समाज हा बहुपेडी असतो. त्यामुळे समाजाअंतर्गत अनेक समस्या, प्रश्न विद्यमान असतात, निर्माण होत असतात. या समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण समाजानेच केले पाहिजे अशी धारणा असणारे आपल्या देशात आहेत. त्यापैकी डॉ. दादा आचार्य आणि त्यांचे 'केशवस्मृती सेवा प्रतिष्ठान' यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. संघसंस्कारात वाढेलल्या डॉ. दादा आचार्यांनी जळगाव शहर आणि परिसरात सेवाभावातून आत्मीय भावनेने विविध प्रकारची कामे चालू केली आहेत. 'संघभावनेने' बांधलेला एक मोठा सजग समूह समस्यांना भिडतो आहे आणि समस्यांचे निराकरण करून समाजजीवनात आनंद आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांचा हा प्रवास... समस्यांशी भिडण्याचा आणि संघभावनेच्या प्रकटीकरणाचा.
खोल समुद्रात... सर्व बाजूला पाणीच पाणी... दिशाही स्पष्ट होत नाही आणि निश्चित किनाराही नजरेस येत नाही... अशा वेळी जहाजांचा एक खूप मोठा काफिला लीलया प्रवास करत असतो. या अथांग सागरात. त्यांना भीती नसते तारू भटकण्याची की तमा नसते किनाऱ्यांची. कारण त्यांचा विश्वास असतो ध्वजवाहक नौकेवर. त्याच ध्वजवाहक नौकेवर केवळ विश्वास ठेवून नव्हे, तर प्रगाढ श्रध्दा ठेवून छोटी छोटी गलबते आपला प्रवास सुरू करतात आणि... त्याच ध्वजवाहक नौकेच्या आधाराने, मार्गदर्शनाने आपली परिक्रमाही पूर्णत्वास नेतात. वादळवारे, तुफानी लाटा, मधूनच डोके वर काढणारे हिमनग आणि निर्जन बेटे यांचा सामना करत हा काफिला चालत राहतो. आपल्या ईप्सित स्थळी सुखरूप पोहोचतो. म्हटले तर... प्रत्येक गलबत हे स्वतंत्र... त्याचे चालक स्वतंत्र, प्रवासी स्वतंत्र. असे प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असतानाही हा काफिला एका बंधात बांधलेला असतो. तो बंध म्हणजेच संघभावना... ही संघभावना जशी दूरवरच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे, तशीच वैयक्तिक जीवनात, समाजजीवनातही उपयुक्तच. रा.स्व. संघाने याच संघभावनेच्या बळावर गेल्या 93 वर्षांत असाच देदीप्यमान प्रवास केला. अनेक अडचणी, संकटे आणि संस्थाजीवनातील चढ-उतार अनुभवत आपल्या आपल्या ईप्सित ध्येयाच्या दिशेने अविरत मार्गक्रमण आजही चालू आहे. या प्रवासातील एक सहप्रवासी म्हणजे जळगावचे कै. डॉ. अविनाश आचार्य. दादा आचार्य म्हणून सुपरिचित असणाऱ्या या माणसाने 'आपण समाजाचं देणं लागतो' या एका उक्तीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. जवळजवळ वीस वर्षे जिल्हा संघचालक म्हणून काम केलेल्या डॉक्टरांनी समाजजीवनाला वळण लावण्यासाठी, समाजाला सुदृढ करण्यासाठी असंख्य वाटा चोखाळल्या. सेवायोगाचे बीजरोपण करत अनेकांना भारावून टाकले. समाजाची जी गरज असेल ती आपण पूर्ण केली पाहिजे, या एका ध्यासातून आज बहारदार सेवावृक्ष जळगावात उभा राहिला आहे.
1980च्या दशकात दादा आचार्य यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. तेव्हापासून अगदी त्यांच्या निधनापर्यंत - म्हणजे 2014पर्यंत त्यांनी असंख्य समाजोपयोगी कामांना सुरुवात केली. जो प्रश्न समोर उभा राहील, त्याचे उत्तर शोधण्याचे दायित्व स्वयंसेवक म्हणून माझ्यावर आहे या भावनेतून दादा आचार्य काम करत राहिले. आज सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आठ संस्थांच्या माध्यमातून तेरा प्रकल्प चालू आहेत. या प्रकल्पात 921 सहकारी कार्यरत असून 115 सेवाभावी संचालक ध्येयप्राप्तीसाठी श्रम करीत आहेत. दादा आचार्यांनी केलेल्या बीजारोपणातून आता एक सशक्त चळवळ निर्माण झाली असून 'केशवस्मृती सेवा संस्था समूह' या नावाने ही चळवळ जळगाव शहरावर आणि आसपासच्या परिसरावर आपला ठसा उमटवत आहे.
***
रक्त... रक्ताचे नाते... माणसाचे जगणे-मरणे रक्तावर अवलंबून असते. आजचे बदलते वातावरण, जीवनशैली यांच्यामुळे मानवी जीवन अनेक व्याधींनी ग्रासले जाते आहे. त्याचप्रमाणे जन्मजात शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शारीरिक, मानसिक व्यंगाबरोबरच थॅलिसेमियाग्रस्त बालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. थॅलिसेमियाग्रस्तांना सातत्याने बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो आणि त्यांची वारंवारताही खूप जास्त असते. अशा वेळी हे रक्त उपलब्ध होण्याचे एकच ठिकाण, ते म्हणजे रक्तपेढी. कोणत्याही रक्तपेढीतून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, गंभीर आजाराचे रुग्ण, अपघातग्रस्त यांच्यासाठी रक्तपुरवठा केला जातोच, पण थॅलिसेमियाग्रस्तांसाठी रक्ताचीही मागणी अशा रक्तपेढयांकडे खूपच असते आणि ती सातत्याने पूर्ण करावी लागते. एकाच थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाला वेगवेगळया रक्तदात्यांची दिलेले रक्त दिले जाते आणि नंतर काही काळाने एक नवी समस्या उभी राहते. रक्तगट जुळला, तरीही त्या रक्ताचा उपयोग रुग्णाला न होता अधिकच गुंतागुंत वाढते. भविष्यात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत असतात.
