ही कशानं खळबळ झाली?

विवेक मराठी    10-Sep-2016   
Total Views |



गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या समाजजीवनात एकच विषय गाजतो आहे, तो म्हणजे मराठा समाजाचा. औरंगाबाद, जळगाव, परभणी, धाराशिव, बीड या ठिकाणी लाखोंच्या संख्येत आणि अभूतपूर्व शांततेत हे मोर्चे झाले. येत्या काही दिवसांत सोलापूरला आणि लातूरलाही असे मोर्चे होतील. या मूक मोर्चाचे निमित्त कोपर्डी येथील बलात्काराची घटना पीडित मुलीची हत्या असल्याचे सांगितले जात असले, तरीही समाजाच्या मनात काही तरी वेगळीच दीर्घकालीन खदखद आहे का? आणि अशी खदखद असेल, तर ती आताच का बाहेर येत आहे? या मूक मोर्चातून मराठा आरक्षणांची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित होते आहे. नक्की काय हवे मराठा समाजाला? कसली खळबळ चालू आहे तळागाळात?

शरद पवार साहेबांनी मागच्या आठवडयात पत्रकार परिषदेत काही विधाने केली. त्यातील बहुतांश विधाने मराठा समाजासंबंधी होती. त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी नगर, परभणी, संभाजीनगर येथे मराठा समाजाचे मूक मोर्चे झाले होते, पण खरी चर्चा सुरू झाली ती पवार साहेबांच्या वक्तव्यानंतरच. साहेबांनी सांगितले की ''हे मोर्चे उत्स्फूर्त असून त्याच्या आयोजनाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात संबंध नाही.'' ते खरेच असावे, कारण ज्या संख्येत हे मोर्चे निघत आहेत, तेवढी संख्या जमा करण्याची ताकद पवाराजवळ नाही.. कारण पवारांनी नेहमी तळी उचलली ती पाटील-देशमुखांची, म्हणजेच सरंजामी मानसिकतेत वावरणाऱ्या मूठभर मराठयांची. अशा सरंजाम्यांना हाताशी धरून पवार आजवर बेरजेचे राजकारण करत आले आहेत. संपूर्ण मराठा समाज कधीही त्यांच्यासोबत नव्हता. आज महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत निघणारे हे मोर्चे कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय निघत आहेत. असे जर वास्तव असेल, तर मग मराठा समाज असा अचानक का रस्तावर उतरू लागला, याचा विचार करायला हवा. ठिकठिकाणचे स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः शासकीय नोकऱ्या करणारा मराठा समाजातील घटक या मोर्चाच्या आयोजनात सक्रिय आहे. प्रत्यक्ष मोर्चात महिला, तरुण यांची उपस्थिती विशेष लक्षणीय  आहे. तरुण पिढी अशा मोर्चांतून आपल्या भविष्याचा वेध घेत आहे, तर महिलांना सुरक्षेची हमी हवी आहे. लाखोच्या संख्येने जे मूक मोर्चे झाले, ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरक्षणाची मागणी करत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर स्वतःला मराठयांचे तारणहार म्हणवून घेणारे राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापली मते मांडून या विषयाला केवळ राजकीय रंग देण्यात धन्यता मानली. मराठयांचे सर्व प्रश्न केवळ राजकीय आहेत का? आणि ते केवळ राजकारणाने सुटणार आहेत का? मराठा समाजात आज जी खळबळ आहे, तिचा केवळ राजकीय कुरघोडीसाठी वापर करायचा की काही सकारात्मक राजकारण करायचे, याचा विरोधी आणि सत्ताधारी पक्ष या दोघांनीही विचार करायला हवा. कारण मराठा समाजात असणारी खदखद आजच नीटपणे समजून घेतली नाही, तर उद्या विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनाही त्यांचे परिणाम भोगावे लागतील.


जबाबदारी
कुणाची?

