अंकुराचे होता रोप

विवेक मराठी    30-Aug-2016
Total Views |

शिकण्याची वर्षं आयुष्यातून वजा केली तर काहीच राहत नाही असं मला वाटतं का? त्या 10-15 वर्षांतलं मला ठळकपणे काय आठवतं? माझ्यात बदल काय काय झाले? या प्रश्नांची उत्तरं जर माझ्याकडे असली, तर त्या शिक्षणाला अर्थ. खरं जगणं तर नंतरच सुरू झालंय. मी इतरांशी माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे? समाजाप्रती माझी काय काय जबाबदारी आहे? सर्वांशी माझे नातेसंबंध कसे आहेत? मला सवयी कोणत्या आहेत? मी विचार कसा करते? कोणत्या कोणत्या अंगांनी माझ्यात समृध्दता आली आहे? अशा प्रश्नांची उत्तरं शिक्षणातून मिळतात का?


''ता
ई तुमच्या ओळखीनं मला त्या शाळेत प्रवेश मिळवून द्याल का हो?''

''काही जागा आहेतच तुमच्यासाठी. ओळख कशाला हवी?''

''असं वाटतं तुम्हाला.''

''बरं, का रे त्या शाळेत प्रवेश हवा?''

''पोराच्या बरोबरीच्यांनी प्रवेश घेतलाय तिथं! याला वाटणारच ना!''

''परवडणारे का तुला?''

''करीन दोन कामं जादा. उद्या पोरानं म्हणायला नको. आम्ही असंच राहिलो. पोरांना तरी तसं राहायला नको. चांगल्या शाळेत शिकला, चांगली नोकरी मिळेल. आता गरिबांना वेगळया शाळा, श्रीमंतांना वेगळया.''

''तू कोण आहेस?''

''पण तुम्हाला ठाऊक नाय का? नाय परिस्थिती. पोरांना कुठं जाणीव आहे? पोरांना वाटतं, बापाने कायपण करावं पण त्यांना हवं ते मिळवून द्यावं.. तुम्हाला सांगतो, आता गावाकडंपण हीच परिस्थिती आहे. पोरं पिवळया गाडीत बसून जावीत, बुटं-टाय लाऊन साळंला जावी असं वाटतं. त्यांना वाटणं बरोबरच आहे. एकतर लोक तसं करतात नायतर शहरात एक जण बिऱ्हाड करतं नि सगळयांची पोरं साभाळतं.''

''हो का रे? खूपच माहिती आहे तुला!''

''गावाकडनं फोन येतात. सगळा कळताच ना!''

मी मनात एवढंच म्हणाले - काळ बदलाय. कुणालाही वाटणारच ना ही संधी आपल्याही मुलांना मिळावी म्हणून! तिथलं सगळं जगणं परवडणारे का तुला? असं मला विचारावंसं वाटलं, पण मी विचारलं नाही. म्हणाले, ''करते प्रयत्न.''

''हे काम झालं तर तुम्हालाही देईन थोडे...''

''वा! बरीच तयारी केली आहेस तर!''

''काय करणार! सगळी तयारी ठेवावी लागते...''

लोक नक्की कशाला भुलले आहेत? माध्यमाला? चकचकीतपणाला? तिथे गुणवत्ता आहे या भासाला? बाहेरच्या पोशाखीपणाला? अद्ययावतपणाला? तंत्रज्ञानाला?... काय चाललंय हे समजून घेण्याच्या मनःस्थितीतच नाही आम्ही. जर लोकांना हे हवंय, तर सगळीकडे का नाही आणता येत हे आम्हाला! सरळ हिशोब आहे - ज्याला परवडतं, त्याने तिथे संधी घ्यावी. वडापाव 10 रुपयाला मिळतो नि एअरपोर्टवर 50 रुपयाला. मटेरियल तेच. जागा बदलते, इतकंच.

तसंच शिक्षणाचं चाललं आहे. खूप गोंधळलो आहोत. इकडे घोकंपट्टीतून बाहेर पडू या, मुलांना शिकण्याच्या संधी देऊ या असं म्हणताना अधिकच परीक्षार्थी आणि परीक्षार्थी होताहेत मुलं. नाहीतर टेस्ट सिरीजची दुकानं वाढली नसती. टॅलंट टेस्ट करणाऱ्या परीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढली नसती. खपतंय म्हणून नवीन निघतंय. आपण हे सगळं बदलणारे कोण? बदलायचंच असलं तर याचं खरं उत्तर आपणच. स्वत:ला बदलू या. नीट विचार करू. निर्णय घेऊ. असा काही विचार करणाऱ्यांशी बोलू.