या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. हा प्रश्न समोर आला आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढीत त्याचे उत्तर शोधले. 1998 साली केशवस्मृती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली जळगावला रक्तपेढी सुरू झाला. तेव्हा रक्तपेढीची गरज होती. 1998 साली सिव्हिल हॉस्पिटल आणि रेडक्रॉस अशा दोनच रक्तपेढया जळगाव जिल्ह्यात कार्यरत होत्या. रक्ताची मागणी भरपूर होती आणि त्या मानाने रक्तपेढयांची संख्या कमी. या प्रश्नाला आपण काही उत्तर देऊ शकतो का? गरजूंना मदत करू शकतो का? या विचारातून हे काम सुरू झाले आणि शेवटी माधवराव गोळवलकर रक्तपेढी सुरू झाली. रक्तसंकलन, आवश्यक ते प्रबोधन आणि प्रचार यासाठी वेगवेगळी शिबिरे, उपक्रम रक्तपेढीतर्फे घेतले जाताताच, पण त्यापेक्षा वेगळे काय? रूढ मार्गाने जाण्यापेक्षा काळाचा वेध घेत आपण वेगळे काय करणार, यांचा विचार ही मंडळी करत राहिली आणि त्यातून उदयास आली 'थॅलिसेमिया पालक योजना.'
माधवराव गोळवलकर रक्तपेढीतून सातत्याने काही थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्तपुरवठा केला जातो. याआधी उपलब्ध रक्तदात्याचे रक्त दिले जाई. त्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक जणांचे रक्त दिले जाई. त्यातून काही गुंतागुंती निर्माण होतात असे वैद्यकशास्त्र सांगते. 'दानांची संकल्पना' खूप पुण्यपर असली, तरी त्यातून समस्या निर्माण होणार असेल तर काय करायचे? त्यावरही उपाय शोधायला हवा. रक्तदाता आणि रक्तलाभार्थी या दोघांनाही आनंद व समाधान प्राप्त झाले पाहिजे आणि म्हणूनच मग ही पालक योजना.
या योजनेअंतर्गत एका थॅलिसेमियाग्रस्त व्यक्तीसाठी रक्तदाते निश्चित करून त्यांचेच रक्त त्या व्यक्तीला दिले, तर भविष्यातील समस्या कमी होऊ शकतात, म्हणून रक्तदात्याचे प्रबोधन आणि थॅलिसेमियाग्रस्तांना मानसिक आधार देणारी ही योजना तयार होऊ लागली. 'मी तुझा रक्ताचा पालक आहे' असा आश्वासक आधार रक्तदात्यांच्या माध्यमातून माधवराव गोळवलकर रक्तपेढी देत असते. ही योजना दिवसेंदिवस अधिक सक्षम होत आहे.
आज जळगाव परिसरात आठ रक्तपेढया कार्यरत आहेत. महिन्याला 690 रक्तपिशव्या वितरित करणारी माधवराव गोळवलकर रक्तपेढी रक्तसंकलनासाठी सातत्याने विविध उपक्रम करत असते. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'रक्ताचे अभियान' होय. आपल्या देशात महापुरुषांची मांदियाळी आहे. त्यांचे नित्यस्मरण आपल्याला प्रेरणा देत राहते. 12 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2017 या काळात रक्तपेढीने 'रक्तचेतना अभियान' आयोजित केले. या कालखंडात ज्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आहेत त्यांचे स्मरण करून जास्तीत जास्त रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. स्वामी विवेकानंद, लहुजी साळवे, स्वा. सावरकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा अशा महापुरुषांच्या प्रेरणा जागवत सुमारे 13 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यातून 598 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. एका अर्थाने ही आपण आपल्या महापुरुषांना वाहिलेली आगळीवेगळी आदरांजली होती.
केवळ रक्तसंकलन आणि आवश्यक तेथे रक्तपुरवठा एवढयापुरते माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे काम मर्यादित नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जळगाव शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही रक्तपेढी कटिबध्द आहे. रक्तसाठवणीबरोबरच त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत ही रक्तपेढी पोहोचत आहे. कोणत्याही व्यावसायिक दृष्टीकोनाचा अंगीकार न करता केवळ सामाजिक जाणिवेतून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षाही कमी किमतीत रक्तपिशव्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे पूर्णपणे संगणकीकृत काम असल्यामुळे तत्काळ सेवा ही या रक्तपेढीची खासियत झाली आहे. रक्तपेढीने सुरू केलेल्या 'रक्तदूत' यंत्रणेमुळे रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ थांबली आहे. अतिरिक्त खर्च थांबला आणि रक्त मिळेल की नाही ही धास्तीही थांबली. ज्या रुग्णालयात रक्ताची गरज आहे, तेथून रक्तपेढीत फोन येतो. रक्तदूत रुग्णालयात जातो, रुग्णाचा रक्तगट तपासतो आणि त्यांच्याशी जुळणारा रक्तगट उपलब्ध करून दिला जातो. माधवराव गोळवलकर रक्तपेढीचा हा 'रक्तदूत' उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या मार्गाने कार्यविस्तार करता येईल, त्या त्या मार्गाचा अवलंब करण्यात सर्वच कार्यकर्ते, कर्मचारी नेहमीच अग्रेसर असतात.
सातत्याने रक्तसंकलन शिबिरे, रक्तदानासाठी प्रचार, प्रसार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम सेवा यामुळे जळगावची माधवराव गोळवलकर रक्तपेढी आज जिल्ह्यातील अग्रगण्य रक्तपेढी झाली आहे. सेवाभाव जपताना व्यावसायिकता पाहायची नाही, आणि जिथे जिथे गरजू दिसेल तिथे तिथे पोहोचायचे हा या संस्थेचा मानस आणि त्यानुसारच आजवरची वाटचाल. भविष्याची भव्यदिव्य स्वप्ने उरी बाळगून त्या दिशेने झेपावणारी...
***
जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर, राजीव गांधीनगर, खंडेराव नगर हा विभाग म्हणजे शहराचा विस्तारित भाग. सारी कामगार वस्ती छोटया-छोटया बैठया घरात, दाटीवाटीने राहणारी ही माणसे. बहुसंख्य लोक मोलमजुरी करणारे. तेही बांधकाम क्षेत्रात. महिला विटा-सिमेंट वाहतात. पुरुष लोखंडकाम करतात. ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी जेवण नाही, असे हातावर पोट जगवणाऱ्या या वस्तीतल्या काही समस्या आहेत आणि समस्या आहेत म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठान तिथे आहे. 'झोपडपट्टी' या सदरात मोडणारी ही वस्ती. अनेक समस्यांचे आगर. सर्वच समस्या मानवी जीवनाला या ना त्या अर्थाने स्पर्श करणाऱ्या. मग त्या समस्या मानवी आरोग्याच्या असो की शिक्षणाच्या, संस्काराच्या असो, ज्येष्ठ नागरिकांच्या असो अगर किशोरवयीन मुलींच्या असो. ज्या ज्या समस्या दिसतील, त्या त्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे.
