पुरातत्त्वशास्त्र ही बहुआयामी विद्याशाखा आहे. त्यातील एकेका विषयाचा आयुष्यभर ध्यास घेणारे, अभ्यासविषयात शास्त्रशुध्द संशोधनाने मोलाची भर घालणारे विद्वान भारतभरात, महाराष्ट्रातही आहेत. सोशल मीडियाच्या आणि अन्य माध्यमांच्या बेगडी झगमगाटापासून कोसो दूर राहून व्रतस्थपणे कार्यमग्न असलेली ही सर्वच नावं प्रात:स्मरणीय आहेत. विवेकच्या वाचकांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या हेतूने 'गाथा ऋषिमुनींची' हे सदर सुरू केलं. काही कारणाने त्यात खंड पडला, तोही थोडाथोडका नव्हे, तर तीन वर्षांचा. पुन्हा एकदा हे सदर सुरू करत आहोत, डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या मुलाखतीने. जामखेडकर सरांचा अधिकार चालत नाही अशी पुरातत्त्वशास्त्राशी संबंधित एकही शाखा नसेल.
सरांचं घर पारंपरिक गाणपत्य संप्रदायाचं आणि वडील संस्कृतातील विद्वान. आपल्या मुलानं संस्कृतचं अध्ययन करावं, त्यात तज्ज्ञता मिळवावी, अध्यापन करावं या वडिलांच्या इच्छेला जामखेडकर सरांनी मूर्तरूप तर दिलंच, एवढंच नाही, तर त्यापुढे कित्येक योजने ते चालून गेले.
पुण्यातील डेक्कन अभिमत विद्यापीठ म्हणजे पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांची काशी. त्याचे कुलपती म्हणून जामखेडकर सरांची नुकतीच निवड झाली आहे. त्यानिमित्ताने येत्या 18 सप्टेंबर रोजी त्यांचा सत्कार होत आहे. या पार्श्वभूमीवर या ज्ञानयोग्याशी संवाद साधला. व्युत्पन्नमति म्हणजे काय याचा साक्षात्कार घडवणारी ही भेट शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न...
मालेगावातील जामखेडकरांचं घराणं गाणपत्य संप्रदायाचं. त्यांच्या घरी भाद्रपदातल्या गणपतीची जी प्राणप्रतिष्ठा होते, ती घरातल्या सदस्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या गणपतीची. 110 वर्षांपूर्वी बनवलेल्या गणेशमूर्तीचा फोटो सरांच्या संग्रही आहे, त्यांच्या घराण्याची ही परंपरा किमान तितकी जुनी आहे याचा हा पुरावा. पूर्वी ही मूर्ती शेतातल्या काळया मातीपासून तयार केली जात असे. आज गावातून शहरात स्थलांतर झाल्यानंतर काळी माती मिळणं दुरापास्त झालं, तशी गणेशाची मूर्ती शाडूची बनू लागली, इतकाच काय तो फरक.
जामखेडकर सर हे जातिवंत शिक्षक आहेत, त्याची प्रचिती या मुलाखतीदरम्यान आली. त्यांनी सर्वच प्रश्नांची अतिशय सविस्तर उत्तरं दिली. गाणपत्य संप्रदाय म्हणजे काय, हे समजावण्यापासूनच मुलाखतीची सुरुवात झाली, तेही बोलण्याच्या ओघात, साध्या सोप्या प्रवाही भाषेत...
'गाणपत्य संप्रदाय हा आगम परंपरेतला आहे. आगम परंपरेत सहा संप्रदाय मानले आहेत. त्यांना षण्मतं म्हणतात. 'जे काही जग आहे, ते आद्यतत्त्व आहे. तेच निरनिराळया रूपात प्रकट होतं. ते कोणी निर्माण करत नाही.' हा आपल्याकडच्या विचारांचा पाया आहे. ते आद्यस्वरूप काही जण विष्णूच्या रूपात बघतात. काही जण शिवाच्या.
तिथेही तीन पायऱ्या/स्तर आहेत. पहिली निर्गुण निराकार. दुसरी पायरी म्हणजे जगद्उत्पत्तीच्या वेळच्या त्याच्या शक्ती. या 5 शक्ती आहेत. इच्छा, ज्ञान आणि क्रिया याबरोबरच त्याच्याकडे तिरोधान शक्ती वा आवरण शक्ती आहे. या शक्तीमुळे त्याचं मूळ स्वरूप त्याने निर्माण केलेल्या जगापासून लपवून ठेवता येतं. आणि पाचवी, प्रसाद शक्ती. म्हणजे त्याच्या इच्छेने स्वत:ला प्रकट करण्याची शक्ती. आणि ज्याला आपण शिव म्हणतो किंवा विष्णू म्हणतो, ती तिसरी पायरी आहे. ज्याचा आपण महिमा वर्णन करतो ती ही तिसरी पायरी. पहिल्या पायरीवरचं ब्रह्म हे निर्गुण, निराकार असल्याने दुसऱ्या पायरीवरच्या 5 शक्तींमुळे सगळं जग नियंत्रित केलं जातं. मात्र भक्तांसाठी तो सगुण रूप धारण करतो. काही लोक ते ब्रह्म विष्णुस्वरूप मानतात, तर काही शिवस्वरूप. काहींना ते शक्तिस्वरूप वाटतं, तर काहींना गणपतिस्वरूप. ब्रह्म सूर्यस्वरूप आहे असं मानणारेही लोक आहेत... आणि दक्षिणेकडे त्याचं कुमारस्वरूप मानलं जातं. याला शंकराचार्य षण्मतं म्हणतात. गाणपत्य संप्रदाय सुरू झाला तो या विचारांतून...