कुठलं तरी छान चलनी नाणं असलेलं नाव घेऊन वाडीवस्तीवरही दुकानं दिसतात. प्रश्न दुकानं निर्माण झाली आहेत हा नाही. प्रश्न आहे जे चाललेलं दिसतं त्याचा! मराठीचा बाजच तिथेही इंग्लिशमध्ये वावरताना दिसतो. ज्या हेतूने आपण निवड करतो तो हेतूच आपल्याला तरी कुठे नक्की माहीत असतो? एकदम एक प्रचंड लाट येते नि आपल्या सगळयांनाच घेऊन जाते. मग काय शिल्लक राहतं? आपण.

मी काय शिकले/शिकलो? त्यातलं किती लक्षात आहे आणि काय उपयोगी पडतं? मला आनंद किती मिळाला? शिकण्याची वर्षं आयुष्यातून वजा केली तर काहीच राहत नाही असं मला वाटतं का? त्या 10-15 वर्षांतलं मला ठळकपणे काय आठवतं? माझ्यात बदल काय काय झाले? या प्रश्नांची उत्तरं जर माझ्याकडे असली, तर त्या शिक्षणाला अर्थ. खरं जगणं तर नंतरच सुरू झालंय. मी इतरांशी माणूस म्हणून कसं वागलं पाहिजे? समाजाप्रती माझी काय काय जबाबदारी आहे? सर्वांशी माझे नातेसंबंध कसे आहेत? मला सवयी कोणत्या आहेत? मी विचार कसा करते? कोणत्या कोणत्या अंगांनी माझ्यात समृध्दता आली आहे? अशा प्रश्नांची उत्तरं शिक्षणातून मिळतात का?

इथून गुणवत्तेचा प्रदेश सुरू होतो. त्या दृष्टीने आपल्याला काम करायला हवं. सगळं तसं अमूर्त वाटतंय ना? तसंच आहे. प्रत्येक शिक्षणकेंद्र वेगळं असायला हवं. कारण तिथे विचार करणारी माणसं वेगळी असणार आहेत. आपल्याकडे तर उलट आहे. साचा जितका घट्ट करता येईल तितका घट्ट करतो आपण. ज्याला जसा अर्थ घ्यायचाय तसा घेतो आपण. एका शाळेत गेले होते. दोघे शिक्षक काम करत बसले होते. मुलांचे गट केले होते. त्यांच्याकडे काही काही पट्टया दिल्या होत्या.

''काय म्हणताय?''

''मस्त. मुलं मुलांचं काम करतायत. आम्ही आमचं.''

''मुलांना काम काय दिलंय?''

''गटाप्रमाणे काय दिलंय. त्याचं त्यांचं ते करतात...''

''जावं लागत नाही त्यांच्याजवळ -''

''अजिबात नाही. शैक्षणिक साधनं त्यांना दिलीत. त्यांच्या मनाप्रमाणे ते वापर करतात.''

''अरे वा! छान! म्हणजे भरपूरच साधनं तयार केली असतील...''

''हो! सतत काही ठरावीक वेळाने बदलतो गट.''

''त्यांनी काय केलं त्या वेळात हे कसं पाहता?''

''पाहतो ना. साधारण लक्ष असतं आमचं!''

''नंतर काय द्यायचं मुलांना हे कसं ठरवता?''

''ठरवतो तसंच. काय काय द्यायचंय त्याचा अंदाज आलाय आम्हाला!''

''आताच्या वेळात त्यांनी काय केलं, कुणाला कुठे गरज पडली का तुमची, हे कसं ठरवता? मला समजून घ्यायचंय म्हणून विचारतेय.''

''त्याबद्दल काही नाही. मुलांनी काय केलं, काय समजून घेतलं हे काही असं रोज पहात नाही आम्ही. पण कळतं. कुणाला गरज पडली तर मुलं येतात विचारायला. भांडण वगैरे झालं तर येतात. तुम्ही म्हणताय तशा नोंदी ठेवायला हव्या. पण कशा ठेवायच्या? नोंदवायचं काय? हे अजून लक्षात येत नाही. एक मात्र नक्की - मुलांनी मुलांचं शिकणं यात त्यांना मजा येते. मुलं गोलात बसतात. नंतर गोल विस्कटतो. त्यांना हवं तिथं बसतात गटात. वेगवेगळया पट्टया त्यांना दिलेल्या असतात. त्या एकमेकांना देतात. एकमेकांना मदत करतात. समजून घेतात. मजा वाटते. आम्ही शिकवतो तेव्हा 'चला रे ओळीत बसा...' नुसतं ओरडावं लागायचं. आता नाही. एक नक्की, दिवसाच्या समारोपाला मुलांकडूनच हे जाणून घेऊन नोंद ठेवता येईल. छानच सुचवलं तुम्ही... गरज आहे त्याची!''

दोघंही स्वीकारण्यास तयार, हे छानच नाही का!

9403693275

renudandekar@gmail.com