कोणत्याही समस्येचा पहिला बळी ठरते ती महिलाच. मग ती समृध्द परंपरा लाभलेल्या घरातील असो अगर अठरा विशे दारिद्रयात खितपत पडलेली असो. दोन्हीकडे पीडित होते ती महिलाच. जन्मजात सोशिकपणा हा बाईचा स्थायिभाव. या स्थायिभावातून केवळ सोसणे आणि त्या सोसण्याचे स्वत:वर, स्वत:च्या आरोग्यावर परिणाम करून घेणे. या वस्तीत काम करताना, सोसणाऱ्या अशा असंख्य महिला समोर आल्या. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्या संसाराचा गाडा ओढत होत्या. कधी
स्वत:च्या ताकदीवर तर कधी आपल्या जोडीदाराच्या मदतीने. अशा परिस्थितीत जगणाऱ्या या महिलांच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून येते. त्याला या वस्ती अपवाद कशा असतील? मुळात असे काही असते, यावरच या महिलांचा विश्वास नसतो. वरवर धडधाकट वाटणाऱ्या या महिला आतून पोखरलेल्या असतात.
वस्तीतील महिलांचे हिमोग्लोबीन कमी आहे हे लक्षात आल्यावर या समस्येशी दोन हात करण्याचा चंग संस्थेने बांधला. डॉ. विवेक जोशी हे सेवाभावी कार्यकर्ते या वस्तीत दररोज सकाळी तीन तास आपली सेवा प्रदान करत असतात. महिलांचे आरोग्य सुधारणे हा जरी मुख्य विषय असला, तरी छोटे-मोठे आजार आणि समस्या यावर उपचार होतात. वस्तीतील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यावर औषधोपचार करण्यासाठी गेली चार वर्षे सातत्याने कार्य चालू आहे. गेल्या वर्षी हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यासाठी 29 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि 1526 महिलांनी त्याचा लाभ घेतला. 'अक्षर भाषा' या अमेरिकास्थित संस्थेच्या सहयोगातून हा उपक्रम सुरू आहे. केवळ तपासणी न करता महिलांमध्ये असलेल्या जाणिवेचा अभाव घातक असल्याचे लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून 'ऍनिमिया जाणीव जागृती मोहिमा' राबवण्यात आल्या. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व स्तरातील महिलांसाठी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. त्यात महिलांचे समुपदेशन करून हिमोग्लोबीन कमी असण्याचे कारण आणि त्यावर घरगुती उपचार पध्दतीची माहिती दिली जाते. उद्देश हाच की 'घरातील बाई तंदुरुस्त, तर घर तंदुरुस्त.'
सेवा वस्तीत काम करायचे तर सर्वच समस्यांचा सामना करत परिवर्तन घडवून आणायचे, हे केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे. ते काम करताना स्व. दादा आचार्यांनी दिलेला मंत्र ते कायम जपतात. तो मंत्र आहे, 'समाजावर आईसारखे नि:स्वार्थी प्रेम करू या.' आई जशी आपल्या लेकरांमध्ये कोणताही भेद करत नाही, त्यांच्यावर केवळ प्रेम आणि प्रेमच करते, अगदी तसेच आपण आपल्या समाजबांधवांवर जिवापाड प्रेम केले पाहिजे. सेवा वस्तीत काम करताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा बोध कायम ध्यानात ठेवला आणि निरपेक्ष भावनेने काम केले. या तीन नगरांत ज्या काही समस्या समोर येतात, त्यांना भिडायचे हे निश्चित असल्यामुळे आरोग्य, शिक्षण, संस्कार अशा सर्वच बाबींवर येथे मूलभूत स्वरूपाची कामे चालू असतात.
आरोग्य, शिक्षण आणि संस्कार या तीन सूत्रांना धरून बालवाचनालय, 'स्वच्छ घर सुदृढ आरोग्य', 'पाठयपुस्तक योजना', लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, ज्येष्ठ नागरिकांचे भजनी मंडळ, असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वस्तीत व्यसनाधीनता होती. आता तिचे प्रमाण कमी होते आहे, असे डॉक्टर जोशींचे मत आहे. दहा-बारा महिला दवाखान्यात येऊन बसल्या की औषधोपचाराबरोबर डॉक्टर समुपदेशनही करतात. सहज बोलण्यातून कुठे काय घडते आहे आणि आपण काय केले पाहिजे याची माहिती मिळते. अनेक अडचणींवर उत्तरे शोधता येतात. सेवा वस्तीत बदल घडतो आहे आणि त्याला केशवस्मृती प्रतिष्ठान कारणीभूत आहे. या संस्थेमुळे आमच्या जगण्याचे संदर्भ बदलत आहेत, असे आता येथील स्थानिक बोलू लागले आहेत आणि हीच कामाची पोचपावती आहे.
***
स्व. दादा आचार्य यांनी जळगाव जनता बँकेच्या माध्यमातून सेवायज्ञाचा प्रारंभ केला आणि आवश्यकतेनुसार त्यांनी नव्या नव्या समस्यांना हात घातला. उदाहरणच द्यायचे, तर बळवंत सहकारी पतपेढीचे देता येईल. जळगाव जनता सहकारी बँक असतानाही एका छोटया पतसंस्थेची निर्मिती करून अगदी तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश साध्य केला. पतसंस्थेचे ध्येयवाक्यच खूप काही बोलून जाते - 'हातात हात गरजवंताला साथ'. जे जे गरजू आहेत त्यांना मदत झाली पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका घेऊन गेली अठरा वर्षे पतसंस्था प्रामाणिकपणे काम करत आहे. सातत्याने 'अ' वर्ग मिळवणारी ही संस्था दोन शाखा आणि मुख्य कार्यालय यांच्या माध्यमातून सेवावस्तीत राहणारे लोक, भाजी विक्रेते, फिरते विक्रेते यांच्यासाठी सहकार क्षेत्रात काम केले जाते.
