सरत्या वर्षामध्ये चरित्रपटांचं पीकचं आलं असं म्हणायला हवं. एकूणच या वर्षामध्ये तेरा चरित्रपट बनले आणि प्रदर्शितही झाले. यामधील बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट म्हणजे आमिर खान अभिनित 'दंगल'.
'दंगल' हा कथापट गीता फोगट हिच्या महिला कुस्तीगिरीच्या कामगिरीवर आधारलेला चित्रपट. महावीरसिंग फोगट, बलाली (हरियाणा) या छोटयाशा गावातील एक यशस्वी पैलवान; पण चरितार्थ चालविण्यासाठी त्याला वडिलांच्या सांगण्यावरून नोकरी पत्करावी लागते आणि देशासाठी कुस्तीमधून मोठी कामगिरी करावी हे स्वप्न अधुरं राहतं. यथावकाश महावीरचं लग्न होतं. आपल्याकडून नाही, पण आपल्या मुलाकडून मोठी कामगिरी करून घेता येईल अशी आशा बाळगून असलेल्या महावीरच्या पत्नीला एकामागून एक चार मुली होतात. महावीर काहीसा निराश होतो. मुली मोठया होतात. शाळेत जाऊ लागतात. अशातच एक दिवस शेजारी आपल्या मुलांना तुझ्या मुलींनी मारलं अशी तक्रार घेऊन येतात. तो त्यांची माफी मागतो, पण त्या वेळी त्याच्या लक्षात येतं की या मुलींमध्ये पैलवानाचं रक्त सळसळतं आहे आणि तो ठरवतो की, यांना महिला कुस्तीगीर बनवायचं. पत्नी, भाऊ, गावकरी यांच्या विरोधाला न जुमानता तो घडवतो गीताकुमारी आणि बबिताकुमारी या महिला कुस्तीगीर! हा अतिशय मेहनतीचा, मनोरंजक प्रवास साधारण 1988 ते 2010पर्यंतच्या कालखंडातील, गीता-बबिताच्या यश-अपयशाचा प्रवास, गीताला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळेपर्यंतचा श्वास रोखून धरायला लावणारा भावनिक द्वंद्वांचा प्रवास...
महावीरचा पुतण्या ॐकार निवेदनपर आवाजात कथापट उलगडत जातो. अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत तो सतत महावीरसोबतच असतो. कथापट हा कुस्ती या खेळावर किंवा कुस्ती दाखवीत असला, तरी तो खेळ यावर आधारलेला नाही. तो आहे वडील-मुलगी यांच्यामधील नातेसंबंधावरचा, स्त्रीसन्मानाचा... कारण चित्रपटाचं घोषवाक्यचं सांगतं, 'म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम हैं के?'
एका प्रसंगात सरावाचा कंटाळा करून, स्त्रीसुलभ भावनेतून नटूनथटून गीता, बबिता आणि ॐकार एका मैत्रिणीच्या लग्नसमारंभात जातात. तिथे रमतात, मजा घेतात, पण महावीर अचानक तिथे पोहोचतो. ॐकारच्या मुस्काटात मारतो. सगळेच अस्वस्थ होतात. त्या वेळी त्यांची वधुमैत्रीण त्यांना सांगते की, ''माझ्या वडिलांनी अगदी सरधोपटपणे माझी सासरी पाठवणी केली. माझा कुठलाच विचार त्यांनी केलेला नाही, पण तुमच्या पित्याने तुम्हाला सन्मानाने घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारीशक्तीला एका उंचीवर पोहोचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यामागे केवळ तुमचाच विचार आहे.'' यातून गीता-बबिताचं मनापासून मतपरिवर्तन होतं. महावीरचं मुलांसोबत आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाडयात उतरवणं, अजमावणं, स्वत:ला त्रास झाला तरी चालेल, पण एका ध्येयाने प्रेरित झालेला तो पिता मुलींच्या जन्मानंतर पत्नीला किंवा स्वत:ला दोष देत नाही.
