हिंदू समाजाने नवभारताचे व नवहिंदूसमाज निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन कार्यरत होण्याचे आव्हान हिंदू धर्मपीठांनी स्वीकारले पाहिजे, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत, स्किल इंडिया यासारख्या कितीही चांगल्या कल्पना असल्या, तरी समाज त्यांचा मनापासून स्वीकार करीत नाही, तोवर त्यातून फारसे काही घडणार नाही. यासाठी धार्मिक पीठांनी सामाजिक संस्काराच्या माध्यमातून नवसमाजनिर्मितीचे आव्हान पेलले पाहिजे. याशिवायही या विषयावर अनेक मुद्दयांवर चर्चा करता येईल. पण त्यापैकी वरील किमान दोन मुद्दयांचा विचार केला, तरी चांगली सकारात्मक चर्चा सुरू होईल. पाश्चात्त्य संस्कृतीतील बाजारपेठीय उपभोगवाद व प्रत्येक प्रश्नाकडे सत्ता संतुलनाच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन या टाळण्याच्या गोष्टी आहेत, तसेच तेथील चिकित्सक ज्ञानपरंपरा व सिव्हिल सोसायटीची मूल्ये या स्वीकारण्याच्या गोष्टी आहेत. तसेच सेमेटिक धर्मांतील इतर धर्मांचा द्वेष व त्यातून येणारी असहिष्णुता ही टाळण्याची गोष्ट आहे, तर त्या धर्मातून निर्माण होणाऱ्या समूहभावाचा उपयोग करून समाजपरिवर्तन घडविणे ही स्वीकारण्याची गोष्ट आहे.
जगातील संस्कृतींचे तीन प्रमुख गटांत विभाजन करता येईल. भारत, चीन व जपान यासारख्या पौर्वात्य संस्कृती हा पहिला गट. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम हा सेमेटिक धर्मांचा दुसरा गट. ग्रीक परंपरेपासून सुरू झालेला व युरोपियन प्रबोधन काळाने त्यात आधुनिकता आणलेला तिसरा गट. जागतिकीकरणाने या तिन्ही गटांची घुसळण सुरू असून त्या घुसळणीतून पुढच्या जगाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या सांस्कृतिक आदान-प्रदानात जी संस्कृती या तिन्ही संस्कृतीतील सर्वोत्कृष्ट मूल्ये आत्मसात करेल, तीच अधिक प्रभावी ठरेल. त्यामुळे हिंदू समाजाने इतर संस्कृतींकडून काय घ्यावे? हा प्रश्न महत्त्वाचा बनतो, त्याचबरोबर काय घेऊ नये यावरही विचार करणे आवश्यक आहे. हा विचार करण्यापूर्वी प्रत्येक सांस्कृतिक प्रवाहांची वैशिष्टये कोणती आहेत व त्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत, याची चर्चा करणे आवश्यक आहे.
भारत, चीन व जपान या संस्कृतीतील एक समान धागा म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपियन देशांनी या संस्कृतींवर आक्रमण करेपर्यंत या तिन्ही संस्कृती आत्ममग्न होत्या. भारत व चीन यांनी वैज्ञानिक क्षेत्रात जगाला मूलगामी स्वरूपाचे योगदान दिलेले आहे. परंतु गेल्या चार-पाच शतकांत युरोपमध्ये जी वैज्ञानिक क्रांती झाली व त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली, त्यामुळे युरोपियन देश व्यापारासाठी विस्तारवादी झाले व त्या विस्तारवादाला चीन, जपान व भारत या तिन्ही देशांना तोंड द्यावे लागले. यापैकी जपानने या युरोपियन विस्तारवादामागे असलेल्या ऐहिक ज्ञानप्रेरणा लगेच ओळखल्या व त्या आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे जपानच्या लक्षात आले. युरोपमधले आधुनिक शिक्षण आपल्या नव्या पिढीला मिळावे अशी जपानने योजना केली व अल्पावधीतच विसाव्या शतकाच्या प्रारंभी जपान युरोपियन देशांच्या मांडीला मांडी लावून पूर्व आशियाई देशांचे राजकारण करू लागला व दुसऱ्या महायुध्दात तर अमेरिकेला आव्हान देण्याइतके बळ त्याने प्राप्त केले. भारतातील एकामागोमाग एक राज्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या ताब्यात आणली व 1818ला मराठे पराभूत झाल्यानंतर सर्व भारत इंग्लंडच्या ताब्यात आला. चीन हा महाप्रचंड देश असल्यामुळे कोणत्याही एका युरोपियन सत्तेला तो आपल्या हाती आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिनी राज्यकर्त्यांवर आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जपाननेही चीनवर आक्रमण करून चिनी जनतेवर प्रचंड अत्याचार केले. पाश्चात्त्य देशांनी केलेले शोषण व जपानचे अत्याचार यांच्या ऐतिहासिक स्मृती अजूनही चीनच्या स्मरणात आहेत व त्याचा परिणाम चीनच्या विद्यमान धोरणांवर पडत आहे.