पतसंस्थेच्या आणि बँकेच्या माध्यमातून 'महिला बचत गट' हा विषय खूप आग्रहाने आणि आत्मीयतेने हाताळला जात असतो. जळगाव शहरात आणि जिल्ह्यात बचत गटाची सशक्त चळवळ आणि त्यातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे काम अविरत चालू आहे. या चमूला केवळ आर्थिक क्षेत्रात काम करायचे नाही, तर आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करायचा आहे. समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि त्यांचे परिणामही दिसत आहेत. ज्याप्रमाणे तळागाळातील गरजूंना बँकेच्या, पतसंस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो, त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राला आवश्यक असणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानही 'जळगाव जनता इन्फो लिमिटेड' या कंपनीद्वारे वितरित केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यवस्थापन ही छोटया छोटया सहकारी संस्थांना न परवडणारी गोष्ट आहे. छोटया संस्थांना असे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून देणे आणि पुढील काळात त्या तंत्रज्ञानाची देखभाल करणे हे काम 'जळगाव जनता इन्फो लिमिटेड'च्या माध्यमातून होते. ही संस्था जरी व्यावसायिक तत्त्वावर चालणारी असली, व्यावसायिक नीतिनियम पाळणारी असली, तरी डॉ. आचार्यांनी दिलेला सेवाभाव हे तिचे अधिष्ठान आहे. संघभावनेचा संस्कार आहे. त्यामुळे अल्पावधीत या संस्थेने सहकार क्षेत्राला आवश्यक असणारे विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील छोटया छोटया आर्थिक संस्थांना आधार उभा केला आहे.
उद्याच्या वैभवशाली भारत घडवायचा असेल तर भावी पिढी सुसंस्कारित आणि शीलवान करावी लागेल आणि त्यासाठी शिक्षणासारखा दुसरा मार्ग नाही, हे डॉ. दादा आचार्य यांनी ओळखले होते आणि म्हणूनच साधारणपणे 20 वर्षांपूर्वी आपल्या निवडक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. विवेकानंद प्रतिष्ठानच्या रूपाने आदर्श शिक्षण संस्था कार्यरत झाली. आजघडीला सुमारे 6500 विद्यार्थी आणि 400 शिक्षक या शिक्षण संस्थेशी जोडले आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणूस म्हणून जगण्याची कला इथे शिकवली जाते. ज्ञान-विज्ञान-संस्कार आणि क्रीडा या सर्वच बिंदूंना सामावून घेत इथे नवी पिढी घडवली जाते. डॉ. अविनाश आचार्य विद्यालय (पूर्व प्राथमिक विभाग) डॉ. अविनाथ आचार्य विद्यालय (प्राथमिक विभाग), शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.) इंग्लिश मीडियम स्कूल, कम्युनिटी कॉलेज अशा विविध शाळांतून ज्ञानमोचन चालू आहे. जसजशी गरज जाणवत गेली, तसतशी शाळाच्या विस्ताराची योजना संस्था करत केली. क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय असंख्य गोष्टी या शाळेत शिकवल्या जातात. जिल्हा आणि विभाग पातळीवरच्या अनेक स्पर्धांचे विजेतेपद इथल्या विद्यार्थ्यांच्या नावावर नोंदवले गेले आहे. चिरंतन भारतीय संस्कार जगण्याचा भाग व्हावा, म्हणून 'योगदिन', 'शिवजयंती', 'आनंदायी शिक्षण जत्रा' असे अनेक उपक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थेचे संचालक यांच्या माध्यमातून यशस्वी केले जातात.
समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू झालेला हा सेवायज्ञ आता विविध आयामांनी बहरत आहे. समस्या मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित, तिच्याशी दोन हात करायचे हा संस्थेतील कार्यकर्त्यांचा बाणा. गेल्या वर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट होते. शासन दुष्काळमुक्तीसाठी चिरकालीन प्रयत्न करत होते. या प्रयत्नातील एक भाग म्हणून संस्थेने तीन गावे निवडली. जनसहभाग आणि संस्थेची मदत यातून या गावातील नद्यांचे खोलीकरण झाले. पाण्याची समस्या संपली. भोणे, जुनेरे आणि शेवाळे या तीन गावांतील हे काम केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सामाजिक जाणिवांचे प्रतीक आहे. दुष्काळाशी सामना करायचा, तर आपणही त्यात सहभागी झाले पाहिजे, समस्येचे निराकरण संघभावनेतून केले पाहिजे ही डॉ. दादा आचार्यांनी घालून दिलेली कार्यपध्दती या कामातही लागू पडली. या प्रयत्नातून 4 कोटी 65 लाख लीटर पाणी अडवले गेले आणि त्याचा परिणाम आसपासच्या परिसरावर झाला. कोरडया पडलेल्या विहिरी भरल्या. केशवस्मृती प्रतिष्ठानने आपल्या प्रयत्नातून, जनसहभागातून शुष्क विहिरींना आणि कोरडया ओढया-नाल्यास पाझर फोडला, जो करुणेचा आहे, आत्मीयतेचा आहे आणि सेवेचाही आहे.
आरोग्य, शिक्षण आणि सेवा या तीन क्षेत्रांत संस्था भरीव काम करत आहे, पण त्याला जोडून 'विशेष' या सदरात मोडले जातील असेही काही उपक्रम केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 'आश्रम माझे घर', 'समतोल' आणि 'श्रवण विकास मंदिर' या तीन कामांचा उल्लेख करावा लागेल. सर्वसाधारण व्यक्तीसाठी मदत करणे, त्यांची गरज लक्षात घेऊन आधार देणे सोपे असते. पण 'विशेष' या सदरात मोडणाऱ्यांसाठी काय? जे जन्मापासून कर्णबधिर आहेत म्हणून मुके आहेत, जे शरीराने, वयाने मोठे होत आहेत, पण बुध्दीने विकसित झाले नाहीत, जे घर, गाव सोडून परागंदा झाले आहेत, स्वत:ची ओळख विसरून रेल्वे फलाटावर जगत आहेत त्यांचे काय? असे अनेक प्रश्न समाजात आहेत आणि कुणीतरी त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत अशी समाजाची अपेक्षा आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानही वरील तिन्ही विषयांवर काम करत आहे. श्रवण विकास मंदिर ही कर्णबधिरांसाठीची शाळा गेली अनेक वर्षे संस्था चालवत असून एका सुसज्ज वास्तूत या संस्थेचे काम चालते. पन्नास मुलांच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. या विशेष मुला-मुलींचे अंगभूत कलागुण विकसित करण्यावर भर असतो. या कामाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच इथली मुले सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या आशा फाउंडेशनच्या आशा महोत्सवात सर्वाधिक 12 पारितोषिके मिळवून सर्वोत्कृष्ट शाळेचा बहुमान मिळवला. शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत 5 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके मिळाली. पुणे येथील बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेत संस्थेची 5 मुले सहभागी झाली, तर 20 दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थी राज्य पातळीवर क्रीडा स्पर्धेसाठी निवडली गेली.
