पाचवीला पुजलेला दुष्काळ, पाण्याचे कायम दुर्भिक्ष, वाढती बेरोजगारी आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कीटकनाशक फवारणीच्या जीवघेण्या फासात शेतकरी-शेतमजूर अडकला आहे. कपाशीवर कीटकनाशक फवारणी करत असताना 19 शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला, शेकडो जण 'व्हेंटिलेटरवर' आहेत, तर काहींना कायमचे अंधत्व आले आहे. एकूणच इथला शेतकरी कीटकनाशकाच्या व्यूहात अभिमन्यूसारखा अडकला आहे. या विदारक वास्तवाचा हा ऑन द स्पाट रिपोर्ट.
विदर्भात यवतमाळ जिल्हा नेहमी चर्चेत असतो तो नकारात्मक गोष्टींसाठी, हे भीषण वास्तव आहे. शेतकरी आत्महत्या असो की दुष्काळ, यवतमाळ जिल्ह्याचे नाव नेहमी अग्रस्थानी असते. सध्या यवतमाळ जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे तो विषारी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने आतापर्यंत झालेल्या 19 शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यूमुळे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? जीवघेणी कीटकनाशके कोणती होती? शेतकऱ्यांनी फवारणी करताना काळजी घेतली का? चिनी पंपामधला धोका शेतकऱ्यांना माहीत होता का? अशा असंख्य प्रश्नांचा वेध घेण्यासाठी मी 6 ऑक्टोबर 2017 या दिवशी यवतमाळ शहरात उतरलो. प्रथम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व नैसर्गिक शेतीसाठी प्रसिध्द असलेल्या दीनदयाळ उपाध्याय प्रबोधिनीत आलो. प्रकल्प प्रमुख विजय कद्रे यांनी प्रकरणाची थोडी माहिती दिली. माझ्या सोबतीला सूरज भाकरे हा प्रकल्पातील युवा कार्यकर्ता दिला. येथूनच पुढच्या प्रवासाची सविस्तर दिशा ठरली.
'कॉटन सिटी'ला कीटकनाशकांचे ग्रहण
हा भाग हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लोकनायक बापूसाहेब अणे यासारख्या अनेक दिग्गज लोकांचा आहे. सध्या कापसाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी यामुळे कापूस आणि तूर पिकांचे उत्पादन घटले. कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असल्यामुळे बहुतांश शेतकरी नेहमी सुधारित कपाशीचे पीक घेण्यावर भर देतात. यवतमाळमधील प्रसिध्द आणि प्रतिष्ठित असलेल्या रेमंड्स कारखान्यात जीन्ससाठी लागणारा विशेष धागा तयार होतो. हा जिल्ह्यातील एकमेव मोठा कारखाना आहे. म्हणूनच एकूण 9 लाख हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी यंदा 4 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरी 60 टक्के पावसाची नोंद झाली आहे. कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरविली. काही भागात तर पाऊस झालाच नाही. निसर्गाच्या लहरीमुळे सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले असले, तरी जिल्ह्याची पैसेवारी 63 टक्के आहे. 2049 महसुली गावांची पैसेवारी उत्तम असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.
""सायेब, पोट्टीचं लगन कसं करू?''
''सायेब, औदा घर बांधले काढलेय. मस्त पीक येन येन, दिवाई सुखात जाईल, औदा उन्हाळयात पोट्टीचं लगन लावून द्यायले होते. माझा नवरा जिगरीनं काबाडकष्ट करत व्हता. त्यायले जीव प्यारा व्हता. मेहनतीच्या पैशावर सगले कर्ज फेडायले ठरव्हले होते. पोट्टीले आणि पोट्टाले शाला शकवले. आतले घरचा कर्ताले मानुस गेलाय, म्या बाईले पोट्टीचे लगन कशाले करू?'' अशी केविलवाणी व्यथा संगीता गजानन फुलमाळी यांनी सांगितली.
संगीता यांचा पतीचा - गजानन नामदेव फुलमाळी (रा. सावरगाव, ता. कळंब) याचा कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला. गजानन फुलमाळी याची तीन एकर कोरडवाहू शेती असून, पावसाच्या पाण्यावर ते कपाशीचे लागवड करतात. यंदा प्रथमच कपाशीवर सहा ते सात वेळा फवारणी करावी लागली. त्यात उन्हाची तमा न बळगता गजाननने कपाशीवर फवारणी केली. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यंदा कपाशीचे चांगले उत्पादन निघेल या आशेवर गजानन घर बांधायला काढले होते. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. प्रतीक्षा व धर्मरक्षा या दोन मुली एन.एम.चे शिक्षण घेत आहेत. त्यात प्रतीक्षाचे शिक्षण पूर्ण झाले. ती सध्या नोकरीच्या शोधात आहे. यंदा तिची हळद पिवळी करायची, असा गजाननच्या मनात विचार होता. फायनान्स कंपनी, बचत गटासह गजाननवर जवळपास एक दीड लाखाचे कर्ज आहे. मुलगा ॠतिक हा सध्या बारावीत शिकत आहे. त्याचे शिक्षण, घरखर्च आणि मुलींचे लग्न कसे करायचे? असा प्रश्न संगीता फुलमाळी यांच्यासमोर उभा राहिला आहे.