आज मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाने हा मार्ग का स्वीकारला? या गोष्टीचा विचार करताना कमीतकमी पंचवीस वर्षे तरी मागे जावे लागेल. जागतिकीकरणाने बदललेली बाजारपेठीय संस्कृती आणि त्याच्यापासून कोसो दूर असणारा शेतीत राबणारा मराठा समाज हे त्रैराशिक याआधी कधी समजून घेण्याचा प्रयत्न कुणी केला का? विदर्भात, मराठवाडयात शेतकरी आत्महत्या करत असताना कुणी या गोष्टीवर भाष्य केले आहे का? जागतिकीकरणाने जगण्याचे सर्वच संदर्भ बदलत असताना मराठा समाज त्याच त्या परंपरेच्या जोखडाखाली का दबून राहिला? त्याच्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक बाजारपेठीय व्यवहार का पोहोचला नाही? या प्रश्नाचे खापर कोणाच्या माथी फोडायचे? हा कळीचा प्रश्न आहे. सरळ सरळ उत्तर द्यायचे, तर जे सत्तेवर असतात त्यांनी या प्रश्नाची उत्तरे शोधायला हवीत. मग याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले? याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी केले केवळ जातीचे राजकारण आणि शेतीतील आम्हालाच खूप कळते अशा अभिनिवेशात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पाण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांच्यावर झालेल्या गोळीबार आपण विसरलो काय? नाशिकमध्ये सडक्या कांद्यांची माळ गळयात पडूनही कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सोईस्करपणे केले गेलेले दुर्लक्ष आपण विसरलो काय? ''धरणात पाणी नाही, तर काय लघुशंका करू का?'' असा उर्मट सवाल आपण विसरलो आहोत का? एकूणच काय, शेतकरी म्हणजेच शेतात राबणारा मराठा अडचणीत आहे. नापिकी, अवर्षण, बी-बियाणे आणि कीटकनाशके यामध्ये होणारी फसवणूक, वाढलेले मजुरीचे दर या सर्वाचा मुक्तपणे सामना करत आजवर मराठा समाज शेती करत होता. पण आज त्याच्या अडचणीची परिसीमा गाठली आहे, यातूनच एकूणच व्यवस्थेबाबत पराकोटीची चीड निर्माण झाली आहे. या साऱ्या दैन्याला सुरुवातच वीस-पंचवीस वर्षांपूर्वी झाली आहे. वेळीच जर या अडचणीतून मार्ग शोधले असते, तर आज ही वेळ आली नसती आणि आपल्या राजकीय पापाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याची गरजही राहिली नसती.

मराठा समाजाच्या या मोर्चांतून ऍट्रोसिटी ऍक्टबाबत मागणी केली जात आहे. या मागणीचा आधार घेऊन मराठा विरुध्द दलित असे चित्र रंगवण्याचा काहीनी प्रयत्न केला आहे. शरद पवार यांनी आधी हा कायदा रद्द करावा असे म्हटले आणि पेपरमधील बातम्या शिळया होण्याआधीच आपल्या भूमिकेत बदल करून या कायद्याचा राजकीय वापर होतो आहे, तेव्हा त्यात आवश्यक तो बदल व्हावा अशी दुरुस्ती केली. मुळात आपल्या संविधानात दोन प्रकारचे कायदे आहेत. एक कल्याणकारी कायदे आणि दुसरे म्हणजे संरक्षणात्मक कायदे. ऍट्रोसिटी ऍक्ट हा संरक्षणात्मक कायदा आहे. कल्याणकारी कायद्याचा आवश्यकतेनुसार आढावा घेऊन दुरुस्ती वा बदल करणे उचित ठरते. पण संरक्षणात्मक कायद्याच्या बाबत असे करणे धोक्याचे ठरू शकते. अशा संरक्षणात्मक कायद्याचा वापर करण्याची गरजच निर्माण होणार नाही, असे समाजजीवन तयार करणे आणि समाजातील सर्व घटकांना त्याचा अनुभव येणे हेच याबाबतचे उत्तर असू शकते. संरक्षणात्मक कायद्याचा वेळोवेळी अभ्यास जरूर करावा, त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे असा आग्रहही धरावा. पण मागील काही दिवसांतील बदलते समाजजीवन आणि त्यातून निर्माण झालेली खदखद लक्षात घेऊन ऍट्रोसिटी ऍक्टमध्ये बदल करण्याची मागणी करणे योग्य नाही.