ही यशाची ध्वजपताका फडकत असताना आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कार यांचा समन्वय साधत श्रवण विकास मंदिर आपली वाटचाल करत आहे. ज्यांना ऐकता येत नाही, त्यांना बोलताही येत नाही, मुलात ती मुले नसतात हे लक्षात घेऊन 'स्पीच थेरपी' आणि 'मानसशास्त्र' यांच्यावर विशेष काम करून अनेकांना वाचा देण्याचे काम येथे सातत्याने चालू आहे. संघ शिक्षणाबरोबरच विविध कलांचा विकास येथे घडवून आणला जातो. या विकासामुळे शाळा संपल्यावर अनेक मुले-मुली स्वत:च्या चरितार्थाची साधने शोधू शकतात. आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने जगण्याचा आनंद ते उपभोग असतात. 'कानाने बहिरा, मुका परी नाही' ही ओळ कृतीने सिध्द करण्यात श्रवण विकास मंदिर यशस्वी झाले आहे. या क्षेत्रात काम करताना कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक साधनांचा वापर करून, शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत श्रवण विकास मंदिर कार्यरत आहे. सेवाभावी शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि संस्था संचालकांचे स्नेहपूर्ण मार्गदर्शन यामुळे श्रवण विकास मंदिर यशोपथावरून आगेकूच करत आहे.
ज्या माता-पित्याच्या पोटी मतिमंद मुले जन्माला येतात, त्यांचे दु:ख शब्दात मांडता येत नाही. चोवीस तास त्यांचे जीवन त्या मुलांशी बांधलेले असते. त्यामुळे जगण्याचा कोणताही आनंद त्यांना अनुभवता येत नाही. या मुलांचे वय वाढत जाते, तसतसे अनेक समस्यांचे जाळे गडद होत जाते. वाढत्या वयात या मुलांना सांभाळणे अवघड होते. अशा वेळी या मुलांचे संगोपन कसे करायचे? हा प्रश्न पालकांना सतावत असतो. मतिमंद मुलांचा हा प्रश्न म्हणजे समाजजीवनातील एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे अनेक माता-पित्यांची ससेहोलपट होते. या समस्येवर केशवस्मृती प्रतिष्ठानने उत्तर शोधले.
गेल्या चार-पाच वर्षांपासून 'आश्रम माझे घर' हा आयाम सुरू झाला. समाजातील उणिवांचा शोध घेऊन केशवस्मृती प्रतिष्ठान सतत सेवेची संधी शोधत असते. ज्या ठिकाणी सेवेची उणीव आहे तेथे सेवा प्रदान कण्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी काम केले जाते. गतिमंदत्व (मतिमंद) हीदेखील समाजाच्या प्रगतीमधील मोठी खीळ आहे. अशा बालकांच्या आयुष्यात हक्काचा निवारा असावा आणि समाजाकडून सन्मानजनक वागणूक मिळावी, याकरिता 'आश्रम माझं घर'ची स्थापना करण्यात आली. या मुलांना जन्मभर सांभाळण्याची वसतिगृहासारखी व्यवस्था उभी करणे गरजेचे होते. ही गरज संस्थेने पूर्ण केली. 'आश्रम माझे घर' या प्रकल्पात सध्या अठरा मुले राहत असून त्यांच्या संगोपनाबरोबरच त्यांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी काही कलाकौशल्य शिकवण्याचाही प्रयत्न येथे होत असतो.
या गतिमंद मुलांचा सांभाळ करणे खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा त्यांना काही शिकवणे अवघड आहे. पण जे अवघड आहे, ते सोपे करायचा वसा केशवस्मृती प्रतिष्ठानने घेतला आहे. त्यामुळे तन-मन-धनपूर्वक कोणत्याही समस्येशी दोन हात करण्याची त्यांची तयारी असते. जिथे गरज आहे तिथे आपण काम करायचे, ही कार्यपध्दती असल्यामुळेच गतिमंद मुलांसाठी काम सुरू झाले. पाच ते पंचवीस वयोगटातील 18 मुले या आश्रमात घराचा अनुभव घेत आहेत.
समस्या कुठे नसतात? मुले कधीकधी या समस्याची शिकार होतात. ती लहान मुले कधी आई-वडील यांची भांडणे, हलाखीची आर्थिक परिस्थिती किंवा मायेचा आधार देणारे कोणी नाही, म्हणून घर सोडून परागंदा होणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. या संख्येत आता आधुनिक तंत्रज्ञान आणि संपर्क साधने यामुळे अधिकच भर पडू लागली आहे. माध्यमातून विविध आकर्षणे समोर येतात आणि ती मिळवण्यासाठीही काही जण घर सोडतात. या मुलांचे पुढे काय होते? एक तर त्यांची भटकंती दिशाहीन असते म्हणून कायम सुरक्षितता आणि अस्थिरतेचा सामना करण्याची पाळी त्यांच्यावर येते. याच काळात पुन्हा मायेची ऊब मिळाली नाही, तर व्यसनाधीनतेच्या आणि गुन्हेगारीच्या विळख्यात ही मुले जखडली जातात. ही समस्या सार्वत्रिक आहे. त्याला जळगाव जिल्हाही अपवाद नाही.
चार वर्षांपूर्वी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिला जाणारा डॉ. आचार्य केशवस्मृती सेवा पुरस्कार मुंबईतील विजय जाधव यांना दिला गेला. त्यांनी घरातून पळून येणाऱ्या मुलाची संख्या आणि त्यांची होरपळ आपल्या भाषणातून मांडली. स्वत: विजय जाधव अशा मुलांसाठी मुंबईत 'समतोल' या नावाने गेली अठरा वर्षे काम करत असून मुंबई, ठाणे, कल्याण येथे रेल्वे स्टेशनवर भरकटलेली मुले शोधून त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. अशाच प्रकारचे काम त्यांनी जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शनमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की, हे काम करण्यासाठी मला स्थानिक संस्थेचा आधार हवा.
केवळ सेवाभावाच्या मदतीने समाजाचा उत्कर्ष साध्य करतानाच आपल्या समाजाला एकसंध करणाऱ्या अनेक गोष्टींचा आधारही केशवस्मृती प्रतिष्ठान आपल्या कामासाठी घेत असते. खान्देशात भुलाबाई प्रसिध्द आहे.. घरगुती भुलाबाईला सार्वजनिक स्वरूपात साजरे करायला सुरुवात केली. गेली अनेक वर्षे जळगावात भुलाबाई महोत्सव केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या निमित्ताने जिल्ह्यातील असंख्य महिला आपल्या कलागुणांना वाव देतात.
