार आहे का? जर ती संपणार नसेल तर अस्पृश्यांच्या मते फक्त ‘मालक बदलला’ एवढाच फरक होईल आणि त्यासाठीच बाबासाहेब सामाजिक स्वातंत्र्यासाठी आग्रही होते. भारतात जातीजातींत, प्रांताप्रांतात असलेले संघर्ष, एकता आणि एकात्म भावनेचा र्‍हास, बंधुतेचा अभाव याच कारणांनी भारतावर अनेक विदेशी लोकांनी आक्रमणे करून भारत परतंत्र केला. संकट ओढवले. हे पारतंत्र्याचे सावट कायमस्वरूपी नाहीसे करायचे असेल, तर राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्वीजो विचार मांडला, तो आज भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पूर्ण होत असताना दूरदृष्टी विचार ठरला आहे.

बाबासाहेबांनी राष्ट्रहितासंबंधी अनेक भाषणे दिली आहेत. ही भाषणे अनेक पुस्तकांत, ग्रंथांत आपल्याला वाचनास उपलब्ध आहेत. महारांची सुधारणा व्हायची असेल तर त्यांचे वतन खालसा झालेच पाहिजे, हे पटवून देण्यासाठी बाबासाहेब एक गोष्ट सांगत,‘‘एक श्रीमंत कुटुंब दारिद्य्रावस्थेत होते. चार-पाच भावंडांचे मोठे कुटुंब होते. त्यांच्या अंगणात एक शेवग्याचे झाड होते. या शेंगा स्वतः विकल्या तर आपली अब्रू जाईल, म्हणून ते रात्र झाली की एका माळ्याला विकत आणि माळी जो पैसे देईल, त्याच्यावर आपली गुजराण करत. थोडःया पैशाने कधी तरी आळीपाळीने उपासमारीची वेळ येत असे. पण अब्रू जाईल, म्हणून काम-धंदा करण्यास बाहेर पडत नव्हते. एक दिवस त्यांच्या घरी एक पाहुणा राहायला आला. त्याने त्यांची ही गोष्ट पाहिली आणि त्यांच्या दारिद्य्राची कीव न करता त्याने ते शेवग्याचे झाड एका रात्री कापून टाकले आणि कुणालाही न सांगता तेथून निघून गेला. सकाळी उठल्यावर आपल्याला ज्या शेवग्याचा झाडाचा आधार होता, तोच आधार आलेल्या पाहुण्याने समूळ नष्ट केल्याचे पाहून, आपली आणखी परवड होईल या भीतीने ते धास्तावले. परंतु आता असे हातावर हात धरून आपले पोट काही भरणार नाही, हे त्यांना चांगले कळून चुकले आणि त्यांनी घराबाहेर पडण्याचा निश्चय केला. एक-दोन वर्षातच त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि आलेल्या पाहुण्याने असे का केले याची प्रचितीही आली. कोणत्याही माणसाने स्वतःहून जोखडातून मुक्त व्हायचे ठरविल्याशिवाय त्याची प्रगती अशःय आहे आणि हेच काम बाबासाहेबांनी वेळोवेळी केल्याचे आपल्याला दिसते. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला.

भारत ही धर्मभूमी आहे आणि धर्म हा भारताचा आत्मा आहे. धर्मांतरासाठी बाबासाहेबांपुढे ख्रिश्चन, मुसलमान आणि शीख अशा धर्मांचे पर्याय उपलब्ध होते. परंतु राष्ट्रीय ऐःय, हिंदू समाजाची पुनर्रचना हा धर्मांतराचा मुख्य उद्देश होता. अस्पृश्यता संपल्याशिवाय हिंदू समाजाची पुनर्रचना अशःय होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीवर समाजाची पुनर्रचना साध्य करायची होती. सामाजिक न्याय मिळविण्यासाठीच बाबासाहेबांना धर्मांतर करायचे होते. भारत बलशाली कसा होईल, एकराष्ट्रीयत्वाची भावना कशी प्रबळ होईल, म्हणून भारतीय संस्कृतीशी ज्या धर्माची नाळ जोडलेली आहे आणि ज्या धर्मात समता, ऐःय, समरसता याचे सखोल चिंतन आहे, अशा बौद्ध धर्माची निवड बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी केली. शिवाय धर्मांतरासाठी कुणावरही जबरदस्ती केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. तथागत गौतम बुद्धांच्या अनुयायांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास जगभर प्रवास केले. इस्लामी आणि ख्रिश्चन मिशनर्‍यांसारखा (हिंसक मार्गाने) बौद्ध धर्माचा प्रसार न करता अहिंसक मार्गाने, प्रेमाने आणि मानसिक परिवर्तनाने केला. 14 ऑःटोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेबांनी लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्मात प्रवेश केला.