जामखेडकर सरांचे वडील पदवीधर होते, शिवाय कायद्याचाही अभ्यास केला होता. मात्र वकिली करण्याऐवजी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. संस्कृत भाषेची आवड आणि त्यात प्राप्त केलेला अधिकार हेही कारण असावं. मुलाबरोबरच सहाही मुलींना त्यांनी संस्कृत भाषेचं ज्ञान दिलं होतं. मात्र आपल्या एकुलत्या एक मुलाने संस्कृत भाषेतला विद्वान व्हावं ही त्यांची आंतरिक इच्छा. मोठया बहिणीबरोबरच जामखेडकर सरांची शाळा सुरू झाली. पहिल्या दोन वर्षांत दोन दोन इयत्तांचा अभ्यास करून तिसऱ्या वर्षी ते हायस्कुलात गेले. 15व्या वर्षी मॅट्रिक आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी संस्कृत आणि भाषाशास्त्र या विषयात इंग्लिश माध्यमातून एम.ए. झाले. स.प. महाविद्यालयातून संस्कृत आणि अर्धमागधी भाषेत इंग्लिश माध्यमातून बी.ए. ही पदवी मिळवतानाच दुसरीकडे टिळक विद्यापीठातून संस्कृतचं पारंपरिक अध्ययनही चालू होतं. व्याकरणातली मध्यमा या स्तराची परीक्षा त्यांनी दिली आणि इंग्लिशमधून एम.ए. करताना वेदांचा अभ्यास केला. ज्यांचा लौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर होता, असे संस्कृतमधले विद्वान गुरू म्हणून लाभले हा भाग्ययोग. संस्कृतचं अध्ययनच त्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाकडे घेऊन गेलं. त्याची गोष्टही ऐकण्याजोगी...
'दांडेकर सरांप्रमाणे आपणही दुसऱ्यांदा एम.ए. करावं, तेही त्यांच्याप्रमाणेच, पुणे विद्यापीठातून 'एन्शंट इंडियन कल्चर' या विषयात असं मला वाटू लागलं. मी प्रवेश घेणारच होतो, पण त्याआधी चित्रावशास्त्रींशी बोललो. कारण ते माझ्या मोठया बहिणीचे सासरे आणि माझे पुण्यातले पालक होते. त्यांचा माझ्यावर जीवही खूप होता. त्या वेळी ते डेक्कन कॉलेजमध्ये शब्दकोशाच्या कामात होते. त्यांनी काही दिवस त्यांच्याबरोबर स्थलकोशाचं काम करावं असं सुचवलं. त्यामुळे नंतरचं वर्ष-दीड वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. त्या वेळेपर्यंत मला प्राच्यविद्येत रस निर्माण झाला होता. माझं संस्कृत उत्तम असलं, तरी प्राच्यविद्येच्या अभ्यासासाठी तेवढंच पुरेसं नव्हतं. म्हणूनच मुंबई विद्यापीठातून एम.ए. करण्याची माझी इच्छा होती. मात्र चित्रावशास्त्रींच्या सांगण्यावरून मी डॉ. शां.भा. देवांकडे गेलो. पुस्तकी अभ्यास करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवच घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि नेवासा इथल्या उत्खनन मोहिमेत मला सहभागी व्हायला सांगितलं. तेच त्या मोहिमेचे प्रमुख होते. या मोहिमेत सहभागी होण्याआधी किमान प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम तरी बघावं म्हणून मी मुंबईत आलो. म्युझियम पाहून मी भारावून गेलो. तिथे मांडलेल्या अगणित वस्तू पाहताना स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्र, चित्रकला या इतक्या गोष्टी आपल्याला एम.ए.च्या अभ्यासातून कशा कळणार, अशी काळजी वाटू लागली. ती मनात ठेवूनच मी नेवासाच्या उत्खननात ट्रेनी सुपरवायझर म्हणून सहभागी झालो. चार महिने सलग ही मोहीम सुरू होती. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यावर अचानक 15-20 मानवी सांगाडे सापडले. त्यामुळे आम्हांला एका सांगाडयावर स्वतंत्रपणे काम करायची संधी मिळाली. ते काम करताना डॉ. सांकलियांनी पाहिलं. आमच्या कामाचं कौतुक केलं. मला बोलावून पुढे काय करणार, याची चौकशी केली. 'आता मी ए.आय.सी.मध्ये एम.ए.करणार आहे. त्यानंतर आर्किऑलॉजीत पीएच.डी. करीन' असं सांगितलं. त्यावर सांकलियांनी सल्ला दिला की, 'एम.ए.पर्यंत जर तू सब्सिडिअरी लँग्वेज म्हणून अर्धमागधी भाषेचा अभ्यास केला आहेस, तर जैन धर्माशी संबंधित विषयावर पीएच.डी करावी.' त्यामुळे मी 'वसुदेवहिंडी : एक सांस्कृतिक अध्ययन' हा विषय पीएच.डी.साठी निवडला. त्यासाठी मार्गदर्शन लाभलं ते डॉ. शां.भा. देवांचं...
पीएच.डी.चा अभ्यास करताना एकीकडे मी उत्खननाच्या कामातही व्यग्र होतो. त्यामुळे पीएच.डी. मिळाल्याचंही माझ्याआधी घरच्यांना कळलं. वडिलांना खूपच आनंद झाला. त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. अर्धमागधीच्या झालेल्या अभ्यासामुळे मला प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. अर्धमागधी ही जैनांची भाषा. त्या वेळी धुळयात, 'संस्कृत नको, अर्धमागधी हवी' यासाठी एक चळवळ उभारली गेली होती. डॉ. वैद्य म्हणून शिवाजी विद्यापीठ संस्थेत प्रिन्सिपॉल होते. तेच अर्धमागधी शिकवत असत. मात्र रजिस्ट्रार म्हणून त्यांची नेमणूक झाल्याने ते कॉलेज सोडून गेले आणि मी त्यांच्या जागी अर्धमागधीचा साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झालो. धुळयासारख्या ठिकाणी या विषयासाठी एम.ए.पर्यंतचे 750 विद्यार्थी होते. त्यामुळे तिथल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात माझं कसून प्रशिक्षण झालं.'