''आमचं पोट मातीवरच चालतं. एक दिवसाले मजुरी न केल्यावर उपासे राहायले लागतें. त्यामुले आमचं मातीशी नातं हाय. मेय नवऱ्याले दिसरात तिच्या संगतीत जीवन गेले. रातीचा दिवस करून आमाले पुसले. औदा फवारणीचे आक्रीतच घडले. त्यामले मेय नवरा गेला. संसाराचा सगले इस्कोट झाला'' अशी केविलवाणी व्यथा मयत शेतमजूर देवीदास रामाजी मडावी (रा. पोळयाचा मारोती, ता. कळंब) यांच्या पत्नी मंगला मडावी यांनी सांगितली. देवीदास मडावी यांचा 19 ऑगस्ट 2017 रोजी फवारणी विषबाधेने यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. दिवाळी जवळ आल्याने, घरखर्च भागविण्यासाठी देवीदास दिवसातून चार ते पाच वेळा दुसऱ्याच्या शेतात मजुरीने फवारणीसाठी जात होते. फवारणीच्या वेळी तोंडाला रुमाल न बांधल्यामुळे विषबाधा झाली. ''ते अचानक घरी आले, तीन-चार वेळा संडासाला जाऊन आले. उलटया सुरू झाल्या. आम्ही त्यांना गावातल्या दवाखान्यात घेऊन गेलो, तिथे इलाज होत नसल्याचे कारण दिल्याने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलो, पण ते वाचू शकले नाहीत. माझ्या नवऱ्याचा मृत्यू होऊनही माझ्याकडे महिनाभर कुणीच फिरकले नाही. आता गेल्या दहा दिवसांपासून मंत्री आणि पुढाऱ्यांना आमचं घर दिसतंय??'' असे मंगला मडावी यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर मधुकर ढाले (रा. चिखली) हा शेतमजूर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला दिवसाकाठी दीडशे रुपये मजुरी मिळत होती. फवारणीच्या दुष्परिणामांची त्याला कोणतीही माहिती नव्हती, अशी माहिती अनिता ज्ञानेश्वर ढाले यांनी दिली. ''माझ्या पोराची बायको डिलिव्हरीला गेली आहे. शेतात कपाशीवर बोंडअळीने थैमान घातले आहे. आम्ही म्हातारे आईबाप फवारणी करू शकत नाही. पोराने फवारणी केली, त्याला मळमळ, चक्कर, उलटी होऊ लागली. डॉक्टराने सांगितले, पोराला फवारणीमुळे विषबाधा झाली. आमच्या पायाखालची वाळू सरकली'' अशी विषबाधित रुग्ण मारुती रामराव बरबडे (रा. बेलोरा, ता. दिग्रस) यांच्या वृध्द पित्याने हकीकत सांगितली.
प्रमोद संभाशिव देठे (रा. सोनापूर) हा रुग्णालयात चार दिवसांपासून भरती आहे. त्याची कथाही याच स्वरूपाची आहे.
साधारण जून/जुलै महिन्यांत कपाशीची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली. त्यामध्ये बीटी कपाशीची लागवड सर्वाधिक झाली आहे. यंदा कपाशीवर प्रारंभी मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी आणि सध्या मिलीबग यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन भरात आलेले हे पीक कीडरोगांमुळे हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनाकडून ते वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कपाशीवर महिन्याभरात आठ ते दहा वेळा फवारणी हा त्या प्रयत्नांचाच भाग. मात्र फवारणीचे शास्त्रशुध्द ज्ञान नसल्यामुळे पीक वाचविण्याच्या प्रयत्नांत आतापर्यंत 19 जणांनी आपला जीव गमवला आहे. एकूण विदर्भात हा आकडा 32वर पोहोचला आहे. कॉटन सिटीला लागलेले मृत्यूचे ग्रहण हे यवतमाळच्या शेतीआधारित अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असून, या ग्रहणातून सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. याला मुख्य कारण आहे, यवतमाळ जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला वापर. या वर्षी तर खतांचा वापर दुप्पट झाला आहे. शिवाय या खतांचे दुष्परिणाम लक्षात आणून देणारी यंत्रणा तालुका व गावपातळीवर नसल्यामुळे शेतकरी अंधारात चाचपडत आहे. भविष्यात जमीन नापीक होण्यापासून वाचवण्यासाठी ही यंत्रणा गावपातळीवर पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते बी.टी. बियाणांना अधिक रासायनिक खतांची गरज भासते. त्यामुळे या बियाणांसाठी, खतासाठी आणि कीटकनाशकांसाठी वारेमाप खर्च होतो. मात्र, शेतमालाच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादनाला अल्प भाव मिळतो. दर वर्षी तोटयातच जाणारी 'बॅलन्स शीट' नफ्यात आणण्यासाठी उत्पादन वाढ हा एकमेव पर्याय त्यांना वाटतो.
बीटीचे (मॉन्सेन्टोचे) महाकाय भूत
यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधित शेतकऱ्यांच्या मृत्यूला जे विविध घटक जबाबदार आहेत, त्यामध्ये बीटी अर्थात 'मॉन्सेन्टो' या महाकाय अमेरिकन कंपनीचा समावेश करावा लागेल. मॉन्सेन्टो ही महाकाय बहुराष्ट्रीय कंपनी तणनाशक आणि जनुकांतरित (जी.एम.) बियाणे बनविणारी जगातील अग्रेसर कंपनी आहे. बी.टी. कापसाचे संशोधन याच कंपनीचे आहे. यवतमाळ हा कापसाचा जिल्हा आहे. यंदा 4 लाख 80 हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. एक हेक्टरसाठी बियाणाच्या 4 ते 5 बॅगा लागतात. त्यासाठी 25 लाख पाकिटे जिल्ह्यात आली. त्यापैकी 11 ते 12 लाख पाकीटे आंध्र प्रदेश व गुजरातमधून आली. बीटी 3 ही सदोष बियाणे गुजरातमधून कृषी विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. सन 2002 साली बी.टी. कापूस प्रथम भारतीय बाजारपेठेत आला. आरंभी BG I म्हणजे बोलगार्डची पहिली पिढी, नंतर दुसरी पिढी BG II आली व आता तर आर.आर.एफ. (Ready Roundup Flex) हे तणनाशक वाण भारत सरकारची कोणतीही परवानगी नसताना आंध्र, महाराष्ट्र आणि गुजरातसह कापूस उत्पादक राज्यात पोहोचले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही याच बीटी बियाणांचा पेरा झाला आहे.