शेतीपूरक व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारी अर्थक्रांती किती मराठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे? पारंपरिक शेती करताना आतबट्टयाचा व्यवहार करत आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून जागतिक झालो आहोत. गगनाला भिडणारी महागाई आणि मिळणारा अल्प फायदा लक्षात घेतला, तर शेतीवर हा समाज कसा आणि कशासाठी जगत आहे, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रदीर्घकाळाची दिरंगाई, जाणीवपूर्वक केलेला कानाडोळा आणि मराठा समाज आपल्याला सोडून कोठे जात नाही हा राजकीय गैरसमज यातून मराठयांच्या दैन्याचा जन्म झाला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर विचार करताना आपल्या लक्षात येते की मराठा समाज आज प्रचंड अस्वस्थ आहे. त्यांच्या विकासाची कोणतीही साधने त्याच्यापुढे दिसत नाहीत. शेती तोटयात आहे. त्यामुळे शेती सोडून अन्य पर्याय शोधणे स्वाभाविक आहे. पण ते पर्याय उपलब्ध होत नाहीत, किंवा मराठा असल्यामुळेच ते मिळत नाहीत असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि त्याला कसे उत्तर द्यायचे, यावर भविष्यातील चित्र उभे रहाणार आहे हे लक्षात घ्यायला हवे.

केवळ आरक्षण हाच पर्याय?

'मराठा समाजाला आरक्षण हवे, इतके दिवस मिशांना तूप लावून फिरणारे आज आरक्षणाचा वाडगा मागत रांग लावून उभे आहेत' अशा शब्दांत मराठा आरक्षणाच्या मागणीची खिल्ली काही मंडळींनी याआधी उडवली आहे. मराठयांना आरक्षण मिळावे या मागणीची बीजे मंडल आयोगापासूनच रोवली गेली आहेत. ती काल-परवा केलेली मागणी नाही. माथाडी कामगारांचे नेते व विधान परिषदेचे माजी सभापती कै. अण्णासाहेब पाटील यांनी 1983 साली विधानभवनावर मोर्चा नेऊन मराठयांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी केली होती. अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाने ती मागणी आजही लावून धरली आहे. मराठयांच्या आरक्षणाबाबत याआधी अनेक प्रयत्न झाले आहेत, पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले नाहीत. त्यातील अगदी अलीकडचा प्रयत्न म्हणजे नारायण राणे समितीने केलेले सर्वेक्षण आणि 16 टक्के आरक्षणाची केलेली शिफारस होय. राज्य सरकारने ही शिफारस स्वीकारली, पण तीही कायद्याच्या कसोटीवर टिकली नाही. मागील दहा-पंधरा वर्षांत मराठा आरक्षणाचा विषय हा मताच्या राजकारणाचा विषय झाला आहे.