जामखेडकर सर या प्राध्यापकीत रमलेले होते, तरी मनात प्राच्यविद्येची ओढ जागी होती. डॉ. शां.भा. देवांसारख्या गुरूच्या सान्निध्यात तिला खतपाणीही मिळालं होतं. त्यामुळे तशी संधी चालून आल्यावर धुळयातल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि नागपूर विद्यापीठात डॉ. शां.भा. देवांनी नव्याने सुरू केलेल्या प्राच्यविद्या विभागात ते अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. इथल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या उत्खनन मोहिमांमध्ये सहभागी होऊन त्यावरच्या अहवाल लेखनातही त्यांनी योगदान दिलं. मांढळ इथे झालेली पुरातत्त्वीय उत्खननाची मोहीम ही त्यातलीच एक.
दरम्यानच्या काळात 1971-72 साली त्यांना नेदरलँड सरकारची 'रेसिप्रोकल फेलोशिप' मिळाली. त्या वेळी त्यांनी आग्नेय आशियाच्या संस्कृतीवर काम केलं. संस्कृत, अर्धमागधी, भाषाशास्त्र, कोशशास्त्र, पुरातत्त्व या प्रवासाला या फेलोशिपमुळे कला आणि कलेतिहास अशी नवी दिशा लाभली. या काळात युरोपातील अनेक वस्तुसंग्रहालयांना आणि कला वस्तुसंग्रहांना दिलेल्या भेटींनी वस्तुसंग्रहालयशास्त्रातलं त्यांचं अनौपचारिक शिक्षणही झालं. या भेटींनी त्यांच्या मन:पटलावर अमीट ठसा उमटवला. त्याचा प्रत्यय आजही त्यांच्या बोलण्यातून येतो. जगभरातल्या विख्यात वस्तुसंग्रहालयाची ते एक सफरच घडवून आणतात.
'मी हॉलंडला जेव्हा फेलोशिपवर गेलो, तेव्हा मला एक पास होता. त्या आधारावर मी कुठल्याही म्युझियमला भेट देऊ शकत असे. त्यामुळे तिथले सगळे शनिवार/रविवार कारणी लागले. या भेटींमधली एक भेट म्हणजे ट्रॉपिकल म्युझियमला दिलेली भेट. डच लोकांचंही उष्णकटिबंधातल्या एका देशावर राज्य होतं. उष्णकटिबंधीय देशांची वैशिष्टय सांगणारं म्युझियम. प्रत्येक उष्णकटिबंधीय देशातली शेती करण्याची पध्दत, तिथली कालवे काढण्याची पध्दत अशी इत्थंभूत माहिती तिथे मांडली होती. इतकंच नव्हे तर या देशांमधलं संगीतही तिथं वाजवलं जात असे. त्या त्या देशातली शास्त्रीय नृत्यंही दाखवली जातात.
पॅरिसमधली म्युझियम बघण्यासाठी मी दहा दिवस गेलो होतो. तिथल्या मित्राने म्हटलं - इथे 150 म्युझियम्स आहेत. 10 दिवसात तू काय बघणारेस?
तिथे एका म्युझियममध्ये सगळा डिस्प्ले जिन्याच्या बाजूने केलेला होता. जिना चालता चालता तुम्ही म्युझियम बघता. प्रत्येक शतकासाठी एकेक जिना अशी मांडणी केली होती.
एक वस्तुसंग्रहालय तर फक्त 'एशियन ऍंटिक्विटीज'वर होतं. संबंधित विषयातलं सखोल ज्ञान असलेले तज्ज्ञ तिथे प्रमुख म्हणून नेमलेले असतात. या म्युझियमच्या प्रमुख जागतिक कीर्तीच्या इंडोलॉजिस्ट होत्या. त्यांचं 'लाईफ इन एन्शंट इंडिया' हे 300 पानांचं पुस्तक पेंग्विनने प्रकाशित केलं आहे.
लूव्र हा तर अडीच चौकाचा राजवाडा आहे. तिथली शिल्पं बघत मी एक पूर्ण दिवस चालत होतो.
हॉस्टेल ऑफ द इनव्हॅलिड सोल्जर्स इथे नेपोलियनचं म्युझियम आहे. नेपोलियनच्या व्यक्तिगत खोलीत त्याचा कॅम्पकॉट, त्याची मच्छरदाणी, त्याचे केस ठेवलेले आहेत. नेपोलियनची कॉफीन जिथे आहे, तिथे संगमरवरात त्याच्या आयुष्यातले मुख्य दहा प्रसंग कोरले आहेत. त्याच्या मध्यभागी एक स्तंभ आहे, त्यावर कॉफीन ठेवली आहे. जगात जे जगज्जेते म्हणून गणले जातात त्यांच्या मुख्य लढायांचं तिथे चित्रण केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रीकांच्या महत्त्वाच्या 10-15 लढायांचं माहितीपूर्ण चित्रण तिथे केलेलं आहे.
म्युझियमबद्दल सरांच्या मनात निर्माण झालेली आवड नंतरच्या काळातही टिकली, वाढली. त्यांच्यातल्या पुरातत्त्व संशोधकाला समृध्द करत राहिली. ज्या ज्या वेळी ते परदेशात गेले, तेव्हा पाहण्याजोग्या स्थळांच्या यादीत मानाचं स्थान म्युझियमचंच राहिलं.
'एकाहून एक सरस म्युझियम पाश्चात्त्य देशांत उभी राहिली आहेत, याला कारण त्यांचा दृष्टीकोन आणि जुन्या वस्तूंचं त्यांना उमजलेलं मोल. म्हणूनच ते इतक्या काळजीपूर्वक जपणूक करतात. त्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च करतात.
16व्या शतकात खाजगी संग्रहांपासून याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यात कसे बदल होत गेले, संग्रह करताना वैज्ञानिक दृष्टीकोन कसा विकसित झाला हे पाहताना समजतं. म्युझियम किंवा हेरिटेज म्हणजे इतिहासाचं तत्त्वज्ञान आहे. तुम्हाला इतिहास कळला पाहिजे, त्या वेळी झालेल्या चुका कळल्या पाहिजेत त्यासाठी म्युझियम असतात. तुम्हाला असलेला वारसा सांगण्याचं काम म्युझियम करतात.