वास्तविक बीटीवर बोंडअळी येत नाही, असा या कंपनीचा दावा होता. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून बीटीवर मोठया प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो आहे. या बियाणांची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली असतानाही शेतकऱ्यांच्या माथी हेच बियाणे मारले जात आहे. एकूणच ही बहुराष्ट्रीय कंपनी संपूर्ण भारतीय शेतीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या बियाण्यामुळे व रासायनिक कीटकनाशकांमुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. बीटी कंपनीचे महाकाय भूत देशाबाहेर काढण्याकरिता, कृषी विद्यापीठांना देशी वाण विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि सर्व प्रकारचे पाठबळ देण्याची गरज आहे.
571 गावांमधील बीजी-2 सदोष
कापसावरील सर्व प्रकारच्या बोंडअळयांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बोलगार्ड 2 (बीजी-2) हे वाण कंपनीने बाजारात आणले आहे. या वाणाच्या बियाण्याचे दर अधिक वाजवी आहेत. तरीही जुलै-ऑगस्ट महिन्यात बीटी कपाशीवर मोठया प्रमाणात बोंडअळयांचा प्रादुर्भाव आढळून आला. यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात रसशोषक किडीचा आणि गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील 571 गावामध्ये बीजी-2 हे वाण सदोष आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी पावणेदोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर मोठया प्रमाणात कीटकनाशके फवारली जात आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही कंपन्यांनी विदर्भात बराच पैसा कमावल्याची चर्चा आहे. या औषध कंपन्यांनी मालाची विक्री करण्यासाठी दुकानदारांना आमिष दाखवून शेतकऱ्यांनाकडून पैसा उकळला. कंपनीच्या दुकानदारांनी शेतकऱ्यांना ओलीस ठेवल्याने ही आपत्ती कोसळली. झटपट कामे उरकण्यासाठी आणि स्वस्त पडते म्हणून शेतकऱ्यांनी ही कीटकनाशके घेतली आणि त्यात त्यांचा बळी गेला. त्यांना कोणत्याही दुष्परिणामांची वा परिणामांची कल्पना नव्हती. यवतमाळ जिल्ह्यात लहानसहान गावांत कृषी सेवा केंद्रांचे जाळे पसरले आहे. ही केंद्रे म्हणजे शेतकऱ्यांचा मार्गदर्शक, पुरवठादार, खरेदीदार सर्व काही आहे. त्यांच्यामार्फत कंपन्या शेतकऱ्यांच्या गळी काय वाटेल ते उतरवितात. शेतीत वापरली जाणारी नवनवी रसायने आणि बियाणे शेतकऱ्याला लाभदायक असून, कमी मात्रा असलेल्या औषधात विविध घटक मिसळून औषध फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे, कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याने सांगितले.
कपाशीला काय हवे असते?
कपाशीतून चांगले उत्पादन काढण्यासाठी योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक असते. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पलाश देणे आवश्यक असते. त्याचबरोबर खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक, तर बोरॉन, क्लोरीन, तांबे, लोह, मॅगनीज, झिंक आदी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणे आवश्यक असते. सध्या रासायनिक खतांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कपाशीसाठी विषारी खतांचा मोठया प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
फवारणीचा जीवघेणा फास
कापूस हे विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. नगदी मिळणाऱ्या पैशातून इथल्या सामान्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा वर्षभराचा घरखर्च कसाबसा चालतो. कपाशी, सोयाबीन आणि तुरीचे पीक घेणारे शेतकरी आहेत. कापसावर आधारित एक-दोन उद्योग असल्याने या शेतकऱ्यांना व्यापारी व दलालांवर अवलंबून राहावे लागते. अनुकूल हवामान, उत्पादन आणि किफायतशीर बाजारभाव यांचा मेळही कधीच बसत नाही. त्यातच लहरी निसर्गाशी संघर्ष करण्यासाठी भांडवल, शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाचा नेमका वापर न केल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
यवतमाळसह अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विषबाधेने मरण पावलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीवर फवारणी करताना जी कीटकनाशके वापरली, त्यामध्ये प्रोफेक्स सुपर, पोलीस, मोनोसिल या कीटकनाशकांचा वापर जास्त आहे. त्याचबरोबर फॉस्कील ऍसाटॉप, पोलो स्टीमरिच टॉमिक, मॅटसिस स्टॉप, लेजर, मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशके यवतमाळ घटनेस जबाबदार आहेत.