त्याच वर्षापासून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात 'समतोल' सुरू झाले. भुसावळ, जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कार्यकर्ते फिरू लागले. केवळ हे काम रेल्वे स्टेशन परिसरातील असले, तरी त्यासाठी खूप मोठया प्रमाणात प्रबोधनाची गरज आहे, म्हणून जळगाव, भुसावळ शहरात 'समतोल एक्स्प्रेस' या नाटकांचे आयोजन करून जनजागृती केली गेली. काही निवडक कार्यकर्त्यांच्या बळावर गेल्या चार वर्षांत समतोलने लक्षणीय काम केले असून समतोलचे काम सुरू झाल्यापासून 601 मुलांना रेल्वे स्टेशन परिसरात फिरताना ताब्यात घेतले, तर 170 मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात यश आले आहे. भटकलेली, पळून आलेली मुले रेल्वे स्टेशन परिसरात मिळतात, पण त्यांना ठेवायचे कुठे? हा संस्थेपुढचा प्रश्न आहे. सध्या या मुलांना शासकीय बाल सुधारगृहात ठेवले जाते. पण संस्था त्यावर समाधानी नाही. लवकरच स्वत:चे शेल्टर होम सुरू व्हावे, यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा बालकल्याण विभाग यांच्याशी तसा पत्रव्यवहार सुरू आहे.
प्रत्येकाला स्वत:चे घर मिळाले पाहिजे हा समतोलचा ध्यास आहे. त्यासाठी अथक परिश्रम करून या मुलांच्या पालकांना शोधले जाते आणि तेथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. चार वर्षांत 170 मुलांना पुन्हा स्वत:चे घर मिळाले, ही छोटी बाब नाही. भविष्यात शेल्टर होम, मनपरिवर्तन शिबिरे आणि विविध कौशल्य देणारे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मानस आहे.
***
गरजपूर्ती पूर्णान्नाची, असो गरीब अथवा श्रीमंतांची ।
नसावी मनी कुठलीही भ्रांती, एकच नाव फक्त क्षुधाशांती ।
या ओळीत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित श्री क्षुधाशांती सेवा संस्थेचे हे घोषवाक्य. हे काम सुरू होऊन आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. 9 जून 1992 रोजी डॉ. दादा आचार्य आणि रतनलालजी बाफना यांनी सात कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन 'श्री क्षुधाशांती झुणका भाकर केंद्र' सुरू झाले. केवळ गरिबांसाठी नाही, तर गरजूंसाठी माफक दरात सकस अन्न पुरवणे हा या कामाचा उद्देश. डॉक्टरांच्या दवाखान्यात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची अन्नाअभावी होणारी उपासमार थांबवण्यासाठी दररोज 50 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करणारा प्रकल्प पंचवीस वर्षांत यशोशिखरावर पोहोचला असून सध्या दररोज 3500 लोकांची भूक येथे भागवली जात आहे. हा सारा खटाटोप चालतो तो केवळ सेवा म्हणून. नफा-तोटयाचे हिशेब येथे मांडले जात नाहीत. 2015-2016 या अहवाल वर्षांत 8,55,360 लाभार्थींनी भोजनाचा, न्याहरीचा आस्वाद घेतला. सध्या संस्थेत 34 सेवाभावी कार्यकर्ते कार्यरत असून शासनाच्या सर्व सुविधा आणि कामगार कल्याणाचे कायदे त्यांना लागू आहेत. जळगावच्या एसटी स्टँडजवळ असणारी 'श्री क्षुधाशांती सेवा संस्था' केवळ जळगावच्या रहिवाशांची भूक भागवते असे नाही, तर प्रवासानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक, एस.टी.चे कर्मचारी, जळगाव जिल्हा स्थान असल्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी या साऱ्यांची क्षुधाशांती या ठिकाणी होत असते.
घरचे अन्न ही संकल्पना शहरी भागात दुर्मीळ होऊन बाहेर खाणे मला प्रगतीचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. जळगावही त्याला अपवाद नसावे. पण श्री क्षुधाशांती सेवा संस्थेत मिळेल ते घरगुती चवीचे आणि सकस पौष्टिक अन्न घेण्यासाठी जळगावकर झुंबड उडवतात. अत्यल्प दरात मिळणारे हे अन्न 'पूर्णब्रह्म' म्हणून स्वीकारताना श्री क्षुधाशांती सेवा संस्थेने काही नियम घालून दिले, ते पाळावे लागतात. पहिले म्हणजे रांगेत उभे राहून ताट घ्यायचे आणि जेवण झाल्यावर स्वत:चे ताट स्वत: उचलायचे. ताटात काहीही शिल्लक ठेवायचे नाही. हे नियम आता अंगवळणी पडले आहेत. अगदी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यापासून ते रस्त्यावरच्या हमालापर्यंत साऱ्यांकडून त्यांचे पालन होते. शिस्त, स्वच्छता आणि शांतता यांचा त्रिवेणी संगम आपल्याला या ठिकाणी पाहता येतो.
'जिथे गरज तिथे आम्ही' हा या मंडळींचा बाणा आहे. त्यामुळेच उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्तीच्या काळात 42,500 अन्नपाकिटे रेल्वेच्या मदतीने रवाना करण्याचे काम संस्थेने केले. जो भुकेलेला आहे, ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे तिथपर्यंत आपण पोहोचले पाहिजे याच भूमिकेतून श्री क्षुधाशांती सेवा संस्थेने नैसर्गिक आपत्तीत आपला मदतीचा हात आपद्ग्रस्तांना दिला होता. रा.स्व. संघ जनकल्याण समितीमार्फत जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज 55 लोकांना विनामूल्य भोजन देण्यात येते. हे भोजन क्षुधाशांती केंद्रात निर्मिती शुल्क घेऊन नफा न घेता व वाहतुकीचा खर्च न घेता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज पुरवण्यात येते. मागील वर्षी 31,000 व्यक्तींनी या भोजनाचा लाभ घेतला आहे. ते इथे येतात आणि आस्वाद घेतात. सेवाभाव आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावरची ही पंचवीस वर्षांची चवदार वाटचाल जळगावची 'आयकॉन' झाली आहे. त्यामुळे जळगावमध्ये येणारे विविध क्षेत्रांतील मान्यवर क्षुधाशांतीला हमखास भेट देतात. अनेक दूरचित्रवाहिन्यांनी क्षुधाशांती सेवा संस्थेवर रिपोर्ट सादर केले आहेत आणि श्रीक्षुधाशांती सेवा संस्थेचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे. 1995नंतर काही काळ अशाच प्रकारची 'झुणका भाकर योजना' युती शासनाने सुरू केली, पण ती पुढे टिकली नाही. डॉ. आचार्यांनी सुरू केलेली ही संस्था मात्र पंचविशी साजरी करत आहे.