आज काश्मीरमध्ये अशांतता आणि अराजक माजल्याचे चिन्ह दिसत आहे. दहशतवाद पोसण्याबरोबरच भारतातून काश्मीर वेगळे होण्याच्या मागणीपोटी जनतेचा अतोनात छळ होत आहे. ही वेगळी होण्याची मानसिकताच धोःयाची घंटा आहे. काश्मीरमधील मुस्लीम तरुण लष्कराच्या जवानांवर सररास दगडफेक करीत असतात आणि या तरुणांना खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान करीत असतो. लष्कराला समोरून दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा आणि पाठीमागून दगडफेःयांच्या दगडांचा सामना करावा लागतो. तसेच श्रीनगरचे खासदार आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे अलीकडेच बेताल वक्तव्य करताना म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे, तो मिळविण्यासाठी कितीही लढाया केल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. बाबासाहेब हयात असताना काश्मीरचे त्रिभाजन (हिंदू-मुस्लीम-बौद्ध) करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. असे जर झाले असते, तर यासारखे प्रश्‍नच उद्भवले नसते. समस्या काश्मीर खोर्‍यातील मुसलमानांची आहे, जम्मू-लडाखची नाही.

काश्मीरमधील प्रश्‍न, आता येऊ घातलेल्या गुजरातच्या निवडणुका आणि त्याला दिलेला जातीय रंग, विविध जातींतील संघर्ष, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून चाललेले मोर्चे, धर्मांतर (घरवापसी), खैरलांजी-कोपर्डीसारख्या निर्दयी घटना, यासारखे अनेक विषय आणि या सर्व गोष्टींचा मतपेढीसाठीकसा वापर करून घेता येईल, हा राजकीय स्वार्थ. अशा विविध विषयांचे चिंतन व्हायला हवे. बाबासाहेबांनीदेखील हे सारे विषय हाताळले, त्यासाठी संघर्ष केले, लढे दिले. पण हे सारे करताना कुठेही वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थ नव्हता, तर केवळ राष्ट्रहिताचाच विचार होता. राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना एका सूत्रात बांधणारी राज्यघटना असो वा सामाजिक न्याय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची तत्त्वत्रयी अमलात आणणे असो, या सार्‍या विषयातून केवळ राष्ट्रहित आणि राष्ट्रहितच जपल्याचे दिसते. परंतु आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे, राज्यघटना निर्माण होऊन 67 वर्षे आणि बाबासाहेबांना जाऊन 61 वर्षे झाली आहेत. या वेळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या थोर राष्ट्रपुरुषांनी आणि बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी जो त्याग, बलिदान केले, विचार मांडले त्याचा विचार व्हायला हवा. बाबासाहेब पार्थिव शरीराने जरी आपल्यात नसले, तरी विचाराने ते सदैव जिवंतच आहेत. शिवाय राज्यघटना निर्मिती करताना स्वीकार आणि समन्वय या दोन भारतीय मूल्यांचे चिंतन करून ‘भारत’ ही संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. बाबासाहेबांचे हेच दूरदृष्टी ठेवणारे विचार, आजच्या घडीला प्रत्यक्षात काही अंशी तरी अमलात आणण्याचा प्रयत्न करणे, हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.

9594961859