16 लिटर पाण्यात ज्या औषधाचे प्रमाण फक्त 6 मि.ली असायला हवे, तिथे बोंडअळी लवकर नष्ट होण्यासाठी शेतकरी 10 मि.ली.चा वापर करत होता, असेही सांगण्यात आले. किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशक औषधाचा योग्य तीव्रतेचा फवारा मारणे आवश्यक होते, पण शेतकरी त्याहून कितीतरी जास्त पटीत फवारणी करत होते. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 32पेक्षा जास्त कीटकनाशक कंपन्या असून, तेराशेपेक्षा जास्त विक्री केंद्रे आहेत. यातील किती कंपन्यांना परवानगी आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यातील अनेक कंपन्यांची उलाढाल कोटयवधी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.
आंध्र प्रदेशाला लागून यवतमाळ जिल्हा असल्याने त्या राज्यातून मोठया प्रमाणात कीटकनाशके आयात होत होती. ही कीटकनाशके तुलनेने स्वस्त असल्याने शेतकऱ्यांची पावले आपसूकच या कीटकनाशकांकडे वळली. या विषारी औषधांमुळे यवतमाळमधील 19 आणि अमरावती, वर्धा आणि अकोला जिल्ह्यांतील मिळून 32 शेतकऱ्यांचा जीव गेला, तर तीसहून अधिक जणांना कायमचे अंधत्व आले. शेकडो शेतकरी- शेतमजूर आज व्हेंटिलेटरवर आहेत. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. फवारणीच्या जीवघेण्या फासाने केवळ शेतकरीच हादरून गेलेला नाही, तर राज्य सरकारसमोरही नवे संकट उभे राहिले आहे. अशा जीवघेण्या कीटकनाशक कंपन्यांना लगाम घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फवारणी संदर्भात शास्त्रशुध्द ज्ञान नसल्याने व कृषी विभागाने तशा प्रकारचे प्रशिक्षण न दिल्यामुळे वरील घटना घडल्याचे अनेकांचे मत आहे.
कापूस लागवड करताना शेतकरी कीटकनाशके, खते, माती-पाणी परीक्षण-जड मूलद्रव्ये यांच्या योग्य प्रमाणाच्या बाबतीत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येते. काही मोजके व मोठे शेतकरी वरील गोष्टीचे पालन करून चांगला नफा कमावतात. सामान्य शेतकऱ्यांना कोणतेही शास्त्रीय ज्ञान हाती नसल्याने आणि कुशल मनुष्यबळ, फवारणीसाठीची चांगली उपकरणे यांचा अभाव असल्याने, भर रणरणत्या उन्हात कपाशीवर फवारणी करावी लागते. तुषार सिंचनाप्राणे पाऊस झाल्यामुळे यंदा कपाशीही कधी नव्हे ती डोक्यापर्यंत वाढली. वातावरणातील बदलामुळे सोयाबीनवर आणि कपाशीवर मोठया प्रमाणावर कीड पसरली आहे. ही कीड नष्ट करण्यासाठी शेतकरी मोठया प्रमाणात फवारणी करत आहे. पण कडक ऊन, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण लक्षात न घेता अनेक शेतकरी पीक वाचविण्याच्या संघर्षात स्वत:चा जीव धोक्यात घालून बसले.
कपाशीला खत देताना एका एकरासाठी दोन मजुरांची गरज भासते. त्यानुसार प्रति मजुराला दिवसाला 200 रुपयांचा मोबदला दिला जातो. कपाशीवर फवारणी मारण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात मोठया प्रमाणात मजुरांच्या टोळया आहेत. या मजुरांना फवारणीचे कोणत्याही प्रकारचे तांत्रिक ज्ञान नाही. वाढलेला उष्मा आणि कीटनाशकांची चुकीच्या पध्दतीने केली जाणारी फवारणी, मिश्र कीटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता आणि फवारणीच्या वेळी आपल्या शरीराची काळजी न घेतल्याने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. कृषी विभागाला कीटकनाशक फवारणी संदर्भात शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा केला असल्याचे सूचित करायचे आहे. या विभागाने शेतकऱ्यांना फवारणी संदर्भात माहिती पोहोचवली होती का? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर मिळू शकले नाही.
मरण पावलेल्या शेतकरी-शेतमजुरांची नावे
विदर्भात कीटकनाशकांवर फवारणी करताना झालेल्या विषबाधेने मरण पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या 32पेक्षा जास्त आहे, तर 25 जणांना कायमचे अंधत्व आले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मृतांची संख्या सर्वाधिक - 19 आहे, तर 403 शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा झाली.
अकोला जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 105 मजुरांना विषबाधा झाली.