केशवस्मृती प्रतिष्ठान सेवाभावाने आणि संघभावनेने काम करत आहे आणि समाजात त्याची प्रचितीही येत आहे. आपण जे काम करतो, तसेच काम अन्य संस्था आणि कार्यकर्ते करत असतात. त्यांच्या कामाला समाजाची पोचपावती मिळावी आणि त्यांचे कौतुक व्हावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून 'आचार्य अविनाशी' पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत भारतबाई देवकर, विजय जाधव, प्रमोद करंदीकर, नरसिंग झरे यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
3 मार्च 1997 रोजी डॉ. आचार्य आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी लावलेला सेवावृक्ष म्हणजे मांगीलालजी बाफना नेत्रपेढी आणि चिकित्सालय. मांगीलाल बाफना यांना नेत्रदान करायचे होते, पण ते नेत्रदान करू शकले नाहीत, कारण त्या वेळी नेत्रदानाची सुविधा उपलब्ध नव्हती, ही सल रतनलाल बाफना यांना होती. याच वेदनेचे उत्तर शोधताना 'मांगीलाल बाफना नेत्रपेढी आणि चिकित्सालय'चा जन्म झाला. केशवस्मृती प्रतिष्ठान आणि आर.सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून ही नेत्रपेढी चालवली जाते. मरणोत्तर नेत्रदान स्वीकारणारी आणि मोफत नेत्ररोपण करून देणारी जळगाव जिल्ह्यातील ती एकमेव नेत्रपेढी आहे. स्थापनेपासूनच नेत्रपेढीच्या माध्यमातून नेत्रदान, नेत्ररोपण आणि नेत्रआरोग्य या विषयांवर निरंतर जनजागृती सुरू आहे. नेत्रदानास प्रोत्साहन मिळावे या हेतूने नेत्रपेढीतर्फे जागृती असते. पण ग्रामीण भागात जागृतीचा अभाव असतो, हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त ग्रामीण भाग आपल्या कार्यक्षेत्रात आणण्याचा प्रयत्न नेत्रपेढी करत असते. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील ही एकमेव मान्यताप्राप्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली नेत्रपेढी आहे. नेत्रदानाबाबतच्या जाणीवजागृतीबरोबरच प्रत्यक्ष उपचार आणि मार्गदर्शनही इथे केले जाते.
संस्थेच्या स्थापनेपासून मांगीलाल बाफना नेत्रपेढीमुळे 197 लोकांना पुन्हा जग दिसू लागले, तर नेत्रपेढीच्या प्रयत्नातून 405 लोकांनी नेत्रदान केले. वीस वर्षांचा कालखंड पाहता ही प्रगती खूपच आश्वासक आहे. नेत्रदानाची मोहीम राबवताना संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवते. त्यामध्ये पोस्टर स्पर्धा, नेत्रचेतना यात्रा, अंधत्व निवारण कार्यक्रम यांचा यात समावेश आहे. मुंबई येथील 'द सीएसआर जर्नल' या संस्थेने मांगीलाल बाफना नेत्रपेढीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. द सीएसआर जर्नलच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या 'स्वॅग' म्हणजेच सोशल वेल्फेअर ऍड ग्रोथ या नामांकित पुरस्कारासाठी द्वितीय मानांकन मिळाले. नेत्रपेढीच्या माध्यमातून मागील 19 वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया, अंधत्व निवारण जनजागृती, नेत्रदान जनजागृती चळवळ, नेत्रदूत आणि अल्पदरात होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
'नेत्रदूत' हा संस्थेचा अनोखा उपक्रम. नेत्रदानाची जाणीव निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात नेत्रपेढीच्या माध्यमातून 'नेत्रदूत' ही संकल्पना राबवली जाते. ग्रामीण भागातील नेत्ररुग्णाला मदत मिळावी, म्हणून नेत्रदूत योजना बनवण्यात आली. सध्या पन्नास नेत्रदूत जिल्ह्यात कार्यरत आहेत. या नेत्रदूतांचे प्रशिक्षण आणि प्रबोधन करण्यासाठी सातत्याने विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. अशा उपक्रमामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या माध्यमातून 'नेत्र' या विषयातील खान्देशाची गरज पूर्ण केली जात आहे, तीही अत्यल्प दरात आणि सेवाभाव आणि आत्मीयतेसह...
भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे एकत्व म्हणजे कुटुंब. पण मागील काही वर्षांपासून याच कुटुंबव्यवस्थेला घरघर लागली आहे. कारणे काहीही असोत, कुटुंबव्यवस्था विसकळीत झाली आहे हे मात्र खरे. मग अशातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला एकच उत्तर असते, ते म्हणजे वृध्दाश्रम. गेली वीस वर्षे मातोश्री वृध्दाश्रमाच्या माध्यमातून कुटुंबव्यवस्थेला पडलेल्या समस्येचे उत्तर शोधले जाते. 'सन्मानपूर्वक वागणूक आणि ज्येष्ठांचा हक्काचा निवारा' या गोष्टींवर भर देत संस्था काम करत आहे. आजच्या बदलत्या काळात वृध्दाश्रम ही गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक वृध्द हा काही मुलांनी टाकून दिले, नाकारले म्हणून वृध्दाश्रमात येत नाही. आज वृध्दाश्रमात दाखल होण्याची अनेक कारणे आहेत. केवळ नातेसंबंधात ताणतणाव निर्माण झाला म्हणून कोणी वृध्दाश्रमात येत नाही आणि समजा अशा परिस्थितीत कोणी आलाच, तर त्यांचे समुपदेशन करून पुन्हा त्यांना घराकडे पाठवले जाते. आजी-आजोबांनी आपल्या परिवारात असावे अशी वृध्दाश्रमाची आधीपासूनची भूमिका आहे. म्हणून कधीकधी नात्यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करून आजी-आजोबा आणि त्यांची मुले यांच्यात संवादाचा पूल बांधला जातो. या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद लाभतो. गेल्या वर्षी या प्रयत्नामुळे 6 आजी-आजोबा परत आपल्या घरी गेले. मातोश्री वृध्दाश्रम ही तात्पुरती व्यवस्था आहे. समाजाची गरज म्हणून ती चालू आहे.