पटकथा - महावीर, गीता, बबिता यांची कुस्तीचा सराव, डावपेच, अनेकविध स्पर्धा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर आणि शेवटाकडे राष्ट्रकुल स्पर्धेत गीताला सुर्वपदक मिळेपर्यंतचा विश्वसनीय असा प्रवास अगदी सरळपणे होतो. अगदी एकमार्गी. सरकारी अधिकाऱ्याकडे मॅटसाठी आर्थिक मदत मागणारा महावीर, नाकारलेली सरकारी मदत, त्यावरचं महावीरचं भाष्य, सरकारी प्रशिक्षक प्रमोद कदमचा उद्दामपणा, अहंभाव असे प्रसंग वगळता राजकारण, समाजकारण, बदलतं जग यांचा पटकथेत कुठेही कुठलाच अंतर्भाव दिसत नाही. तो व्यवस्थेवर फारसं भाष्य करीत नाही. महावीर ही व्यक्तिरेखा महत्त्वाकांक्षी, मेहनत, डावपेच यावर केंद्रित झालेली दिसते. त्यामुळे तो एका प्रसंगात गीताला म्हणतो, ''तुम्हे सिल्व्हर मेडल मिला तो लोग तुझे भूल जायेंगे, लेकिन गोल्ड मेडल मिला तो मिसाल बन जायेगी। लोग मिसाले देते है।''
एका पिढीचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पुढच्या पिढीकडून पूर्ण करून घ्यायचं, हा पारंपरिक संस्कारातून आलेला विचार. पण इथला पिता कुठेही हतबल, पिचलेला वाटत नाही. कदाचित पैलवानच असल्यामुळे एक लढवय्या वृत्ती त्याच्या वागण्या-बोलण्यात दिसते.
राज्य पातळीवर यशस्वी झालेली गीता जेव्हा राष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्व करण्यासाठी पतियाळा येथील राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीत जाते, त्या वेळी तिथला प्रशिक्षक स्वत:चे डावपेच तिच्यावर लादतो आणि आपल्या वडिलांनी जे काही शिकवलं ते विसरून जा असं सांगतो. त्या वेळी एका गावातून आलेली गीता नव्या शहरात आलेली, तिच्या मैत्रिणींच्या नादाने, नवेपणाने काहीशी नादावते. तिचं वागणं बदलतं, तिच्या डोक्यात हवा जाते. जेव्हा ती वडिलांना भेटायला गावी जाते, तेव्हा ती कुस्तीचं नवं तंत्र वडिलांना सांगते. त्या वेळी वडील आणि गीता यांच्यामध्ये एक द्वंद्व निर्माण होतं. धाकटी बहीण बबिता तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण व्यर्थ. वडील आणि गीता यांच्यामध्ये काही काळ अंतर निर्माण होतं, पण बबिता मात्र वडिलांचे डावपेच वापरून यशस्वी होते आणि राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात दाखल होते. तिला तिथे गीता भेटते. गीता तिला तिथल्या गमतीजमती, मौजमजेची ठिकाणं दाखवते, पण बबिता तिला अगदी ठामपणे ''मला सरावाचं ठिकाण दाखव'' असं सांगते. बबिताला गीताचा उतरता आलेख कळतो. अपयशाची कारणं कळतात. अशा वेळी महावीर स्वत: शहरात येऊन मुक्काम ठोकतो आणि अपयशाची कारणं, चुकीचं तंत्र याचा अभ्यास करून तो आपलं तंत्र वापरून स्वत: एक वेगळा सराव घेतो आणि गीता पुन्हा आपलं स्वत्व मिळवते. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव होण्यासाठी सर्वार्थाने झोकून देणारा पिता, तर एका प्रसंगात सरावात काटेकोरपणे वागणारा प्रशिक्षक आणि थकून झोपलेल्या मुलींचे पाय चेपणारा पिता यामधून गुरू आणि पिता यामधील भावनिकता अधोरेखित होते.