यवतमाळ जिल्ह्यात मृत पावलेल्या 19 शेतकऱ्यांची व शेतमजुरांची नावे याप्रमाणे : 1) शेतमजूर देवीदास रामाजी मडावी (रा. पोळयाचा मारोती, ता. कळंब), 2) शेतकरी गजानन नामदेव फुलमाळी (रा. सावरगाव, ता.कळंब), 3) शेतमजूर रमेश येरन्ना चिल्लावार (रा. पारवा, ता. घाटंजी), 4) शेतमजूर बंडू चंद्रभान सोनुले (रा. मानोली, ता. घाटंजी), 5) शेतकरी संतोष उत्तम राठोड (रा. पाळोदी, ता. आर्णी), 6) शेतमजूर दीपक शामराव मडावी (रा. शेंदुरसनी, ता. आर्णी), 7) शेतमजूर रवी दुलसिंग राठोड (रा. सेवादास नगर, ता. दारव्हा), 8) शेतकरी दशरथ शामा चव्हाण (रा. नायगाव, ता. दारव्हा), 9) शेतकरी सुशील धावरा चव्हाण (रा. उमरी ई., ता.दारव्हा), 10) शेतमजूर शेख अयुब शेख महमंद (रा. डेहाणी कलंगाव, ता. दिग्रस), 11) शेतकरी कैलास विठ्ठल पेंदोर (रा. निमणी-मुकुटबन, ता. झरी जा), 12) शेतमजूर वसंता केशव चिडाम (रा. मारेगाव, ता. मारेगाव), 13) शेतकरी दिवाकर तुळशीराम घागी (रा. घोडदरा, ता. मारेगाव), 14) शेतकरी शंकर नागोजी आगलावे (रा. पिसगाव, ता. मारेगाव), 15) शेतकरी शंकर विठ्ठल गेडाम (रा. टाकली, ता. मारेगाव), 16) शेतकरी विठ्ठल देवन्ना पेरकेवार (रा. पहापळ, ता. केळापूर), 17) शेतमजूर प्रदीप भाऊराव सोयाम (रा. टेभी, ता. केळापूर), 18) शेतकरी दत्तात्रय गजानन टेकाम (रा. आमलोन, ता. वणी), 19) जंगलू महादेव डावरी (रा. कृष्णापूर ता.वणी) आदी.
फवारणी पंपात चिनी ड्रॅगनचा शिरकाव
विस्तारवादी विकृत मानसिकतेचा चीन उर्फ ड्रॅगन भारतीय शेती उद्योगात शिरकाव करत आहे. जागतिकीकरणामुळे भारतीय बाजारपेठामध्ये चीनी वस्तू आल्या आहेत. जगाच्या पाठीवर कुठल्याही शहरात, गावात चिनी वस्तू दिसतात आणि विकल्या जातात. चीन हा भौगोलिकदृष्टया मोठा देश आहे. त्यात या देशात शेतीचे मोठे क्षेत्र आहे. इथल्या शेतकऱ्यांना कृषी अवजारे पुरवताना ते उत्कृष्ट दर्जाची अवजारे देतात. हीच अवजारे बाहेरील देशात निर्यात करताना चाणाक्षपणा करतात. या अवजारांच्या रचनेत बदल करून जगात आयात करतात. चीन हे आपले शेजारी राष्ट्र असल्यामुळे ही कृषी अवजारे आपल्या देशातील खेडयांपर्यंत पोहोचली आहेत. देशी कृषी अवजारांपेक्षा याची किंमत स्वस्त असल्यामुळे आपले शेतकरी ही चिनी अवजारे खरेदी करताना दिसतात. याचे ज्वलंत उदाहरण यवतमाळमध्ये आढळून आले. यंदा प्रथमच शेतकरी-शेतमजुरांकडे कीटनाशकांची फवारणी करताना उच्च दाबाचे चिनी यंत्र वापरले जात आहे. बाजारात 16 ते 25 लीटर क्षमतेच्या चिनी (तैवान) बनावटीच्या पंपाने शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. हा पंप पेट्रोलवर व गॅसवर चालतो. कृषी अवजार केंद्राकडून या पंपाची चाचणी न घेता, चिनी पंपांना परवानगी नसताना याचा मोठया प्रमाणात शिरकाव झाला. शिवाय पंपाची तांत्रिक माहिती दुकानदाराने शेतकऱ्यांना सांगितली नाही. या पंपाची किंमत देशी पंपाच्या तुलनेने कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हाच पंप दिसून येतो. एका मिनिटात 3 ते 4 लीटरची फवारणी करण्याची या पंपाची क्षमता आहे. जास्त दाबाने फेकले जाणारे हे फवारणी यंत्र असून वरवर फवारणी केली, तर हवेत छत्रीसारखा आकार तयार होतो. ह्याच फवारणीतील विषाचे कण शेतकरी- शेतमजुरांच्या नाका-तोंडात व हातावर पडल्यामुळे उलटी, मळमळ व अंगात विष गेल्याची उदाहरणे आहेत. त्यातच प्रचंड उष्णता असल्याने अनेक मजूर अंगावर कपडे न घालता फवारणी करत होते. 16 लिटरचे फवारणी पंप पाठीवर घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत फवारणी करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रशासन व सरकारमध्ये समन्वयाचा अभाव
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या फवारणी विषबाधा प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता प्रशासन व सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यात विषबाधेने अनेक शेतमजुरांचा मृत्यू झाला. त्यानंतर सातत्याने अशा घटनांची तीव्रता वाढली असताना प्रशासन ढिम्म होते.
यामागचे नेमके कारण काय? याचा शोध 1 महिन्यानंतर घेतला गेला. हीच आपत्ती 2016 साली आली होती, तरीही त्यातून प्रशासन व सरकारने ठोस पावले का उचलली नाहीत? प्रशासन अजूनही विषबाधित सर्व पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचले नाही. कृषी विभागाकडून फवारणी संदर्भातील सूचना जून-जुलै महिन्यातच शेतकरी व शेतमजुरांपर्यत पोहोचणे आवश्यक होते. तशी तत्परता या विभागाने दाखवली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदर्भातील दिग्गज नेते असतानाही त्यांनी यवतमाळ, अकोला, अमरावती व वर्धा जिल्ह्यातील विषबाधित कुटुंबीयांची अद्याप का भेट घेतली नाही? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. सरकारने विषबाधित कुटुंबांना 2 लाखाची मदत जाहीर केली असली, तरी अजूनही ती मदत शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. सरकारी रुग्णालयात शेकडो जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालायात जागेच्या अभावी रुग्णावर जमिनीवरच उपचार सुरू असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. त्याचबरोर औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णाच्या कुटुंबाला बाहेरून दवापाणी घेऊन येण्याची वेळ आली आहे. बऱ्याच जणांची परिस्थिती हलाखीची आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र व कृषी टोल केंद्र कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक रुग्ण शंभर किलोमीटरवरून उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या पोटापाण्याची सोय सरकारने का केली नाही? असा सवाल नेर तालुक्यातील शेतकरी संजय एम. राठोड यांनी केला.