प्रत्येक आजी-आजोबांची काळजी आणि त्यांच्या दैनंदिन जगण्याकडे बारकाईने लक्ष ठेवत गेली वीस वर्षे कार्यरत असणाऱ्या या मातोश्री वृध्दाश्रमात आता साधारणपणे 40 जण सेवा घेत आहेत. वृध्दाश्रमातील ज्येष्ठांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येते. रक्तदाब, हृदयरोग तपासणी, मधुमेह, हाताची तपासणी अशा वेगवेगळया तपासण्या करून त्यांना आवश्यक ती औषधे उपलब्ध करून दिली जातात. सध्या मातोश्री वृध्दाश्रमात असणाऱ्यांपैकी काही आजी-आजोबा नि:शुल्क राहत आहेत.
पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी ती पूर्ण केली पाहिजे अशी भूमिका घेऊन गेली काही वर्षे गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर विसर्जन मार्ग आणि निर्माल्य कुंड स्वच्छ करण्याचे काम केले जाते. यासाठी केशवस्मृती सेवा समितीशी संलग्न सर्व संस्थांचे कार्यकर्ते, संचालक आणि कर्मचारी मोठया सहभागी होतात. विवेकानंद प्रतिष्ठानच्या शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकही या कामात आपले योगदान देत असतात.
वृध्दाश्रम असावेत की नको या विषयावर कधीकाळी खूप चर्चा होत असे आणि हिंदू समाजाला त्यांची आवश्यकता नाही असेच छातीठोकपणे सांगितले जात असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. बदलती समाजव्यवस्था आणि जीवनशैली, जागतिकीकरणांचे परिणाम यामुळे आता वृध्दाश्रम ही गरज झाली आहे. त्याला केवळ शहरच अपवाद आहे असे नाही, तर आता छोटया छोटया गावांतही ही गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. ही गरज जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत मातोश्री वृध्दाश्रम चालू राहणार. असे असले तरी जास्तीत जास्त आजी-आजोबांनी आपल्या मुलांबरोबरच राहावे या मतावर संस्थेचे संचालक ठाम आहेत. एकदम तातडीची गरज निर्माण झाली तरच 'मातोश्री वृध्दाश्रम'चा मार्ग शोधा, असे त्यांचे मत आहे.
मातोश्रीमधील हे 40 आजी-आजोबा म्हणजेसुध्दा एक कुटुंब निर्माण झाले आहे. नातेवाइकांपासून दूर असणारी ही माणसे आता मातोश्रीच्या माध्यमातून एका नव्या भावविश्वात रमली आहेत. एक विस्थापित कुटुंबाचा इथे उदय झाला असून संस्थेचे सदस्य संचालक, कर्मचारी आणि इथले आजी-आजोबा एका अनामिक भावबंधात बांधले आहेत.
***
तर असा हा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावृक्षाचा विस्तार. गेली तीस-चाळीस वर्षे वेगवेगळया प्रकारे समाजाच्या गरजा पूर्ण करताना या मंडळींनी कायम सेवाभाव जपला. पण दातृत्वाचा अहंकार जडू दिला नाही. अहंकार कोणताही असो, तो वाईटच याचे भान जपत ही झालेली वाटचाल आणि म्हणनूच महाराष्ट्र शासनाने 2017 साली शाहू-फुले-आंबेडकर पुरस्काराच्या रूपाने घेतलेली दखल. या साऱ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर असे लक्षात येते की, हे सारे टीम वर्क (संघभावनेचे काम) आहे. संघभावनेत शिस्त, समन्वय आणि संवाद याला खूप महत्त्व असते. या तिन्ही गोष्टी वगळून संघभावना विकसित होऊ शकत नाही. रा.स्व. संघाचे बाळकडू आणि डॉ. आचार्य यांच्या जवळच्या सहवासात केशवस्मृती प्रतिष्ठानची पहिली पिढी घडली आणि त्यांच्या छत्रछायेखाली आता दुसरी पिढी कार्यरत आहे. नवी स्वप्ने आहेत, नवी उमेद आहे, पण अधिष्ठान आणि मार्ग तोच आहे. सेवाभावाच्या, या संघमार्गाने जाताना एका विशिष्ट टप्प्यावर येऊन केशवस्मृती प्रतिष्ठान आज उभे आहे. कदाचित हे भूतकाळाचे सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध असेल.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या घटक असणाऱ्या सर्वच संस्था स्वायत्त आहेत. आर्थिकदृष्टयाही त्या सक्षम आहेत. अशा वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानची पुढची वाटचाल कशी असेल? हा कारवा तर पुढे घेऊन जायचे आहेच, पण त्याला अधिक आशयगर्भ आणि समयोचित करायचे आहे. इतके दिवस समाज समस्या घेऊन केशवस्मृती प्रतिष्ठानकडे येई, आता केशवस्मृती प्रतिष्ठान समस्येचा शोध घेत समाजात जाईल आणि आपली सर्व शक्ती कामी लावून त्या समस्येचे निराकरण करेल. सेवाभाव जपताना आधुनिक मूल्य आणि तंत्रज्ञान सोबतीला घेऊन पुढची वाटचाल करताना थोडीशी व्यवसायिकताही जपली जाईल. समाज समस्यामुक्त व्हावा, आनंद, सुख आणि हास्य यांची समाजात पेरणी करावी यासाठी पुढच्या काळात सेवाभावी संस्थांचे जाळे जिल्ह्यात उभे करून त्यांच्या माध्यमातून सर्वार्थाने समस्या निराकरण करत विकासाचे स्वप्न साकार करावे, असा मानस आता संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व्यवहारातून व्यक्त होतोय. केशवस्मृती प्रतिष्ठान सेवाभावी, विकासाभिमुख संस्थांची नोडल एजन्सी म्हणून पुढील काळात काम करेल आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि वेगवेगळया कारणांनी तुमच्या-माझ्यासारखे समाजबांधव असा हा मोठा कारवा सेवा यज्ञात आपली समिधा अर्पण करतो आहे आणि केशवाची अर्चना करतो आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा की, तुम्ही कोणत्याही देवांना नमस्कार करा, तो केशवाकडे (विष्णू)कडेच जातो. या सुभाषितात थोडा बदल करून असेही म्हणता येईल की, केशवाची स्मृती जागवायची असेल तर एकही सामाजिक समस्या शिल्लक राहता कामा नये. समस्यामुक्त समाज ही केशव अर्चना आहे आणि ती संघभावनेने पूर्ण करायची आहे.
9594961860