गोव्यात गणेश चतुर्थीला 'चवथ' म्हणतात. गोव्याचा गणेशोत्सव सार्वजनिक नसतो, तर कोकणातल्यासारखा घरगुती जिव्हाळयाचा असतो. प्रत्येक कुटुंबात एकच गणपती बसतो, तोही त्या त्या कुटुंबाच्या मूळ गावातल्या पिढीजात घरात. गणेश चतुर्थीच्या त्या तीन दिवसांत मग एरवी घरापासून दूर राहत असलेले त्या कुटुंबातले तीन-चार पिढयांचे प्रतिनिधी मूळ गावच्या ओढीने गावी जातात. सगळी चुलत चुलत भावंडं वर्षातून एकदा तरी एकत्र भेटतात, बालपणीच्या आठवणींमध्ये घटकाभर रंगतात. नव्या पिढीतल्या मुलांना आपला गोतावळा निदान दिसतो तरी. कुठेतरी मनात गावच्या मातीची ओढ निर्माण होते.
गोव्यात गणेश चतुर्थीला 'चवथ' म्हणतात. गोव्याचा गणेशोत्सव सार्वजनिक नसतो, तर कोकणातल्यासारखा घरगुती जिव्हाळयाचा असतो. प्रत्येक कुटुंबात एकच गणपती बसतो, तोही त्या त्या कुटुंबाच्या मूळ गावातल्या पिढीजात घरात.
गणेश चतुर्थीच्या त्या तीन दिवसांत मग एरवी घरापासून दूर राहत असलेले त्या कुटुंबातले तीन-चार पिढयांचे प्रतिनिधी मूळ गावच्या ओढीने गावी जातात. सगळी चुलत चुलत भावंडं वर्षातून एकदा तरी एकत्र भेटतात, बालपणीच्या आठवणींमध्ये घटकाभर रंगतात. नव्या पिढीतल्या मुलांना आपला गोतावळा निदान दिसतो तरी. कुठेतरी मनात गावच्या मातीची ओढ निर्माण होते.
चवथ हा शब्द नुसता उच्चारला तरी माझ्या मनात अनेक आठवणींची गर्दी होते. एखाद्या प्राथमिक शाळेची मधली सुट्टी झाली की लहान मुलं शाळेच्या आवारात कशी घोळक्या-घोळक्याने दिसतात, हसतात, खिदळतात, एकमेकांना ढकलून पुढे येतात, तशा ह्या आठवणी. चवथ दहा दिवसांवर आली की आजोबा चौकीच्या एका कोपऱ्यात नीट झाकून ठेवलेला भलाभक्कम शिसवी देव्हारा उघडायचे, स्वत: सगळी कोळिष्टकं झाडून काढायचे आणि एका वाटीत खोबरेल तेल घेऊन जुन्या चिंधीने तो पूर्ण देव्हारा मन लावून पुसायचे. तेलपाणी केलं की देव्हारा कसा काळा कुळकुळीत व्हायचा, नुकतीच आंघोळ घालून तीट लावलेल्या बाळासारखा ताजातवाना दिसायचा.
चवथीच्या एक-दोन दिवस आधी मग भिकरू यायचा, आपल्याबरोबर आणखी एक-दोघे मजबूत गडी घेऊन. तिघेही मग तो देव्हारा उचलून देव पुजायच्या ठिकाणी नेऊन ठेवायचे. तो एवढा जड देव्हारा नेताना त्यांच्या दंडातल्या बेडक्या तटतटून फुगायच्या. मग सुरू व्हायची सजावट. साधीच असायची. बाजारातून रंगीबेरंगी कागद आणून ते टेबलाला चिकटवायचे. त्याला बेगडीची किनार करायची. नवीन गौरणा आणून ती फोटो फ्रेमला चिकटवायची. त्यातूनही गौरी डावीकडे की महादेव डावीकडे, हा वाद व्हायचाच दर वर्षी. मग कुणीतरी वडील माणूस आपल्या अधिकाराखाली हा दावा निकालात काढायचे. गौरी-महादेवाचे चेहरे वर्षानुवर्षं तसेच. देवांसारखे वाटायचेच नाहीत. घरातल्याच कुणा देखण्या, प्रेमळ काकांसारखा दिसायचा महादेव आणि गौरीत तर आईचा, आजीचाच चेहेरा दिसायचा.
हरताळकेच्या दिवशी घरातल्या बायकांचा उपास असायचा. त्यासाठी आजोबा मग मुद्दाम पाडेली बोलावून माडावरची कोवळी आडसरे पाडवून घ्यायचे. देवीपुढे ठेवायच्या सौभाग्यवाणांसाठी तरणे नारळ पाडले जायचे. देवीपुढे मूठ-मूठभर तांदळाचे ढीग आणि त्यावर ठेवलेला एक-एक नारळ. नारळावर एकेक निरांजन. आरतीच्या वेळेला ती सगळी निरांजनं पेटवली जायची आणि देवीचा शांत, सुंदर, सोशिक चेहरा त्या मंद उजेडाने उजळून जायचा.