रासायनिक खतांचा पंजाब ते यवतमाळ प्रवास
सततचा दुष्काळ, भूकबळी यामुळे आपल्या देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती घडवून आणावी लागली. हरित क्रांतीने धान्याचे उत्पन्न अफाट वाढल्याचे आकडे कायम समोर आल्यामुळे तिच्या तोटयांकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. हरित क्रांतीचा पाया म्हणजे संकरित बियाणे. पण या जातींचे जास्तीचे उत्पादन पदरात पडण्यासाठी पाणी, कीटकनाशके व रासायनिक खते यांचा अतिरिक्त वापर करणे गरजेचे ठरले.
कीडनाशकांचा भारतातील वापर झपाटयाने वाढू लागला. 1966पासून 1978पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला. 2001मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले. यामुळे उत्पादन खर्च तर वाढलाच, त्याचबरोबर जैविक शेती नष्ट झाली. हरित क्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर रुग्ण आहे. त्यामुळे पंजाबला Cancer Capital of India असे म्हणू लागले आहेत. पंजाब राज्यातील भटिंडा, बटला परिसरात एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही. पंजाब सरकारने याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून हे निष्कर्ष काढले आहेत. या भागातील गावोगावी कर्करोगी आढळतात.
भटिंडा ते बिकानेर धावणाऱ्या गाडीला नागरिकांनी 'कॅन्सर ट्रेन' हे नाव दिले आहे. बिकानेरच्या आचार्य तुलसी कर्करोग रुग्णालयात जाणारी आम जनता या गाडीने प्रवास करते. दूरदर्शनद्वारा निर्मित 'मेरे देश की धरती' ह्या माहितीपटात पंजाबच्या अशा आधुनिक शेतीवर सविस्तर कहाणी असल्याची माहिती वर्धा जिल्ह्यातील जैविक पध्दतीने शेती करणारे शेतकरी वसंतराव फुटाणे यांनी दिली. सध्या आपला शेतकरी वैज्ञानिक पध्दतीने शेती न करता औषध कंपनीच्या व दलालांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे. सिक्कीम या राज्यात जैविक पध्दतीने शेती केली जाते. त्यामुळे इथली शेती जगाच्या नकाशावर आली आहे. आंध्र प्रदेशने विषमुक्ती करण्यासाठी प्रभावीपणे पाऊल उचलले असून हजारो हेक्टर शेती जैविक पध्दतीने केली जात आहे.
देशभरात फवारणीचे काम करणाऱ्यांपैकी दर वर्षी 28000 जणांचा मृत्यू विषबाधेमुळे होतो. सुमारे 450 विषारी घटक प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जनुकांमध्ये जाऊन बसले आहेत, जे पुढील प्रत्येक पिढीत संक्रमित होणार आहेत. 1977 साली कर्नाटक राज्यातील मालनाड येथे घडलेली घटना 'हंडी सिंड्रोम' या नावाने प्रसिध्द आहे.
या जिल्ह्यात भातासाठी मोठया प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने 200 मजुरांना अर्धांगवायू दिसून आला. खेकडयांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश असल्याचे तपासाअंती सिध्द झाले. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात विविध पिके घेतली जातात. या ठिकाणी पिकांच्या उत्पादन वाढविण्यासाठी मोठया प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. या भागात कर्करोगाचे प्रमाण किती आहे? याचा शोध घेणे आवश्यक आहे. कापसावर व सोयाबीनवर मारलेली जंतुनाशके जमिनीत उतरून पाण्यात मिसळतात. त्यामुळे पंजाब राज्यातील लोकांप्रमाणे यवतमाळमधील लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले असून यवतमाळ पंजाबसारखा होऊ नये, यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे, असेही फुटाणे म्हणाले.
सरकारची कारवाई
सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कपाशी कीटनाशकांची फवारणी करताना 19 शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांना गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी निलंबित केले आहे. जिल्ह्यात विनापरवाना कीटकनाशके विकणाऱ्या कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. केंद्राचे पथकही जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. प्रथम पाच केंद्रावर कीटकनाशके अधिनियम कलम 21 क व कलम 10 अ (आय), तसेच भादंवि 304 (अ) 29/1 सी.एफ 1,2,3,1,3,1 कीटकनाशक कायदा 1968 /104, 12 कायदा 1972 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 23 जणांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. दोन कृषी केंद्रांच्या तपासणीमध्ये घरडा केमिकल्स, मुंबई, इंडोसीस केमिकल्स, रॅलीज इंडिया लिमिटेड, युनायटेड पेस्टिसाइड लि. गुजरात, एस.डी.एस. रामसाईड, अदामा इंडिया, बीएसएफ इंडिया, पेस्टिसाइड लि. लखनौ या कंपन्यांची कीटकनाशके आढळून आली आहेत. याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून आणखी केंद्रांची झाडाझडती सुरू आहे. त्याचबरोबर अकोला येथील औद्योगिक वसाहतीतील फेज 3मध्ये माहेश्वरी बायो फ्युएल प्लॉट क्रमांक 14 येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड, तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनी, फेज 2 प्लॉट नं. एफ-22मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदामे सील करण्यात आली आहेत. या दोन्ही ठिकाणांहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती.