मराठयांना आरक्षण का हवे? या प्रश्नाचे उत्तर देताना असे सांगितले जाते की मराठा समाजात दारिद्रय आहे, भूमिहीनतेचे प्रमाण वाढले आहे, अज्ञानाचे प्रमाण खूप आहे. आणि म्हणून मराठयांना शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात आरक्षण हवे. वास्तवाचा विचार केला तर ही मागणी रास्त आहे. पण संविधानात आरक्षणाची संकल्पना ही गरिबी निर्मूलनाच्या अर्थाने आलेली नाही किंवा आरक्षणाचा संबंध हा केवळ आर्थिक मागासलेपणाशी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आरक्षणाविषयी आग्रही भूमिका घेताना याचा विचार होतो का? आजवर वेगवेगळया प्रयत्नांतूनही जर मराठयांना आरक्षण मिळाले नाही, तर मग खऱ्या अर्थाने वंचिततेचा अनुभव घेणाऱ्या समाजघटकाचा विकास कशा प्रकारे करायचा, हा गंभीर प्रश्न आहे. मराठा आरक्षणाची मागणी करताना त्याच्यासाठी रस्त्यावर आंदोलन करताना या प्रश्नाची उकल करण्याची आवश्यकता आहे. या साऱ्या परिश्रमातून मराठयांना आरक्षण मिळाले, ते कायद्याच्या कसोटीवर टिकले,े तरी या आरक्षणातून मराठयांचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे का? याचाही विचार करायला हवा. कारण आजचे बदलते संदर्भ लक्षात घेता आपण काळाच्या खूप मागे पडलो आहोत. सर्वच गोष्टींचे राजकारण करण्याच्या हव्यासापोटी समाजाच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण यामुळे दिवसेंदिवस  शातकीय नोकऱ्यांची उपलब्धता कमी होत चालली आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला नाही तर, गुणवत्तेला प्राधान्य आहे. एका बाजूला नोकऱ्यांची संधी कमी होत असताना स्वतंत्र रोजगाराच्या संधी मात्र खूप मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तांत्रिक ज्ञान, कौशल्याधारित शिक्षण असणाऱ्यांना खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. या संधी आता गावोगावीही दिसून येत आहेत. गरज फक्त त्याचा शोध घेण्याची आणि आपली वृत्ती बदलून काम करण्याची आहे. 16 टक्के आरक्षणापेक्षाही या संधींतून समाजाचा अधिक गतीने विकास होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही आडपडद्याने मराठा आरक्षणाला विरोध करत आहोत. आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे आहे की गेल्या सत्तर वर्षांत आरक्षणाची अंमलबजवणी आणि त्याच्या स्पष्ट झालेल्या मर्यादा, त्यातून उभे राहिलेले समाजवास्तव तपासले, तर अशा आरक्षणातून मराठा समाजाच्या हाती फार काही लागेल असे वाटत नाही.

कोपर्डी घटनेचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना अटकही करण्यात आली. पण काही राजकीय नेते या घटनेला एका वेगळयाच वळणावर घेऊन जात आहे. एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्यांना कठोर शासन व्हायलाच हवे यात काही दुमत नाही. पण ते आरोपी आणि पीडित मुलगी कोणत्या जातीची आहे व या प्रकाराला जातीचे लेबल लावण्यात धन्यता मानत आहे. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाने मोर्चा काढला होता. पण केवळघटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा होता की काही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून किंवा समाजाची ताकद दाखविण्याचा हा प्रयत्न होता, हे काही कळले नाही. अशा मोर्चाने मोठयांप्रमाणे तरुणांना आकर्षित केले. दीड लाख लोक यामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चेबांधणीची सुरुवात झाली ती तरुणांच्या अधिक जवळ असलेल्या सोशल मीडियापासून - फेसबुक, टि्वटर, व्हॉट्स ऍप यांच्यामार्फत तरुणांना जातीची महती सांगणारे संदेश पाठविण्यात आले. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सोशल मीडियावर ग्रूप तयार करण्यात आले. #kopardirape, #Maratha kranti morcha या हॅशटॅगखाली लोकांना आकर्षित करण्यात आले, तर फेसबुकवर 'मराठा क्रांती मोर्चा', 'एक मराठा लाख मराठा,' 'स्वाभिमानी मराठा मोर्चा' अशा नावाने लाइक पेज तयार करण्यात आले. लोकांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, पण यामुळे एक समाज दुसऱ्या समाजपासून दुरावला. ज्याप्रकारे आयसीस या माध्यमांचा वापर करून तरुणांना आकर्षित करतात, त्याचप्रकारे आता तरुणांना स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आकर्षित करण्यात आले. समाजामध्ये अशा प्रकारे अराजक निर्माण करणे योग्य नाही.