वसाहतवादाचा कालखंड हा वेदनादायी कालखंड आहे. पण तो इतिहास नाकारता येत नाही. त्याचं म्हणून मूल्य आहेच, हे जाणून हा सगळा कालखंड त्यांनी ब्रिटनमध्ये आर्किऑलॉजीच्या माध्यमातून मांडून ठेवला आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या बरीच आहे. त्या लोकांना आणि इंग्लिश लोकांनाही त्यांचा इतिहास कळायला हवा, हा दृष्टिकोन आहे. तटस्थ वृत्तीने कालखंड समजून घ्यावा हा विचार त्यामागे आहे.'
या जिव्हाळयाच्या विषयावर बोलताना साहजिकच गाडी आपल्याकडचे म्युझियम, त्यांची अवस्था, त्यांची निगराणी याकडे वळते. त्या संदर्भात जामखेडकर सरांच्या मनात असलेली अस्वस्थता जाणवल्यावाचून राहत नाही.
'मी काही म्युझिऑलॉजीचा विद्यार्थी नव्हतो. पण जगभरातली चांगली म्युझियम्स बघितल्यानंतर माझी दृष्टी विकसित झाली.
प्रत्येक म्युझियमचं कौतुक तिथे असलेल्या वैविध्यपूर्ण वस्तूंचं प्रमाण किती आहे त्यावर ठरतं. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये 40-45 हजार वस्तू आहेत. नागपूरच्या म्युझियममध्ये 32 हजार वस्तू आहेत. तर तेर या एका खेडयातल्या म्युझियममध्ये 26 हजार वस्तू आहेत. एका ठिकाणी मिळालेलं इतकं मोठं भांडार महाराष्ट्रात कुठेही नसेल.
आपल्याकडे उत्तरेत टेराकोटाच्या वस्तू मुबलक आहेत. पण त्या ठेवायला जागा नाही, या कारणास्तव त्या 100-200 पोत्यांत बांधून ठेवल्या आहेत. ही आपली आस्था. दिल्लीच्या नॅशनल म्युझियमचीही दुरवस्था आहे, तर बाकीच्यांची काय कथा? दीर्घकाळ म्युझियमच्या डायरेक्टरपदी योग्य व्यक्ती नेमत नाहीत. तिथे एखादा आय.ए.एस. ऑफिसर नेमून कसं चालेलं? त्यातली जाणकार, तज्ज्ञ, या अभ्यासाची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती असायला हवी हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे आपलं दुर्दैव आहे, म्युझियमसंदर्भात आपल्या केंद्र सरकारची पॉलिसी नाही. आपल्या उदासीन वृत्तीचा याहून वेगळा पुरावा तो काय?
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी या म्युझियम पॉलिसीसंदर्भात विचार करण्यासाठी एक नॅशनल कॉन्फरन्स बोलावली. त्या वेळी मी राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याचा संचालक होतो. त्या कॉन्फरन्सचं मला निमंत्रण होतं. तीन दिवस चाललेल्या त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही पॉलिसी कशी असावी यावर बराच खल केला. त्याचा लेखी अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपुर्द केला. त्याचं पुढे काय झालं ते कधीच कळलं नाही.
जामखेडकर सर सुमारे 20 वर्षं राज्याच्या पुरातत्त्व विभागाच्या संचालकपदी होते. त्या काळात त्यांनी स्वतंत्रपणे आणि त्याआधी नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, औरंगाबाद विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांबरोबर अनेक पुरातत्त्वीय उत्खननं हाती घेतली. तोवरच्या इतिहासाच्या मांडणीत काही राहून गेलेले दुवे यापैकी काही उत्खनन मोहिमांमध्ये हाती लागले. मांढळ आणि नागरा इथे झालेल्या मोहिमांचं मोल तर अनन्यसाधारण आहे.
'वाकाटकांच्या दोन पात्या. एक नागपूरकडची नंदीवर्धन आणि दुसरी वऱ्हाडकडली वाशिमची वत्सगुल्म. वत्सगुल्म या शाखेने अजिंठयाला आश्रय दिला होता. तोवर नंदीवर्धनबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. फक्त एक देऊळ आणि काही मूर्ती, एवढंच माहीत होतं. मी विदर्भात 20 वर्षं वाकाटकांवर काम केलं. 4-5 महत्त्वाची उत्खननं केली. मांढळ, नागरा त्यापैकीच. उत्खननात विटांची देवळं सापडली. नागऱ्याला एका देवळाचं जोतं सापडलं. त्याचा आकार होता 27 मीटर # 42 मीटर एवढा प्रचंड. त्यावर विटांचं देऊळ बांधलेलं होतं. ते आम्ही शोधून काढलं.
त्यानंतर अगदी नक्षलाईट भागात विवेकानंदपूर इथे उत्खनन केलं. लोकांनी आम्हाला न जाण्याचाही सल्ला दिला. पण तिथे इतक्या सुंदर गोष्टी सापडत होत्या की या धोक्याच्या सूचनांचा आमच्यावर काही परिणाम झाला नाही. वाकाटकांच्या काळात नागरीकरणाची प्रक्रिया इतकी वेगात होती की आज लक्कामेटा-पांडवांचं लाक्षागृह तिथे असलं पाहिजे, अशी तिथल्या लोकांची धारणा आहे; म्हणून जे ठिकाण आहे तिथे आजही 200 किलोमीटर चालत येऊन आदिवासी पाच पांडव आणि द्रौपदी यांची पूजा करतात. मला माझ्या सहकाऱ्याने या ठिकाणाची माहिती दिली. त्या भागात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊनच जाता येत असे. आम्ही पोलिसांना बरोबर न घेता आत जायचं ठरवलं. कारण पोलीस बरोबर आले असते, तर नक्षलवादी बिथरायची शक्यता होती. आम्ही चंद्रपूरमध्ये फॉरेस्ट ऑफिसरच्या घरापर्यंत जीपने गेलो. त्यानंतर पुढे 6 किलोमीटरवर वाकाटकांची साइट होती. जिथे आज वाहनाने जाता येत नाही, अशा ठिकाणी त्या काळात वाकाटकांनी पक्क्या विटांची देवळं बांधली होती. यावरून त्यांच्या समृध्दीची कल्पना येते. आमच्या या उत्खनन मोहिमांनी वाकाटकांचा इतिहास बदलायला मदत झाली.