2 हजार शेतकरी जैविक शेतीकडे
एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर कपाशीवर आलेल्या बोंडअळी नष्ट करण्याच्या नादात आपला अनमोल जीव गमावून बसला, तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी जैविक पध्दतीने शेती करून आपल्या कपाशीवरील बोंडअळी नष्ट करून मोठया जोमात पीक उभे केल्याचे सुखद चित्रही पाहावयास मिळते. शेतकऱ्यांमध्ये हा बदल घडवून आणण्यात यवतमाळमधील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या शेतकरी विकास प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे.
कृषी प्रकृती, कृषी संस्कार आणि कृषी संघटनात्मक बांधणी या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या प्रकल्पामुळे यंदा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची कपाशी मोठया प्रमाणात बहरलेली असून, यावर आलेल्या बोंडअळीवर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत आणि आधुनिक सेंद्रिय खते यांची फवारणी करण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या एका कपाशीच्या तब्बल 40 ते 50 बोंडे आली आहेत. या पध्दतीने शेती करणाऱ्या एकाही शेतकऱ्याला फवारणीतून विषबाधा झाली नाही, हे विशेष. शेतीची दुरवस्था, कर्जबाजारीपणा, वैफल्य आणि त्यातून घडणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक उपाययोजना म्हणून 2011 साली शेतकरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. सध्या जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांपासून जैविक पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यातील एकाही शेतकऱ्याने आतापर्यंत दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या नाहीत.
194 गावामध्ये हा प्रयोग सुरू असून शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळविण्यास आम्हाला यश आले आहे. मालखेड गावचे कापूस उत्पादक शेतकरी अनिल गावंडे हे गेल्या दोन वर्षांपासून आमच्याशी जुळले आहेत. त्यांचे कापसाचे उत्पन्न 2015 साली दुपटीने वाढले आणि खर्च बराच कमी झाला. त्यांना पावणेदोन एकरात 38 क्विंटल कापूस झाला. आतापर्यंत त्यांनी आपल्या शेतात रासायनिक औषधे आणि खते वापरली नाहीत.
यंदाच्या वर्षी जमिनीतील गांडुळे, पाच प्रकारचे मित्रकीटक आणि अनेक पक्षी त्यांच्या शेतात वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्पन्न घेण्याच्या नादात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी स्वत:चा जीव गमावून बसला. आजच्या शेतकऱ्यांना जैविक पध्दतीने शेती करावी, यासाठी आमची प्रचार मोहीम अधिक गतिमान करणार असून यंदा गावात पूर्णकालीन कार्य करणारे 19 शेतकरी कार्यकर्ते, दोन संशोधक, स्वयंप्रेरणेने काही वेळ देऊन कार्य करणारे 137 शेतकरी स्वयंसेवक आणि संस्थेचे अन्य कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख विजय कद्रे यांनी दिली.
संरक्षक किट पुरविणे बंधनकारक - तिवारी
''यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणासंदर्भात विरोधकांकडून निव्वळ राजकारण केले जात आहे. हे विषबाधा प्रकरण मी शोधून काढले. तेव्हा विरोधकांना याची कल्पना नव्हती. कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊन मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे'' असे राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले व शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरेवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी पीडित शेतकरी-शेतमजुरांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कापूस आणि सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
अशा अघटित घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष स्वरूपाचे प्रतिबंधक किट वितरित करण्याचे कीटकनाशक कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावर नावे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंतचे विमा संरक्षण तत्काळ देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. या योजनेचे विमा संरक्षण मिळू न शकणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुबीयांना याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वच कीटकनाशक कंपन्यांना कीटकनाशकांची विक्री करताना संरक्षक किट पुरविणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. जिल्ह्यातील कृषी केंद्रातील बनावट औषधांचा शोध घेऊन परवाने रद्द करण्याचा आदेशही देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
18 कीडनाशकांवर 2020पर्यंत पूर्ण बंदी
देशातील 18 कीटकनाशकांवर सन 2020पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला होता. या बंदीत बुरशीनाशक, कीटकनाशक आणि तणनाशक यांचा समावेश आहे. ही बंदी 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीपर्यंत लागू होणार आहे.
भारतात नोंदणीकृत असलेल्या निओनिकोटिनॉईडस गटातील कीटकनाशकांच्या वापराविषयी आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने जुलै 2013मध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. त्यानंतर हेच उद्दिष्ट कायम ठेवून पुढे अन्य देशांत बंदी असलेल्या किंवा मर्यादित (रिस्ट्रिक्टेड) वापरासाठी संमत झालेल्या, मात्र भारतात त्यांच्या वापरासाठी नोंदणीकरण झालेल्या कीडनाशकांचा आढावा घेण्याचे कार्य समितीतील तज्ज्ञांनी केले. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी व सीआयबीआरसीचा अहवाल यांचा एकत्रित विचार करून मानवी आरोग्य, प्राणी व पक्षी यांच्यासाठी धोकादायक असलेल्या 18 कीडनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आला आहे.