असे असले, तरी भारत, जपान व चीन यांच्यात एक मूलभूत फरक आहे. भारतापाशी ऐतिहासिक काळापासून विकसित झालेले एक प्रगल्भ जीवन तत्त्वज्ञान होते व त्या आधारे हजारो वर्षांची परंपरा असलेली एक जीवनपध्दती होती. अनेक आक्रमणांचा सामना करूनही ती हजारो वर्षे केवळ जिवंत आहे; एवढेच नव्हे, तर भारताचा प्रमुख जीवनस्रोत म्हणून कार्यरत आहे. जपान व चीनबद्दल तसे नाही. जपानवर पाश्चात्त्य सांस्कृतिक पगडा असून चीननेही त्याच्या परंपरेशी विसंगत असलेल्या कम्युनिझमचा स्वीकार केला. माओनंतर कम्युनिझम सोडून चीनने बाजारपेठीय संस्कृतीचा स्वीकार केला. या बाजारपेठीय संस्कृतीत चीनची स्वत:ची ओळख कशी टिकवायची? त्यात कन्फ्युशिअसच्या तत्त्वज्ञानाचा कसा समवेश करायचा? यावर चर्चा होत आहे. तो या लेखाचा विषय नसल्याने त्याच्या अधिक चर्चेत जाण्याचे कारण नाही. भारतापुरता विचार करायचा असेल, तर सेमेटिक धर्म आणि युरोपियन आधुनिक संस्कृती यांच्यामुळे हिंदू संस्कृतीपुढे नेमके कोणते प्रश्न निर्माण केले आहेत? या संस्कृतीतील कोणती मूल्ये स्वीकरार्ह आहेत व कोणती मूल्ये टाळली पाहिजेत याचा विचार केला पाहिजे.
सेमेटिक धर्म
हिंदू हा जीवनविषयक दृष्टीकोन असलेला धर्म आहे, तर ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम हे केवळ ईश्वराची उपासना करणारे संप्रदाय आहेत अशी मांडणी केली जाते. परंतु ती मांडणी चुकीची आहे. या तिन्ही धर्मांचे जीवनविषयक दृष्टीकोन आहेत व त्यांच्या जीवनपध्दतीवर व विचार पध्दतीवर या दृष्टीकोनाचा प्रभाव पडला आहे. ज्यू हा यातील सर्वात प्राचीन धर्म. ज्यू हे ईश्वराचे लाडके असून त्यांच्यासाठी आज जिथे इस्रायल देश आहे, ती जमीन ईश्वराने त्यांच्यासाठी दिली आहे अशी त्यांची श्रध्दा आहे. ईश्वर हा या जगाचा नियंत्रक असून मोझेसचा शब्द अंतिम आहे. ज्यूप्रणीत धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपातील ईश्वर अस्तित्वात नाही अशी त्यांची श्रध्दा आहे. ज्यू समाज हा वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय भावनांचे मिश्रण आहे. ज्यू धर्मातील एकेश्वरी, एकाच प्रेषितावरची श्रध्दा या मूलभूत गोष्टी ख्रिश्चन व इस्लाममध्येही आल्या आहेत. पण ज्यूंचा धर्मांतरावर विश्वास नाही. एखाद्याला ज्यू धर्म स्वीकारायचा असेल, तर ती वाट एवढी सोपी नाही. ज्यूंना फक्त आपला समाज, धर्म, संस्कृती, राष्ट्र टिकवायचे आहे. ख्रिश्चन व मुस्लीम समाजांना मात्र सर्व जगाला आपल्या धर्मामध्ये आणायचे आहे. यासाठी ख्रिश्चन धर्म प्रामुख्याने सेवेचा मार्ग अनुसरतो, तर मुस्लीम धर्म युध्दाचा. त्यामुळे सेमेटिक धर्म हे मूलत: विस्तारवादी असतात. धार्मिक संघर्षाची मुळे याच दृष्टीकोनात असतात.