सकारात्मक विचार व्हावा

मराठा समाज जागृत होत आहे. कोणत्याही नेत्याच्या आवाहनाशिवाय रस्तावर उतरून शांतपणे आपल्या रास्त मागण्यांची मांडणी करतो आहे,ही खूपच आनंदाची बाब आहे. कोणत्याही समाजातील संख्येने मोठा असणारा घटक जितक्या प्रमाणात समाजजीवनात जागृत असायला हवा, तितक्या प्रमाणात मराठा समाज जागृत नव्हता. अपवाद फक्त राजकीय क्षेत्राचा होता. पण आता मराठा समाजाला आपल्या दैन्याची जाणीव झाली आहे आणि तो आता मैदानात उतरला आहे. त्याचा हा संघर्ष कुणाबरोबर आहे? या प्रश्नाचे उत्तर तीन प्रकारे देता येईल. मराठा समाजाचा पहिला संघर्ष हा स्वतःबरोबर आहे. कारण बदलत्या काळाचे वेध घेण्यास हा समाज अपयशी ठरला. त्यामुळे स्वतःशी संघर्ष करून आता या समाजाला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. दुसरा संघर्ष स्वजातीय प्रस्थापित राजकारण्यांशी आहे. इतकी वर्षे केवळ हक्कांची मतपेढी म्हणून मराठा समाजाचा वापर झाला. मराठा जातीचे नेतृत्व म्हणून गौरवाची झूल मिरवणाऱ्या नेत्यांनी समग्र मराठा समाजाचा विचार कधी केला होता का? मूठभरांचा महापूर आल्यासारखा विकास म्हणजे संपूर्ण मराठयांचा विकास कसा ठरतो? याचे कुणीतरी या निमित्ताने संशोधन करायला हवे. मराठयांचा तिसरा संघर्ष जो आहे, तो संभाजी बिग्रेडसारख्या नकारात्मक आणि विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांशी. गेल्या पंधरा-वीस वर्षांत या संघटनांनी अशा प्रकारचा हैदोस घातला की मराठा समाज  विखारी, अविवेकी आणि कर्तृत्वशून्य आहे की काय, असा प्रश्न पडू लागला. अरेरावी, बिनबुडाचे आरोप आणि आणि छत्रपतींचे जातकेंद्रीकरण यामुळे मराठा समाज बदनाम झाला आहे. समाजात जी काही खळबळ आहे, त्याला ही काही न दिसणारी, पण मराठा समाजाच्या मनाला टोचणारी कारणे आहेत. गेली अनेक वर्षे ही सल भोगल्यानंतर ही स्थिती आली आहे. त्यामुळे हे मोर्र्चे अचानक झाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

मराठा समाज आज जे मोर्चे काढत आहे, ते शांततेत पार पडत आहेत. स्वयंस्फूर्तीने एवढा मोठा समाज जर एकत्र येत असेल आणि आपल्या मागण्या घटनात्मक मार्गाने मांडत असेल, तर ही मराठा समाजाची सकारात्मक ऊर्जा आहे असे समजायला काहीही हरकत नाही. या सकारात्मक ऊर्जेचा समाजाच्या भल्यासाठी अधिक मोठया प्रमाणात कशा प्रकारे उपयोग करता येईल, याचा विचार मराठा समाज मोर्चाच्या आयोजकांनी करायला हवा. मराठा समाजाच्या मोर्चातून आज मांडल्या जाणाऱ्या मागण्या भविष्यात मान्य होतील. मोर्चाचे औचित्य संपून जाईल. पण या जागृत झालेल्या समाजाचे काय? या निमित्ताने आपल्या सुप्तशक्तीची जाणीव झालेला या समाजाचे पुढे मार्गक्रमण कसे होणार? या सकारात्मक शक्तीला केवळ मोर्चे, आंदोलनासाठी वापरायचे की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या शक्तीचा वापर करायचा, यावर मराठा समाजाची भविष्यातील वाटचाल ठरणार आहे.