या बंदीला काही वर्षांचा कालावधी बाकी आहे. कीडनाशकांमुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात आले असताना सरकार आणखी किती काळ वाट पाहत बसणार आहे? या बंदीचा निर्णयाचा पुर्नेविचार करून त्वरीत अंमलबजाणी करणे आवश्यक आहे. जगातील 80हून अधिक वैज्ञानिकांच्या समूहाने 'ग्लायकोफोसेटी'वर बंदी आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे मागणी केली आहे. ग्लायकोफोसेटी तणनाशकांचा संबंध कर्करोगाशी जुळत आहे. एकूणच जगभरात कीटकनाशकांच्या काळाने घाला घेतले असून, भारतातही त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कीटकनाशकांचा काळ संपविण्यासाठी शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
कीटकनाशके वापरताना काळजी घ्या - कोळपकर
जिल्ह्यातील 469 कृषी साहाय्यकांच्या मदतीने फवारणी संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामसभा, प्रभातफेरी, पत्रक, आकाशवाणी, समाजमाध्यमे आदी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे.
कीटकनाशके खरेदीपूर्वी कीटकनाशकांचे बॅच क्रमांक, केंद्रीय कीटकनाशक नोंदणी मंडळाचे नोंदणी क्रमांक, उत्पादन तारीख, अंतिम तारीख पाहूनच कीटकनाशके खरेदी करावीत, त्याचबरोबर फवारणीच्या वेळी नॉझल स्वच्छ करताना तो तोंडावाटे स्वच्छ करू नये, फवारणीच्या पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाहीत याची काळजी घ्यावी, विशेष महत्त्वाचे म्हणजे शिफारस केलेल्या तीव्रतेच्याच कीटकनाशकांचा वापर करावा, फवारणी करताना शरीराला अपायकारक ठरतील अशी कामे करू नयेत. खाणे, पिणे, धूम्रपान इत्यादी फवारणीच्या कालावधीत अजिबात करू नये, फवारणी शक्यतो सकाळी किंवा सूर्याची उष्णता कमी झाल्यावर दुपारनंतर करावी, त्याचबरोबर औषधाची फवारणी ही नेहमी वाऱ्याच्या दिशेबरोबर करावी'' असे आवाहन यवतमाळ जिल्हा कृषी अधीक्षक एन.एम. कोळपकर यांनी केले.
फवारणीसाठी मजूर मिळेनात
विषबाधा प्रकरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे कपाशीवर फवारणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. विदर्भात कपाशीवर फवारणी मारण्यासाठी टोळया असून, ते आपल्या जिवाच्या काळजीने फवारणी करण्यास नकार देत असल्याचे वणी तालुक्यातील शेतकरी विनायक मते यांनी सांगितले.
रसायनिक खत नसून महाविष : राऊत
यवतमाळमधील कीटकनाशकांच्या विषारी औषधांमुळे झालेल्या घटनेची भयानकता लक्षात घेता भारतीय पर्यावरण चळवळ आणि वसुंधरा आंदोलनाचे निमंत्रक ऍड. गिरीश राऊत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ''रासायनिक खते म्हणजे करोडो भारतीयांना विषारी अन्नाद्वारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविणारे महाविष आहे.''
महात्मा गांधीजी म्हणत की, ''भारतातील प्रत्येक शेत ही एक प्रयोगशाळा आहे व प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ.'' जंगलाला कुणी खत देत नाही, पाणी देत नाही, नांगरणी करत नाही. तरीही जंगल करोडो वर्षे आहे. विदर्भासारख्या फक्त 400 ते 600 मि.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रातही घनदाट जंगल होते. आज त्याचे प्रमाण किती आहे? किती टक्के सरासरी पाऊस पडतो? याचा विचार करणे गरजेचे आहे. आज विदर्भातील शेती रासायनिक खतांच्या दुष्टचक्रात अडकली आहे, असे ऍड. गिरीश राऊत यांनी सांगितले..
सेंद्रिय शेती काळाची गरज - शर्मा
सद्यःस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतीची सुपीकता खालावत चालली असून यास रासायनिक खते जबाबदार आहेत. त्यामुळे आजच्या काळात सेंद्रिय शेतीची आवश्यकता आहे. आजचा शेतकरी हा व्यापाऱ्याने व दुकानदाराने सांगितलेल्या तत्त्वावर चालला असून, त्यामुळेच विषबाधेची आपत्ती कोसळली. कीड नियंत्रणसाठी प्रभावी उपाय म्हणजे 'कामगंध सापळे'. शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर कामगंध सापळे लावले असते, तर बोंडअळी आली नसती. शेतकऱ्यांनी या विषातून बाहेर निघण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे. शेतकऱ्यांनी मातीचे व पाण्याचे व्यवस्थापन नीट समजून घेणे गरजेचे आहे. बाजाराच्या कुचक्रातन फसता, फसव्या जाहिरातबाजीला न फसता सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिध्द शेतकरी सुभाष शर्मा यांनी सांगितले.
आजच्या काळातील संकरित बियाणांमध्ये किडीला तोंड क्षमता नसल्यामुळे यवतमाळची दुर्घटना घडली. हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बाधित असून त्यात आणखी अशा दुर्घटनेची भर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सरकारने कीडनाशकांबाबत धोरण आखून मॉन्सेन्टो आणि अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मगरमिठीतून भारतीय शेती-शेतकऱ्यांना मुक्त करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील शिफारशीत निवडक बीटी संकरित कापूस वाण
कंपनीचे नाव बी.टी वाण
1.राशी सीड, अतूर, राशी-2, शक्ती-9, साई, तामिळनाडू राशी-656
9970452767