हिंदू ईश्वराची संकल्पना व सेमेटिक धर्माची संकल्पना यात मूलभूत फरक आहे. सेमेटिक धर्मात ईश्वर हा या जगाचा निर्माता, नियंत्रक, चालक आहे, तोच माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब करून त्याची शिक्षा देतो, एकाच प्रेषिताच्या शिकवणीप्रमाणे, एकाच ग्रंथातील मार्गदर्शनानुसार वागणे म्हणजे धर्माचे पालन असे सेमेटिक धर्म सांगतात. आपलाच धर्म श्रेष्ठ असल्याने इतर धर्मीय फार तर राहू शकतात, परंतु त्यांना कधीही खऱ्या ईश्वराची प्राप्ती होणार नाही, असा त्यांचा दृष्टीकोन असतो. हिंदूंच्या दृष्टीने प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचे फळ मिळत असते. त्यात प्रत्यक्ष परमेश्वरही बदल करू शकत नाही. ईश्वर म्हणजे जग चालविणारे चैतन्यतत्त्व. त्या चैतन्यतत्त्वाचा विविध प्रकारे, प्रतिमांमधून बोध होत असतो. त्या प्रतिमा ईश्वरतत्त्वाचे दर्शन घडवितात. पण त्या प्रतिमा म्हणजे ईश्वर नव्हे. उदा., साखर हा शब्द उच्चारताच गोड या चवीचा बोध होतो, पण प्रत्यक्ष चव घेण्यासाठी साखरेचीच चव घ्यावी लागते. त्यामुळे ईश्वर या सर्व प्रतिमांच्या पलीकडे आहे व प्रत्यक्ष अनुभूतीतूनच त्याचे दर्शन होऊ शकते, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. ही अनुभूती व्यक्तिनिष्ठ असते, त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी सर्वांसाठी अनेक मार्ग असू शकतात, त्यामुळे त्यासाठी एकाच मार्गाचा आग्रह धरणे चुकीचे आहे, असे हिंदूंचे म्हणणे असते. धार्मिकता ही आंतरिक विकासाशी निगडित असलेली बाब असल्याने सेवेची लालूच दाखवून किंवा अत्याचाराच्या भीतीने एखाद्या धर्माचा अनुयायी बनविण्याचा प्रयत्न करणे ही धार्मिक अनैतिकता आहे, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे धार्मिक कट्टरता व हिंदू तत्त्वज्ञान या परस्परविरोधी गोष्टी आहेत.
परंतु व्यवहारात सेमेटिक धर्माचे जे समाज आहेत, त्यांच्यातील संघटिततेमुळे त्यांना जे आक्रमक बळ प्राप्त झाले, त्यामुळे हिंदू समाजाला अनेक धार्मिक अत्याचारांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे या आक्रमणाला तोंड द्यायचे असेल, तर आपणही तसेच धार्मिकदृष्टया आक्रमक झाल्याशिवाय आपला निभाव लागणार नाही, असा विचार करणारा एक वर्ग हिंदू समाजात निर्माण झाला आहे. मुस्लीम समाज जेवढया कर्मठतेने आपल्या धार्मिक कर्मकांडांना मानतो, तसेच आपणही वागले पाहिजे असे या वर्गाचे म्हणणे असते. हा प्रतिक्रियात्मक धर्मवेडेपणा हा हिंदू संस्कृतीशी विसंगत असलेला भाग आहे. वेदकालीन यज्ञसंस्कृती हा त्या वेळच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतरच्या शेकडो वर्षांत कितीतरी देवदेवता, परंपरा निर्माण झाल्या आहेत. परिवर्तने झाली आहेत. मानवी जीवनाची सुरक्षितता ही पंचमहाभूतांच्या शुध्दतेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून आवाज, पाणी, जमीन आदींचे प्रदूषण करणे हे हिंदू संस्कृतीला कधीच मान्य होणारे नाही. त्यामुळे धार्मिक उद्दिष्टांचा आत्मा कायम ठेवून कर्मकांडात बदल झाला पाहिजे, असा आग्रह धरणे हा धर्मद्रोह नसून ते प्रगल्भ धर्माचरणच आहे. दुर्दैवाने जर कर्मकांडातील अपरिवर्तनीयता हाच धर्माचा भाग मानणारे हिंदू समाजात प्रभावी झाले, तर हिंदू धर्माचा आत्माच नष्ट होईल.