पूजेची तयारी करण्यात घरातली सगळीच माणसं गुंतलेली असायची. आम्ही मुली पत्री, फुलं गोळा करण्यात, मखर सजवण्यात, मुलं माटोळीचं सामान आणण्यात, जरा मोठे चुलतभाऊ, काका वगैरे मंडळी देव्हारा सजवण्यात, मागे इलेक्ट्रिकच्या दिव्यांची आरास मांडण्यात... आणि घरातल्या बायकांचं तर काही विचारूच नका. फराळ, पूजेचं सामान, नैवेद्याची जेवणं, पंगतीला बसणाऱ्या लोकांचा स्वयंपाक, नैवेद्याचं दर दिवशी नवं गोडधोड, आल्या-गेल्या पाहुण्याची सरबराई, उकडीचे मोदक, पुरणाच्या नेवऱ्या अशी अष्टावधानं सांभाळण्यात त्यांचा पूर्ण दिवस जायचा. आईच्या तर पायाचे नुसते तुकडे पडायचे.
एरवी सकाळी उठायला कायम अळंटळं करणारी मी, चवथीच्या दिवशी मात्र आईच्या पहिल्या हाकेला ताडकन उठून बसायची. पटकन आंघोळ उरकून, नवे कपडे घालून तयार होऊन बसायची, कारण गणपती आणायला जायचं असायचं. आमचे शेजारी प्रकाशभाऊ त्यांची बस पाठवायचे गणपती आणायला चित्रशाळेत. वाडयावरची बहुतेक मंडळी त्या बसमधूनच जायची. चित्रशाळेत ही गर्दी असायची. फळीवर रंगून ठेवलेल्या, मंद स्मित करत असलेल्या श्रींच्या अनेक मूर्ती, लहान-मोठया आकाराच्या, वेगवेगळया वाहनांवर आरूढ झालेल्या आणि त्यांना निरखणारे, हरखून गेलेले कितीतरी चेहरे. लहान-मोठे, पण प्रत्येकाच्या तोंडावर आनंद, आवडता पाहुणा औटघटकेसाठी का होईना, पण घरी येणार याचा ओसंडून वाहणारा आनंद.
सगळया गर्दीला ओलांडून आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आटोपशीर मूर्तीकडे जायचो. मूर्तिकाराचा माणूस फडक्याने मूर्ती साफ करून द्यायचा आणि वर निगुतीने वर्तमानपत्र बांधायचा. मूर्तीचा बंद केलेला चेहरा आता थेट घरी पोहोचल्यावरच उघडायचा. एका मोठया जीर्ण खातेवहीत वहिवाटीच्या गणपतींची नावं लिहिलेली असायची. त्या वहीत पाहून मूर्तिकार किंमत सांगायचा आणि त्याप्रमाणे पैसे देऊन आम्ही गणपती घरी आणायचो. एखाद्या लहान बाळाला कौतुकाने, काळजीपूर्वक मांडीवर बसवून आणावं तसा गणपती जपून घरी आणला जायचा. दारातच आईने पाट मांडून ठेवलेला असायचा. दोन्ही बाजूला मंद तेवणाऱ्या समया आणि आरतीचं तबक. काका हातातली मूर्ती अलगद पाटावर ठेवायचा, घराकडे तोंड करून. नवीन साडी नेसलेली आई किंवा काकी किंवा वहिनी हसतमुखाने गणपतीचं औक्षण करायची, कणकेचे गोळे मूर्तीवरून उतरून चारी दिशांना फेकायची, कुंकुममिश्रित पाणी दाखवायची आणि गणपती आत यायचा. आमच्या घरातल्या माणसासारखाच, जिव्हाळयाने.
मूर्ती देव्हाऱ्यातल्या पाटावर बसवली की कशी तृप्त, हसरी, शांत, समाधानी दिसायची! दोन्ही बाजूंना दोन समया कायम तेवत असायच्या. घरातलं कुणी न कुणी दर दोन-तीन तासांनी वात पुढे करून, काजळी बाजूला सारून, तेल बघून जायचं. रात्रीतून आजोबा किंवा पापा दोन-तीनदा उठून समईतल्या वाती नीट करून जायचे. भाऊ सकाळी सकाळी गावाबाहेरच्या तळयात जाऊन पाय चिखलाने बरबटवून घेऊन साळकं आणायचे. त्यातही गणपतीला लाल रंग प्रिय, म्हणून तांबडी साळकं आणायचा अट्टाहास असायचा. कंबरभर पाण्यात जाऊन भाऊ एकतरी तांबडं साळकं विजयी मुद्रेने घेऊन यायचाच!