आतापर्यंत सर्वसाधारणपणे भारतीय चित्रपटाने मुलीची सासरी पाठवणी करणारा एक वैशिष्टयपूर्ण असा पिता दाखविला आणि प्रेक्षकांनी तो पाहिला. दंगलमधला पिता भावनिक असला, तरी तो आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती लढायला पाठविणारा, बळ देणारा आणि समर्थपणे मागे उभा राहणारा. तो महिला सबलीकरण, नारी शक्ती, शोषण यावर कुठलंही बेगडी भाष्य करीत नाही, तो समर्थ 'स्त्री' घडविताना दिसतो.
दिग्दर्शक नितेश तिवारी आपल्या दिग्दर्शकीय कामगिरीतून पटकथेत कुठेही आमिर खान दिसेल अशी कुठलीही त्याची योजना दिसत नाही. त्यामुळे महावीरसिंग फोगट ही व्यक्तिरेखा सर्वार्थाने अभिनेत्याने आत्मसात केलेली, त्यासाठी भाषा, काळ, स्थित्यंतर यामधील फरक दाखवताना आमिर खानने घेतलेली शारीरिक मेहनत, सुरुवातीचा तारुण्याचा जोश, वयपरत्वे येणारा थकवा, शिथिल शरीर या शारीरिक फरकांतून आपल्याला पैलवानाची देहबोली दिसून येते.
साक्षी तन्वर या अभिनेत्रीने साकारलेली महावीरची पत्नी संयमित अभिनयातून आपल्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देते. गीता, बबिता (अनुक्रमे झायरा वसिम, सुहानी भटनागर / फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा) यांनी घेतलेली मेहनत, कुस्तीतील डावपेच, तंत्रशुध्दता, बोलीभाषा यातून अभिनयातील जोरकसपणा आणि भावनिक प्रसंगामधील भावुक क्षणही त्या गहिरे करतात. चुलत भाऊ ॐकार (ऋत्विक साहोर / अपारशक्ती खुराना) आपली साथ खुलवतो. त्याच्याच नजरेतून चित्रपट उलगडतो, तर मराठमोळा (पुणेरी) अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेला प्रमोद कदम हा प्रशिक्षक, अहंभावी, उद्दाम असा सराईतपणे साकारला आहे.
कथापटातील चित्रीकरण स्थळं, लांबवर पसरलेली शेतं, घरं, वस्ती, रस्ते, तालीम स्टेडियम यथायोग्य गरजा पूर्ण करतात. चित्रीकरण साधेपणातून सौंदर्य निर्माण करून चित्रचौकटींना नेटकं करतो. 'दंगल, दंगल' हे गीत, पार्श्वसंगीत यामधून संगीतकार प्रितम चित्रपटाला पुढे नेतात.
'दंगल' या चित्रपटात अतिनाटयात्मक प्रसंग, चित्रपटासाठी पटकथेत घेतलेलं स्वातंत्र्य हे जरी असलं, तरी हा चरित्रपट महावीर फोगट, गीता फोगट, बबिता फोगट यांची गोष्ट सांगताना पिता-पुत्रीचं नातं एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवतो.
या बाबतीत बोलताना अभिनेता आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला, ''मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाव, बेटी पढाव' या योजनेच्या पार्श्वभूमीवर आलेला हा चित्रपट तेवढाच महत्त्वाचा आहे, या धोरणाला बढावा देणाराच आहे.''
चित्रपटाच्या प्रभावी माध्यमातून 'दंगल' हा महिला कुस्तीवरचा चित्रपट उदंड प्रतिसाद मिळविताना दिसतो. त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलेलच असं म्हणता येणार नाही, पण भावनेने जोडलेलं चित्रपटाशी असलेलं नातं यात कुठेतरी 'स्त्री'सन्मानाची जाणीव पुसटशी का होईना, करून देईल हे निश्चित. वर्षानुवर्षं असलेलं पितापुत्रीचं गहिरं नातं आता समर्थ होईल असं म्हणायला हवं!
9820160911
vaibhavbagkar@gmail.com