हिंदू देवदेवतांचे स्वरूपही सेमेटिक धर्मापेक्षा निराळे आहे. तेथील ईश्वर हा मानवी जीवनाचा निर्माता, नियंत्रक आहे, तर आपल्याकडल्या देवदेवता या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. दशावतारी व अन्य नाटकांत ज्या प्रकारे विविध देवतांची पात्रे लोकजीवनात अवतरतात, ती समाज वास्तवाचाच भाग बनून जातात. सेमेटिक धर्मवेडातून निर्माण होणारी धार्मिक असहिष्णुता हा हिंदू परंपरेचा भाग बनू देता कामा नये. याचा अर्थ असा नव्हे की जे व्यावसायिक स्वार्थासाठी किंवा मनोविकृतीचा भाग म्हणून श्रध्दाबिंदूंना अपमानित करतात, ते चालवून घ्यावे. कलात्मक स्वातंत्र्य व हेतुपूर्वक केलेली विकृती ओळखणे अवघड असले, तरी अशक्य नसते. सेमेटिक धर्माच्या स्वरूपामुळे बौध्दिक गुलामगिरी येते व त्यामुळे समाजातले बौध्दिक स्वातंत्र्य हरवले जाते व समाज बौध्दिकदृष्टया दुय्यम दर्जाचा बनतो.
असे असले, तरी सेमेटिक धर्मापासून शिकण्यासारख्या व घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आत्यंतिक समर्पणाची व त्यातून निर्माण होणाऱ्या त्यागाची आणि त्यातून येणाऱ्या निर्भयतेची भावना ही मानवी क्षमतांना असाधारण उंची प्राप्त करून देते. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी युरोपमधून अनेक मिशनरी आफ्रिकेतील नरभक्षक टोळयांमध्ये गेले, आशियातील अनेक देशांतील जंगलांमध्ये गेले व चिकाटीने काम करीत राहिले. आजही जिहादी प्रेरणेतून शेकडो तरुण आपले जीवन पणाला लावीत आहेत. हिंदूंच्या इतिहासातही अशी उदाहरणे आहेत, पण त्यातील बरीचशी व्यक्तिनिष्ठ श्रध्देतून आलेली आहेत. ती एखाद्या नेत्यावर विसंबून आहेत. पुण्यामध्ये प्लेग आला, तेव्हा त्याचा सामना करण्याकरिता कर्त्या पुणेकरांनी पुण्यात राहून प्लेग निवारणाचे काम करावे असे आवाहन लो. टिळकांनी केले होते. पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे लो. टिळकांनी मोठया उद्वेगाने लिहिले की गोरे सैनिक व मिशनरी नन्स यांना प्लेगची भीती न वाटता ते काम करतात व आपल्या लोकांना मात्र भीती वाटते, अशी स्थिती असेल तर या देशाची प्रगती कशी होणार?
युरोपियन प्रबोधन पर्व
युरोप ज्या वेळी ख्रिश्चन धर्माच्या बौध्दिक गुलामगिरीखाली अंधारयुगात गेला होता, तेव्हा तेथे वैज्ञानिक क्रांतीच्या रूपाने नवज्ञानाचा प्रकाश अवतरला. हे जग ईश्वराने निर्माण केले आहे, जीझस हा देवपुत्र असल्याने ईश्वराच्या वतीने त्याने मानवजातीवर कृपा केली आहे व त्याला शरण जाऊनच माणसाला मुक्ती मिळू शकते, बायबलवर श्रध्दा ठेवून जीवन जगण्यातच मानवी जीवनाची कृतार्थता आहे, त्यासाठी चर्चद्वारा अधिकृतरित्या नेमलेल्या धर्मगुरूंवरच श्रध्दा ठेवली पाहिजे, या आंधळया धर्मश्रध्देने युरोप ग्रासला गेला होता. या धर्मश्रध्देला बुंध्दिवादाच्या आधारे सर्वंकष आव्हान देणाऱ्या नव्या तत्त्वज्ञानाचा उदय युरोपमध्ये झाला. तर्कशुध्द पध्दतीने कार्यकारणभावाचा विचार करून विश्वाची उत्पत्ती, त्याचे नियमन, मानवी जीवन, त्याची सुखदु:खे याची संगती लावणे शक्य आहे व त्यासाठी ईश्वर या संकल्पनेचा आधार घेण्याची आवश्यकता नाही, या नव्या इहवादी तत्त्वज्ञानाने युरोपचे वैचारिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय वातावरण आमूलाग्र बदलून टाकले. डार्विनने जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिध्दान्त मांडून माणसाची निर्मिती हा त्या उत्क्रांती पर्वाचा एक भाग असल्याचे सिध्द केले. त्यामुळे बायबलमधल्या ऍडम आणि ईव्ह या कथेला अर्थ राहिला नाही. त्याचबरोबर माणसाचे वागणे हे पाप-पुण्याच्या कल्पनेवर अवलंबून नसून प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात जे प्रवाह असतात, त्याचा वागण्यावर परिणाम होतो व त्या माणसाचे मनोविश्लेषण करून तो परिणाम शोधता येऊ शकतो, असा सिध्दान्त फ्रॉईडने मांडला. त्यामुळे माणसाचे अस्तित्व व वागणे या दोन्ही गोष्टी ईश्वरी इच्छेच्या बाहेर गेल्या.
