हरित उद्योजकता (Ecopreneurship)

विवेक मराठी    27-Nov-2017
Total Views |

 

 Ecopreneurship  हा आर्थिक विकास आणि पर्यावरण यांच्यात स्नेह निर्माण करणारा धागा आहे. आज जेव्हा प्रदूषणकारी प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध होतो अथवा पर्यावरणाला घातक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय होतो, तेव्हा 'रोजगाराचं काय?' असा प्रश्न उपस्थित केला जातो. हा प्रश्न पुढे करून अशा निर्णयांना विरोध केला जातो. पर्यावरणपूरक उद्योगांचा झपाटयाने विस्तार करून बेरोजगार माणसांना त्यात सामावून घेणे हेच त्याच्यावरचे उत्तर आहे. त्यासाठी केवळ Entrepreneurship Development पुरेशी नसून Ecopreneurship Development  महत्त्वाची आहे. Ecopreneurship हे उद्योगाचे एक प्रारूप आहे. भारतात Ecoprenaurshipच्या संधी अमाप आहेत. गरज आहे ती फक्त तरुण पिढीने या संधी हेरून त्यात उतरण्याची!

"[र्यावरणवाद हा आर्थिक उलाढालींमधला अडथळा नसून उलट उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करणारा आहे.' (हार्वर्ड बिझनेस स्कूल - 1971)

 

माझ्या मागील लेखात ('भारतीय शेती आणि उद्योजकता' - साप्ताहिक विवेक - दि. 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2017) 'Agripreneurship' अर्थात 'कृषी उद्योजकता' या नव्या संकल्पनेविषयी माहिती घेतली. त्याच्यासारखीच उद्योजकतेतील एक नवीन संकल्पना म्हणजे 'Ecopreneurship', ज्याला मराठीत 'पर्यावरणीय उद्योजकता' (Environmental Entrepreneurship) अथवा 'हरित उद्योजकता' (Green Entrepreneurship) असे म्हणता येईल. याच संकल्पनेला Sustainopreneurship (शाश्वत उद्योजकता), Eco Capitalism (हरित भांडवलशाही) अशी वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. Ecopreneurship हा शब्द साधारणपणे 1990नंतर सार्वत्रिकरित्या वापरला जायला लागला. साध्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाला, तर ज्यात नफ्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचाही हेतू साधला जाईल अशी उद्योजकता म्हणजे Ecopreneurship. ग्विन स्कायलार यांच्या 'Merging Economic and Environmental Concerns Through Ecopreneurship' या पुस्तकात त्यांनी या शब्दाची विस्तृत व्याख्या केली आहे. ते म्हणतात, 'ज्यात पर्यावरण संवर्धनही साधले जाईल आणि नफाही मिळेल अशा उद्योगांच्या संधी शोधून त्यात खासगी क्षेत्राने गुंतवणूक करणे म्हणजे 'Ecopreneurship'.

असे नेमके कोणकोणते उद्योग Ecopreneurship या संकल्पनेत अंतर्भूत होतात? त्यांचे ढोबळमानाने चार प्रकारांत वर्गीकरण करता येईल.

  1. पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प - सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लघुजलविद्युत प्रकल्प, जैविक ऊर्जा प्रकल्प इ.
  2. पर्यावरणपूरक वस्तू आणि उपकरणे - सोलर वॉटर हीटर, सौर पंप, विजेवर वा जैविक इंधनावर चालणाऱ्या गाडया, बांबूचे फर्निचर व विविध वस्तू, प्लास्टिकला पर्यायी कापडी व तागाच्या वस्तू, रसायने नसलेले साबण व डिटर्जंट, सेंद्रिय अन्नपदार्थ, हातापायाने चालवायची यंत्रे (उदा. पेडल पॉवर वॉशिंग मशीन, पेडल पॉवर ग्राइंडर), हस्तकलेच्या वस्तू इ.इ.
  3. अविघटनशील कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण
  4. शेती, जंगल आणि विविध परिसंस्थांवर आधारित पर्यटन उद्योग.

