Enter your Email Address to subscribe to our newsletters
दर पंधरा दिवसांनी तो वृध्दाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुध्दा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मरतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतकी वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या इच्छांचा उत्सव साजरा करतात.काळया स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं. गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail' येईल. 'Weekly Achievers'मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरू राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्षं झरझर त्याच्या डोळयांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येऊन तो स्थिरावला होता. वेगवेगळया शिफ्ट्समध्ये येऊन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची, हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं किंवा माहीत असूनही करता न येणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. झपाटयाने त्याचं मन भूतकाळात जायला लागलं. खूप लहान असताना त्याला पायलट व्हायचं होतं. पप्पा त्यांचा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायचे, तेव्हा त्याला वाटायचं - मॉडेल व्हावं. थोडासा मोठा झाला, तेव्हा त्याला गिटार सापडलं. पप्पांचे मित्र यायचे, त्यांच्यातलाच एक गिटार वाजवायचा. आपण गिटारिस्ट व्हायचं हे त्याने मनोमन ठरवलं. त्याला आठवलं, त्याने ठरवलं तसं काही झालंच नाही. एका दिवशी अचानक पप्पाने स्वत:च्या बॅग्ज उचलल्या, कॅमेरा घेतला आणि कुठेतरी निघून गेला. जाताना त्याचा गालगुच्चा घेऊन आणि त्याच्यासाठी नवंकोरं गिटार ठेवून गेला. काही महिने त्याने मम्मीला विचारलं, ''पप्पा कुठे गेला? असं न सांगता कुणी जातं का?'' त्याला वाटायचं की मम्मी पप्पावर खूप चिडलीये, पण कारण कळायचं नाही. ह्याला कधी पप्पाचा फारसा राग आला नाही. पप्पाचा राग.
त्याला आठवली ती रात्र. बारावीच्या निकालानंतर काय करायचं, असं मम्मीने विचारल्यावर तो म्हणालेला, ''मला म्युझिकमध्ये करिअर करायचंय. गिटारिस्ट व्हायचंय. गिटार वाजवणं माझं पॅशन आहे.'' मम्मीने मला कानाखाली दोन मारल्या आणि म्हणाली, ''पॅशनच्या गप्पा मला नको सांगूस.'' त्या क्षणी त्याला पप्पाची खूप आठवण आली. पप्पा असता, तर त्याने बरोबर मम्मीला समजावलं असतं. का नव्हता तो त्या वेळेला? पप्पानेच दिलेलं ना ते गिटार? मग आता मम्मी खेचून घेत होती, तेव्हा पप्पा इकडे हवा होता. त्याने काळजी घ्यायला हवी होती गिटारची. आणि अचानक त्याला जाणवलं की ती काळजी असती, तर तो असं अचानक त्याला आणि मम्मीला सोडून गेलाच नसता. त्या दिवशी रात्री मम्मीला गिटार कुलूपबंद कपाटात ठेवताना पाहून आणि स्वत: उशीत डोकं खुपसून रडताना त्याला पप्पाचा खूप जास्त राग आलेला... खूप जास्त. आणि मग दिवसागणिक, वर्षागणिक तो राग साचत गेला, वाढत गेला.
मोबाइलच्या रिंगटोनने तो भानावर आला. ''नमस्कार. मी विसावा वृध्दाश्रमातून बोलतेय. येत्या रविवारी आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय, त्यात तुमच्या वडिलांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शनसुध्दा आहे. तुम्हाला यायला आवडेल का?''
''अं... हां, म्हणजे मी कळवतो तुम्हाला तसं. तुम्ही मला वेळ मेल करून ठेवा.''
याच फोटोंनी, कॅमेऱ्याने या माणसाच्या संसाराची, आयुष्याची धूळधाण केली, ह्याला वृध्दाश्रमात आणून सोडलं तरीही ह्याची फोटोग्राफी काही जात नाही आणि आपण इतक्या सहज तेव्हा गिटार सोडलं. आजही गिटार, म्युझिक आपल्याला बोलवत असतं, पण ही हातातली नोकरी सरळसोट सोडून देता येत नाही आणि मनात आपण विचार करत राहतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय... त्याने रागात कॉम्प्युटर बंद केला आणि सिगरेट मारायला स्मोकिंग झोनकडे निघाला. येत्या रविवारी बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून वृध्दाश्रमात जायचं त्याने ठरवलं. इतकी वर्षं साचलेल्या रागाला वाट मोकळी करून द्यायला.
गाडी पार्क करून तो हॉलमध्ये आला. तिकडे त्याच्या पप्पाने 'क्लिक' केलेले काही फोटोग्राफ्स मांडून ठेवले होते. त्याच्या पप्पाचे काही तिथलेच वृध्द मित्र, दोन-चार महाविद्यालयीन तरुण होते तिकडे. तो पप्पाजवळ आला. त्याला जाणवलं, वयापेक्षा फार लवकर म्हातारा झालाय पप्पा. ''हा माझा मुलगा.'' पप्पाने सोबतच्या दोन वृध्दांना त्याची ओळख करून दिली. त्यांच्या डोळयांत त्याला एकाच वेळी त्याच्याबद्दलचं प्रेम आणि पप्पांबद्दलचा हेवा दिसला. त्यांच्या इतक्या जवळचं, इतक्या रक्ताच्या नात्याचं कुणी तिथे येत नसावं बहुधा. तितक्यात ते दोन-तीन तरुण तिथे आले आणि पप्पा बोलू लागला, ''मी तसा कॅमेरा आजकाल ठेवूनच दिलाय रे बाजूला. ही पोरं इथे येत असतात आमच्याशी गप्पा मारायला. ह्यांच्या हातात लागला, तर म्हणे आपण प्रदर्शन भरवू या. आता काय म्हणत होते की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या फोटोग्राफीचं वर्कशॉप घ्यायला. बाकी तू येशील असं वाटलं नव्हतं.''