वैज्ञानिक क्रांतीपाठोपाठ आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे युरोपीय देश प्रबळ झाले व जगाच्या बाजारपेठा ताब्यात घेण्याची त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. या सर्व प्रक्रियेत इंग्लंड-फ्रान्स आदी देशांत पारंपरिक धार्मिक मूल्यांना पर्यायी नागरी समाजाची नवी मूल्ये तयार झाली. मानवता, मूलभूत मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठेचा विचार, समता विचार, लेखन, धर्म आदी स्वातंत्र्यांचा स्वीकार, लोकशाही राज्यव्यवस्था या नवसमाजाच्या आधारशिला बनल्या. या मूल्यांचा सर्वाधिक परिपोष इंग्लंडमध्ये झाला व इंग्लंडचे राज्य जगभर पसरले. त्यामुळे या मूल्यांना आधुनिक जागतिक मूल्यांचे स्वरूप प्राप्त झाले.
या पार्श्वभूमीवर औद्योगिक संस्कृतीत कामगारांचे व जे शोषण होत होते, त्याच्या विरोधात माक्र्सने साम्यवादाचा सिध्दान्त मांडला. आजवर मांडले गेलेले इतर सिध्दान्त व माक्र्सचा सिध्दान्त यात एक मूलभूत फरक होता. तोपर्यंतचे इतर सिध्दान्त आदर्शवादी स्वरूपाचे, सदिच्छेच्या स्वरूपातील होते, तर आपला सिध्दान्त हा गणिती स्वरूपाचा असल्याने आपल्या सिध्दान्ताप्रमाणे क्रांती घडणे अपरिहार्य आहे, असा त्याचा दावा होता. कामगारांचे शोषण आणि विविध देशांच्या बाजारपेठा ताब्यात घेण्यासाठी युरोपियन साम्राज्यवादी देशात चालणारी युध्दे यातून माक्र्सवादच मार्ग दाखवू शकेल, असा विश्वास जगभरातील विचारवंतांना वाटू लागला. ते माक्र्सवादी विचारातून होणाऱ्या क्रांतीची स्वप्ने पाहू लागले.
भारतीय प्रबोधन पर्व
भारतावर इंग्रजांची राजवट आली, तेव्हा भारत मुस्लीम राजवटींच्या गुलामगिरीतून अर्धवट मुक्त होत होता. मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप मुख्यत: लष्करी होते, पण ब्रिटिश आक्रमणाचे स्वरूप अगदी वेगळे होते. मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले, श्रध्दास्थाने नष्ट केली, राज्यकारभाराची भाषा बदलली; पण या सर्वातून जो हिंदू समाज टिकला, त्यांच्या परंपरा, चालीरिती यात मूलगामी बदल झाला नाही. पण ब्रिटिश राजसत्ता जशी दृढमूल होऊ लागली व 1857च्या स्वातंत्र्ययुध्दात भारतीय संस्थानिकांचा पराभव झाला, त्यानंतर इथले संस्थाजीवन, विचारपध्दती, राजकीय व सामाजिक व्यवस्था यात मूलगामी स्वरूपाचे बदल होऊ लागले. हिंदूंच्या त्या वेळच्या परंपरा, चालीरिती, समाजव्यवस्था यापेक्षा हे सर्व बदल अगदी वेगळे होते. धर्माच्या बाबतीत सांगायचे, तर ख्रिश्चन धर्मातील सेवाभावाचा प्रभाव अनेक सुशिक्षित हिंदूंवर पडला. हिंदू समाजव्यवस्था, तत्त्वज्ञान, धर्मकल्पना यांना मुळासकट हादरा देणारा हा बदल होता. यातून या सर्वाबद्दल न्यूनगंड असलेला मोठा सुशिक्षित मध्यमवर्ग तयार झाला. तयार झालेले नवे संस्थाजीवन हे युरोपियन प्रबोधन प्रक्रियेतून निर्माण झालेले होते. ते अपरिहार्यही होते. आपली घटना ही इंग्रजांनी केलेल्या 1935च्या