यापुढील काळात भारताची आणि संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मुख्यत्वेकरून या चार प्रकारच्या उद्योगांभोवती केंद्रित असेल. अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा पर्यावरणाचा विचार कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. अर्थात पर्यावरणाचा ऱ्हास ही त्या वेळी समस्या म्हणून जाणवू लागली नव्हती. तेव्हापासून गेली तीन शतके फक्त गुंतवणूक करून नफा मिळवणे हे एकमेव ध्येय डोळयासमोर ठेवून जगभर उद्योगांचा विस्तार झाला. आज प्रदूषण कळसाला पोहोचलेले आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या आणि सरकारच्या दबावामुळे सर्वच क्षेत्रांतील उद्योगांना पर्यावरणाचा विचार करणे भाग झाले आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? सरकारची, नागरिकांची की उद्योजकांची? वास्तविक सगळयांची. पण मुख्यत्वेकरून उद्योजकांची. कारण वस्तूंचे उत्पादन आणि प्रदूषण यांचा थेट संबंध आहे. वस्तूंच्या उत्पादनाची सर्व सूत्रे उद्योजकाच्या हातात असतात. Ecopreneurship हा आर्थिक विकास आणि पर्यावरण यांच्यात स्नेह निर्माण करणारा धागा आहे. आज जेव्हा प्रदूषणकारी प्रकल्पांना स्थानिकांकडून विरोध होतो अथवा पर्यावरणाला घातक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय होतो, तेव्हा 'रोजगाराचं काय?' असा प्रश्न उपस्थित केला जातो. सध्या चर्चेत असलेल्या फटाकेबंदी आणि प्लास्टिकबंदी या निर्णयांच्या बाबतीतही 'या उद्योगांमध्ये गुंतलेल्या माणसांच्या रोजीरोटीचं काय?' हा प्रश्न पुढे करून अशा निर्णयांना विरोध केला जातो. पर्यावरणपूरक उद्योगांचा झपाटयाने विस्तार करून बेरोजगार माणसांना त्यात सामावून घेणे हेच त्याच्यावरचे उत्तर आहे. त्यासाठी केवळ Entrepreneurship Development पुरेशी नसून Ecopreneurship Development महत्त्वाची आहे. Ecopreneurship हे उद्योगाचे एक प्रारूप आहे. या 

 

प्रारूपामध्ये उद्योगाचे संपूर्ण व्यवस्थापन पर्यावरणकेंद्री असते. उत्पादन जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसे बनवता येईल या संशोधनावर भर असतो, ज्याला Eco Innovation म्हणतात. म्हणजे उत्पादनासाठी पुनर्नवीकरणीय संसाधनांचा वापर (उदा. बाजारात नव्याने आलेला बांबूचा की-बोर्ड आणि माउस), ऊर्जेचा अपव्यय होणार नाही अशी उत्पादनपध्दती, कापडी वा तागाचे पर्यावरणपूरक वेष्टन, वस्तूचा टिकाऊपणा, वस्तू निरुपयोगी झाल्यानंतर तिच्या विल्हेवाटीची व्यवस्था इ. सर्व गोष्टींचा सूक्ष्म विचार उद्योगाच्या व्यवस्थापनात केला जातो. एखादा उद्योग पर्यावरणावर किती परिणाम करतो याचे आपल्याकडे अचूक मूल्यमापन होत नाही. कंपनीला उत्पादन करून फायदा किती झाला वा तोटा किती झाला याचा आर्थिक हिशेब फक्त मांडला जातो. पण 'पर्यावरणीय किंमत' मोजली जात नाही. ती दुसऱ्या कोणावर तरी ढकलली जाते. (आर्थिक परिभाषेत याला Externality म्हणतात.) म्हणजे असे की नदीकिनारी एखादा कारखाना आहे, ज्यामुळे नदीचे प्रदूषण होऊन आजूबाजूचे लोक आजारी पडले, तर त्यांना आरोग्यासाठी खर्च करावा लागतो. शिवाय नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारला वा स्वयंसेवी संस्थांना खर्च करावा लागतो. म्हणजेच प्रदूषणाची आर्थिक किंमत दुसऱ्यांवर लादली जाते. Ecopreneurshipमध्ये ही प्रदूषणाची आर्थिक जबाबदारी उद्योजकांनी स्वत:कडे घेणे अपेक्षित आहे. म्हणजे उद्योग जेवढा जास्त प्रदूषणकारी असेल, तेवढा कंपनीचा प्रदूषण कमी करण्यावरचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून साहजिकच कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढेल. आर्थिक (Financial), सामाजिक (Social) आणि पर्यावरणीय (Environmental) अशा त्रिमितीय पध्दतीने कंपनीच्या जमाखर्चाचा हिशोब ठेवण्याची पध्दत हळूहळू सार्वत्रिक होत आहे, ज्याला Triple Bottom Line Accounting म्हणतात. अलीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या उद्योगाची पत ठरवताना केवळ नफा हा एकमेव निकष विचारात न घेता त्या उद्योगाकडून पर्यावरणाची किती काळजी घेतली जाते, हेही पहिले जाते. त्यासाठी वेगवेगळी मानके तयार केली गेली आहेत. ISO 14001 - 2015 हे असेच एक मानक आहे, जे उत्पादनाची पर्यावरणपूरकता बघून दिले जाते. पर्यावरणपूरक उद्योगांना कर्जपुरवठयासाठी Green bankingसारख्या संकल्पना उदयाला आल्या आहेत. युरोप, अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया, जपान या देशांमध्ये अशा ग्रीन बँका स्थापन झालेल्या आहेत, ज्यांच्यामार्फत हरित तंत्रज्ञानासाठी आजपर्यंत सुमारे 20 अब्ज डॉलर्सची कर्जे दिली गेली आहेत. मोठया उद्योगांसाठी जशी विशेष आर्थिक क्षेत्रे (Special Economic Zones) असतात, तशीच कॅनडा आणि काही युरोपीय देशांमध्ये Eco-Industrial parks निर्माण केली गेली आहेत. हे सगळे प्रयत्न Ecopreneurshipच्या विकासासाठी पोषक आहेत.