जागतिकीकरणानंतर बदलेले अर्थकारण, गावगाडयावर झालेला त्याचा परिणाम, नैसर्गिक आपत्ती, बदलते हवामान आणि कृषी जगतावरचा त्याचा परिणाम, शिक्षण क्षेत्रातील नव्या संधी, माहिती तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या साऱ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून मराठयांची जागृत झालेली सकारात्मक शक्ती कामी लावावी लागेल. यातूनच समाजाला स्थायी स्वरूपाचे स्थैर्य प्राप्त होईल.

 भविष्याचा वेध घेताना

आता मराठा जागा झालाच आहे, तर त्यांने सर्वक्षेत्रीय भविष्याचा वेध घ्यायलाच हवा. कारण जे भूतकाळात रमतात, त्यांचा वर्तमानकाळ दिशाहीन होतो आणि भविष्यात काही शिल्लक राहत नाही हा धडा लक्षात घेऊन आता मराठा समाजाने आता भविष्यवेधी व्हायला हवे. काय असेल मराठयाचे भविष्य? राजकारणाच्या दलदलीत सडणारी मतपेढी, संभाजी बिग्रेडच्या विखारी आणि विद्वेषी विचाराने कुपोषित झालेली युवा पिढी, की आहे त्या वास्तवातून भरारी घेऊन स्वतःला सर्वार्थाने एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेला सुजाण समाज, जो परस्परांशी भ्रातृभावाने जोडलेला असेल आणि सर्वांगीण विकासाची त्याला भूक असेल.  आम्हाला वाटते की मराठा समाजाला विकासाची तीव्र भूक आहे. आणि त्याची परिपूर्ती कशी करायची? हा प्रश्न आहे.

काळाचे भान ज्यांना येते, ते नवे मार्ग चोखाळतात आणि त्यांची पायवाटच महामार्ग होऊन जातो. केवळ आरक्षणातून आपला उध्दार होणार नाही हे लक्षात आल्यावर मिलिंद कांबळेंनी भविष्याचा वेध घेत डिक्कीचा प्रयोग सुरू केला. गेल्या बारा वर्षांत डिक्की देशभर पसरली आहे. मिलिंद कांबळे यांचा प्रवास विद्रोहाकडून नवसृजनाकडे जाणारा आहे. हे लक्षात ठेऊन अशा प्रकारच्या भविष्यवेधी नेतृत्वाची आणि राजकारणापेक्षा समाजकारणावर प्रगाढ श्रध्दा असणाऱ्या समूहाची मराठा समाजाला खूप मोठी गरज आहे. ही गरज जसजशी पुरी होत जाईल, तसतशी मराठा समाजाची विकासभिमुखता वाढत जाईल.

महाराष्टातील गेल्या काही दिवसांतील मराठा समाजाच्या मोर्चातून समाजमन ढवळले आहे. समाज अस्वस्थ आहे याबाबत शंका घेण्याचे काही एक कारण नाही. पण महिलांवरील अत्याचार, ऍट्रोसिटीचा गैरवापर आणि बेरोजगारी आहे म्हणून आरक्षणाची गरज एवढीच कारणे या मोर्चामागे नाहीत, तर त्यापेक्षाही आपण वर चर्चा केलेल्या दाहक वास्तवाचा अनुभव समाज घेत आहे आणि त्याच कारणामुळे कुणी नेतृत्व न करताही मराठा समाज मैदानात उतरलाच आहे. आता भविष्याचा वेध घेण्यास त्याने सज्ज व्हायला हरकत नाही.

9594961860

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001