कायद्याची सुधारून वाढविलेली आवृत्ती आहे, अशी टीका केली जाते. भारतीय राज्यघटना तयार होताना त्यातील तरतुदींवर भरपूर चर्चा झाली असली, तरी 1935चा कायदा हाच तिचा मूळ ढाचा होता. त्या वेळी शुध्द भारतीय घटना बनवायचे ठरविले असते, तरी ती कोणत्या स्मृतीच्या आधारे बनविली असती? त्या स्मृतीला सर्वमान्यता कशी मिळाली असती? त्यामुळे स्वातंत्र्यानंतर इंग्रजी राजवटीचा वारसा म्हणून जे संस्थाजीवन भारताने स्वीकारले, ते स्वाभाविकच होते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील पुराणमतवादी शक्ती प्रभावी होऊन भारताला मध्ययुगीन काळात नेतील का? या भीतीतून हिंदूंच्या परंपरा, इतिहास, तत्त्वज्ञान यांच्यावर सातत्याने टीका करून हिंदू समाजाच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारा विचारवंतांचा नवा वर्ग तयार झाला. त्यात चीन, रशिया, क्यूबा आदी देशांतील क्रांत्यांनी प्रभावित झालेला, ब्रिटिश उदारमतवादालाच जीवनातील अंतिम मूल्ये मानणारा, अमेरिकन मुक्त वातावरणाने भारावलेला असे अनेक प्रकार होते. त्यांच्या जीवननिष्ठा वेगवेगळया असल्या, तरी हिंदू समाजाला त्याच्या परंपरेपासून तोडले पाहिजे याबाबत या सर्वांचे एकमत होते. यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असा होता की हे पुरोगामित्वाचे प्रयत्न फक्त हिंदू समाजाशी निगडित होते. मुस्लीम समाजाच्या मध्ययुगीन मानसिकतेबद्दल त्यांची तक़्रार नव्हती. किंबहुना त्यावर कोणी टीका केली की 'हिंदू जातीयवादी' म्हणून त्याची संभावना केली जात असे.
पण काळाच्या ओघात रशिया, चीन, क्यूबा इथल्या क्रांत्या विफल झाल्या, ब्रिटिश उदारमतवादाची प्रतिष्ठा लयाला गेली, अमेरिकेत भारतीय बुध्दिमत्तेने आपला दबदबा निर्माण केला, मुस्लीम जिहादी दहशतवादाने जगभर थैमान मांडले. या पार्श्वभूमीवर हिंदू तत्त्वज्ञान, परंपरा यासंबंधी न्यूनगंडरहित भावाने विचार करणारा नवा सुशिक्षित वर्ग उभा राहिला. 1980 ते 90 या दशकात मीनाक्षीपुरम येथील धर्मांतर, काश्मीर खोऱ्यातील हिंदूंचे विस्थापन, शहाबानू खटल्यानंतर मुस्लीम जातीयवाद्यांनी केलेला गदारोळ व त्यापुढे सेक्युलरवाद्यांनी घातलेले लोटांगण याची प्रतिक्रिया म्हणून देशभरातून श्रीरामजन्मभूमी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातून आजवर अव्यक्त असलेल्या हिंदूंच्या सामूहिक विराट शक्तीचे दर्शन जगाला झाले. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या विजयात त्याचीच परिणती झाली. मोदी सरकारने आपल्यापुढे राजकीय उद्दिष्टे ठेवली आहेत. त्यांच्या यशापयशानुसार मोदी सरकारच्या यशापयशाचा विचार करावा लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन जागृत हिंदू समाजाचा स्वत:चा काही अजेंडा आहे काय? असेल, तर त्याचे स्वरूप काय? याचा विचार करावा लागेल. यापैकी काही अजेंडा सरकारने करायचा असला, तरी त्यातील मोठा अजेंडा हिंदू समाजालाच पुरा करायचा आहे.