कालिदासाचा रामगिरी हा पर्वत कुठला, याचा शोध चालू होता. काहींच्या मते तो नाशिकला असला पाहिजे, किंवा छत्तीसगडचा रामदुर्ग असला पाहिजे. नागपूरजवळचं रामटेक हेच रामगिरी असलं पाहिजे असं मिराशींचं म्हणणं होतं. कारण त्या ठिकाणी वाकाटक राज्य करत होते. वाकाटकांची एक सून गुप्त घराण्यातली होती. आणि कालिदास हा चंद्रगुप्ताने आपल्या नातवांना संस्कृत शिकवण्यासाठी म्हणून पाठवलेला होता. प्रवरसेनाने महाराष्ट्रीमध्ये काव्य केलेलं आहे. त्याविषयी टीकाकारही असं म्हणतात की, कालिदासाने येऊन त्याला शिकवलं. त्याच्यावर संस्कार केले. त्रिविक्रमाचं वाकाटककालीन मंदिर आहे.
पुरातत्त्व खात्याने 1862 साली जे सर्वेक्षण केलं, त्यात असं म्हटलंय की ही मंदिरं भोसलेकालीन आहेत. हे भोसले रामभक्त, शिवाजीचं घराणं शिवभक्तांचं. तिकडे जातान जबलपूरवरून जायचं. त्यांचा पहिला पाडाव तिथे पडला होता. रामटेकला मोठं तळं आहे. तिथे त्यांनी नवस केला, या मोहिमेत मी यशस्वी झालो तर इथली सगळी देवळं दुरुस्त करीन. ती त्यांनी इतकी दुरुस्त केली की त्यातली वाकाटकांच्या काळातली सहा देवळं ओळखू येईनाशी झाली. मी जेव्हा सांगितलं की ही वाकाटकांची देवळं आहेत, तेव्हा सुरुवातीला या विषयातल्या तज्ज्ञांनी यावर विश्वास ठेवला नाही. पण नंतर त्यांना पटलं.
मांढळ इथे केलेलं उत्खनन, माझ्या मते सगळयात महत्त्वाचं उत्खनन होतं. वाकाटक घराण्याची - नंदीवर्धनाची जी शाखा होती, तिच्या कारकिर्दीवर या उत्खननामुळे प्रकाश पडायला मदत झाली. त्याने इतिहासाची दिशा बदलली. गुप्त कला आणि अजिंठा यामधला तो दुवा आहे हे लक्षात आलं.
नंदीवर्धनाची ही शाखा म्हणजे कला आणि स्थापत्य यातलं वेगळेपण जपणारी शाखा होती. अर्थात या मोहिमांचं, त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांचं श्रेय कुणा एकटया व्यक्तीचं नसतं. ते सगळया टीमचं असतं.
त्यानंतर वाशिमला इथं केलेल्या उत्खननात वाकाटककालीन दगडी आणि विटांची मंदिरं आम्ही शोधून काढली. तिथे शिलालेखही मिळाला.'
सगळया कामाच्या व्यापातही सरांच्या संशोधन मोहिमा जशा चालू होत्या, तसं त्यावरचं लेखनही एकीकडे चालू होतं. आतापर्यंत शंभरच्या जवळपास लेख प्रकाशित झाले असून त्यात संशोधनात्मक आणि ललित अशा अंगांनी केलेल्या लेखनाचा समावेश आहे. त्यांच्या उल्लेखनीय ग्रंथांमध्ये ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या प्रकाशनाने प्रसिध्द केलेला 'अजिंठा' (2009) तसेच महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभागाने प्रकाशित केलेला 'महाराष्ट्र - प्राचीन काळ, भाग 1 खंड 2, महाराष्ट्र स्थापत्य आणि कला' हे ग्रंथ आहेत. त्यामुळे बोलण्याच्या ओघात स्थापत्यकलेचा विषय येणं अपरिहार्य होतं.
'कोणतंही स्थापत्य हे गरजेतून निर्माण होतं. तुमच्या काही आदर्शवत कल्पना असतात. आपल्या देवळाविषयीच्या आणि देवाविषयीच्या संकल्पनांमध्ये जो विकास होत गेला, तो स्थापत्यकलेत प्रतिबिंबित झालेला दिसतो. पहिल्यांदा माणसाचा देव साधा होता, त्यामुळे त्याचं प्रतिमागृह किंवा देवगृह असे. नंतर त्याचा प्रासाद झाला. कारण राजा हा देवांचा प्रतिनिधी म्हणून समजला जाऊ लागला. राजा जर राजवाडयात राहत असेल, तर देवांनी साध्या घरात कसं राहायचं? म्हणून देवाला राजवाडयाचं स्वरूप आलं. देवदासी संस्कृती ही त्या विचारातूनच आली आहे. राजाचं मनोरंजन करण्यासाठी जशा गणिका, नृत्यांगना असतात, त्याप्रमाणे देवालाही असायला हव्यात हा विचार देवदासी परंपरेमागे दिसतो. राजवाडयाचे जसे दिवाण-इ-आम, दिवाण-इ-खास, तसे देवालयाचेही भाग असतात. म्हणूनच देवळात अंत:पुरम आणि बाह्य अभिस्थानमंडप असतं. बाहेर आम भक्तांना, तर आतल्या भागात धर्मगुरू, राजा आणि काही महत्त्वाचे लोक यांना प्रवेश असतो. राजासाठी जसे पहारेकरी असतात, तसे देवळाच्या बाहेरही शस्त्रधारी पहारेकरी असतात. आपली पूजापध्दतीही त्याप्रमाणे बदलत गेली आहे. षोडशोपचार पूजा हे त्याचं उदाहरण आहे.