''हं... कधीकधी आपल्याला वाटत नसतं तसंच वागतात लोक.'' तो जरा घुश्श्यातच म्हणाला.
''हं, तेही खरंच. चल, जरा फिरून येऊ.''
तो पप्पांसोबत फिरायला निघाला आणि बोलता बोलता दोघं त्यांच्या खोलीजवळ आले. ''ये. ही माझी खोली. सवय झालीये आता एकटं राहायची.''
''एकटं राहण्याबद्दल तुम्ही मला नका सांगू पप्पा. तुम्ही गेल्यापासून आम्ही एकटंच राहतोय.''
''हं.. मी परत आलो नाही हे खरंच. फोटोग्राफी माझं जगणं झालं होतं. ती असाइनमेंट म्हणजे एक खूप मोठी संधी होती. हातातली नोकरी, तुम्ही दोघं, सगळं सोडून मी गेलो.''
त्यांना मध्येच तोडत तो म्हणाला, ''हो, तू गेलास. 'तुझ्या' पॅशनसाठी. पण त्या अनुभवाने मम्मी इतकी कडवट झाली की मला माझं गिटार, म्युझिक सारं काही सोडून द्यावं लागलं. केवळ तुझ्यामुळे. बरं, गेलास ते गेलास आणि परत आलास तर तेसुध्दा एक अयशस्वी फोटोग्राफर म्हणून?''
''अच्छा, म्हणजे मी यशस्वी झालो असतो, तर माझ्या नावाचा उपयोग करून मी तुला एक गिटारिस्ट म्हणून 'सेटल' केलं असतं, असं होय?''
''होय. इतके वर्षं तुझं नाव लावल्याचा काहीतरी फायदा झाला असता.''
''हं, खरंय. ना मी एक चांगला बाप झालो, ना एक चांगला फोटोग्राफर.''
पप्पाला मध्येच तोडत तो पुन्हा म्हणाला, ''तुझ्या या अशा बेजबाबदार वागण्यामुळे मलाही गिटारिस्ट नाही होता आलं. मी गिटार सोडलं, नोकरी करतोय. दर महिन्याला या वृध्दाश्रमाचे पैसे भरतोय आणि तू मात्र तुला आयुष्यभरासाठी फेल करणारी फोटोग्राफी अजूनही सोडत नाहीयेस. तुला काहीच कसं वाटत नाही रे पप्पा?''
इतका वेळ आपल्या पोराच्या डोळयाला डोळा न देणाऱ्या पप्पाने वर पाहिलं, नजर रोखली आणि म्हणाला, ''माझ्या नावाखाली स्वत:चा पळपुटेपणा लपवू नकोस. माझ्यामुळे कदाचित एकदा तुझ्यापासून गिटार दुरावलं असेल, पण निर्णायक क्षणी तू स्वत: तरी असं कितीदा त्याला स्वीकारलंयस?''
पप्पाच्या त्या वाक्याने त्याला आठवलं, कॉलेजच्या लास्ट इयरला असताना म्युझिक बँड बनवण्याची हाताने घालवलेली संधी, नंतर नोकरी लागल्यावर कमी झालेली प्रॅक्टिस, काहीतरी वेगळं करायचंय असं ऑॅफिसमध्ये म्हणायचं आणि वेळ आली की 'म्युझिक गिग' सोडून ओव्हरटाइम करायचा. पप्पाला दोष देता देता त्याची पॅशन वयाच्या पंचविशी-तिशीतच मरू लागली होती. बराच वेळ तो शांत राहिला.
पप्पा त्याला म्हणाला, ''फार विचार करू नकोस. मी पॅशनेट म्हणून मरेन आणि तू असाच जगत राहिलास, तर प्रॅक्टिकल म्हणून मरशील. तोवर तुला जसा वेळ मिळेल तसा इथे येत राहा.''
पप्पा अंथरुणातून उठला. त्याने सहज हात पुढे केला. त्याचा हात धरून पप्पा कपाटाजवळ आला. त्याने कपाट उघडलं आणि आत ठेवलेलं नवं कोरं गिटार त्याला दिलं, म्हणाला, ''हे घे. मला माहीत होतं तू आज येशील. लगेच सगळं सोडून गिटारिस्ट हो असं नाही म्हणणार मी. तितपत प्रॅक्टिकल मीसुध्दा झालोय आता. पण वाजवत राहा. सोडू नकोस.''
आताशा दर पंधरा दिवसांनी तो वृध्दाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुध्दा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मारतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतकी वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या इच्छांचा उत्सव साजरा करतात.
9773249697