संभाव्य अजेंडा
श्रीरामजन्मभूमी आंदोलनापासून हिंदू सामूहिक शक्तीचे पडसाद जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पडायला सुरुवात झाली. त्याचा पहिला टप्पा म्हणजे ज्या विचारवंतांच्या फळीने हिंदू समाजाच्या मनात आजवर न्यूनगंड निर्माण केला, त्या फॅशनेबल विचारवंतांना हिंदू समाजाने नाकारले आहे. आपली वैचारिक प्रतिष्ठा व प्रभाव कमी झाला आहे, याची जाणीव या वर्गाला होत असल्यानेच वैचारिक असहिष्णुतेचा डांगोरा पिटला जात आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही. त्याचबरोबर जगातील सर्व लोक हिंदू समाजावर अन्याय करण्यासाठीच टपलेले आहेत या नकारात्मक मानसिकतेतूनही लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरज आहे. मनात एकदा अशा नकारात्मक भावनेने घर केले की मनातील सकारात्मक, निर्मितीशील ऊर्जेला जागा राहत नाही. स्वत:ला पुरोगामी, सेक्युलर म्हणविणाऱ्या विचारवंतांच्या फळीचा अजूनही प्रसारमाध्यमांवर प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या खऱ्या शक्तीपेक्षा त्यांचा आवाज अधिक मोठा भासतो. पाश्चात्त्य देशांतही चिकित्सक अभ्यासाच्या नावे हिंदू परंपरा, तत्त्वज्ञान, परंपरा यांचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी काही सहेतुक असला, तरी काही त्यांच्या दृष्टीकोनातून सत्यशोधनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ते जेवढया निर्दयतेने हिंदू समाजाची चिकित्सा करतात, तेवढयाच निर्दयतेने ख्रिश्चन धर्माचीही करत असतात. त्यामुळे आधुनिक चिकित्सक वैचारिक चर्चेत हिंदू समाजाचे, परंपरांचे व तत्त्वज्ञानाचे यथार्थ दर्शन घडायचे असेल, तर त्याकरिता स्वतंत्र वैचारिक चिकित्सा पध्दती निर्माण केली पाहिजे. सेमेटिक धर्मकल्पना व सिव्हिल सोसायटीची विकसित झालेली मूल्ये यांची चिकित्सा पारंपरिक हिंदू विचारसृष्टीत नाही. रा.स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी समतायुक्त व शोषणरहित हिंदू समाजाची संकल्पना मांडली. या दोन्ही संकल्पना या युरोपियन प्रबोधन वैचारिक प्रक्रियेतून आल्या आहेत. इकडली तिकडली काही उदाहरणे देऊन आमच्याकडेही या कल्पना कशा होत्या हे दाखविता येईलही. परंतु त्यातून तर्कशुध्द व्यवस्था निर्माणाची प्रक्रिया उभी करता येत नाही. समतायुक्त व शोषणरहित समाज निर्माण करण्याचे जगात अनेक प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या सर्व विचारपध्दती फक्त शरीर, मन व बुध्दी यांचाच विचार करून थांबतात. भारतातील शून्याच्या शोधाने जशी गणितात क्रांती घडविली, तशीच मानव्यशास्त्रात बदल घडविण्याची क्षमता 'आत्मा' या संकल्पनेत आहे. योगशास्त्राच्या स्वरूपात त्या संकल्पनेचा जगाला परिचय झालेला आहे. परंतु या संकल्पनेच्या व्यापक उपयोजनेवर विचार झालेला नाही. भारताच्या प्रबोधन पर्वात स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लो. टिळक. म. गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी यावर विचारमंथन केले आहे. पण या विचारपरंपरेतून एकविसाव्या शतकातील प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य आहे काय, यावर गांभीर्याने विचारमंथन झालेले नाही. चिकित्सक अभ्यास म्हणजे गौरवग्रंथ नव्हेत. प्रत्येक सिध्दान्ताची सामर्थ्यस्थळे, मर्यादा, उपयोजनाची पध्दत, त्यातून केलेले प्रयोग, त्या प्रयोगांचे निष्कर्ष अशा अभ्यासप्रक्रियेतून त्या सिध्दान्ताची उपयुक्तता सिध्द होते. विकसित देशातील विद्यापीठे तेथील ज्ञानाची ऊर्जा केंद्रे बनतात, याचे कारण ही प्रक्रिया तेथे सातत्याने चालत असते. त्या तुलनेत भारतातील प्रस्थापित विचारवंतांची फळीच दुय्यम दर्जाची आहे. तिच्यातील पोकळपणा दाखविणे हे शौर्याचे काम नाही. नवी दृष्टी निर्माण करणे व त्यासाठी आवश्यक त्या क्षमतांचा विचार करणे यात खरा कस आहे. पाश्चात्त्य विचारवंतांनी आपल्या विचारमंथनातून ऐहिक जीवनाच्या विविध पैलूंचे जे दर्शन घडविले, त्यासाठी जी निर्भयता व अभ्यासशीलता दाखविली, त्याचा स्वीकार केल्याशिवाय केवळ प्रचाराद्वारे झालेले परिवर्तन टिकविता येणारे नाही.