भारतातील संधी

भारतात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा, जंगलांवर आधारित उद्योग, कृषी पर्यटन, हस्तकला, कचरा पुनर्चक्रीकरण अशा पर्यावरणपूरक उद्योगांच्या असंख्य संधी आहेत. 2022पर्यंत भारताने 175 गिगावॅट पुनर्नवीकरणक्षम ऊर्जानिर्मितीचे (सौर, पवन, जैविक आणि लघुजलविद्युत) उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यात गुंतवणुकीच्या मोठया संधी उपलब्ध होणार आहेत. IREDA (Indian Renewable Energy Development Agency) ही भारत सरकारची बिगरबँकिंग वित्तसंस्था असून विविध योजनांच्या माध्यमातून पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचे काम करते. सौर ऊर्जा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी भारत सरकारने 2015 साली 'सूर्यमित्र योजना' सुरू केली. या अंतर्गत सौर ऊर्जेशी संबंधित तांत्रिक कामांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. भारतात टाटा, रिलायन्स, विक्रम सोलर अशा अनेक कंपन्या सौर ऊर्जेत गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. पवन ऊर्जा क्षेत्रातसुध्दा सुझलॉन, ऑॅरेंज रिन्यूएबल, गद्रे मरीन, शालिवाहन ग्रीन एनर्जी अशा अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक केली आहे. पुण्याच्या संतोष गोंधळेकर यांच्या 'गंगोत्री रिन्यूएबल एनर्जी प्रा.लि.' या कंपनीने स्वत: संशोधन करून जैविक कचऱ्यापासून सी.एन.जी. वायू तयार करण्यात यश मिळवले आहे व त्यावर प्रत्यक्षात गाडया धावायला लागल्या आहेत. तसाच बायो-सी.एन.जी.चा दुसरा प्रकल्प संगमेश्वरातील गोळवली या गावी साकारला जात आहे.

भारताच्या खेडोपाडयातील स्थानिक संसाधनांचा उपयोग करून उद्योग निर्मितीला प्रचंड वाव आहे. बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तूंच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी भारत सरकारने National Bamboo Mission सुरू केले आहे. बांबूच्या चांगल्या दर्जाच्या प्रजाती शोधणे, लागवडीसाठी साह्य करणे, बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करणे, तरुणांना प्रशिक्षित करणे, वस्तूंचे मार्केटिंग असे अनेक प्रयत्न या मिशनमध्ये केले जात आहेत. निसर्ग पर्यटनाचे खूप चांगले प्रयत्न स्थानिक पातळीवर होत आहेत. भारताला जीवविविधतेचा अतिशय समृध्द वारसा लाभलेला आहे. ही जीवविविधता नष्ट करून उद्योग उभारण्यापेक्षा ती जतन करून त्यापासून आर्थिक लाभ कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. साधे सृष्टीचे ज्ञान ही भविष्यात खूप पैसे मिळवून देणारी मोठी गोष्ट होऊ शकते. निसर्ग पर्यटन म्हणजे फक्त पर्यटकांना निसर्गसौंदर्य दाखवणे नव्हे, तर इथले प्राणी, वनस्पती यांची आणि संपूर्ण जीवविविधतेची मनोरंजक पध्दतीने माहिती दिली गेली, तर जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित होतील. कोकणात वेंगुर्ला, वेळास अशा ठिकाणी 'कासव पर्यटनाचे' प्रकल्प यशस्वीपणे उभारले गेले आहेत. तेथील समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या अंडयाचे संरक्षण केले जाते आणि कासवांची पिल्ले पाहायला खूप पर्यटक येतात. त्याच ठिकाणी मग आलेल्या पर्यटकांना कासवांची आणि एकंदर सागरी जीवसृष्टीची माहिती देणाऱ्या फिल्म्स दाखवल्या जातात. अशा ज्ञानाधारित निसर्ग पर्यटन उद्योगाला भारतात भरपूर वाव आहे.

सारांश - भारतात Ecoprenaurshipच्या संधी अमाप आहेत. गरज आहे ती फक्त तरुण पिढीने या संधी हेरून त्यात उतरण्याची!

 9405955608