सुरुवातीला आपण आपली स्थापत्यकला ग्रीकांच्या स्थापत्यविचारांनी समजून घेत होतो. कारण या विषयातल्या अभ्यासाला त्यांनी आधी सुरुवात केली. मात्र सोमपुरांनी बांधलेल्या देवळांचा जेव्हा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्याचा अर्थ उलगडायला लागला.'
भारतीय संस्कृतीतील हिंदू, बौध्द आणि जैन या तिन्ही धर्मपरंपरांचा गाढा अभ्यास आहे. यावर त्यांनी लेखनही विपुल केलं आहे. बोलताना या तीन धर्मांतल्या साम्यस्थळांविषयी त्यांनी सांगितलं....
'तिघांमधलं मूलभूत साम्य म्हणजे सगळयांचा कर्मसिध्दान्तावर असलेला विश्वास. 'जो करेल तो भरेल' हा कर्मसिध्दान्ताचा मुख्य विचार. या जन्मात मला दु:ख भोगावं लागत असेल तर त्याचं काय कारण? याचा शोध घेताना जन्म-मृत्यूचा फेरा ही संकल्पना आली. प्रत्येकाने आपलं कर्म केलं पाहिजे, या सकारात्मक विचारावर भर द्यायला हवा. ही गोष्ट या तिन्ही धर्मांमध्ये आहे. प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने त्याचा अर्थ लावला आहे.
बुध्दाने सांगितलं की, हे जग उत्पन्न करणारा कोणी नाही. जैन धर्मीय म्हणतात की, हे जग आपोआप चालतं. उत्पन्न करणारा कोणी नाही. म्हणजे ते निरीश्वरवादी आहेत. आणि ही ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातली मांडणी आहे. तिकडे युरोपात 18व्या शतकापर्यंत ईश्वर अस्तित्वात नाही म्हणणाऱ्याला जाळत होते. तेव्हा आपल्याकडची धर्मकल्पनाच वेगळी आहे. म्हणून आपल्या पध्दतीने, आपलं तत्त्वज्ञान नीट समजून घेऊन आपण पुढे जायला हवं.
इतिहासापासून काही शिकायचं असेल तर धर्मातली सकारात्मक बाजू लक्षात घेऊन पुढे जाणं हे शिकायला हवं. आपण अन्य कुठल्याही धर्माचा द्वेष करूच शकत नाही, ही गोष्ट अन्यधर्मीयांना समजू शकत नाही. 'परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, तुमचा मार्ग तुम्ही निवडलाय. तुमचा मार्ग वेगळा म्हणून तू चूक ठरत नाहीस' असं आपण मानतो. ही सहिष्णू प्रवृत्ती तिन्ही धर्मांमध्ये आहे. हातात तलवार न घेता बुध्द धर्म जपानपर्यंत गेला. आपले धर्म व्यापाऱ्यांबरोबर बाहेरच्या देशात गेले. या व्यापाऱ्यांबरोबर भिक्षू गेले. राजे नंतर गेले. आग्नेय आशियामध्ये कुठल्याही राजाने जाऊन तिथली राज्य जिंकली असा आपला इतिहास नाही. तिथपर्यंत जाण्याची ताकद होती, तरीही असं केलं नाही. चोलांची आरमारं तिथपर्यंत गेली, तरी त्यांनी असं केलं नाही. का केलं नसेल? काही जण म्हणतील की तशी महत्त्वाकांक्षा नव्हती. तसंही असेल, पण एक गोष्ट सत्य आहे की आम्ही कोणाचाही धर्म कधी जबरदस्तीने बदलला नाही. उदाहरणार्थ, जपानमधला शिंटो नावाचा धर्म आहे. चीनमध्ये ताओइझमचं प्राबल्य असताना, तो आत्मसात करून बुध्द धर्म तिथे स्थिरावला.
त्याचबरोबर एक लक्षात घ्या की, प्रत्येक देशातला बुध्दिझम वेगळा आहे. त्या त्या देशातल्या परंपरांना अनुसरत बुध्द धर्म रूप घेत गेला.'
2007 ते 2013 या काळात जामखेडकर सर मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष होते. आजही या संस्थेचे पदाधिकारी म्हणून ते काम पाहतात. एशियाटिक सोसायटीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने त्यांनी एक संशोधनप्रकल्प हाती घेऊन संस्थेतील संशोधन कार्याचं पुनरुज्जीवन केलं. हस्तलिखितांच्या अध्ययनाचा संशोधन प्रकल्प हा त्यापैकीच एक. त्याविषयी बोलताना ते म्हणाले,
'हे काम खूप मोठं अाहे. गेली 8 वर्षं ते चालू आहे. सह्याद्री खंड म्हणून कोकण प्रांतावर जो स्कंदपुराणाचा भाग आहे, त्यातली निरनिराळया प्रकारची तीर्थक्षेत्रं, त्याचा धार्मिक इतिहास यातून उलगडला जाणार आहे. ही सगळी पुराणं 13व्या शतकातली आहेत. सल्तनतींचा अस्त आणि पोर्तुगीजांचं आक्रमण यातला तो संधिकाल आहे. धार्मिकदृष्टया सत्त्वपरीक्षेचं वातावरण होतं. त्या वेळी या पुराणकर्त्यांनी काय केलं? त्या काळात नवीन मिथकं निर्माण झाली. दक्षिण काशीची संकल्पना का आली? कारण काशीला जाताच येत नव्हतं. उत्तरेकडच्या सगळया बुध्दमूर्ती आक्रमकांनी तोडून टाकल्या, म्हणून त्यांनी स्वयंभू पुराण निर्माण केलं. पेथड या जैन व्यापाऱ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात 82 देवालयं बांधली. ही जी 13व्या शतकातली उलथापालथ आहे, त्याचा सांस्कृतिक अभ्यास या हस्तलिखितांच्या संशोधनाच्या माध्यमातून करायचा आमचा विचार आहे. आणखी एखाद्या वर्षात ते पूर्ण होईल. '
प्राचीन भारतीय संस्कृती या विषयातला जामखेडकर सरांचा अधिकार वादातीत आहे. नागरीकरण हा या प्रवासाचा एक अटळ टप्पा. आज मात्र नागरीकरणाला-शहरीकरणाला नावं ठेवायची आपल्याकडे प्रथा आहे. 'खेडयाकडे चला' असं केलं जाणारं आवाहन हे त्यातूनच येतं. असं शक्य आहे का? संस्कृतीचा प्रवास पुन्हा उलट दिशेने होऊ शकतो का? या शंकेचं सरांनी निरसन केलं.