हिंदूंच्या वाढत्या प्रभावाचे दर्शन हिंदू परंपरेतील कर्मकांडाच्या समारंभी आविष्कारातून दिसते. समाजाच्या सामूहिक आत्मविश्वास टिकविण्यास त्याची मदत होत असली, तरी समाजाला अशा कर्मकांडांची नशा चढण्याचाही धोका असतो. आज विविध वाहिन्यांपासून रोजच्या व्यवहारापर्यंत अशा कर्मकांडांचे पेव फुटले आहे. पण या कर्मकांडातून होणाऱ्या सामाजिक संस्कारांचे स्वरूप काय आहे? राजकारणाच्या व कायद्याच्या माध्यमातून समाज घडविणे ही आधुनिक राज्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय संकल्पना आहे, तर सामाजिक संस्कारातून मानसिक व सामाजिक परिवर्तन घडविणे हे स्वावलंबी समाजाचे लक्षण आहे. आजही धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन धर्मपीठे हजारोंच्या संख्येत मिशनरी निर्माण करण्याकरिता प्रेरणा देत असतील आणि जिहादी निर्माण करण्याची प्रेरणा मुल्ला-मौलवी देत असतील, तर नवभारताचे व नवहिंदूसमाजाचे निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन कार्यरत होण्याचे आव्हान हिंदू धर्मपीठांनी स्वीकारले पाहिजे, असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत, स्किल इंडिया यासारख्या कल्पना कितीही चांगल्या असल्या, तरी समाज त्यांचा मनापासून स्वीकार करीत नाही, तोवर त्यातून फारसे काही घडणार नाही. यासाठी धार्मिक पीठांनी सामाजिक संस्काराच्या माध्यमातून नवसमाजनिर्मितीचे आव्हान पेलले पाहिजे.
याशिवायही या विषयावर अनेक मुद्दयांवर चर्चा करता येईल. पण त्यापैकी वरील किमान दोन मुद्दयांचा विचार केला, तरी चांगली सकारात्मक चर्चा सुरू होईल. पाश्चात्त्य संस्कृतीतील बाजारपेठीय उपभोगवाद व प्रत्येक प्रश्नाकडे सत्ता संतुलनाच्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन या टाळण्याच्या गोष्टी आहेत, तसेच तेथील चिकित्सक ज्ञानपरंपरा व सिव्हिल सोसायटीची मूल्ये या स्वीकारण्याच्या गोष्टी आहेत. तसेच सेमेटिक धर्मांतील इतर धर्मांचा द्वेष व त्यातून येणारी असहिष्णुता ही टाळण्याची गोष्ट आहे, तर त्या धर्मातून निर्माण होणाऱ्या समूहभावाचा उपयोग करून समाजपरिवर्तन घडविणे ही स्वीकारण्याची गोष्ट आहे.
त्यासाठी मध्ययुगीन आत्ममग्नतेतून बाहेर येऊन जगात जे परिवर्तन होऊ घातले आहे, त्यातील सकारात्मक व मानवी मुक्ततेला पोषक ऊर्जा कोणकोणत्या आहेत त्यांचा विचार करून पाश्चात्त्य बाजारपेठीय उपभोगवादी संस्कृती, चीनचा असुरी विस्तारवाद, जिहादी दहशतवाद याला पर्यायी अशी परस्पर विश्वासावर आधारित, सामाजिक मूल्यांवर आधारित, मानवकेंद्री व निर्मितीच्या आविष्काराला पूर्ण संधी देणारी स्वायत्त व्यवस्था निर्माण करण्याचे नवे स्वप्न व उद्दिष्ट जगाला दिले पाहिजे. यासाठी केवळ व्यक्तिगत मोक्षासाठी आत्मसाधना न करता सर्व समाजाची मानसिक, बौध्दिक व आत्मिक उन्नती करण्याकरिता आत्मविकासाचा उपयोग कसा करता येईल, यावर अभ्यास केला पाहिजे.