द गेम जस्ट बिगॅन

विवेक मराठी    06-Aug-2016
Total Views |

बहुचर्चित 'रिओ ऑलिम्पिक 2016' या खेळाच्या महाकुंभाला अखेर सुरूवात झाली आहे. रिओ द जानेरो येथील मरकाना स्टेडियमवर उद्घाटन सोहळयाने 31 व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दमदार सुरूवात झाली. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता या सोहळयाला सुरूवात झाली. ऐतिहासिक मरकाना स्टेडियमवर 75 हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 2008 सालच्या बिजिंग ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय हॉकी संघाला मात्र अतिशय नेत्रदीपक अशा या सोहळयाला मुकावे लागले. कपडयांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भारतीय हॉकी संघाला या सोहळयात भाग घेता आला नाही. 207 देशांचे खेळाडू यावर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत.


मरकाना स्टेडियमवरील फटक्यांच्या नयनरम्य आतषबाजीमुळे परिसर झगमगून गेला होता. रिओ ऑलिम्पिक सोहळयात सगळयांचे लक्ष वेधून घेतले ते थ्रीडी इफेक्टने उभारलेल्या देखाव्याने. ब्राजीलच्या विकासाचा आतापर्यंतच प्रवास या थ्रीडी फिल्ममध्ये दाखविण्यात आला.  ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे सादरीकरण रिओचे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संरक्षणासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे सादरीकरण करण्यात आले.

रिओ ऑलिम्पिक 2016च्या सोहळयाला ब्राझीलची प्रसिध्द मॉडेल 'जिसेल बुंडेचन'ची उपस्थिती होती. आर्थिक मंदी आणि ब्राझीलवासियांचा असलेला असंतोष अशा सगळया बिकट परिस्थितीतसुध्दा ब्राझील सरकारने ऑलिम्पिक सोहळयाचे उत्तम आयोजन केले. केवळ फटक्यांची रोषणाई किंवा सांस्कृतिक सादरीकरणच नव्हे तर या सोहळयात सादर करण्यात आलेले प्रत्येक प्रात्यक्षिक हे सामाजिक संदेश देणारे होते. ज्यावेळेस ब्राझीलच्या संघाचे आगमन झाले. तेव्हा 'ब्राझील' 'ब्राझील' अशा जयघोषाने आख्खे स्टेडियम दणाणून गेले. 2012 साली इंग्लंडमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तुलनेत ब्राझीलमधील आयोजन हे दमदार असेल यात शंकाच नाही. जब आगाज ही शानदार हो जाए, तो अंजाम भी शानदार ही होगा. 10000 हजार खेळाडू आता आपल्या देशाच्या गौरवासाठी रिंग ऑफ ग्लोरीच्या या स्पर्धेत उतरणार आहेत. ऑलिम्पिक मशाल प्रज्ज्वलित करण्याचा मान यावर्षी ज्येष्ठ खेळाडू पेले यांना देण्यात आला होता पण तब्येत ठीक नसल्याकारणाने ब्राझीलच्या माजी मॅरेथॉन खेळाडू 'वांदरलेय कॉर्डेइरो दि लिमा' यांना हा मान देण्यात आला.