'भारताचा सगळा इतिहासच नागरीकरणाचा आहे. आजही आपल्याकडे आदिवासी जमाती आहेत. म्हणजे नागरीकरणाची प्रक्रिया अजूनही आपल्याकडे चालूच आहे. युरोपमध्ये ही प्रक्रिया थांबली आहे. तिथे खरं खेडं आता दिसत नाही. सगळीकडे विज्ञानयुगातल्या सगळया सुखसोयी पोहोचलेल्या आहेत. नागरीकरण हे स्वाभाविक आहे. तो माणसाने निवडलेला मार्ग आहे. जे संन्यासी आहेत वा विरक्त वृत्तीचे आहेत, त्यांनी नागरीकरणाची जरुरी नाही असं म्हणावं. मात्र माणसाने जेव्हा ठरवलं की अन्नाच्या शोधात न राहता अन्न पिकवायचं, तो नागरीकरणाचा पहिला टप्पा होता. त्यातून आधी खेडी निर्माण झाली.
सगळयात पहिल्यांदा नागरीकरणाची प्रक्रिया मोठया नद्यांच्या काठाने नाही, तर वाळवंटात झाली. कारण तिथे माणसाचं आयुष्य तुलनेनं अस्थिर, असुरक्षित असतं. पुढल्या वर्षी कुठली तृणधान्य येतील याची वाळवंटी प्रदेशात शाश्वती नसते. तृणधान्यं ठरवून का पिकवू लागलो? कारण कमी पावसात ती होऊ शकत होती म्हणून. आफ्रिकेतनागरीकरण झालंच नाही. कारण तिथे निसर्ग इतकं भरभरून देत असतो की तुम्हांला उद्या काय खायचं हा प्रश्न पडत नाही.
माझ्या मते नगराची सोपी व्याख्या म्हणजे जिथे शेती होत नाही असं ठिकाण. दुसरी गोष्ट तुमचा शेजारी तुमचा नातेवाईक नसतो. आपल्याकडे एका खेडयाचं नाव आहे लोणी काळभोर. लोणी या नावाची आणखी 25 खेडी असतील, तिथे पूर्वी लवण विकलं जात असेल किंवा लोणी विकलं जात असेल. त्यावरून हे नाव पडलं असावं. काळभोर या आडनावाचे सगळे लोक तिथे राहतात म्हणून त्या गावाचं नाव लोणी काळभोर. नागरीकरणाच्या आदिम टप्प्यावर खेडयात राहणारे सगळे लोक एकमेकांचे नातेवाईकच असतात. त्यामुळे तिथले कायदेकानून वेगळे असत.
राजा कशासाठी असतो? तर पिकणाऱ्या धान्याचं न्याय्य वाटप व्हावं यासाठी. जेव्हा राजाची धान्याची कोठारं भरून वाहायला लागली, तेव्हा त्याचा हिशोब ठेवण्यासाठी लिपी आली. आपण शिकण्यासाठी लिपी आली नाही. मोडी लिपीसंदर्भातली माझी व्युत्पत्ती अशी की, मोडी ही गुजरातमधले जे मोढ लोक आहेत त्यांनी आणलेली लिपी आहे. मोडी आणि गुजराती या लिप्यांमध्ये फार जवळचं साम्य आहे. व्यापारासाठी आणि हिशेब ठेवण्यासाठी लिपी आहे. आपण कुळदैवत म्हणतो, हे कुळदैवत म्हणजे ज्या खेडयात तुम्ही राहता त्या खेडयाचंच ते दैवत असतं. ती खरं तर ग्रामदेवता असते. शहरात आल्यावर कुळदैवत वेगळं होतं. त्या नगराची देवता हे कुळदैवत होतं... तसं व्हायला हवं.
राजा हा देवाचा प्रतिनिधी मानला गेला आहे. कारण तो व्यवस्थित रितीने पीकपाणी होईल की नाही याची काळजी घेतो. त्याला खगोलशास्त्राची माहिती असते. पाऊसपाण्याचा अंदाज बांधता येतो. प्रजेच्या रक्षणासाठी त्याला धनधान्याच्या रूपात कर मिळतो. ते धनधान्य तो पुन्हा लोकांमध्ये वितरित करतो.
नागरी आणि लष्करी प्रशासनाची गरज हीदेखील व्यापार उत्तम चालण्यासाठी असते. त्यातूनच नगर तयार होतं. तेव्हा नागरीकरण होणं हे नैसर्गिकच आहे.
नगरासंदर्भातला दुसरा एक भाग लक्षात घ्या. मुंबईसारख्या महानगरात महाराष्ट्राची एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. याचा अर्थ काय? अन्नाच्या शोधात माणूस जेव्हा भटकत होता, तेव्हा वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी, अन्नधान्याची बेगमी करण्यासाठी त्याला घर म्हणून जास्त जागा लागायची. नागरीकरण होताना राहत्या जागेचं आकारमान कमी होतं. कारण वेगवेगळया वस्तूंसाठी परस्परावलंबन वाढतं. त्यातूनच व्यापार वाढतो आणि व्यक्तिगत साठवण करण्याची गरज कमी होते. कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी रिसोर्सेस वापरून जगणं ही माणसाने निवडलेली जीवनपध्दती आहे.