पूजा करताना मग ते तांबडं साळकं गणपतीच्या मुकुटावर किंवा सोंडेत ठेवलं जायचं. पूर्ण फुललेलं ते हसरं फूल श्रीगणेशाच्या सोंडेत कसं साजून दिसायचं! पूजेचे तीन दिवस घरात एक सुंदर वास कायम दरवळत राहायचा. कापराचा तिखट वास, चंदनाचा मंद दरवळणारा वास, तुपाच्या निरांजनाचा खरपूस, किंचित जळका वास, उदबत्तीचा धुंद सुगंध आणि कितीतरी प्रकारच्या फुलांचा संमिश्र सुगंध - गुलाबाचा उग्र, जाईचा मंद, मोगऱ्याचा नाकात भरून राहणारा वास, कमळांचा जाणवेल न जाणवेल असा सूक्ष्म दरवळ... असे कितीक वास घरी पाहुणे आलेले. चवथ संपली तरी ते वास कितीतरी दिवस नाकात रेंगाळत राहायचे.
दुपारच्या पूजेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायची. माझ्या लहानपणी बाप्पी - म्हणजे माझे चुलत आजोबा पूजा करायचे. ओल्या दूर्वांची टोकं श्रीगणेशाच्या छातीला लावून मंत्र म्हणताना त्यांची स्थिर, अचल दृष्टी मूर्तीच्या डोळयांकडे लागलेली असायची. जणू ते आपलं सर्वस्व खरंच मूर्तीला अर्पण करत असावेत. मूर्ती खरंच सजीव, सगुण वाटायची मग.
पूजा झाली की आरत्या व्हायच्या. नेहमीच्या तीन तर व्हायच्याच, पण लोकाग्रहामुळे पूजा सांगणारे विनूभाऊ - आमचे शेजारी - त्यांच्या खास ठेवणीतल्या दोन आरत्या म्हणायचे. 'आरती ही तुजला गणऽराया' ही आरती म्हणताना लय एकदम द्रुत व्हायची. टाळ वाजवता वाजवता हात दंडातून भरून यायचे. आरत्या झाल्या की जेवणं व्हायची. गौरीचं नैवेद्याचं पान जेवताना फार मोठा बहुमान मिळाल्यासारखं वाटायचं. पानात गरम गरम पातोळया असायच्याच असायच्या. वरची हळदीची पानं हळुवारपणे बाजूला करताना हळदीचा वास नाकात अगदी भरून जायचा.
जेवणं झाली, मागची झाकपाक उरकली की सगळी माणसं एकतर गप्पांचे फड टाकायची किंवा पत्त्यांचे डाव. सगळे काका, चुलतभाऊ, आम्ही मुलं असे सगळे कितीतरी महिन्यांतून भेटत असायचो. साहजिकच गप्पांना उसंत नसायची. कधी राजकारणावर गरमगरम चर्चा व्हायची, तर कधी हास्यविनोदाचे इमले चढायचे. आम्ही मुलं कधी फोग लावण्यात गुंतलेलो असायचो, तर कधी मोठया माणसांच्या गप्पांत. फोग म्हणजे फटाके. फोग कसला, तर चार-दोन भुईनळे, चंद्रज्योतींचे एक-दोन बॉक्स, भुईचक्र आणि बाण. मोठे बाँब, किमती फटके वगैरे नसायचेच तेव्हा. असेल तो इवला फोग पुरवून पुरवून लावायचा.
रात्री परत पंचोपचार पूजा व्हायची, पण महानैवेद्य वाढायचा नसल्यामुळे पूजा आटोपशीर व्हायची. जेवणंही लवकर उरकायची. परत एकदा गप्पा रंगायच्या आणि उशिरा कधीतरी पेंगाळलेले डोळे घेऊन सगळे झोपायला जायचे. दिवे बंद व्हायचे. फक्त देवासमोरच्या समया अखंड तेवत असायच्या. शेजारी कुणाच्या तरी घरी आरती चाललेली असायची, तिचा अस्पष्ट आवाज कानावर यायचा. बाकी सगळं शांत झालेलं असायचं. समयांच्या मंद उजेडात श्रीगणेशाचे शांत, तृप्त डोळे आणखीनच प्रेमळ दिसायचे. सगळे झोपायला गेले की मी हळूच उठून मूर्तीपुढे उभी राहायचे. वाटायचं की ही मूर्ती नाहीच आहे, हा खरा गणपती आहे आणि तो आत्ता सोंड उघडून माझ्याशी काहीतरी बोलणार आहे. अंगावर शहारा यायचा. नमस्कार करून झोपायला गेले तरी कितीतरी वेळ माझ्या मिटल्या डोळयापुढे गणपतीचे ते रेखीव, सुंदर, शांत, आश्वासक डोळे तरळत असायचे!
vivekedit@gmail.com