मात्र नागरीकरणामागचं तत्त्वज्ञान लक्षात न घेता, नियोजनाचा फारसा विचार न करता आपल्याकडे नागरीकरण होतं. त्यातून एका ठिकाणी माणसांची गर्दी होते. मुंबईत गर्दी झाली म्हणून नवी मुंबई निर्माण केली, तिथेही गर्दी झाली म्हणून आता आपण नव्या महानगराच्या उभारणीत आहोत. तत्त्व समजून न घेता कृती करत राहिलो तर समस्या संपणार नाहीत, हे अजूनही लक्षात घेतलं जात नाही.
पुरातत्त्व शाखा ही अनेक शाखांचं मूळ. इतिहासाची शास्त्रशुध्द संगती लावण्याचं काम हिच्या आधाराने केलं जातं. मात्र आजही या विषयाबद्दल सर्वसामान्यांना फारशी कल्पना नाही. या अनभिज्ञतेची, उदासीनतेची कारणं जामखेडकर सरांनी सांगितली. ते म्हणाले,
'याची काही कारणं इतिहासात दडली आहेत, तर काही आपल्या नाकर्तेपणात आणि काही आपल्या कर्मात. शिक्षण अजूनही सगळयांपर्यंत पोहोचलंय हे छातीठोकपणे सांगता येत नाही. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि गुणवत्ता यात लक्षणीय सुधारणा होईपर्यंत अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. शिक्षणाच्या धोरणात तीन मुख्य घटक अंतर्भूत आहेत. धोरणकर्ते, ही धोरणं अंमलात आणणारं शासन-प्रशासन आणि तिसरा घटक शिक्षक. तिघेही जबाबदार आहेत, पण शिक्षकांच्या उदासीनतेला क्षमा नाही. ते जास्त जबाबदार आहेत. इतके उत्तम पगार असूनही अनेक शिक्षक मन लावून काम करत नाहीत, हे दु:खद आहे.'
जामखेडकर सरांचं काम बहुआयामी आहे. इथवरच्या प्रवासात विविध ज्ञानशाखांचे प्रवाह त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मिसळले. प्राच्यविद्येशी संबंधित बहुतेक सर्वच विषयातली तज्ज्ञता त्यांच्यापाशी आहे. अशी वैविध्यपूर्ण कारकिर्द घडण्यात गुरूंचा वाटा मोलाचा आहे. त्यांचे वडील, तसंच चित्रावशास्त्री यांच्यापासून अनेकांचं मोलाचं मार्गदर्शन सरांना मिळत गेलं. यात डॉ. शां.भा. देव आहेत, डॉ. सांकलिया आहेत, संस्कृतातले अनेक पंडित आहेत.... हाही भाग्ययोग असावा लागतो. सर म्हणतात,
'प्रत्येक क्षेत्रातले अतिशय विद्वान गुरू लाभले हा भाग्ययोग. भारतभर ख्याती असलेले संस्कृतचे पंडित आम्हांला बी.ए.ला शिकवायला होते. डॉ. शां.भा. देव हे माझे प्राच्यविद्येतले आद्य गुरू. त्यांनी प्राच्यविद्येतली सगळी तंत्रं शिकवली. इतक्या मोठया माणसांच्या सान्निध्यात राहून काहीच करू शकलो नाही, तर मग स्वत:लाच दोष द्यायला हवा. आणि जर काही थोडंफार करू शकलो असेन तर त्याचाही अभिमान बाळगण्यात अर्थ नाही. जे करू शकलो, ते या गुरुजनांच्या संस्कारांमुळेच.'
आज वयाच्या पंचाहत्तरीनंतर डेक्कन कॉलेजचे कुलपती म्हणून नवी जबाबदारी सरांवर आली आहे. कसं पाहतात ते या नव्या जबाबदारीकडे, काय संकल्प आहेत? असं विचारलं असता ते म्हणाले,
'डेक्कन कॉलेजही त्याच्या वयाच्या पंचाहत्तरीत आहे. इथे संस्कृत आहे, भाषाशास्त्र, प्राच्यविद्या आहे, इतिहास आहे, त्याचबरोबर 'हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स' या विषयावरच्या बृहद् शब्दकोशाचं काम गेली 60 वर्षं चालू आहे. आतापर्यंत फक्त 'अ' अक्षरापर्यंत हे काम झालं आहे. केंद्र सरकारमधील लोक म्हणतात, आणखी 5 वर्षात हे काम संपवा. त्यांना त्या विषयाचं महत्त्व, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ समजावून सांगावा लागेल. संशोधन संस्था म्हणून डेक्कन कॉलेज ओळखलं जावं यासाठी प्रयत्न चालू आहेत. देगलूरकरांपासून त्याचा पाठपुरावा चालू आहे. तो पुढेही चालू ठेवावा लागणार आहे. त्यातली अनेक कामं मार्गी लावण्याची संधी मला प्राप्त झाली आहे, असं मला वाटतं.'
9594961865
गौरव सोहळा
ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. अरविंद प्र. जामखेडकर हे नुकतेच डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती झाले आहेत, याचे निमित्त साधून विविध ज्ञानशाखांतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी इतिहास संकलन समिती, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - श्ािल्पकार चरित्रकोश, विश्व अध्ययन केंद्र, सोमय्या बुध्दिस्ट स्टडी सेंटर, अनंताचार्य इंडॉलॉजी इन्स्टिटयूट, पां. वा. काणे संशोधन संस्था, साठये महाविद्यालय इत्यादी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिटयूट सभागृह माटुंगा (पूर्व) येथे रविवार दि. 18 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अरविंद प्र. जामखेडकर गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. जामखेडकरलिखित 'पुरासंचय' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.